गढवाली कला

(गढवाल कला या पानावरून पुनर्निर्देशित)

गढवालचा विभाग पंजाबच्या टेकड्यांच्या आग्नेयीस आहे. त्याची ही अलग अवस्थाच त्याचे स्वतंत्र अस्तित्त्व आणि लघुचित्रणातील त्याची किरकोळ परंतु महत्त्वाची सिद्धी विशद करते.


१६५८ मध्ये औरंगजेबापासून त्याचा पुतण्या सुलैमान गढवालला पळून जात असता त्याने दोन कलावंत बरोबर नेले. त्यांनी प्रवर्तित केलेली शैली जुजबी असून ती मोलारामच्या (१७५०–१८३३) काळापर्यंत तशीच अनाकर्षक राहिली. चित्रकार म्हणून मोलाराम हा ओबडधोबड आणि अकल्पक होता. गढवाल संस्थानात बाहेरून येणाऱ्या लोकांविषयी त्याच्या मनात अढी होती, हे त्याच्या लेखनावरून दिसून येते. या नव्यांच्या या प्रांतात झालेल्या आगमनामुळे नव्या शैलीचा आविष्कार घडला, हे स्पष्ट दिसून येते. कदाचित हा बदल घडण्यास शेजारचा कांग्रा संप्रदायही कारणीभूत झाला असावा किंवा राजा प्रद्युमनाचा गुलेर संस्थानच्या राजकन्येबरोबर विवाह झाला, त्यामुळेदेखील हे परिवर्तन घडले असावे. एक गोष्ट मात्र खरी, की या नव्या घटकामुळे या प्रांतात एक वैशिष्ट्यपूर्ण नवी शैली घडली गेली हे एका अनामिक कलाप्रभूच्या कृतींत दिसते. त्याची विसांहून कमीच चित्रे उपलब्ध आहेत. त्याच्या कृतीतली पहिली अवस्था काव्यात्म भाववृत्तीची आहे. उत्क नायिकांच्या त्याच्या चित्रणात त्याने निळे, तांबडे रंग काळ्याशार व हिरव्या रंगांत आलटून पालटून वापरले आहेत.

त्यानंतरच्या त्याच्या कृतींच्या दुसऱ्या अवस्थेत निसर्गदृश्यांबद्दलचे भान प्रकट झालेले दिसते. झाडाच्या निष्पर्ण फांद्या सडपातळ नारीप्रमाणे कमनीयतेने खाली वाकलेल्या दिसतात. दोन प्रियजन बाझबहादूर व रूपमती चांदण्यारात्रीच्या एकांतवासात आहेत, हे चित्र या दुसऱ्या अवस्थेचे निदर्शक आहे. गढवाल अभिव्यक्तीचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य तिसऱ्या अवस्थेत आढळते. कालियादमन या चित्रात दिसणाऱ्या जललहरी. त्यातील कुरळ व बाकदार आकृत्या गढवाल संप्रदायाची गुंफित लय अभिव्यक्त करतात.

त्यानंतरचे कलावंत पहिल्या कलाप्रभूच्याच कृतींचे अनुकरण करण्यात संतुष्ट होते. हे अनुकरण त्याच त्या नारीसदृश असणाऱ्या निष्पर्ण शाखा, तारकाकार फुलाची टोके, उसळत्या पाण्याचे वातावरण इत्यादींतून दिसते. नवे अगर वैशिष्ट्यपूर्ण असे काही देण्याजोगे त्यांच्याजवळ नव्हतेच. १८०३ मध्ये या भागावर आक्रमण झाले व तेथील कलावंत राजधानी सोडून निघून गेले.

गढवाल संप्रदायाचा एकमेव वारसदार चैतूशहा (टेहरीमध्ये काम करणारा) याने एकोणिसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात निष्पर्ण तेच ते वृक्षांचे वातावरण निर्माण केले फक्त त्याने झाडे अधिक उजाड पार्श्वभूमीवर काढली.