गंगाधरराव नेवाळकर
झाँसी नरेश महाराधिराज श्रीमंत महाराज गंगाधरराव नेवाळकर बाबासाहेब (१८१३ - २१ नोव्हेंबर, १८५३: झांसी, उत्तर प्रदेश) हे मराठा साम्राज्याचे झाशी येथील सुभेदार / महाराजा होते. इ.स. १८५७चा स्वातंत्र्यलढ्यातल्या सेनानी राणी लक्ष्मीबाई या त्यांच्या पत्नी होत्या.
१८१३ साली महाराजा शिवराव भाऊ आणि महाराणी पद्माबाई यांचे पोटी जन्म झाला. महाराज गंगाधरराव हे त्यांचे धाकटे पुत्र होय. कृष्णराव, रघुनाथराव तृतीय यांच्या नंतर इंग्राजांनी गंगाधररावास झांशी नरेश म्हणून सिंहासनी बसविले. त्यामुळे घरातील नातेवाईक राणी सखुबाई, राणी जानकीबाई, राणी लछ्छोबाई, चंद्रकृष्णराव, अली बहादुर झांसी असे सर्व आप्तेष्ट गंगाधररावांचे शत्रू झाले.
गंगाधररावांच्या पहिल्या पत्नी महाराणी रमाबाई यांचे निधन झाले. आणि म्हणून मोरोपंत तांबे यांची कन्या मनिकर्णिका हिच्याशी त्यांचा दुसरा विवाह झाला. मनिकर्णिका अर्थातच महाराणी लक्ष्मीबाई होय. महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यात खूप वर्षाचे अंतर होते. राणी लक्ष्मीबाईंचे पहिले मुल हे बालपणातच दगावले. म्हणून गंगाधरराव आणि लक्ष्मीबाई यांनी पारोळ्याचे जहागीरदार चुलत बंधू वासुदेवराव नेवाळकर यांच्या आनंदराव नावाच्या मुलाला दत्तक घेतले. व त्याचे नाव आपल्या मृत मुलाच्या नावावर दामोदर राव असे ठेवले. महाराजा गंगाधरराव हे कलाप्रेमी होते. त्यांची स्वतःची रंगशाळा होती. त्यात ते स्वतः नाटक, नृत्य, रासलिला, रामलिला, नळ दमयंती स्वयंवर, मेनका आणि विश्वामित्र. नाटक आणि तांडव करीत असत. तसेच त्यांचा वाचनाचा छंद होता. भारतातील दुसरे मोठे पुस्तकालय महाराजा गंगाधरराव यांच्या महालात होते.
दत्तक विधीच्या दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर १८५३ दुपारी ३ वाजता दीर्घ आजाराने महाराजा गंगाधरराव यांचे निधन झाले. महाराणी लक्ष्मीबाई यांनी महाराज गंगाधरराव यांच्या स्मरणार्थ त्यांची भव्य अशी समाधी उभारली. त्यांच्या मृयूनंतरदेखील दामोदर रावांच्या नावे महाराणी लक्ष्मीबाई यांनी कारभार पाहिला पण १८५४ ते १८५७ महाराणी राजमहाल सोडून राणी महालात साधारण आयुष्य जगत होत्या. १८५७ घ्या संग्रामानंतर त्या पुन्हा झांशी व बुंदेलखंडाच्या साम्राज्ञी झाल्या. एप्रिल १८५८ नंतर झांशी युद्ध आरंभिले. आणि १७ जून १८५८ ला महाराणी लक्ष्मीबाई युद्धात धारातीर्थी पडल्या. व झांशी राजशाही संपुष्टात आली.