ख्रिश्चन धर्माचा इतिहास
ख्रिश्चन धर्म हा लोकसंखेच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा धर्म आहे. ख्रिस्ती धर्माला जवळजवळ २००० वर्षांचा इतिहास आहे. या धर्माचा उगम पालेस्तीन (म्हणजे आताचा इस्राएल देश) येथे झाला. प्राचीन यहुदी धर्मातून ख्रिस्ती धर्माचा विकास होत गेला. येशू ख्रिस्त हा या धर्माचा प्रवर्तक मानला जातो.[१] स्वतः येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य हे धर्माने यहुदी होते. ख्रिस्ती शकारंभी बलाढ्य रोमन साम्राज्य अटलांटिक महासागरापासून तुर्कस्तानपर्यंत व जर्मन समुद्रापासून सहारापर्यंत पसरले होते. पालेस्तीन हा या रोमन साम्राज्यातील एक सुभा होता. योग्य वेळी जेरुसलेम शहराजवळच्या गालील प्रांतात, बेंथलेहम या गावी मरिया नावाच्या एका यहुदी कुमारीकेपोटी ख्रिस्ताचा जन्म झाला. पुरुषाच्या संपर्काशिवाय पवित्र आत्माच्या द्वारे मरिया कुमारी असतानाच हा जन्म झाला. हा एक चमत्कारच होता. असा ख्रिस्ती धर्माचा विश्वास आहे. मरीयेचा वाग्दत्त पती योसेफ याने तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारले. त्या काळी पालेस्तीनवर रोमन सत्ता होती. सम्राट औगुस्तुस हा रोमचा बादशहा होता व हेरोद राजा हा त्याचा मांडलिक राजा म्हणून गालील प्रांतावर राज्य करीत होता. ख्रिस्ताचा जन्म नक्की कधी झाला याची नक्की तारीख उपलब्ध नाही. परंतु अलीकडील संशोधनानुसार इसवी सन पूर्व ४ ते ६ या दरम्यान मार्च किवा एप्रिल महिन्यात त्याचा जन्म झाला असावा असा कयास आहे[२].[ संदर्भ हवा ] आज जो ख्रिस्ती शक (इसवी सन A. D.) आपण वापरतो त्याची सुरुवात ख्रिस्ताच्या जन्मापासून झालेली आहे. वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत तो सुताराचे कार्य करीत होता. मग शाश्वत स्वर्गीय राज्य येणार असल्याची शिकवण देण्यास त्याने सुरुवात केली.
ख्रिस्ती धर्माच्या विकासाचे विश्लेषण | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | इतिहासाचा पैलू | ||
---|---|---|---|
उपवर्ग | इतिहास | ||
चा आयाम | ख्रिश्चन धर्म | ||
पासून वेगळे आहे |
| ||
| |||
आपले कार्य पुढे अखंड चालू राहावे यासाठी त्याने बारा अनुयायांची निवड केली. तेच बारा शिष्य किवा प्रेषित होत. ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना मनपरीवर्तनावर विशेष भर देण्याचा उपदेश केला. त्याने पारंपारिक यहुदी धर्मातील कर्मकांङ यांना विरोध केला किवा त्याला नवीन मानवतावादी वळण देण्याचा प्रयत्न केला. त्याने सागितलेले नीतीनियम मुख्यत: मानवप्रेमावर आधारलेले होते. कारण सर्व माणसे ही स्वर्गातील पित्याची लेकरे आहेत अशी त्याने शिकवण दिली. तसेच तो स्वतः मार्ग, सत्य व जीवन आहे. माझ्या द्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी जात नाही. असे त्याने उद्घोषित केले. (योहान १४:६) . प्रभूने आपल्या प्रेषितांना मोठा अधिकार बहाल केला. या अधिकारी वर्गाचा प्रमुख म्हणून त्याने पेत्राला निवडले. (मत्तय १६, १८-१९, योहान २१:१५-१७). जेथे हा अधिकारी वर्ग राहील तेथे ख्रिस्त व त्याचे मंडळ राहील. " जो तुमचे ऐकतो तो माझे ऐकतो., जो तुम्हास तुच्छ लेखतो तो मला तुच्छ लेखतो. (लूक : १०:१६) रोग, मृत्यू व पाप यांचे जिच्यापुढे काहीच चालू शकत नाही अशी एक अद्वितीय ईश्वरी शक्ती जगात प्रविष्ट झाली आहे, याची लोकांना प्रचीती यावी म्हणून ख्रिस्ताने पुष्कळ चमत्कार केले. बऱ्याच कर्मठ यहुदी धर्माधिकाऱ्याना येशूची क्रांतिकारी शिकवण रुचली नाही. ख्रिस्त काहीतरी भयंकर बोलतो असे वाटून त्यांनी त्याच्या नाशाची कुटील योजना आखली. तत्कालीन रोमन सत्ताधीकार्यांच्या मदतीने येशूला क्रुसावर खिळून ठार मारण्यात आले. त्याचे बहुतेक शिष्य त्याला सोडून लपून बसले. मानव व ईश्वर यांचे पापामुळे नाहीसे झालेले सख्य वधस्तंभावरील मरणाद्वारे ख्रिस्ताने पुन्हा सांधले. अशी ख्रिस्ती श्रद्धा आहे.
ख्रिस्ताने आधीच सांगितल्याप्रमाणे त्याच्या वधानंतर तीन दिवसांनी त्याचे पुनरुत्थान झाले. तो पुन; जिवंत होऊन उठला. आणि चाळीस दिवस दृश्य स्वरूपात आपल्या शिष्यासमवेत राहिला. त्यानंतर त्याचे स्वर्गारोहण झाले. याच समयी त्याने पेत्राला सागितले होते की, " तू पेत्र (म्हणजे खडक) आहेस. व या खडकावर मी आपली मंडळी उभारीन. (मत्तय १६:१८). आपल्या शिष्यांना ख्रिस्ताने पापांची क्षमा करण्याचाही अधिकार दिला. (योहान २०: २१-२३). चाळीस दिवसानंतर ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना शेवटचा आदेश दिला. (मत्तय २८; १९-२०). त्याने त्यांना जगभर जाऊन त्याच्या शिकवणुकीचा प्रसार करण्याचा आदेश दिला. जगाच्या अंतापर्यंत मी सदैव तुम्हाबरोबर राहीन असे अभिवचन त्याने आपल्या शिष्यांना दिले. त्यानंतर त्याचे स्वर्गारोहण झाले. (अंदाजे कालखंड इसवी सन पूर्व ४ ते ३0).
ऐतिहासिक आधार - ख्रिस्ताचा मृत्यू, पुनरुत्थान व स्वर्गारोहण यानंतर त्याच्या आदेशानुसार त्याचे शिष्य सुवार्ताप्रसार करण्यासाठी विविध ठिकाणी गेले. याच कालावधीत त्याची कृत्ये व शिकवण यांचा संग्रह लिखित स्वरूपात शब्दबद्ध करण्यात येऊ लागला. ही शिकवण मुखत्वे चार शुभवर्तमानात आढळते. हे चौघे शुभवर्तमानकार म्हणजे मत्तय, मार्क, लूक व योहान हे होत. योहान व मत्तय हे ख्रिस्ताचे प्रेषित होते. व त्याच्या सहवासात कित्येक वर्ष राहिले होते. मत्तय हा कर वसूल करणारा अधिकारी होता. तर लुक हा वैद्य असून पौलाचा सहकारी होता. ख्रिस्ती इतिहासाच्या सुरुवातीच्या कालखंडाबद्दल माहिती देणारे नव्या करारातील उत्तम पुस्तक म्हणजे प्रेषितांची कृत्ये हे होय. अशा रीतीने नव्या करारातील लिखाणाचा जन्म झाला. ख्रिस्ताच्या जीवनाबद्दल अनेक यहुद्यानी देखील लिहून ठेवले आहे. त्यापैकी जोजेफस फ्लावियास (इसवी सन ३७-१०५) हा विशेष उल्लेखनीय आहे. त्याचा ग्रंथ " ॲन्टीक्विटास युदेओरुम " ( इसवी सन ९३) हा होय. रोमन इतिहासकारापैकी प्लीनियास, सेकंदस मायनर, कर्नेलीउस, टॅंसिटास हे विशेष उल्लेखनीय होत. त्यापैकी प्लीनियास आशिया मायनर मध्ये महत्त्वाचा आहे. इसवी सन १११ ते ११३ मध्ये तो सरकारचा अधिकृत प्रतिनिधी होता. टॅसिटसने आपल्या 'अन्नालस' या ग्रंथात असे नमूद केले आहे कि रोमन बादशहा टायबेरीयासच्या कारकिर्दीत, बादशहाचा प्रतिनिधी पोन्तियास पायलट (उर्फ पोन्ति पिलात) याने ख्रिस्ताला देहांताची शिक्षा दिली.
ख्रिस्तमहामंडळाचा भूमध्यसमुद्राभोवतालचा विस्तार (इसवी सन ३३ ते ५००) - प्रेषितांद्वारे प्रसार :
जेरुसलेम येथे - येशूच्या स्वर्गारोहणानंतर त्याच्या शिष्यांनी जेरुसलेममध्ये जाऊन प्रार्थना करण्यास सुरुवात केली. आणि ज्या पवित्र आत्म्याच्या आगमनाचे वचन प्रभूने दिले होते. त्याची ते वाट पाहू लागले.. दहाव्या दिवशी म्हणजे पेन्तेकॉस्टच्या सणाच्या दिवशी त्यांच्यावर पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला. यानंतर ख्रिस्ताच्या प्रेषितांना सामर्थ्य प्राप्त झाले. स्वतःला अपरिचित अशा विविध भाषात ते प्रभूचा संदेश देऊ लागले. त्या वेळी हा सण साजरा करण्यासाठी निरनिराळ्या देशांतून बहुभाषिक यहुदी जेरुसलेम येथे जमले होते. त्यांनी आपआपल्या भाषेत प्रेषितांना संदेश देताना ऐकले व ते आश्चर्याने थक्क झाले. त्या वेळी पेत्राने उभे राहून त्यांना प्रभूच्या सुवार्तेची घोषणा केली. परिणामस्वरूप त्या दिवशी ३००० लोकांनी बाप्तिस्मा स्वीकारला असे नव्या करारात नमूद केले आहे. अशा रीतीने शुभवर्तमान प्रसाराला जेरुसलेमपासून सुरुवात झाली.
ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबद्दल प्रेषित मोठ्या उत्साहाने घोषणा करू लागले. परमेश्वराने पुष्कळ चमत्काराच्या द्वारे आपण त्यांच्याबरोबर आहोत ही गोष्ट उघड केली. यहुदी धर्मातील मुख्य याजक व इतर धार्मिक पुढाऱ्यानी त्यांना येशूच्या नावे प्रचार करण्यास मनाई केली. परंतु पेत्र त्यांना म्हणाला , "आम्हाला मानवी आज्ञेपेक्षा परमेश्वरी आज्ञा पाळली पाहिजे." (प्रे. कृत्ये ४:१९). त्यामुळे प्रेषितांचा छळ चालूच राहिला. थोड्याच दिवसात येशूचा प्रेषित स्टेफान याला प्रभू येशूविषयी साक्ष दिल्याबद्दल दगडमार करून ठार करण्यात आले. परंतु कोणत्याही मानवी सत्तेला शुभवर्तमानाचा प्रसार छळाने किवा बळाने रोखता आला नाही. या सर्व जुलूमामुळे ख्रिस्ती लोकांची पांगापांग झाली व ते सर्व पालेस्टाइनभर पसरले. आणि त्यांनी आपल्याबरोबर ख्रिस्ताचे शुभवर्तमान पसरविले. ख्रिस्ताचे मरण व पुनरुत्थानाबद्दल सभास्थानात व घरोघरी सांगण्याचे कार्य प्रेषितांनी चालूच ठेवले आणि दिवसेंदिवस बाप्तिस्मा घेणाऱ्या लोकांची संख्या वाढतच गेली .
यरूशलेम आणि त्याच्या सभोवतालच्या परिसरातील ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या लोकांचा एक छोटा समाज तयार झाला. त्यांचा जीवनक्रम शुद्ध आणि निर्दोष होता. ते सर्व एका दिलाने आणि एका विचाराने राहत असत. (प्रेषितांची कृत्ये २:४५). जरी पुष्कळ यहुदी लोकांनी ख्रिस्ती धर्माचा अंगिकार केला तरी बरेचसे यहुदी लोक ख्रिस्ताला मसीहा (म्हणजे तारणारा) मानण्यास तयार नव्हते. हे लोक यहुदी लोकांचे साम्राज्य स्थापणारा व रोमन लोकांच्या सत्तेतून मुक्त करणाऱ्या मसिहाची वाट पाहत होते. ते आपलाच हेका धरून बसले. म्हणून प्रभू येशूने भाकीत केल्याप्रमाणे (मत्तय २४:१-२) (मार्क १३:१-२) (लुक २१:५-६ ; २१:२०-२४) ख्रिस्तानंतर ४० वर्षानी (इसवी सन ७० साली) रोमन लोकांनी यरूशलेमचा व मंदिराचा पुर्णपणे नाश केला. त्यानंतर बहुतेक यहुदी लोकांना बंदिवान करून गुलाम म्हणून विकले गेले. बहुतेकांना ठार करण्यात आले. उरलेले लोक जगभर विखुरले गेले.
रोमन साम्राज्यात ख्रिस्ती धर्माचा प्रसार - ख्रिस्ताचे पहिले अनुयायी धर्माने यहुदी होते. स्वतः येशू ख्रिस्त हा सुद्धा यहुदी होता. त्यामुळे सर्व ख्रिस्ती लोकांनी यहुदी होऊन मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करावे व सुंता करून घ्यावी असे ख्रिस्ती बनलेल्या काही यहूद्यांना वाटत होते. (पहा नवा करार : प्रेषितांची कृत्ये :१५:१-५) एकदा पेत्र प्रार्थना करीत असताना त्याला साक्षात्कार झाला की येथून पुढे यहुदी नसलेल्या "परराष्टीय " लोकात जाऊन तू शुभवर्तमानाचा प्रसार कर. त्या नंतर पेत्र आणि इतर यहुदी लोकांसमोर एक रोमन अधिकारि, त्याचे नातलग आणि इष्टमित्र यांचावर पवित्र आत्मा उतरला. म्हणून पेत्राने त्यांना ख्रिस्तमहामंडळात समाविष्ट करून घेतले. (प्रेषितांची कृत्ये १०:१-४८). अतिविस्तृत अशा रोमन साम्राज्यात ख्रिस्ती धर्माचा प्रसार पौल याने घडऊन आणला. पूर्वआयुष्यात पौल हा धर्माने कट्टर यहुदी होता. तो रोमन नागरिक होता. हल्लीच्या तुर्कस्तांनातील तार्स येथे त्याचा जन्म झाला. त्याचे आरंभीचे यहुदी नाव शौल असे होते. त्याचे शिक्षण यरूशलेम येथे झाले. तो यहुदी धर्मातील कट्टर परुशी या पंथाचा होता. त्याने त्यावेळच्या ख्रिस्ती लोकांचा भयंकर छळ चालू केला. इसवी सन ३४ साली ख्रिस्ती लोकांना पकडून बंदिवान करण्यासाठी तो दमास्कसला (सिरिया) चालला असताना त्याला ख्रिस्ताचा साक्षात्कार झाला. ख्रिस्त त्याला म्हणाला, "शौला मला का छळतोस?" शौल त्याला म्हणाला ,"प्रभू तू कोण आहेस?" तेव्हा तो म्हणाला,"ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे." त्यानंतर शौलचे परिवर्तन झाले. (प्रेषितांची कृत्ये ९:१-२५) त्याने पौल असे नाव धारण केले. बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. तीन वर्ष एकांतवासात घालविली. त्याने सिरियातील अंतिओख शहरी आपल्या मिशनरी कार्याला सुरुवात केली. लवकरच अंतिओख शहर ख्रिस्तमहामंडळाच्या मिशन कार्याचे सर्वात प्रमुख केंद्र बनले. याच शहरी ख्रिस्ताच्या अनुयायांना ख्रिस्ती असे नाव मिळाले. (इसवी सन ४४-५८) (पहा प्रेषितांची कृत्ये ११:२६). या काळात पौलाने धर्मप्रसाराच्या कार्याकरिता तुर्कस्तान (टर्कि), सायप्रस आणि ग्रीस या ठिकाणी दूरवर प्रवास केले. त्यासाठी त्याने अपार छळ सहन केला. करिन्थकरास लिहीलेल्या दुसऱ्या पत्रात तो म्हणतो,"पाच वेळा मी यहुद्यांच्या हातून एकूणचाळीस फटके खाल्ले. तीन वेळा छड्यांचा मार खाल्ला. एकदा मला दगड्मार करण्यात आला. तीन वेळा माझे गलबत फुटले व समुद्रात मी दिवसरात्र घालविले. मी कितीतरी प्रवास केला. नदीमधील संकटे, लुटारू लोकांची संकटे, स्वजातीची संकटे, विदेशी लोकांची संकटे, समुद्रातील संकटे, खोट्या बंधूंची संकटे, श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, भूक तहानेचा मारा, पुष्कळ वेळा काढलेले उपवास, थंडी व उघडेवागडेपणा, शिवाय या अशा गोष्टींखेरीज माझा रोजचा व्याप म्हणजे मंडळ्यांची चिंता ही आहे." (करींथकरास दुसरे पत्र ११:२४-२९)
इसवी सन ५८ साली यरूशलेममध्ये पौलाला तुरुंगात टाकण्यात आले. पण तो रोमन नागरिक असल्याने त्याने रोमच्या बादशहाकडे दाद मागितली. तेथून दोन वर्षानी त्याची सुटका झाली. इसवी सन ६२ किंवा ६३ साली तो स्पेन देशात गेला. त्यानंतर तो ग्रीस व क्रीट येथेही गेला. त्याला पुन्हा कैदेत टाकण्यात आले आणि कैदी म्हणून त्याला रोमला आणण्यात आले. रोममध्येच इसवी सन ६७ साली त्याचा शिरच्छेद करण्यात आला. संत पौलाने नव्या करारात लिहिलेली १४ पत्रे येशूची शिकवण त्याला किती स्पष्टपणे समजली होती याची साक्ष देतात. ख्रिस्तप्रेम ही त्याच्या कार्याची प्रेरक शक्ति होती. फक्त यहुदी लोकांनाच नव्हे तर सर्व मानवजातीला ख्रिस्ती धर्माचे दरवाजे खुले करण्याचा त्याने पराकाष्ठेचा प्रयत्न केला. यहुदी नसलेल्या लोकांना (म्हणजे पररार्ष्टीय लोक) ख्रिस्तमंडळात प्रवेश देऊन त्यांना यहुदी लोकांच्या बरोबरीचे मानण्याला पुष्कळ यहुदी लोकांचा तीव्र विरोध होता.
इसवी सन ४९ साली प्रेषितांनी यरूशालेम येथे एक धर्मसभा बोलाविली. (पहा नवा करार : प्रेषितांची कृत्ये : १५:६-३५). त्यांनी या सभेत असा निर्णय घेतला की यहुदी नसलेल्या लोकांस ख्रिस्ती होण्यापूर्वी यहुदी होण्याची (किंवा यहुदी धर्माप्रमाणे सुंता करण्याची ) गरज नाही. येशूने वचन दिल्याप्रमाणे पवित्र आत्म्याने योग्य निर्णय ठरविण्याच्या कामी त्या सभेत सहाय्य केले. त्या सभेत ख्रिस्ताची शिकवण ही एका विशिष्ठ लोकांपुरती मर्यादीत नसून जगातील सर्व लोकांस ती खुली आहे या तत्त्वास पुर्णपणे पाठिंबा देण्यात आला. रोमन साम्राज्याच्या निरनिराळ्या भागात तीस वर्षात ख्रिस्ती समाज संघटितपणे स्थापन झाला. या प्रत्येक भागातील समाजावर प्रेषितांनी महागुरूस्वामी (बिशप) नेमले. आणि त्यांना ठीकठिकाणच्या समाजाबाबतचे पूर्ण अधिकार दिले. इसवी सन १०० च्या पूर्वीच प्रत्येक शहरात एक महागुरुस्वामी नेमण्याची पद्धती सुरू झाली होती. इसवी सन ३०० च्या सुमारास शेकडो महागुरुस्वामींची पीठे स्थापन झाली होती. मुख्य पीठे रोम (इटली), अंत्युखिया (सिरिया), आलेक्झांद्रिया (इजिप्त), आणि यरूशलेम (इस्राएल) या ठिकाणी होती. ही सर्व पीठे प्रेषितांनी स्थापन केली होती.
रोमन साम्राज्यातील ख्रिस्तमहामंडळाचा विजय
जुलूम व छळ : सर्व रोमन साम्राज्यात ख्रिस्ती धर्माचा प्रसार अगदी झपाट्याने झाला. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. येशू ख्रिस्ताने वचन दिल्याप्रमाणे ईश्वरी सहाय्याचा लाभ ख्रिस्ताच्या अनुयायांना मिळाला. (प्रेषितांची कृत्ये १:४-८ , लुक २४:४७-४९, मार्क १६:१५-२०, मत्तय २८:१६-२०)
२. नवीन ख्रिस्ती झालेल्या लोकांच्या उत्साहामुळे जे ख्रिस्ती होत ते आपल्या निकटच्या गटात आणि आपल्या समाजात ख्रिस्ताची साक्ष देत.
३. ख्रिस्ती धर्म हा एका विशिष्ट वर्गापुरताच मर्यादित नसून सर्व मानवजातीला लागू पडणारा होता.
४. सामाजिक अशांतता या काळात प्रबळ झाल्यामुळे नैतिक सुधारणा व्हाव्यात अशी पुष्कळांची मनीषा होती. ख्रिस्ती धर्माने लोकांपुढे उच्चतम ध्येय ठेवले.
५. पापांची क्षमा, आत्म्याचे अमरत्व, प्रांभीच्या ख्रिस्ती समाजातील बंधुभाव, आणि ईश्वरावरील दृढ श्रद्धा या गोष्टी अनेकांना पटल्या.
६. संघटनेचा पाया बळकट करणारी ख्रिस्ताच्या अनुयायांतील एकी फार बळकट होती. (पहा प्रेषितांची कृत्ये २:४२-४७)
७. सर्व रोमन साम्राज्यात यहुदी लोकांच्या वसाहती होत्या. त्या वसाहतींपासून ख्रिस्ती धर्माचा प्रसार सुरू झाला.
या सर्व गोष्टींमुळे ख्रिस्ती धर्माचा प्रसार अधिकाधिक होऊ लागला. परंतु इतर धर्मांशी सहिष्णूवृत्तीने वागणाऱ्या रोमन अधिकाऱ्यानी मात्र ख्रिस्ती लोकांचा छळ केला. याचे मुख्य कारण म्हणजे ख्रिस्ती लोकांनी रोमन सम्राट व इतर अनेक देवदेवताची उपासना करण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना देशद्रोही समजून देहांत शिक्षा देण्यात आल्या. बलाढ्य रोमन साम्राज्याने दहा वेळा ख्रिस्ती लोकांचा नाश करण्याचा संघटितपणे प्रयत्न केला. (तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको; पाहा, ‘तुमची परीक्षा व्हावी’ म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे; आणि तुमचे ‘दहा दिवस’ हालअपेष्टांत जातील. मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. प्रकटीकरण 2:10) जुलूम व छळ तर कित्त्येक वर्ष चालूच होता. अनेक ख्रिस्ती लोकांनी हुतात्म्याचे मरण पत्करले . रोममध्ये ख्रिस्ती लोक भुयारातील स्मशानभूमीमध्ये (क्याथकोंब्समध्ये) उपसानेकरिता जमा गुप्तपणे होत असत. इसवी सन ६४ साली रोममध्ये मोठी आग लागली. समजूत अशी होती की त्या वेळचा रोमन सम्राट निरो ( इसवी सन ५४-६८) याने ही आग लावली होती. परंतु निरो याने ही आग ख्रिस्ती लोकांनी लावली असा खोटा आरोप करून ख्रिस्ती लोकांचा भयंकर छळ चालू केला. रोमन इतिहासकार टेसिटस याने आपल्या "अन्नालास " या ग्रंथात (१६:४:४) लिहिले आहे, ' ज्यांचा वध निश्चित आहे अशांचा जाहीर खेळातून उपयोग केला जाई. त्यांना भुकेल्या वाघा सिंहा समोर आणि रानटी कुत्र्यांसमोर टाकण्यात येत असे आणि ते त्यांना फाडून खात असत. अनेकांना क्रूसावर खिळून ठार करण्यात आले तर अनेकांना जिवंत जाळण्यात आले."
या छळाला बळी पडलेल्या हुतात्म्यात पेत्र आणि पौल हेही होते. दुसरे प्रेषितही हुतात्मे होऊन निरनिराळ्या जागी मारले गेले. योहान (याने नव्या करारातील प्रकटीकरण हे पुस्तक लिहिले) मात्र इसवी सन १०१ साली काही नैसर्गिक कारणाने पात्म नावाच्या बेटावर हद्दपारीत मृत्यू पावला. इसवी सन ३१३ पर्यंत जवळ जवळ एक लक्ष लोकांनी हुतात्म्याचे मरण पत्करले अशी विश्वसनीय माहिती मिळते. धर्माकरिता इतक्या मोठ्या संखेने लोकांनी मरण पत्कल्याचा इतर दाखला इतिहासात नाही. यामध्ये विविध क्षेत्रातील लोक होते. महागुरू, सैनिक, सरदार, स्त्रिया, गुलाम, लहान मुली आणि मुले. या सर्वांच्या हकिकती असामान्य धैर्य यांनी भरलेल्या आहेत. आजतागायत यापासून ख्रिस्ती लोकांना स्फूर्ती मिळाली आहे.
तत्कालीन इतिहासातील काही घटना खालीलप्रमाणे नमूद केल्या आहेत.
संत ईग्नाती (मृत्यू इसवी सन १०९) हा संत योहानाचा शिष्य होता. आंटीओख येथे तो महागूरुस्वामी म्हणून नियुक्त केला गेला होता. रोममध्ये त्याला भुकेल्या हिंस्त्र सिंहापुढे टाकण्यात आले. रोमच्या वाटेवर असताना त्याने तेथील ख्रिस्ती लोकांना उद्देशून लिहिले आहे, "सिंहाच्या दाढाखाली मी रगडला जाईन पण त्यामुळे कदाचित माझे शुद्ध ख्रिस्तीत्व सिद्ध होईल. मला जिवंत जाळोत अथवा वन्य श्वापदांच्या पुढे मला भक्ष म्हणून टाकोत, मला क्रूसावर चढवोत अथवा माझे तुकडे तुकडे करण्यात येवोत माझा जितका सैतानी छळ करता येईल तितका ते करोत. त्याची मला पर्वा नाही . मला फक्त ख्रिस्तसेवेचा आनंद हवा. " ख्रिस्ताने स्थापन केलेल्या या धर्माला कॅथॉलिक (म्हणजे विश्वव्यापी) असे नाव प्रथम संत ईग्नातीने दिले.
संत पोलिकोर्प (मृत्यू इसवी सन 155) हा सुद्धा योहानाचा एक शिष्य होता. तुर्कस्तांनातील स्मूर्णा येथे हा महागुरू म्हणून कार्यरत होता. त्याला जिवंतपणी चितेवर ठेवून जाळण्यात आले तेव्हा तो अशी प्रार्थना करीत होता की, " हे परमेश्वरा तू तुझा एकुलता एक पुत्र जो येशू त्याचा पिता आहेस. येशूच्या द्वारे तुझे ज्ञान होण्याचे भाग्य आम्हाला लाभले. आज कृपावंत होऊन मला तू जो हा भोग देत आहेस त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. आज हुतात्म्याच्या सानिध्यात मला जाता येईल. आणि तुझा पुत्र येशू याने जो प्याला प्राशन केला तो मलाही पिता येईल.त्यामुळे मला अमर जीवनाची प्राप्ती होईल."
कार्थेज येथील थोर महागुरू सीप्रियन (मृत्यू २५८) याला न्यायाधीशापुढे आणण्यात आले. तेव्हा त्याला तुझा याग बादशाह साठी असू दे असे सांगण्यात आले. तो नाही म्हणाला तेव्हा न्यायाधीश म्हणाला , "पूर्ण विचार करून मगच काय ते ठरव." संत सीप्रियन म्हणाले, "तुला जे करणे असेल ते कर. ज्या बाबतीत संदेहाला काडीमात्र जागा नाही तेथे विचार कसला करावयाचा ? " शेवटी त्याचा शिरच्छेद करण्यात आला. संत्त आग्नेस (मृत्यू ३०४) हिने ख्रिस्तासाठी अवघ्या तेराव्या वर्षी मरण पत्करले. त्या छळाच्या दिवसात , "हुतात्म्यांच्या रक्तात ख्रिस्ती धर्माचे बीज आहे. " हे शब्द खरे ठरले. रक्त सांडले पण ख्रिस्ती धर्माचा प्रसार थांबला नाही.
मुक्तता : रोमन साम्राज्यात ख्रिस्ती धर्म विजयी झाला. दीर्घकाळ चाललेला छळ व जुलूम यांचा शेवट इसवी सन ३१३ या साली झाला. त्या साली सम्राट कोन्स्टंटाईन याने मीलानच्या जाहीरनाम्याद्वारे ख्रिस्ती धर्माला राजमान्यता दिली. ख्रिस्ती धर्म आता झपाट्याने पसरू लागला. ख्रिस्ती धर्म रोमन साम्राज्याच्या पूर्वेकडील भागात जास्त जोरदार होता. ख्रिस्ती शिक्षणाची प्रमुख केंद्रे म्हणजे आलेक्झांद्रिया (इजिप्त ) आणि अंत्युखिया (ग्रीस) ही शहरे होत. रोमन आणि ग्रीक संस्कृतीत जे जे उत्तम म्हणून होते ते ख्रिस्ती समाजाने आपल्यात समाविष्ट करून घेतले.
रोमन साम्राज्याच्या बाहेर ख्रिस्तमहामंडळाची वाढ : संत मत्तय हा आफ्रिका खंडातील अबिसिनिया येथे आणि संत अंद्रिया हा आशिया मायनर आणि रशिया या देशात सुवार्ता प्रसारासाठी गेला. संपूर्ण ख्रिस्ती झालेले पहिले राष्ट म्हणजे अर्मेंनीया . येथे संत ग्रेगरी याने तिसऱ्या थिरीदेतास राजाला इसवी सन २८६ साली ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. दुसरे ख्रिस्ती झालेले राष्ट म्हणजे बिथिनिया. आज हा तुर्कस्थांनचा एक भाग आहे. सुमारे इसवी सन ३५ या वर्षी अबिसिनियाची कांदके म्हटलेल्या राणीच्या एका सरदारास फिलिप नामक येशूच्या शिष्याने ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली.
पर्शियन लोकांनी व्यापलेल्या देशात पुष्कळ ख्रिस्ती समाज भरभराटीस आले होते. इसवी सन ३१० ते ३८० पर्यंत दूसरा सापोर हा राजा राज्य करीत होता. त्याने सर्व ख्रिस्ती लोकास सूर्याची उपासना करण्याचा हुकूम दिला. पण त्यांनी तो हुकूम मानला नाही . त्या वेळी पर्शिया देशात १६००० ख्रिस्ती मारले गेले.
- ^ "भारतातील ख्रिस्ती धर्मप्रसार". Loksatta. १८ मार्च २०१९ रोजी पाहिले.
- ^ पंडिता रमाबाईचे भाषांतर. (पवित्र शास्त्र).
संदर्भ : ख्रिस्त महामंडळाचा संक्षिप्त इतिहास (लेखक : म. रा. लेदर्ले)