कृष्णदयार्णव
कृष्णदयार्णव (मूळ नाव : नरहर नारायण जोशी-कुलकर्णी) (जन्म : कोपर्डे-सातारा, अक्षय्य तृतीया-इ.स. १६७५; - पैठण, १३ नोव्हेंबर १७४०) हे मराठी कवी होते. एकनाथांचे शिष्य असलेल्या कृष्णदयार्णवांनी 'श्रीकृष्णस्वयंवर' नावाचा ओवीबद्ध ग्रंथ रचला.
कृष्णदयार्णव | |
---|---|
जन्म नाव | नरहर नारायण जोशी-कुलकर्णी |
टोपणनाव | कृष्णदयार्णव |
जन्म | इ.स. १६७५ (अक्षय्य तृतीया) |
मृत्यू | १३ नोव्हेंबर १७४० |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
विषय | भक्ती, अध्यात्म |
प्रसिद्ध साहित्यकृती | श्रीकृष्णस्वयंवर, श्रीमद् भागवताच्या दशम स्कंधावर हरिवरदा |
प्रभाव | एकनाथ, ज्ञानेश्वर |
कृष्णदयार्णवांचे घराणे पिढीजात वतनदार असलेल्या जोशी - कुलकर्ण्यांचे. वडील नारायणराव आणि आई बहिणाबाई. वयाच्या पाचव्या वर्षी मुंज झाल्यावर वडिलांच्या हाताखाली कृष्णदयार्णवांचे पारंपरिक पद्धतीने शिक्षण सुरू होते. वयाच्या आठव्या वर्षी त्यांचे लग्न झाले. ते अवघे १२ वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले व प्रपंचांचा भार त्यांच्यावर पडला. या सुमारास औरंगजेबाचे दक्षिणेवर आक्रमण झाल्याने त्यांनी कुटुंबीयांसह अंबेजोगाई येथे स्थलांतर केले.
पुढे गुरू श्रीगोविंद यांनी कृष्णदयार्णव यांना दीक्षामंत्र दिला (सन १६९६). त्यांच्या हाताखाली शास्त्राध्ययन केल्यावर ते अंबेजोगाईस परतले. पण तो तोपर्यंत सारा मुलुख मोगलांनी उद्ध्वस्त केला होता. तेव्हा बीडजवळील पिंपनेर येथे ते स्थायिक झाले.
कृष्णदयार्णवांना महारोग लागला. त्यावर उपाय म्हणून भागवताच्या दशमस्कंधावर त्यांनीं 'हरिवरदा' नावाची प्राकृत टीका लिहिण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांचे वय ५४ होते. या ग्रंथास श्रीधरी टीकेचा आधार आहे. पूर्वार्धाचे ४९ अध्याय संपले व रोग नाहींसा झाला. उत्तरार्धाचे ३७ अध्याय संपविले, ३८ व्या अध्यायाचे २३ श्लोक झाले आणि कृष्णदयार्णवस्वामी पैठण येथें समाधिस्त झाले(शके १६६२ मार्गशीर्ष). या ग्रंथाचे लेखन तब्बल १६ वर्षे चालले. ४२ हजार ओव्या लिहून हा ग्रंथ अपुराच होता. त्यातील ओवी एकनाथांच्या ओवीसारखी साडेचार चरणी आहे. या ग्रंथात फारशी - अरबी शब्दांच्या प्रवेश होऊ नये, म्हणून त्यांनी संस्कृत प्रतिशब्द घडविले. तथापि सन १७४० च्या सुमारास कृष्णदयार्णवांचे निधन झाल्याने, अपुरा राहिलेला हा ग्रंथ त्यांचे शिष्य उत्तमश्लोक यांनी पुढे पूर्ण केला.ज्ञानेश्वरीचीहि छाया ग्रंथावर पडलेली आहे. विद्वान लोक या “हरिवरदा” ग्रंथास फार मान देतात. यावरून कर्त्याची विद्वत्ता व बहुश्रुतपणा दिसून येतो. काव्याच्या दृष्टीनेंहि ग्रंथ चांगला वठला आहे. विस्ताराच्या मानानें हा ग्रंथ प्रचंड आहे. याची एकंदर ओवीसंख्या ४२ हजार आहे. स्वामींचा “तन्मयानंद” नांवाचा आणखी एक ग्रंथ व बरेचसे अभंग आणि पदें इतकी कृति सध्यां उपलब्ध आहे [महाराष्ट्र सारस्वत].
याशिवाय, काही स्फुट कविताही कृष्णदयार्णवांच्या नावावर आहेत.
कृष्णदयार्णवांनी श्रीकृष्ण उपासनेचा भारतभर प्रसार केला. त्यासाठी १६ मठांची त्यांनी स्थापना केली.
कृष्णदयार्णवांची ग्रंथरचना
संपादन- चिन्मयानंदबोस
- तत्त्वयानंद
- विचारचंद्रिका
- सारांशात्मक गीता
- शिवचरित्रकथा
- श्रीकृष्णस्वयंवर (ओवीबद्ध)
- सिद्धान्तसार
- हरिवरदा (ओवीबद्ध)
श्रीमद्भागवतच्या दशम स्कंधावर 42 हजार ओव्यांची टीका. संत एकनाथांचा अनुग्रह स्वप्नामध्ये झाल्यावर त्यांनी भागवताच्या दशम स्कंधावर सुंदर मराठीत टीका लिहिली. ही टीका त्यांनी अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवीच्या परिसरात बसून लिहिली असे म्हणले जाते. हा ग्रंथ साहित्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असून मराठी भाषेत घुसवलेले उर्दू ,फार्सी व परकीय शब्द न वापरता अस्सल देशी मराठी शब्द वापरून कृष्णदयार्णव यांनी मराठी भाषेला या हरीवरदा टीकेतून मोठीच भेट दिली आहे.