काळ्या डोक्याचा खंड्या

काळ्या डोक्याचा खंड्या (शास्त्रीय नाव: Halcyon pileata, हॅल्सायन पायलीटा ; इंग्लिश: Black-capped Kingfisher, ब्लॅक-कॅप्ड किंगफिशर ;) ही धीवराद्य पक्षिकुळातील दक्षिण आशिया, पूर्व आशियाआग्नेय आशिया या भूप्रदेशांत आढळणारी एक प्रजाती आहे. हे साधारणपणे २८ ते ३० सें. मी. लांबीचे पक्षी असून यांचा रंग पाठीकडून गडद निळा असतो. यांचा पोटाकडून छातीचा भाग पांढरा, तर खालील भाग लालसर पिवळा असतो. यांच्या डोक्यावर मखमली काळी टोपी आणि गळ्यापासून मानेपर्यंत पांढरी पट्टी असते, तर चोच लाल रंगाची असते. या पक्ष्यांमध्ये नर आणि मादी दिसायला सारखेच असतात.हा पक्षी कमी प्रमाणात दिसतो.

काळ्या डोक्याचा खंड्या
शास्त्रीय नाव हॅल्सायन पायलीटा [टीप १]
कुळ धीवराद्य
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश ब्लॅक-कॅप्ड किंगफिशर [टीप २]
संस्कृत कालशीर्ष खंड्या
हिंदी कौरिल्ला

काळ्या डोक्याचा खंड्या हा पक्षी अंदमान आणि निकोबारसह भारताच्या समुद्र किनाऱ्यावरील प्रदेशात सर्वत्र आढळतो. तसेच बांगलादेश, श्रीलंका, थायलंड आदी देशांतही याचे वास्तव्य आहे. समुद्र किनाऱ्यालगत कांदळवनात (मॅंग्रोव्हच्या जंगलात), खाडी-नदी-नाल्यांच्या काठावर, बहुधा एकट्यानेच राहणारा हा पक्षी आहे. विदर्भात त्याच्या अस्तित्वाच्या काही अपवादात्मक नोंदी आढळल्या आहेत.

खाद्य

संपादन

खेकडे, मासोळ्या, सरडे, कीटक हे या पक्ष्यांचे खाद्य आहे.

प्रजनन

संपादन

एप्रिल-मे ते जुलै हा काळ यांचा प्रजनन काळ आहे. हे खाडी किंवा नदीच्या काठावरील तटाला लागून जमिनीत खोल बोगद्यासारखे घरटे तयार करतात. मादी एकावेळी ४ ते ५ पांढऱ्या रंगाची अंडी देते. नर-मादी मिळून पिलांची देखभाल व संगोपन करतात.

तळटिपा

संपादन
  1. ^ हॅल्सायन पायलीटा (रोमन: Halcyon pileata)
  2. ^ ब्लॅक-कॅप्ड किंगफिशर (रोमन: Black-capped Kingfisher)

बाह्य दुवे

संपादन
  • "काळ्या डोक्याच्या खंड्यांची चित्रे, आवाजांची ध्वनिमुद्रणे व अन्य माहिती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)