करडई

(करडी या पानावरून पुनर्निर्देशित)

करडई (शास्त्रीय नाव: Carthamus tinctorius, कार्थेमस टिंक्टोरियस ; इंग्लिश: Safflower, 'सॅफ्लॉवर ;) हे बारमाही उगवणारे, काटेरी कडांची पाने असणारे झुडूप आहे. कोवळी पाने काटेरी नसतात, जून झाली की होतात. करडईची रोपे ३० सें.मी. ते १५० सें.मी. उंचीपर्यंत वाढतात. यांना पिवळी, भगवी, तांबडी गेंदेदार फुलेही येतात. याच्या पानांची खाण्यासाठी भाजी करतात. तसेच करडईच्या बियांपासून खाद्यतेल बनवले जाते. करडईची एक बिन काटेरी जात आहे. तिच्या फुलांपासून दोन प्रकारचे रंग मिळतात. एक पाण्यात विरघळणारा पिवळा आणि दुसरा अविद्राव्य गडद लाल. या लाल रंगाच्या वड्या करून ठेवतात आणि कपड्यांना रंग देण्यासाठी हव्या तेव्हा वापरतात.

करडईचे वनस्पतिशास्त्रीय चित्र
Carthamus tinctorius

संस्कृतमध्ये करडईला कुसुंभ म्हणतात. मराठीत कुसुंब म्हणज करडईचे फूल. एकेकाळी महाराष्ट्रात कुसुंबी रंगांच्या साड्यांची चलती होती.

कालिदासाने ऋतुसंहारमध्ये रानातील वणव्याचे वर्णन करताना,

विकचनवकुसुंभस्वच्छसिंदूरभासाः दिशि दिशि परिदग्धा भूमयः पावकेन ऋ.सं १-१७ अर्थ:नुकत्याच फुललेल्या कुसुंभाच्या नव्या कळ्यांनी स्वच्छ सिंदूराचा(शेंदुराच्या रंगाचा) भास होतो. असे वाटते कि भूमी ही दिशा-दिशांना (सर्व दिशांना) अग्निने जळत आहे.

आणि, वनितांच्या रंगवलेल्या वस्त्रांचे वर्णन करताना, कुसुंभरागारुणितैर्दुकूलैः ऋ.सं ६-४ असे लिहिले आहे.

हे रबी हंगामात घेण्यात येणारे एक पीक आहे.या झाडाचे वैशिष्ट्य असे कि, कमी पाण्यावर तसेच अवर्षणावर मात करण्याची क्षमता या पिकात जास्त आहे. त्यामुळे कोरडवाहू जमिनीतही हे पीक घेता येते.[]

या पिकास थंड हवामान मानवते. मध्यम प्रकारची जमिन आवश्यक आहे पण ती चांगला निचरा असणारी हवी.ओल धरून ठेवण्याची क्षमता अशा जमिनीत हवी.[]

या वनस्पतीचे बियाणे हे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवून मग नंतर त्याची पेरणी केल्यास या वनस्पतीची उगवण चांगली व लवकर होते.[]

या पिकाची तोडणी बोंडॅ पिवळी पडल्यानंतर करतात.मध्यम प्रकारच्या जमिनीत याचे सुमारे १० ते १२ क्विंटल, तर भारी जमिनीत १४ ते १६ क्विंटल व ओलीताच्या जमिनीत २० ते २५ क्विंटल प्रति हेक्टरी इतके उत्पादन मिळते.[]

मावा ही करडई या पिकावर पडणारी एक कीड आहे. ही या पिकावर नेहामी आढळते. या पिकाची पेरणी उशीराने केल्यास या कीडीचा प्रादुर्भाव आढळून येतो.यामुळे पिकाचे २५-३० टक्के नुकसान होऊ शकते.[]

करडईची पेरणी लवकर म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यापर्यंत संपवावी. त्यानंतरही या पिकावर मावा आढळल्यास, पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करणे योग्य असते.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ a b c d प्रा. डॉ. दिलीप अलोणे. तरुण भारत, नागपूर कृषी भारत पुरवणी- पान क्र. ८ "करडी" Check |दुवा= value (सहाय्य). २१-११-२०१८ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]
  2. ^ a b -. तरुण भारत नागपूर, कृषी भारत पुरवणी "शंका-समाधान" Check |दुवा= value (सहाय्य). ०३-०२-२०१९ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत