कट्यार हे मध्ययुगीन भारतीय उपखंडात प्रचलित असलेले पात्याचे शस्त्र होय. हिला 'एच' या रोमन अक्षराच्या (रोमन: 'H') आकारातली मूठ असते; जेणेकरून शस्त्रधारकाच्या मूठ आवळलेल्या बोटांवरून हिचे पाते सरळ फुटल्यासारखे दिसते. हिच्या संरचनेमुळे लक्ष्याला भोसकण्यासाठी हिचा वापर करता येतो. हे एक छोटे दुधारी शस्त्र आहे.

राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली येथील कलाकुसर केलेल्या मुठीची कट्यार

संस्कृती संपादन

समारंभप्रसंगी गौरवचिन्ह म्हणूनही हिला महत्त्वाचे स्थान आहे. वर कट्यार धारण करतो आणि विवाह सोहळ्यात मानाने ती मिरवतो. सध्याच्या काळात विवाह सोहळ्यात हिचा वापर केला जातो.उत्तर भारतात जसे मोजड्या पळवतात तसे महाराष्ट्रात वधुचे भाऊ कट्यार पळवतात आणि त्या बदल्यात वराकडून पैसे वसूल करतात. लग्न जमतांना वधुपिता वराला कट्यार भेट देण्याची परंपरा आहे.[१] विवाहप्रसंगी नवरदेवाने कट्यार बाळगायची असते. प्रत्येक लढाऊ वीराचे लग्न कट्यारीशी लागलेले असते असा हा संदेश आहे. तसेच शत्र वापरून तू माझ्या मुलीचे रक्षण कर असा संदेश यातून दिला जातो. तसेच पुर्वीच्या काळी मुलगी आपले कट्यार हे आत्मसंरक्षणाचे शस्त्र माहेरातून घेऊन सासरी येत असे. म्हणज सारे हिंदु कुटुंब हे शस्त्र सज्ज असत असे.

तंत्र संपादन

लहान पाते आणि मजबूत पकड यामुळे एखादी ढाल फोडणे या शस्त्राने शक्य होत असे. कट्यार वापरून निर्णायक वार केले जाऊन शत्रूला ठार मारले जात असे. हातात असलेली कट्यार ठोसा मारावा तशी मारली जात असे. यामुळे शरीराची सर्व उर्जा कट्यारीमध्ये सामावली जाऊन प्रचंड ताकदीने ढाल ही फुटत असे. शक्य असल्यास वार करून जखमी करणे हे कार्य पण कट्यार करत असे. अर्थात हे शस्त्र हातघाईच्या लढाईच्या वेळी अत्यंत महत्त्वाचे होते. थंड डोक्याने नेमका वार करून मोक्याच्या क्षणी लढाई जिंकणे हे या शस्त्राने शक्य होत असे.

चित्रण संपादन

ऐतिहासिक चित्रांमध्ये राजकुमार आणि सरदारांना कट्यार धारण केलेले चित्रित केले जात असे. कट्यार दाखवणे केवळ आत्म-बचावासाठी ही खबरदारी नव्हती तर समाजात उंचावलेले स्थान, आणि संपत्ती दाखवण्यासाठी कट्यार दाखवली जात असे. होते. कट्यार वापरून रजपूत राजे अगदी वाघाची ही शिकार करीत. एखाद्या शिकारीसाठी अशा प्रकारच्या छोट्या-अंतराच्या शस्त्राने वाघाला ठार मारणे हे शौर्य आणि युद्ध कौशल्य यांचे निश्चित चिन्ह मानले जाते. नस्तनपूर यथील श्री शनीमहाराज मंदिरातील मूर्ती चतुर्भुज असून हातात कट्यार धारण केलेली आहे.[२]

महत्त्व संपादन

कट्यार ही तूलनेने लहान असलयाने वागवणे सोपे होते. कायम सोबत ठेवता येते. मुठीच्या रचनेमुळे हातातून सुटणे अशक्य असते. त्यामुळे हे फार महत्त्वाचे शस्त्र होते. या खुबींमुळे या शस्त्राचा प्रसार व्हिएतनाम ते अफगाणिस्तान पर्यंत झालेला दिसून येतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे आवडते शस्त्र कट्यार होते असे म्हणतात.[३][४] त्यांच्या कमरेला शेल्यामध्ये कट्यार असायची. मराठा साम्राज्यातही सरदार आणि दरबारच्या मानी सरदारांनाच कट्यारीचा मान होता.[५] कट्यार बाळगण्याचा मान असलेल्यांना कट्यारे असे ही म्हंटले जात असे.

हे सुद्धा पहा संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  1. ^ "माहेश्वरी समाज की उत्पत्ति | अखिल भारतीय धाकड़ माहेश्वरी सभा | Akhil Bhartiy Dhakad Maheshwari Sabha" (इंग्रजी भाषेत). 2021-02-10 रोजी पाहिले.
  2. ^ "श्री शनीमहाराज मंदिर नस्तनपूर". www.shanimandirnastanpur.com. 2021-02-10 रोजी पाहिले.
  3. ^ "कट्यार". India trekking forum - Sahyadri (इंग्रजी भाषेत). 2021-02-10 रोजी पाहिले.
  4. ^ "शिवाजी महाराजांचे आवडते शस्त्र कट्यार - InfoMarathi". Dailyhunt (इंग्रजी भाषेत). 2021-02-10 रोजी पाहिले.
  5. ^ author/online-lokmat (2018-02-19). "'पंचहत्यारी' मावळे; 'ही' होती शिवरायांच्या सैन्यातील पाच प्रमुख शस्त्रं". Lokmat. 2021-02-10 रोजी पाहिले.