इब्राहिम खान गारदी

मराठ्यांचा एक प्रमुख सरदार

इब्राहिम खान गारदी (?? - इ.स. १७६१:पानिपत, हरयाणा, भारत) पानिपतच्या तिसऱ्या लढाईमधील मराठ्यांचा प्रमुख सरदार होता.इब्राहिम खान गारदी हा मराठ्यांचा तोफखाना प्रमुख होता.इब्राहिम खान गारदी हा दिसायला उंचापुरा, राकट, काळाकभिन्न आणि डोळ्यात जसे निखारे तरळत असावे अशा लालभडक डोळ्यांचा होता.

त्याची तुकडी ज्याच्या सैन्यात असे त्यांची इमानेइतबारे चाकरी करत असे.पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठे विरुद्ध अफगाण या लढ्यात इब्राहिम खान आणि त्याचा भाऊ फत्तेखान यांच्या खांद्यावर मराठ्यांच्या तोफदलाची संपूर्ण धुरा होती.

याच्याकडे १०,००० पायदळ व तोफखान्यातील सैनिकांचे नेतृत्व होते.

सैनिकी कारकीर्दसंपादन करा

इब्राहिम खान गारदी हा हैदराबादच्या निजामाच्या सेवेत होता. तुकडीचे नेतृत्व असल्याने त्याने खान या नावाची पदवी धारण केली होती. मराठ्यांनी त्याची उपयुक्तता पाहून आपल्या बाजूला वळवले. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत इब्राहिम खान गारदीने गारद्यांच्या तुकडीचे नेतृत्व केले. ह्या तुकडीने फ्रेंच सैन्याकडून प्रशिक्षण व हत्यारे घेतली होती. १७५० च्या दशकात मराठा सैन्याचे अतिशय प्रबळ सैन्यात रुपांतर होण्यात या तुकडीचा मोठा वाटा होता. हे सैनिक त्यांच्या प्रशिक्षण व हत्यारांमुळे युरोपीय सैन्यासाठी देशी मस्केटीयर्स होते. गारद्यांची हल्ला पद्धती ही ब्रिटीश अथवा फ्रेंच सैनिकांप्रमाणे होती. पुढे जाणाऱ्या पायदळामागून धडाडणाऱ्या तोफांचे संरक्षण मिळे. जेव्हा पायदळ सेना शत्रूजवळ पोहोचे तेव्हा तोफा थांबून पायदळ बंदूकीने हल्ला करत. जेव्हा समोरची फौज एकदम जवळ येई त्यावेळेस तलवार, भाला या पारंपारिक शस्त्रांनी शत्रूवर हल्ला चढवण्यात येई.गोलाची लढाई करण्यात गारदिंचे सैन्य निपुण होते.

पानिपच्या तिसऱ्या लढाईत देखील इब्राहीमखानच्या गारदी तुकडीने आपल्या बरकंदाज व शिलेदारांसह शेवटपर्यंत गोलाच्या लढाईच्या स्वरूपात जहाल हल्ले चालू ठेवले. परंतु मराठा रियासातीचे जुने मात्तबर सरदारांना ही पद्धत मान्य नव्हती. त्यांनी गारद्यांचा तोफखाना आणि बंदुकदल कार्यरत असतांनाच भर मैदानात उडी घेतली. त्याने होत्याचे नव्हते झाले. "तोफगोळे सोडावेत तरी कुणावर परकीयांवर कि आपल्याच सैन्यातून रणमैदानात उडी घेतलेल्या स्वकीयांवर"...त्यामुळे गारद्यांचा तोफखाना थंड पडला.नंतरच्या कालावधीत मुख्य सैन्याने पळ काढल्यावरही गारद्यांनी अफगाण्यांशी झुंज चालू ठेवली.एक एक करीत हे गारदी पडले व दुपारपर्यंत पूर्ण तुकडी नेस्तनाबूद झाली. उरल्यासुरल्या मोजक्या शिपायांनी पहाटेच्या अंधारात माघार घेतली. इब्राहीमखानला अफगाणी सैन्याने जिवंत पकडले व हालहाल करून ठार मारले. मराठा सरदारांपैकी अनेकांनी या लढाईत माघार पत्करून पुणे गाठले पण इब्राहीमखानने आपल्या देशासाठी जीव दिला.

"रेहान सरदार " हे यांचे वंशज असून सध्या पुण्यात राहतात.[१]

पारधी समाजात अजूनही इब्राहीमखान, फत्तेखान व सुलेमानखान गारद्यांच्या शौर्याबद्दलच्या विराण्या गायल्या जातात.गारदी हे त्यांच्या इमानासाठी प्रसिद्ध होते.त्यांच्यातला हा गुण ओळखूनच जुन्या मात्तबर सरदारांचा आणि रघुनाथरावांचा विरोध झुगारून सदाशिवराव भाऊ यांनी उदगीरच्या लढाईनंतर गारद्यांना मराठा सैन्यात दाखल करून घेतले.


संदर्भ आणि नोंदीसंपादन करा