होणार सून मी ह्या घरची या दूरचित्रवाणीवरील मालिकेत जान्हवीच्या सावत्र आईचे काम करणाऱ्या अभिनेत्री आशा शेलार या त्यांच्या श्रेष्ठ अभिनयामुळे प्रेक्षकांच्या डोळ्यात भरतात. दारिद्र्याचे चटके खात आयुष्य गेलेल्या स्त्रीचे दुःख काय असते, तिला काय तडजोडी कराव्या लागतात हे आशा शेलार यांच्‍या जिवंत अभिनयामुळे प्रेक्षकांना जाणवत राहते.

आशा शेलार या अभिनयाच्या क्षेत्रात फार पूर्वीपासून आहेत. ग्लॅमर आणि प्रसिद्धीच्या हव्यासापासून दूर राहून केवळ अभिनयाची भक्ती करणाऱ्या मोजक्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक असे त्यांच्याबाबत म्हणता येईल.

साधारण १९८० च्या दशकात ज्यावेळी टीव्हीवर दूरदर्शन वगळता अन्य वाहिन्या नव्हत्या, करमणुकीसाठी कोणतेही साधन उपलब्ध नव्हते अशा काळात एकांकिका स्पर्धाच्या माध्यमातून आशा शेलार नावारूपाला आल्या. त्यांनी अभिनयाच्या क्षेत्राकडे केवळ आवड म्हणूनच पाहिले. बँकेत चांगली नोकरी मिळाल्यानंतर, नोकरी करता करता अनेक स्पर्धांत आणि विशेषतः प्रायोगिक नाटके, एकांकिकांत वडिलांच्या विरोधाला न जुमानता त्या भाग घ्यायच्या. वडिलांची आणि त्यांची खूप भांडणे व्हायची, पण तरीही आशा शेलार यांनी अभिनय करणे सोडले नाही. बँकांच्या अनेक एकांकिका स्पर्धामध्ये त्या असायच्या. अभिनयाचे कोणतेही प्रशिक्षण न घेता त्यांनी आपल्या तीस वर्षाच्या कारकिर्दीत अनेक एकांकिका आणि नाट्यस्पर्धा गाजवल्या. या स्पर्धांमध्ये मिळालेली १५०हून अधिक पारितोषिके त्यांच्याजवळ आहेत.

चेतन दातार, सत्यजित दुबे, शेखर ताम्हाणे, विजय पाटकर यांच्यासारख्या दिग्दर्शकांकडे आशा शेलार यांनी काम केले आहे. ‘मोठ्या टिकल्या, भडक मेकअप आणि दिखावा साच्यात अडकलेली खलनायिका रंगवण्यापेक्षा प्रेक्षकांना जे पात्र खरे वाटेल असे पात्र साकारण्यावर त्यांचा नेहमीच भर असतो.

गाजलेल्या पुस्तकातले एखादे पात्र रंगमंचावर हुबेहूब उभे करणे हे कौशल्य आशा शेलार यांनी साध्य केले आहे. त्यांनी एका कार्यक्रमात ’भोगले जे दुःख त्याला’च्या लेखिका आशा आपराद यांनाच प्रत्यक्ष रंगमंचावर सादर केले होते. अभिनय आणि संवाद यांच्या साहाय्याने एका मुस्लिम स्त्रीची शिक्षणासाठीची धडपड व त्याला समाजाबरोबरच घरातून होणारा तीव्र विरोध, ही कथा आशा शेलार यांनी रंगमंचावर सादर करून प्रेक्षकांचे मन जिंकले होते.

’गार्गी अजून जिवंत आहे’ या मंगला आठलेकर यांच्या पुस्तकातील गार्गी प्रत्यक्ष डोळ्यासमोर आणण्याची करामत आशा शेलार यांनी केली आहे. स्मशानभूमीत एका स्त्रीने केलेली कामगिरी व त्यातून तिने दाखविलेले धाडस या कथेतून सादर करण्यात आले आहे. कबड्डी कबड्डी आणि लव्ह स्टोरी ही आशा शेलार यांची भूमिका असलेली काही व्यावसायिक नाटके आहेत. यांची खुलता कळी खुलेना, होणार सून मी ह्या घरची आणि सुखाच्या सरींनी हे मन बावरे या मालिकेतील भूमिका प्रसिद्ध आहेत.