अबान मिस्त्री (६ मे, १९४०२० सप्टेंबर, २०१२) या महिला तबलावादक होत्या.

प्रारंभिक आयुष्य

संपादन

आबान एचरशाह मिस्त्री यांचे वडील हे व्हायोलिनवादक, तर आई खुर्शीद दिलरुबावादक होत्या. संगीताचे बाळकडू त्यांना आपल्या घरातूनच मिळाले. त्यांचे संगीताचे प्राथमिक शिक्षण गायनाच्या माध्यमातून त्यांच्या काकू मेहरू वर्किंगबॉक्सवाला यांच्याकडे झाले. त्यांचे उच्च शिक्षणदेखील गायनाच्याच माध्यमातून पं. लक्ष्मणराव बोडस यांच्याकडे झाले. तीस वर्षे इतक्या प्रदीर्घ काळापर्यंत त्या हे गायनाचे शिक्षण घेत होत्या. दरम्यानच्या काळातच आबान मिस्त्री यांनी कथक नृत्यकलादेखील आत्मसात केली. पुढे प्रकृतीच्या काही कारणामुळे त्यांना कथक नृत्यकलेपासून परावृत्त व्हावे लागले. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या सांगीतिक जीवनात गुरू म्हणून पं. केकी जिजीना यांचा प्रवेश झाला. पं. जिजीनांनी आबानांना सतारच्या माध्यमातून शिक्षण दिले. इतकेच नव्हे, तर सतार हा विषय घेऊन अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या विशारद परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. नृत्यकलेमधून निवृत्तीनंतरची लयीची कमी भरून काढण्यासाठी पं. जिजीना यांनी आबान यांना तबल्याचे धडे दिले. संगीताच्या एका माध्यमावर प्रभुत्व मिळण्यासाठी कलाकाराला अनेक वर्षे आणि बहुतांशी सबंध आयुष्य वेचावे लागते. आबानसारख्या बोटांवर मोजता येणाऱ्या कलाकारांनाच संगीताची इतकी माध्यमे केवळ आत्मसातच होत नाहीत, तर त्यांवर त्यांचे प्रभुत्व असते. ज्या काळात स्त्रीचे जीवन केवळ चूल आणि मूल यांतच व्यतीत व्हायचे, त्या काळात आबानसारख्या स्त्रीने इतक्या विविध माध्यमांवर हुकमत मिळवणे आणि मंचावर त्यांचे सुयोग्य प्रदर्शन करणे हे केवळ कौतुकास्पदच नव्हे, तर आदरासही पात्र आहे. त्यांच्या या चौफेर व्यक्तिमत्त्वाला तबल्याच्या माध्यमातून पैलू पाडले ते उ. अमीर हुसैन खॉं यांनी. आबान मिस्त्रींचा तबला ऐकून उ. अमीर हुसैन खॉं यांनी त्यांना आपले शिष्यत्व बहाल केले. फरूखाबाद, दिल्ली, लखनौ, अजराडा या सर्व घराण्यांचे समृद्ध तबलावादन उ. अमीर हुसैन खॉंसाहेबांकडून त्यांना मिळाले. या चारही घराण्यांच्या बंदिशी, त्यांचा निकास, विचार-प्रक्रिया या सर्व गोष्टी त्यांना मिळाल्या. त्यांनी या सर्व शैलींचा अभ्यास करून त्यावर चिंतन करून या शैलींनी युक्त असणारी स्वतःची अशी एक शैली निर्माण केली. आबान मिस्त्रींचे लयीवरील प्रभुत्व वाखाणण्याजोगे असल्यामुळे त्यांनी तीनतालाव्यतिरिक्त झपताल, रूपक, पंचम सवारी इत्यादी तालांतही समर्थपणे वादन केले. त्यांचे कार्यक्षेत्र त्यांनी तबल्यापुरतेच मर्यादित ठेवले नाही, तर त्यांनी पंडित नारायणराव मंगळवेढेकर यांच्याकडून पखवाजाचीदेखील विधिवत तालीम घेतली. त्यावर सखोल विचार व चिंतन केले. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाकडून संगीताचार्य (पीएच.डी.) ही पदवी त्यांना त्यांच्या ‘तबला और पखावज के घराने एवं परम्पराएॅं’ या प्रबंधासाठी मिळाली. यासाठी त्यांनी तबला व पखवाजची विविध घराणी व परंपरा यांवर अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. अनेक ऐतिहासिक पुरावे देऊन त्यांनी तबला हा भारतात पर्शियामधून अमीर खुस्रोने आणला हा गैरसमज खोडून काढला आहे. त्यांनी अनेक सभा-संमेलनांमध्ये वादन केले आहे. त्यांनी परदेशाच्या अनेक वाऱ्या केलेल्या आहेत. युरोप, मध्य आशिया, रशिया इत्यादी देशांत त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. तबल्याव्यतिरिक्त त्या हिंदी, संस्कृत विषयांत साहित्यरत्न आहेत. त्यांनी संगीतावर देश-विदेशांत अनेक प्रसिद्ध मासिकांतून लेखन केलेले आहे. पारशी समाजाच्या हिंदुस्थानी संगीतातील योगदानावर त्यांनी ‘दी पारसीज ॲशण्ड इंडियन क्लासिक म्यूझिक’ हा ग्रंथ लिहिला आहे. शिक्षण व प्रस्तुती या दोनच माध्यमांतून त्यांनी आपली संगीत सेवा थांबवली नाही. त्यापुढे जाऊन आबान यांनी अनेक चांगले शिष्य तयार केले. त्यांचे गुरू पं. जिजीना व त्यांनी एकत्रितपणे ‘स्वरसाधना समिती’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्या जवळजवळ ४० वर्षे सातत्याने नव्या, उदयोन्मुख कलाकारांना मंचप्रदर्शनाची संधी देत आहेत.