स्वर्गीय नर्तक
स्वर्गीय नर्तक (इंग्लिश:Asian Paradise-flycatcher; शास्त्रीय नावः Terpsiphone paradisi) हा भारतातील जंगलात आढळणारा पक्षी आहे. या पक्ष्याच्या नराला लांब शेपूट येते त्यामुळे तो अतिशय सुरेख दिसतो. पूर्ण वाढ झालेला नर हा पांढऱ्या रंगाचा असतो (चित्र पहा). नवतरुण नर आणि मादी लाल रंगाची असते. विविध प्रकारचे किडे हे या पक्ष्याचे मुख्य खाद्य आहे. मध्यप्रदेश राज्याचा हा 'राज्यपक्षी' आहे, त्याला हिंदीमध्ये 'दूधराज' आणि सुल्ताना बुलबुल अशी नावे आहेत. मध्यप्रदेशातील बांधवगड राष्ट्रीय उद्यानात स्वर्गीय नर्तक मोठ्या प्रमाणावर आढळतात.
स्वर्गीय नर्तक हा बुलबुलाच्या आकारमानाचा असून प्रौढावस्थेतील नर शुभ्र पांढऱ्या रंगाचा असतो. त्याचे डोके काळ्या रंगाचे असते. युवा नराचा रंग मात्र तांबूस असतो. मादी तांबूस रंगाची असून, तिचे डोके काळ्या रंगाचे असते. दोघांच्या डोक्यावर लहानसा तुरा असतो. विशेष म्हणजे नराला जवळपास फुटभर लांबीची शेपटी असते.स्वर्गीय नर्तक संपूर्ण भारतात आढळत असून यांच्या दोन उपजाती भारतात तर एक उपजात श्रीलंकेत आढळते. हा पक्षी भारताच्या नैर्ऋत्येकडील प्रदेशात स्थानिक असून उर्वरित भागात तो स्थलांतरित आहे. दरवर्षी जून महिन्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात यांची असंख्य घरटी सहज दृष्टीस पडतात. या कालावधीत ते पन्हाळा परिसरात स्थलांतर करून येतात.
हे पक्षी मार्च ते जून या कालावधीत सांगली जिल्ह्यातील कवठे एकंद मधील जाधव मळा येथे PRC Agro
या शेती फार्म परीसरात वास्तव्यास असतो. या कालावधीत परिसरात पक्ष्यांची घरटी, पिल्ले आढळतात. गेल्या 30 वर्षा पासून या ठिकाणी हे पक्षी येतात.
किटकभक्षी असणाऱ्या या पक्षाचा विणीचा हंगाम पावसाळ्याच्या पूर्वार्धात सुरू होतो.
अमेरिकन पक्षीतज्ज्ञ डॉ. पामेला रासमुसन यांनी या पक्षाचा जनुकीय अभ्यास करून स्वर्गीय नर्तक पक्षाची आणखी एक उपजात शोधून काढली आहे. त्यातील प्रौढ नर हे तांबूस रंगाचेच राहतात अशी नोंद त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या बर्डस् ऑफ साऊथ आशिया या पुस्तकात आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |