सोनम मलिक

भारतीय महिला कुस्तीपटू

सोनम मलिक ( १५ एप्रिल २००२,मदिना,हरियाणा ) ही हरयाणाच्या सोनीपतमधील भारतीय महिला कुस्तीगीर आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकण्याबरोबरच तिने जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत दोन सुवर्ण पदके जिंकली आहेत. भारतासाठी २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारी साक्षी मलिक हिला सोनमने दोन वेळा हरवले आहे. [1]

सोनम मलिक
वैयक्तिक माहिती
Full name सोनम मलिक
Nationality भारतीय
जन्म 15 एप्रिल 2002
मदिना गाव, सोनीपत, हरयाणा
Education बी.ए. (कला) पदवी साठी शिकत आहे.
Sport
Coached by अजमेर मलिक

वैयक्तिक आयुष्य आणि पार्श्वभूमी

संपादन

सोनम मलिकचा जन्म १५ एप्रिल २००२ रोजी हरियाणाच्या सोनीपतमधील मदिना गावात झाला. कुस्तीची समृद्ध परंपरा असलेल्या क्षेत्रातून ती येते. तिचे वडील आणि भाऊ हे कुस्तीगीर होते आणि त्यांचाच प्रभाव म्हणून सोनमने हा खेळ निवडला. [1]

सोनमच्या वडिलांनीच बालपणी तिला तिच्या गावातील नेताजी सुभाषचंद्र बोस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये प्रशिक्षक अजमेर मलिक यांच्याकडे प्रशिक्षणासाठी नेले होते. सराव सुरू करण्यास पुरेशा सुविधा नव्हत्या आणि कोचिंग अकादमीत सराव करण्यासाठी मॅटही उपलब्ध नव्हते. त्यामुळे खेळाडूंना मातीत सराव करावा लागत असे. पावसाळ्यात मातीचे चिखल होत असल्यामुळे पैलवानांना मग रस्त्यावर सराव करावा लागत असे. अशा अपुऱ्या पायाभूत सुविधा असूनही प्रशिक्षण मात्र चांगले होते. [1]

२०१७ मध्ये सोनमच्या खांद्याला एका स्पर्धेत दुखापत झाली. यामुळे तिच्या उगवत्या कारकिर्दीला धोका निर्माण झाला. जवळपास दीड वर्षे तिच्यावर उपचार सुरू होते. ती सांगते की या काळात तिच्या वडिलांनी तिला दुखापतीतून सावरून मेहनत करून पुनरागमन करणाऱ्या इतर खेळाडूंच्या प्रेरणादायी गोष्टी सांगून प्रोत्साहित केले. बरीच मेहनत घेतल्यानंतर तीसुद्धा परत आली आणि पुन्हा जिंकू लागली. [2]

खेळाव्यतिरिक्त, सोनम सध्या कला शाखेत पदवीचे शिक्षण घेते आहे. [3]

व्यावसायिक यश

संपादन

२०१६ च्या राष्ट्रीय शालेय खेळांमध्ये सुवर्ण पदक जिंकत सोनम मलिक राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आली. त्याच्या पुढच्या वर्षी तिला विपुल यश मिळाले. तिने कॅडेट नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले, वर्ल्ड स्कूल गेम्समध्ये सुवर्ण पदक, कॅडेट आशियाई कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक आणि कॅडेट जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.

२०१८ मध्ये कॅडेट आशियाई कुस्ती स्पर्धेत आणि कॅडेट जागतिक कुस्ती स्पर्धेत तिने कांस्य जिंकले.

२०१९ मध्ये सोनमने पुन्हा जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. [3]

२०२० मध्ये तिच्या आयुष्यातला मोठा क्षण आला जेव्हा तिने रिओ ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक हिला दोन महिन्यांमध्ये दोन वेळा पराभूत केले.

यातील प्रथम विजय जानेवारीत आशियाई चॅम्पियनशिपच्या चाचण्यांमध्ये आणि नंतर फेब्रुवारीमध्ये आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या निवड स्पर्धेत, सोनमने साक्षीचा एक हाती पराभव केला. [4] [5]

कुस्तीची रणनीती आणि पदकांच्या गोष्टी ऐकून मोठ्या झालेल्या सोनमचे लक्ष्य आता ऑलिम्पिक पदक जिंकणे आहे. [1]

भारतीय खेळाडूंना ऑलिम्पिक पदक जिंकण्यास आर्थिक मदतीचे काम करणारी ना-नफा संस्था ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट (ओजीक्यू) सध्या सोनमला प्रायोजित करते. [6]

संदर्भ

संपादन

https://www.bbc.com/marathi/india-55698096 [1]

https://www.olympicchannel.com/en/stories/news/detail/sonam-malik-asian-india-tokyo-2020-olympics/ [2]

https://wrestlingtv.in/sonam-malik/ [3]

https://timesofindia.indiatimes.com/sports/more-sports/wrestling/sonam-malik-stuns-sakshi-malik-in-trials/articleshow/73096736.cms [4]

https://sportstar.thehindu.com/wrestling/sonam-malik-sakshi-malik-62kg-trials-asian-olympic-qualifiers-kiran/article30922299.ece [5]

https://thebridge.in/wrestling/sushil-sir-inspires-me-to-work-harder-sonam-malik/#:~:text=The%20teenage%20sensation%20in%20Indian,I%20do%20not%20know%20exactly. [6]