सुरंगी

सुरंगी - सुरंगीची झाडे व उंडे - उंडयाची झाडे

भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरवली परिसरात आढळणारा एक वृक्ष. या वृक्षाची पाने तकतकीत असतात. याच्या खोडालाच भरपूर फुले लागतात. ही फुले ४ पाकळ्यांची व दिसावयास फार सुंदर असतात. तेथील दैवत 'वेतोबा'ला या फुलांच्या माळा वाहण्याचा प्रघात आहे.[ संदर्भ हवा ]

सुरंगीचे झाड साधारण चिकू, आंब्यासारखे मोठे असते. हे झाड चिवट असते.

होळी जवळ आली की सुरंगीच्या गजऱ्यांची आठवण येते. आजकाल खूप दुर्मीळ झालेली सुरंगी ही मार्च महिन्यापासून दोन बहरांत फुलते. सुरंगीच्या कळ्या झाडाच्या खोडालाच लागतात. सुरंगीच्या कळ्या काढणे म्हणजे जोखिमीचे काम असते. कळ्या काढण्यासाठी झाडावर चढावे लागते व एक एक झालेली कळी काढावी लागते. ह्या कळ्याच काढाव्या लागतात. जर फूल उमलले तर गजरा करताना त्रास होतो. साधारण १० वाजता म्हणजे सुर्यप्रकाश पूर्ण आल्यावर ह्या कळ्यांचे फुलात रूपांतर होऊन झाड पिवळे दिसू लागते.

फुलांच्या सुगंधामुळे ह्या झाडावर साप येतात असेही म्हणतात. एवढी जोखीम आणि मेहनत घेऊन सुरंगीच्या ह्या गजऱ्यांना जास्त भाव नसतो. १० ते १५ रुपयांत ह्याचा गजरा मिळतो. शिवाय तो संध्याकाळी कोमेजतो. एकीकडे सायलीचा, टिकाऊ गजरे मात्र बाजारात २५ ते ३० रुपयांना मिळतात.

सुरंगीमध्ये दोन प्रकार आहेत. एक कमी वासाची सुरंगी आणि एक वासाची सुरंगी. दोन्हींची झाडे सारखीच असतात. फक्त कमी वासाच्या सुरंगीच्या फुलांमध्ये परागकण जास्त असतात, तर वासाच्या सुरंगीत कमी.

सुरंगीच्या फुलांचा मंत्रमुग्ध करणारा वास स्त्रियांना आकर्षित करतो. केसांमध्ये माळलेला गजरा सुकल्यावर काढला तरी पूर्ण दिवस ह्या फुलांचा वास केसांमध्ये राहतो. पूर्वी होळीला ह्या गजऱ्यांना खूप मागणी असे.तेव्हा हे गजरे भेट म्हणूनच वाटाले जायचे. गोव्यातील स्त्रियांना सुरंगीची वेणी खूप आवडते.

सुरंगीचे शास्त्रीय नाव Mammea suriga.