सुधा करमरकर (जन्म : मुंबई, १८ मे १९३४; - मुंबई, ५ फेब्रुवारी २०१८) यांचे घराणे मूळचे गोव्याचे. वडील तात्या आमोणकर हे गिरगांव-मुंबईतील साहित्य संघ या नाट्यसंस्थेशी संलग्न होते. त्यामुळे सुधाबाईंना घरातूनच नाट्यसेवेचे बाळकडू मिळाले होते. त्यांतच, तात्या आमोणकरांनी आपल्या सुधा आणि ललिता या दोन्ही मुलींना गायन आणि नाट्य शिकायला पाठवले होते. सुधाला त्या काळात पार्श्वनाथ आळतेकरांच्या कला अकादमीमध्ये दाखल केले गेले, आणि त्यानंतर नृत्यशिक्षक पार्वतीकुमार यांच्या हाताखाली नृत्यशिक्षण घ्यायला लावले. वयाच्या अठराव्या वर्षी त्या भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यप्रकारात प्रवीण झाल्या होत्या. त्याचे फलित त्यांना ताबडतोबच मिळाले. मो. ग.रांगणेकरांच्या ‘रंभा’ या पुनर्जन्मावर आधारित नव्या नाटकात त्यांना नृत्यकुशलनायिकेची, रंभेचीच भूमिका मिळाली, आणि त्यांची ती भूमिका गाजली.

सुधा करमरकर
जन्म नाव सुधा सुधाकर करमरकर
जन्म १८ मे १९३४
मुंबई
मृत्यू ५ फेब्रुवारी २०१८
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र नाट्यक्षेत्र (अभिनय, लेखन, दिग्दर्शन, निर्मिती)
भाषा मराठी
साहित्य प्रकार नाटके
विषय बालरंगभूमी
चळवळ बालनाट्यचळवळ
प्रसिद्ध साहित्यकृती >२५ बालनाट्ये
वडील तात्या आमोणकर
पती (शास्त्रज्ञ)सुधाकर करमरकर
पुरस्कार अनेक

वडील साहित्य संघात असल्यामुळे संघाच्या नाटकात छोट्या-मोठ्या भूमिका त्यांना कराव्या लागत. त्या काळात नटवर्य केशवराव दाते, नानासाहेब फाटक, मास्टर दत्ताराम, दुर्गाबाई खोटे अशा नाट्यक्षेत्रातील दिग्गजांचे मार्गदर्शन सुधा करमरकरांना मिळाले.

सुधाताईंनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून पदवी प्राप्त केल्यानंतर, दामू केंकरे यांनी त्यांना मुंबईतील जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्‌समध्ये (त्यांच्या नाटकातून काम करण्यासाठी) दाखल करून घेतले. त्यावेळी भारतीय विद्याभवनच्या आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धेत दामू केंकरे दिग्दर्शित ‘उद्याचा संसार’ हे नाटक सादर केले गेले. त्या स्पर्धेत, सर्व नाटकांमधून निवड होऊन सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक सुधा करमरकरांना मिळाले.

अधिकचे नाट्यशिक्षण घेण्यासाठी सुधा करमरकर परदेशात गेल्या. त्यांनी अमेरिकेत जाऊन 'बालरंगभूमी' या संकल्पनेचा अभ्यास केला. तिथे त्यांनी मुलांची नाटके पाहिली, आणि तिथूनच त्यांनी भारतात परत गेल्यावर काय करायचे ते ठरवून टाकले. शतकाहून अधिक वर्षाची परंपरा सांगणाऱ्या मराठी रंगभूमीला मुलांचे वावडेच होते .नानासाहेब शिरगोपीकर मुलांना घेऊन ‘गोकुळचा चोर’ हे नाटक करत असत. दामूअण्णा जोशीही मुलांना घेऊन नाटके करीत असत. अशा नाटकांचा उद्देश मुलांना सर्व भूमिका करायला मिळाव्यात एवढाच असे. मुलांचे एक वेगळे विश्व असते, त्यांची वेगळी कल्पनासृष्टी असते, त्यांची मानसिकताही वेगळेच रंग प्रकट करणारी असते हे काही माहीतच नव्हते. या वेगळेपणाची भूक भागेल असे प्रौढ नाटकापेक्षा सर्वस्वी वेगळे असलेले नाटक मराठी रंगभूमीवर नव्हतेच. त्यामुळेच शाळेतल्या समारंभातदेखील मुले दाढी, मिशा लावून किंवा कोट पॅन्ट घालून मोठ्यांचीच नाटके करीत असत. त्यांतील संवादांचा अर्थ मुलांना कळोना कळो, संवाद हातवारे करून धडाधड म्हणायचे आणि आपापल्या भूमिका वठवायच्या, हेच त्यावेळचे बालनाट्य होते.

सुधाताई मायदेशी परतल्या आणि सगळी परिस्थितीच बदलली. त्यांनी साहित्य संघाच्या सहकार्याने २ ऑगस्ट १९५९ रोजी 'बालरंगभूमी-लिट्ल थिएटर' सुरू केले. बालनाट्य हे लहान मुलांच्या करमणुकीसाठी असून ते वास्तव असावे म्हणून सुधाताईंनी रत्नाकर मतकरी आणि इतरही काही नाटककारांकडून नाटके लिहून घेतली. ती शाळांच्या हॉलमध्येच नव्हे, तर व्यावसायिक नाट्यगृहांतही सादर केली. यांतून मुलांची भरपूर करमणूक तर झालीच पण मुलांचे नाटक कसे असावे, याचा धडा सुधाताईंनी संबंधितांना घालून दिला. त्यांनी या लिट्ल थिएटरतर्फे बालनाट्य शिबिरांचे, स्पर्धांचे आयोजन केले.

सुधा करमरकरांनी मुंबईतील आपल्या वडिलांच्याच साहित्य संघ या नाट्यसंस्थेच्या साह्याने ‘मधुमंजिरी’ हे मराठी रंगभूमीवरील खरेखुरे पहिले बालनाट्य सादर केले. रत्नाकर मतकरी यांनी ते लिहिले होते. सुधा करमरकर या नाटकाच्या केवळ दिग्दर्शिकाच नव्हत्या तर त्या नाटकात त्यांनी चेटकिणीची अफलातून भूमिकाही केली होती. १९५९ साली रंगमंचावर आलेल्या या पहिल्या बालनाटकाने रंगभूमीवरील एका नव्या प्रवाहाचीच मुहूर्तमेढ केली. सुधा करमरकरांनी एकूण ३७ बालनाटकांची निर्मिती केली.

नाट्याभिनय

संपादन

रंगभूमीवर सुधा करमरकरांनी अनेक नाटकांतून भूमिका केल्या. त्यांतल्या गाजलेल्या भूमिका आणि नाटके अशी :

  • अनुराधा (विकत घेतला न्याय)
  • उमा (थँक यू मिस्टर ग्लॅड)
  • ऊर्मिला (पुत्रकामेष्टी)
  • कुंती (तो राजहंस एक)
  • गीता (तुझे आहे तुजपाशी)
  • चेटकीण (बालनाट्य-मधुमंजिरी)--इ.स.१९५९
  • जाई (कालचक्र)
  • झाशीची राणी (वीज म्हणाली धरतीला)
  • दादी (पहेला प्यार-हिंदी दूरदर्शनमालिका--इ.स.१९९७)
  • दुर्गाकाकू (भाऊबंदकी?)
  • दुर्गी (दुर्गी)
  • धनवंती (बेईमान)
  • बाईसाहेब (बाईसाहेब)
  • मधुराणी (आनंद)
  • मामी (माझा खेळ मांडू दे)
  • यशोधरा (मला काही सांगायचंय)
  • येसूबाई (रायगडाला जेव्हा जाग येते)
  • रंभा (रंभा)
  • राणी लक्ष्मीबाई (वीज म्हणाली धरतीला)
  • सुमित्रा (अश्रूंची झाली फुले)
  • --?--(पति गेले गं काठेवाडी)
  • --?--(उद्याचा संसार-स्पर्धेतले नाटक)

नाट्यदिग्दर्शन केलेली नाटके

संपादन
  • आनंद
  • काही वर्षे हरवली आहेत
  • मंदारमाला
  • मधुमंजिरी (बालनाट्य)

नाट्यलेखन

संपादन
  • जेव्हा यमाला डुलकी लागते
  • वळलं तर सूत
  • अबब विठोबा बोलू लागला.

लिहिलेली पुस्तके

संपादन
  • कन्याकुमारीची कथा
  • गणपतीची हुशारी

नाट्यनिर्मिती

संपादन

सुधा करमरकरांनी दिग्दर्शित करून रंगमंचावर सादर केलेल्या बालनाट्यांचे लेखक :

  • (चिनी बदाम)
  • रत्‍नाकर मतकरी (कळलाव्या कांद्याची कहाणी, मधुमंजिरी)
  • दिनकर देशपांडे (हं हं आणि हं हं हं )
  • (गणपती बाप्पा मोरया)
  • सुधा करमरकर (अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा,जादूचा वेल)
  • अलीबाबा आणि चाळीस चोर
  • माधव साखरदांडे
  • मीना नाईक
  • जयंत तारे
  • वंदना विटणकर
  • नरेंद्र बल्लाळ
  • माळवा केळकर
  • माधव वझे
  • राजगुरू

सुधा करमरकरांच्या बालरंगभूमीवरचे अभिनेते कलाकार

संपादन
  • भक्ती बर्वे (अलीबाबा आणि चाळीस चोर, अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा, चिनी बदाम)
  • सुधा करमरकर (मधुमंजिरी)

पुरस्कार

संपादन
  • झी दूरचित्रवाणीने ३ मार्च २०१२ला दिलेला जीवनगौरव पुरस्कार
  • महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या वतीने देण्यात येणारा, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार (२१ फेब्रुवारी २०१२)