चिदंबरम सुब्रमण्यम

भारतीय राजकारणी
(सी. सुब्रह्मण्यम या पानावरून पुनर्निर्देशित)

(३० जानेवारी १९१०- ७ नोव्हेंबर २०००)

चिदंबरम सुब्रमण्यम
जन्म १० जानेवारी १९१०
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा राजकारणी / तबलावादक
मूळ गाव पुणे

चिदंबर सुब्रमण्यम यांचा जन्म ३० जानेवारी १९१० मध्ये कोइंबतूर जिल्ह्यातील सेनगुट्ट पलयम येथे झाला. शालेय शिक्षण संपवून ते उच्च शिक्षणासाठी मद्रासमध्ये दाखल झाले. चक्रवर्ती राजगोपालाचारी व पंडित नेहरु या नेत्यांचा प्रभाव त्यांच्यावर पडला व स्वातंत्र्यलढयात त्यांनी भाग घेतला. १९४२ मध्ये महात्मा गांधींनी सुरू केलेल्या 'चले जाव' चळवळीत त्यांनी भाग घेतला.

तत्कालीन मद्रास प्रांतात १९५२ मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले व राज्यमंत्रिमंडळातही त्यांची निवड झाली. तमिळनाडूत राजगोपालाचारी, के. कामराज व भक्तवत्सलम आदी नेत्यांबरोबर त्यांनी काम केले व कुशल, कर्तबार व कडक शिस्तीचा प्रशासक म्हणून छाप पाडली. राज्यातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण हिच गुरुकिल्ली आहे, या भावनेने सुब्रमण्यम यांनी सर्वासाठी मोफत शिक्षण असूनही भयंकर दारिद्य, भूक यामुळे मुले शाळेत येत नसल्याचे लक्षात आाल्यानंतर त्यांनी या मुलांना एक वेळचे जेवण मोफत देण्यास प्रारंभ केला व देशभर त्यांच्या या योजनेचे कौतुक झाले.

केंद्रीय मंत्री म्हणून श्री. सुब्रमण्यम यांचे काम अनन्यसाधारण आहे. ज्येष्ठ नेते कृषी खाते सांभाळण्यास तयार नसताना पंतप्रधान लालबहादूरशास्त्रींनी त्यांना हे खाते सोपविले. अन्नधान्याच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्णकडे नेण्यासाठी विविध योजना राबवून श्री. सुब्रमण्यम यांनी शास्त्रीजींचा विश्वास सार्थ ठरविला. देशोदेशीचे उत्कृष्ट बियाणे वापरण्यास त्यांनी शेतकऱ्यांना प्रवृत्त केले व १९७२ मध्ये भारतात गव्हाचे सर्वाधिक पीक निघाले आणि ही हरितक्रांतीची नांदी ठरली. या त्यांच्या कृषिविषयक नव्या धोरणामुळे 'आधुनिक कृषी धोरणाचे शिल्पकार' अशी त्यांची ओळख झाली.

स्वातंत्र्योत्तर काळात देश घडवण्यासाठी भरलेल्या खऱ्या व ज्येष्ठ देशभक्तांच्या परिषदेचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. सुब्रमण्यम यांनी घटना परिषदेवरही काम करून घटना निर्मीतीत मोलाची साथ दिली.

पन्नास वर्षे सक्रिय राजकारणात असणाऱ्या सुब्रमण्यम यांनी १९७७ मध्ये निवृत्ती जाहीर केली. परंतु वेळोवेळी राजकीय व विकासाच्या दृष्टीने मार्गदर्शनासाठी आपल्या अनुभवांचा ठेवा त्यांनी उपलब्ध करून दिला.

१५ फेब्रुवारी १९९० मध्ये ते महाराष्ट्र्राचे राज्यपाल झाले हे पद सोडल्यानंतर भारतीय विद्या भवन या अग्रगण्य शैक्षणिक संस्थेच्या कार्यात स्वतःला झोकून दिलेे. केंद्र सरकारच्या एरोनॉटिक्स उद्योग, समितीचे अध्यक्ष, राष्ट्रीय कृषी आयोगाचे अध्यक्ष, नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष इ. महत्त्वाची पदेही त्यांनी संभाळली. वॉर ऑन पॉवर्टी . 'सम कंट्रीज हिच आय व्हिजिटेड राऊंड द्र वर्ल्ड, 'द्र इंडिया ऑफ माय ड्रीम' इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली.

देश वर्षानुवर्षे अन्नधान्य आयात करत असतानाच सुब्रमण्यम यांच्यामुळे झालेल्या कृषी क्षेत्रातील क्रांतीने संपूर्ण जगभर त्यांचे कौतुक झाले. तसेच अर्थमंत्री असतांना विभागीय ग्रामीण बँका' सुरू करून बँकांचे जाळे ग्रामीण भागापर्यंत पोचवून या भागाला बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले.

भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे सुब्रमण्यम यांनी शेतकऱ्यांसाठी व ग्रामीण भाग विकसित करण्यासाठी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. भारत सरकारने विविध क्षेत्रांतून निरंतर देशसेवा करणाऱ्या या नेत्याला १९९८ मध्ये 'भारतरत्न ' पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.