सिद्धिविनायक महागणपती मंदिर (टिटवाळा)

सिद्धिविनायक महागणपती मंदिर महाराष्ट्रात मुंबईजवळील टिटवाळा गावात असलेले गणपतीचे देउळ आहे.

येथे पूर्वी कण्वऋषींचा आश्रम होता. शकुंतलेने याच महागणपतीची पूजा केली असे सांगितले जाते आणि म्हणुनच या महागणपतीस विवाहविनायक असे म्हणले जाते.

सध्याच्या कल्याण तालुक्यात कल्याण-कसारा मार्गावर काळूनदीच्या काठावर असलेले हे देउळ प्राचीन असून याची मूळ बांधणी शकुंतलेने केली असल्याची आख्यायिका आहे. हे देउळ एका सरोवरात बांधलेले होते. कालौघात यात गाळ साचून देउळ पूर्णपणे गाडले गेले व सरोवरही नाममात्र राहिले. माधवराव पेशवे यांच्या राज्यकाळात पडलेल्या दुष्काळादरम्यान पाणी साठवण्याची सोय करण्यासाठी सरदार रामचंद्र मेहेंदळे यांनी या तळ्याचे उत्खनन करवले त्यादरम्यान हे देउळ जसेच्या तसे सापडले व देवाची मूर्तीही अभंग स्वरूपात मिळाली. वसईची लढाई जिंकल्यावर माधवराव पेशव्यांनी या देवळाचे पुनरुत्थान करवले व मूर्तीची पुनर्स्थापना केली. त्याचवेळी देवळासमोर लाकडी सभामंडप बांधला. १९९५-९६मध्ये या सभामंडपाचे पुनर्नवीकरण केले गेले.