सिंदखेड राजा

महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील गाव
(सिंदखेड (राजा) या पानावरून पुनर्निर्देशित)

सिंदखेड राजा हे महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील शहर आहे. हे गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई राजमाता जिजाबाई यांचे जन्म गाव आहे. त्यामुळे सिंदखेड राजाला एक आगळे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

सिंदखेड राजा हा बुलढाणा जिल्ह्यातील एक विधानसभा मतदार संघ आहे. ४५,००० लोकवस्तीच्या या सिंदखेड राजा शहरात जुन्या काळात बांधलेला जिजाबाईंचे वडील लखुजीराजे यांचा वाडा, रंगमहाल, सावकारवाडा, काळाकोट, लखुजी राजांची समाधी, पुतळा बारव, सजना बारव, गंगासागर, बाळसमुद्र या नावाच्या विहिरी, चांदणीतलाव, मोतीतलाव हे ऐतिहासिक जलसाठे वगैरे बघण्याजोग्या वास्तू आहेत.

जिजाऊ सृष्टी

संपादन

मराठा सेवा संघाने सिंदखेडराजा येथे नागपूर -मुंबई एक्सप्रेस हायवेवर स्वतःच्या जागेत जिजाऊ धर्मपीठ व जिजाऊ मंदिर अश्या सामूहिक ’जिजाऊ सृष्टी’चे निर्माण कार्य सुरू केले आहे. मोती तलावाच्या बाजूच्या पठारावर जिजाऊ सृष्टीसाठी जागा निवडण्यात आली आहे. या पठार शिवारात राजमाता जिजाऊ घोड्यावरून फेरफटका मारायच्या असे सांगितले जाते.ह्या ठिकाणी त्या युद्धकलेचे, राजकारणाचे शिक्षण घेत होत्या असे म्हणतात. त्याच जागेवर जिजाऊ सृष्टी हा प्रकल्प उभारला जाणार आहे.

जिजाऊ सृष्टी हा देशाच्या स्वाभिमानाचा राष्ट्रीय प्रकल्प व्हावा, हे जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र व्हावे, असा विचार आहे. त्यानुसार जिजाऊ सृष्टी हा विविध विषयांना सामावून घेणारा एकत्रित स्वरूप प्रकल्प व्हावा तो अद्यावत तीर्थक्षेत्र वा ज्ञानक्षेत्र व्हावे, ही संकल्पना आहे.

जिजाऊ संग्रहालय, जिजाऊ ग्रंथालय, महिला रोजगार केंद्र, महिला मिलिटरी अ‍ॅकेडमी, संशोधन केंद्र, महिला विद्यापीठ अशा संस्थांची निर्मिती व्हावी, अशीही योजना आहे. त्यात ध्यानमंदिर, संशोधन विभाग, प्रार्थनास्थळांची रचना करणे, विज्ञाननिष्ठ परंपरा वृद्धिंगत करणारे मेळावे भरवणे, विश्वशांती व एकसंघतेसाठी विविध चर्चासत्राचे आयोजन, विविध विषयाचे प्रशिक्षण, कार्ड कॅम्पस, कमांडो फोर्स, ट्रेनिंग सेंटर यासारख्या विविध योजना, सर्व बहुजन समाज, विज्ञाननिष्ठ, कर्मनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ बनवून संपूर्ण विश्वामध्ये मानवा-मानवा मध्ये समता, समानता, बंधुत्वाची आचारसरणी व विचारसरणी मांडणारा तयार व्हावा, अशी मांडणी व आखणी करणे, हा जिजाऊ सृष्टीचा मुख्य उद्देश आहे.

या प्रकल्पात भारताच्या सुमारे १०,००० वर्षांचा सांस्कृतिक इतिहास, जिजाबाईच्या काळातील देशातील सर्व क्षेत्रातील स्थिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाचे प्रसंग ते इ.स. २००५ पर्यंतची देशाची वाटचाल, बहुजन समाजातील सर्व समसजसुधारक-संतांची शिकवण लिखित स्वरूपात, चित्ररूपाने, शिल्परूपाने, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाच्या साहाय्याने आदी विविध प्रकारे चित्रित केली जाईल.