सालबेग हा राजा मान सिंगच्या मोगलांच्या सैन्यामधिल एक मुस्लिम योद्धा लालबेग ह्याचा मुलगा होय. लालबेगने पिपिली जवळील दंड मुकुंदपुर मध्ये असताना ललिता नावाच्या एका सुंदर ब्राह्मण विधवेला खेड्यातील तलावामध्ये स्नान करताना पाहिले. त्याने तिला पळवून नेऊन तिच्याशी जबरदस्तीने लग्न केले. त्याने जबरदस्तीने ललिताचे धर्मपरिवर्तन करून तिला मुसलमान बनवून तिचे फातिमा बीबी असे नामकरण केले. अशा जोडप्याच्या पोटी सालबेगचा १६ सप्टेंबर १५९२ला (राधाष्टमीच्या दिवशी) जन्म झाला. ज्या घरी त्याचा जन्म झाला, ते घर अजूनही कटकमध्ये लाल बेग किल्ल्याजवळ शाबूत असून ते त्याच्या आईला राहण्यास दिले गेले होते. लालबेग काही काळ कटकमध्ये राहिला आणि त्यानंतर ललिता आणि सालबेगला तिथेच सोडून तो तिथून गेला. जरी ललिताला जबरदस्तीने मुसलमान बनविले गेले होते तरी देखिल तिने पुरीच्या भगवान जगन्नाथाची पूजा अविरतपणे चालूच ठेवली होती. तसेच तिने बाल सालबेगला बालपणापासूनच जगन्नाथाच्या भक्तिचे बाळकडू पाजून त्याला लहानाचे मोठे केले होते.

१६०७ साली लालबेगची बंगालचा सुभेदार म्हणून जहांगीरने नेमणूक केल्यानंतर, त्याने दिल्लीच्या बादशाहीविरुद्ध बंड करणाऱ्या अफगाणी बंडखोरांविरुद्ध स्वतः सोबत लढण्याकरिता सालबेगला बोलवून घेतले. परंतु एका घनघोर युद्धामध्ये सालबेग गंभीरपणे जखमी झाला आणि लालबेग ठार मारला गेला. युद्धभूमिवर झालेल्या गंभीर जखमा चिघळतच गेल्यामुळे सालबेगला वेदना असह्य झाल्या. त्याच्या आईने बाल मुकुंदा नावाच्या एका हिंदू साधुला बोलावून आणले, ज्याने २१ दिवस सालबेगच्या बिछान्याजवळ बसून अविरतपणे महामंत्राचा जप केला आणि त्याच्या कपाळी भस्म लेपन केले. त्यावेळी त्याच्या आईने त्याला शुद्ध अंतःकरणाने भगवान जगन्नाथाची प्रार्थना करण्यास सांगितले. पहाता पहाता सालबेग आश्चर्यकारकपणे पूर्ण बरा झाला. अशाप्रकारे चमत्कारकरित्या पूर्ण बरा झाल्याने सालबेगची भगवान जगन्नाथावरील भक्ति आणि विश्वास आणखीनच दृढ झाला.

सालबेगचा अतूट विश्वास आणि त्याने भगवान जगन्नाथाची भावभक्तिने केलेली पूजा ह्यामुळे तो मुसलमान समाजामध्ये अत्यंत अप्रिय झाला, त्यामुळे त्याला त्याच्या राहत्या घरातून हाकलून देऊन त्याचे सर्व अधिकार काढून घेतले गेले. अशाप्रकारे पूर्णपणे द्रव्यहीन झाल्यानंतर तो पायी चालतच पुरीला गेला परंतु तिथे पोहोचल्यानंतर त्याला भगवान जगन्नाथाच्या मंदिरात प्रवेश दिला गेला नाही तसेच कोणत्याही मठात आणि हिंदू कुटुंबाने त्याला आश्रय दिला नाही. त्यावर त्याने स्वतःच ग्रँड रोडवर बलगंडी येथे तालवृक्षाच्या पानांपासून एक कुटीर बांधले व त्यामध्ये राहून तो रथोत्सवामधिल मिरवणूकीतून येणाऱ्या भगवान जगन्नाथाच्या रथाची उत्सुकतेने वाट पहात राहिला. भावपूर्णपणे भगवान जगन्नाथाची स्वरचित भजने कुटीराबाहेर उभा राहून गात असतानाच लोकांच्या समोर आश्चर्यकारकपणे एकामागोमाग एक असे तिन्ही रथ त्याच्या कुटीरासमोरच थांबले. भगवान जगन्नाथाचे दर्शन होऊ न शकल्याने सालबेगच्या डोळ्यातून एकसारख्या अश्रुधारा ओघळत होत्या. एक घटिका झाली तरीदेखिल रथ तसूभर सुद्धा हलत नाही हे पाहून पुजाऱ्यांनी नम्रपणे सालबेगला रथाचे दोर ओढण्याची विनंती केली, जेणेकरून रथ पुढे सरकेल. त्यावेळी सालबेगला रथामधे विराजमान झालेल्या भगवान जगन्नाथाचे दिव्य दर्शन झाले. जेव्हा कटकचा सुभेदार मिर्जा अहमद बेग पुरीच्या जगन्नाथ मंदिरावर हल्ला करण्यास आला तेव्हा सालबेगने त्याची भेट घेऊन अतिशय कळकळीची विनंती करून त्यास मंदिरावर हल्ला करण्यापासून परावृत्त केले. मंदिरावरील हल्ला टाळल्यामुळे तत्कालीन राजा नरसिंह देवाने अत्यंत कृतज्ञतापूर्वकपणे सालबेगला कुटीराच्या जागी एक कायमस्वरूपी घर बांधण्याची परवानगी दिली. त्याने बांधलेल्या मठाला भेट देण्याकरिता संपूर्ण भारतातून भक्त येऊ लागले. त्यानंतर त्याची आई ललिता (ऊर्फ फातिमा बीबी) त्याच्या सोबत राहण्यास पुरीला आली; कालांतराने तिच्या मृत्युनंतर जेव्हा सालबेग तिचे पार्थीव शरीर घेऊन पुरीतील स्मशानभूमि "स्वर्गद्वारा"ला गेला असताना मंदिराच्या पुजाऱ्यांनी स्मशानभूमि वापरण्यास परवानगी तर दिली नाहीच वर त्याच्यावरील तिरस्कार व्यक्त करण्याकरिता त्यांनी अहंकाराने उन्मत्त होऊन त्याच्या मठावर हल्ला केला.

त्यानंतर सालबेग मथुरेतील वृंदावनाला गेला, परंतु दिल्लीत औरंगजेबाचे राज्य असल्याकारणाने हिंदुंच्या सर्व मंदिरांवर हल्ले होत होते. ते पाहून सालबेग परत फिरला आणि पुरीतील रथयात्रेच्या वेळेस हजर राहण्याकरिता तो वेगाने निघाला. परंतु वाटेतच तो आजारी पडल्याकारणाने त्याचा प्रवास थांबला. आपण रथयात्रेच्या वेळेस जाऊ न शकल्यास प्रभु जगन्नाथाचे दर्शन आपल्याला दुरापास्त होईल ह्या काळजीने त्याने भगवान जगन्नाथाला कळवळून तो येईपर्यंत त्याची वाट पहाण्याची विनंती केली. इकडे पुरीस नेहमीप्रमाणे भगवान जगन्नाथाची रथयात्रा थाटामाटात निघाली, परंतु बलगंडीला म्हणजे सालबेगने उभारलेल्या मठाजवळ येताच रथ थांबला आणि काही केल्या रथ पुढे सरकेना. अनेक यज्ञयाग केले, कीर्तने करून पाहिली, शक्य तेवढे मनुष्यबळ लावून पाहिले आणि सर्वात शक्तिमान असे अनेक हत्ती देखिल रथास जोडून रथ ओढण्याचे प्रयत्न केले गेले; परंतु, सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. रथ हलण्याचे दूरच राहो उलट एक महापूर आल्याने रथाचा मार्ग पूर्णपणे बंद होऊन रथ तीन महिने एका जागीच स्थिर राहिला. जेव्हा सालबेग पुरीस पोहोचला आणि त्याने प्रेमपूर्वक रथारूढ भगवान जगन्नाथाचे दर्शन घेतले, तेव्हाच रथ पुढे सरकला. भगवान जगन्नाथानेच सालबेगची ही सच्ची आणि निरपेक्ष भक्ति जगाला दाखवून देण्याकरिता ही लीला केली होती.[]

आता मात्र राजा नरसिंह देवाला भगवान जगन्नाथाची सालबेगवर विशेष कृपा असल्याची पूर्ण खात्री झाली आणि त्याने मंदिराच्या पुजार्यांना सालबेगला मंदिरात प्रवेश देण्याची आज्ञा केली, परंतु, पुजार्यांनी राजाज्ञा पालन करण्यास साफ नकार दिला. परंतु, सालबेगला प्रभु जगन्नाथाचे प्रेमच पुरेसे होते, त्यामुळे आपल्या इष्टदेवतेच्या भक्तित रममाण होऊन तो अखेरपर्यंत पुरीतच राहिला. सन १६४६ मध्ये त्याने स्वतःच्या मर्त्य शरीराचा त्याग करून तो जगन्नाथाशी एकरूप झाला, असे म्हणतात की त्याच्या निर्वाणानंतर त्याचा मृत देह नाहीसा होऊन आश्चर्यकारकपणे त्या जागी सुगंधित फुलांची एक रास मात्र उरली होती.

बलगंडीमध्ये असलेल्या रामानंदी संप्रदायाच्या बलगंडी छत मठाच्या जवळच सालबेगची समाधि आहे. जणूकाही आपल्या अत्यंत प्रिय असलेल्या भक्त सालबेगची जगाला आठवण करून देण्याकरिता प्रत्येक वर्षी रथोत्सवाच्या वेळी भगवान जगन्नाथाचा रथ छ्त मठाजवळ म्हणजेच सालबेगच्या समाधिजवळ (मौसिमा मंदिराजवळ) थांबतो. आपल्या जीवनकाळात सालबेगने भगवान जगन्नाथ, राधाकृष्ण, शंकर आणि माता मंगला ह्या देवांना उद्देशून एकंदरीत १५० भक्तिगीते विविध भाषांमध्ये लिहिली. त्याचे सर्वात प्रख्यात भक्तिगीत, "आहे नील सईल (हे महान नील पर्वता..) हे होय.

हे नील पर्वतावरील भगवंता।
हत्तीप्रमाणे तुम्ही मंदिराबाहेर येता।
आमचे घनघोर दुःखारण्य दूर करण्याकरिता।
जैसे सोंडेने कमलपुष्प अलगद खुडून अर्पिता।
सर्व दुःखांना आमच्या मूठमाती तुम्ही देता।

संदर्भ

संपादन
  1. ^ "भगवान श्रीकृष्ण के इन मुस्लिम भक्तों के बारे में जानते हैं आप?". ३ ऑगस्ट २०२१ रोजी पाहिले.