सारस क्रौंच

(सारस या पानावरून पुनर्निर्देशित)

सारस क्रौंच अथवा नुसताच सारस (शास्त्रिय नाव :Grus antigone) भारतात मोठ्या प्रमाणावर नसला तरी विपुल प्रमाणात हा क्रौंच आढळून येतो व भारतातील स्थानिक क्रौंच आहे. हा क्रौंच नेहमी त्याच्या जोडीदाराबरोबर असतो व आयुष्यभर बहुतांशी एकच जोडीदार पसंत करतो. याची मुख्य खुण म्हणजे उंच मान, उंच पाय व डोके व चेहरा डोक्यावरील लाल व पांढरा पट्टा बाकी शरीर हलक्या करड्या रंगाचे असते. उंची साधारणपणे ५ फुटाच्या आसपास असते. इतर क्रौंचाप्रमाणे याचे वसतिस्थान पाणथळी जागा, तळी, सरोवरकाठ व नदीकाठ आहे तसेच भातशेतीचे प्रदेश याचे आवडते स्थान आहे. जगभरात आढळणाऱ्या १५ क्रोच प्रजातींपैकी सहा प्रजाती भारतात आढळून येतात. सारस हा यापैकीच एक.

सारस क्रौंच जोडी
Grus antigone

वर्णन

संपादन

सारस पक्षी पाऊस आणि अवर्णन यावर अवलंबून हा पक्षी आपल्या मूळ अधिवासाचे जवळपासच स्थलांतर करतो. सारस हा क्रौन्च कुळातला सर्वात मोठा क्रौन्च सुमारे दीड मीटर उंचीचा. जगातील सर्वात मोठा उडणारा पक्षी असेही त्याचे वर्णन करतात. लांबसडक, शिडशिडीत, जिलबी पाय, उंच मान आणि मस्तकाच्या मागील भागावर, गळ्याच्या वरच्या भागावर असलेल्या लालभडक पिसांमुळे हा पक्षी अधिकच सौंदर्यपूर्ण दिसतो. पाठ, पोट आणि पंखांवर राखाडी निळसर (खापराच्या पाटीसारखी) पिसे असतात. मात्र शेपटीकडे पिसे पांढरी असतात. शरीराच्या मानाने चोच लहानशी असून करड्या रंगाची दिसते. इतर क्रोचांसारखेच सारसही उडताना ताट मान सरळ पुढे करून आणि पाय एका रेषेत मागे ठवून उडतात. तुतारीसारखा, उछस्तरातील आवाज हे क्रोच पक्ष्यांचे वैशिष्टय. हा आवाज असताना, जमिनीवर फिरताना अथवा प्रणयक्रीडेच्या वेळीही काढतात.

आढळस्थान

संपादन

दक्षिण भारताच्या तुलनेत उत्तर भारतात हा जास्त प्रमाणात आढळून येतो. उत्तर प्रदेशचा राज्यपक्षी म्ह्णून मान्यता प्राप्त असलेला सारस महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि ईशान्य भारतातही आढळून येतो. सर्वाधिक वावर राजस्थान व उत्तर प्रदेशातील गंगेच्या खोऱ्यात आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात सारस आढळून आले होते आणि सरसाणा मोठ्या प्रमाणात धोका असल्याचा अहवाल देखील नोंद केला होता. अगदी अलीकदे जुने २०२१ दरम्यान भंडारा, गोंदिया आणि बालाघाट जिल्ह्यात नवयाने सारस पक्ष्यांची गणना करण्यात आलेली असली तरी त्यांचे अस्तित्त्व धोक्यात असल्याचेही नमूद केले आहे. उत्तर भारत, मध्य भारत आणि नेपाळ हा मुख्य अधिवास असलेला सारस पाकिस्तान आणि बांगलादेशामध्येही तुरळक प्रमाणावर दिसतो. हिमालयातील धर्मशाळा आणि काश्मीरमधील ३५०० फूट उंचीवरदेखील सारस आढळून येतो. त्याचप्रमाणे थारचे वाळवंट आणि कच्छच्या राणातही याचे वास्तव दिसून आले आहे. राजस्थानातील जोधपूर, गुजरातमधील सुरत आणि वलसाड, हरियाणातील हिस्सार, उत्तर प्रदेशातील अलाहाबाद, मध्य प्रदेशातील रेवा, छत्रपूर, ग्वाल्हेर आणि महाराष्ट्रातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यात सारस पक्ष्यांची आजवर नोंद घेण्यात आली आहे. मुख्यत्वे उत्तर महाराष्ट्राच्या जंगलात (फारच कमी) पण थोड्याफार प्रमाणात व विदर्भात तसा बऱ्यापैकी दिसतो. भंडारा जिल्ह्यातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान तसेच नागझिरा अभयारण्यात, मेळघाटमधील जंगलांच्या पाणथळी जागांमध्ये/भातशेतीमध्ये दिसण्याची शक्यता असते. अन्नाच्या उपलब्धतेनुसार हे पक्षी स्थलांतर करतात. भरतपुरच्या केवलदेव घाना राष्ट्रीय उद्यानात हा पक्षी हमखास दिसतो. महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र व कोकणात फारच दुर्मिळ आहे.

खाद्य

संपादन

उथळ पाणथळींमधे आणि शेतामध्ये/गवताळ रानात सारस दिसून येतो. मिश्रहारी असेलला हा पक्षी नाकतोडे, इतर कीटक, लहान जलचर आणि वनस्पतीवर ताव मारतो. इतर पक्ष्यांची अंडी, कासवांची अंडी, साप, कासव यांचाही सारसाच्या भक्ष्यात समावेश आहे. तांदळाच्या/धनाच्या उभ्या शेतातील धान्य/दाणे सारस खात नाही तर कापणीनंतर शिल्लक राहिलेले, खाली पडलेले तांदळाचे दाणे ते खातात. याच कारणांमुळे शेतकरी सारस पक्ष्यांना 'पिकांचा शत्रू' समजत नाही. मुळातच स्वभावाने धीट आणि कणखर असलेला हा पक्षी मानवी वस्त्यांच्या जवळपासच शेतजमिनी, गवताळ रानांमध्ये हमखास दिसतो. शेतांमध्ये काम करणाऱ्या माणसांच्या अवतीभवती, वाहतूक असणाऱ्या रस्त्याच्या कडेही हे पक्षी फिरताना, खाद्य शोधताना दिसून येतात.

सारस क्रोच हा नेहमीच जोडीने वावरताण दिसतो. काही वेळेस तर चांगली मोठी झालेली एक-दोन पिल्लेही त्याच्यासोबत असतात. जोडी जमल्यावर प्रणयराधना करणारे नार-मादी आपल्या घरट्यासाठी सीमाक्षेत्र ठरवितात. याक्षेत्रात दुसरा सारस अतिक्रमण करताना लक्षात आल्यास स्वतःचे लांब-रुंद पंख पसरवत आणि तीव्र कर्कश्य आवाज करत हे युगल नवीन पक्ष्याला हुसकावून लावते. सारासांचे प्रियाराधन हा नेत्रदीपक सोहळाच असतो. प्रियाराधना करणारी जोडी आकाशाकडे मान उंचावत गळ्यातून तीव्र स्वर काढत आपले विशाल पंख पसरवत लक्ष वेधून घेतात. जुलै ते ऑक्टोबर (म्हणजे पावसाळा) हा त्यांचा भारतातील विणीचा काळ. भात खाचरांमध्ये अथवा दलदलीमध्ये सारस मोठ्या आकाराचे घरटे बांधतो. यासाठी ते पाणवनस्पतीच्या आणि इतर वनस्पतीच्या काटक्या वापरतात. सुमारे मीटरभर उंचीचे आणि रुंदीचे हे घरटे तराफ्याप्रमाणे पाण्याच्या पृष्ठभागावर आल्याने स्पष्टपणे दिसून येते. एक जोडी हेच घरटे दुरुस्ती करून अनेक वर्ष वापरताना दिसून आले आहे. सारस मादी एक किंवा दोन(क्वचित प्रसंगी तीन किंवा चार) अंडी घालतात (वा दोन अंड्यांमध्ये ४८ तासांचे अंतर असते.) आणि त्यांना उबविण्याचा कालावधी हा ३४ दिवसांचा असतो. नार आणि मादी दोघेही अंडी उबविण्याचे काम चार ते पाच आठवड्यापर्यंत करतात. मातकट दुधाळ रंगाची अंडी चार इंच लांब, अडीच इंच रुंद आणि सुमारे २४० ग्राम वजनाची असतात. अंड्यातून पिल्लू बाहेर आल्यानंतर त्यांचे कवच दार नेऊन टाकले जाते अथवा प्रौढ पकडही ते खाऊन टाकतात. सुरुवातीचे काही दिवस आई-बाबा पिल्लं भरवतात. परंतु त्यानंतर माता पिल्ले स्वतः खायला लागतात. धोक्याचा इशारा मिळताच पिल्ले स्वतःला लपवून घेतात. सुमारे तीन महिन्याचे होईपर्यंत पिल्ले आपल्या जन्मदात्यासमेतच राहतात.

सारसाच्या घरट्याला, अंड्याला पिल्लाना अनेक क्षत्रू असल्याने त्यांच्या संख्येवर बंधने येतात. शेतात वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांमुळेही विषबाधेने सारसांच्या मृत्यूच्या घटना समोर आल्या आहेत. याचबरोबर उच्चदाबाच्या वीज वाहक तारांना धडकुनही हे पक्षी दगावल्याची नोंदी आहेत. भारतामध्ये सारसांची संख्या १५,००० च्या आसपास असून नेसर्गीक पाणथळीच्या ठिकाणी त्यांची संख्या अधिक असल्याचेही नोंदवण्यात आले आहे. 'आययूसीएन, रेड डेटा बूक' नुसार सारस पक्षांची नोंद 'संवेदनशील प्रजाती' म्ह्णून करण्यात आली असली तरी जागतिक पातळीवर ही प्रजात 'संकटग्रस्त' म्ह्णून घोषित कार्नाय्त आली आहे. शिवाय भारतीय वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ नुसार शेड्युल चार अंतर्गत यांचा समावेश करण्यात आला आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये

संपादन

भारतीय संस्कृतीमध्ये या पक्ष्याला मानाचे स्थान आहे. असे मानले जाते की वाल्मिकी ऋषींना सारस क्रौंचाच्या जोडीकडे पाहून पहिले काव्य सुचले व रामायणाची निर्मिती झाली. हे पक्षी आयुष्य एकाच जोडीदारबरोबर व्यतीत करीत असल्याने तसेच विणीच्या हंगामात जोडी अत्यंत मोहक असा प्रणयनृत्य करतात. त्यामुळे या पक्ष्यांना प्रेमाचे प्रतिक मानतात. राजस्थानमध्ये या पक्ष्याचे स्थान अतिशय मानाचे असल्याने याची शिकार करत नाही. असे मानतात की या पक्ष्याची शिकार केली तर त्याचा अथवा तिचा जोडीदार झुरून प्राण त्यागतो त्यामुळे याच्या शिकारीचे पाप अत्यंत मोठे आहे.