एकाच गावात राहणाऱ्या बऱ्याच लोकांना जेव्हा एकच आजार होतो, तेव्हा त्या आजाराला साथीचा आजार म्हणतात. एकेकाळी अशा साथीच्या आजारांना तोंड देताना मृत्युमुखी पडावे लागल्याची अनेक उदाहरणे असत. पण वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीनंतर अशा साथीच्या रोगांची कारणे समजू लागली आणि त्यावर उपायही होऊ लागले. साथीचे रोग बहुधा त्या भागातील दूषित पाण्यामुळे होतात, डासांमुळे, कुत्र्यांमुळे किंवा उंदरांमुळे पसरतात. किंवा आजार झालेला रुग्ण दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्या दुसरी व्यक्तीला आणि तिच्याकडून इतरांना आजार संभवतो. अशाप्रकारे आजाराचे रुग्ण वाढत जातात..

सामान्यपणे होणाऱ्या अशा साथीच्या आजारांची ही जंत्री :

  • इन्फ्ल्युएन्झा
  • कांजिण्या
  • चिकुनगुनिया
  • टायफॉईड
  • डांग्या खोकला
  • डेंग्यू (डेंगी)
  • देवी : डॉ. एडवर्ड जेन्नर यांनी इ.स. १७९६मध्ये देवीवरील लस शोधली. नंतर जगभर लसीकरणाची मोहीम सुरू झाली. पुण्यामध्ये १८०४मध्ये दुसऱ्या बाजीरावांनी स्वतःला आणि कुटुंबीयांना एका इंग्रज डॉक्‍टरकडून लस टोचवून घेतली होती. सुमारे पावणेदोनशे वर्षांमध्ये भारतीयांनी सातत्याने केलेल्या प्रयत्‍नांनांमुळे देवी रोगाचे उच्चाटन झाले. १७ मे १९७५ रोजी भारतात देवी झालेला अखेरचा रुग्ण होता. १९७७मध्ये या रोगाचे पृथ्वीवरून उच्चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले.
  • धनुर्वात
  • नारू : दूषित पाणी पिण्याने होणारा हा रोग आता भारतातून हद्दपार झाला आहे. २००१ सालानंतर भारतात नारूचा रोगी सापडलेला नाही.
  • मलेरिया
  • पटकी (कॉलरा)
  • पोलिओ : इ.स. २००९पर्यंत जगात सर्वांत जास्त पोलिओग्रस्त रुग्ण भारतात होते. रुग्णांच्या लाळ-विष्ठा-शिंकेमार्फत पोलिओचे विषाणू हवा-अन्न-पाण्यातून सर्वत्र पसरतात. निदानासाठी या रोगाची निश्‍चित लक्षणे दिसत नाहीत. हा रोग बरा करण्यासाठी हमखास औषध नाही. हे लक्षात घेऊन भारतातील डॉक्‍टर, तसेच वैद्यकक्षेत्रात सतत कार्यरत असणारे ’पॅरामेडिकल‘ कर्मचारी, सामाजिक संस्था, राजकीय इच्छाशक्ती व वीस लाख स्वयंसेवक यांनी मोठ्या हिकमतीने भारत पोलिओमुक्त करण्यासाठी चंग बांधला. त्यांना यश मिळाले. पोलिओची एकही ’केस‘ १३ जानेवारी २०११ नंतर भारतात आढळलेली नाही. नंतरच्या तीन वर्षांत कुणालाही पोलिओ झाला नाही. साहजिक जागतिक आरोग्य संघटनेने २७ मार्च २०१४ रोजी भारत पोलिओमुक्त असल्याचे जाहीर केले.
  • प्लेग
  • महारोग (कु्ष्ठरोग)
  • क्षय



कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘प्लेगच्या साथीं’चा रोचक आढावा : . जगाच्या इतिहासातील कमी काळात सर्वाधिक बळी घेणाऱ्या तीन प्रमुख महामारी. त्या एकाच जीवाणूमुळे (बॅक्टेरिया) उद्भवल्या. हा जीवाणू म्हणजे, ‘येरसिनिया पेस्टिस’. त्याच्यामुळे घडलेली भयंकर महामारी म्हणजे ‘प्लेगची साथ’. प्लेगच्या साथींनी संपूर्ण जगाला कवेत घेतले. तसा प्लेग अनेकदा उद्भवला, त्याने लाखोंचे बळीसुद्धा घेतले. पण जगाचा इतिहास आणि चेहरामोहरा मोठ्या प्रमाणात बदलून टाकणाऱ्या खालील या तीन प्रमुख साथी. त्या घडल्या नसत्या तर जगाच्या व्यवस्था आतासारख्या नसत्या, त्या काही वेगळ्या असल्या असत्या.

या तीन साथींबाबतचे हे रोचक संकलन, रोगांच्या निमित्ताने जगाचा इतिहास सांगणारे आणि बरेच काही शिकवणारे...

१. जस्टिनाईनचा प्लेग (सहावे शतक)

तसा प्लेग दुसऱ्या शतकातही उद्भवला होता, पण त्याचे महाभयंकर स्वरूप सहाव्या शतकात पाहायला मिळाले. ‘जस्टिनाईनचा प्लेग’ या नावाने ओळखली जाणारी ही महामारीचे वर्ष होते इसवी सन ५४१. बायझान्टाईन साम्राज्य हे त्या काळातील युरोपातील प्रसिद्ध साम्राज्य आणि जस्टिनाईन हे सम्राटाचे नाव.

बायझान्टाईन साम्राज्य हे वैभवशाली रोमन साम्राज्याच्या विभाजनानंतर निर्माण झाले होते. त्यापैकी रोमच्या पूर्व, दक्षिण भागावर असलेले राज्य बायझान्टाईन या नावाने ओळखले जात होते. त्याची राजधानी होती, कॉन्स्टँटिनोपल म्हणजे आताचे इस्तंबूल. हे शहर मध्ययुगात युरोपातील सर्वांत श्रीमंत शहर म्हणून ओळखले जात होते.

जस्टिनाईन हा इसवी सन ५२७ ते ५६५ या काळात या साम्राज्याचा सम्राट होता. तो उत्तम प्रशासक म्हणून ओळखला जाई. त्याने अनेक सुधारणा केल्या. त्यापैकी एक म्हणजे भ्रष्टाचार कमी करण्यासाठी केलेल्या सुधारणा.

इजिप्त ते कॉन्स्टँटिनोपल :

सम्राट जस्टिनाईन याच्याच काळात या साम्राज्यात प्लेग पसरला. तो इजिप्तमार्गे तेथे पोहोचला. या साम्राज्यात नव्यानेच इजिप्तचा प्रदेश जोडला गेला. या प्रदेशातील लोकांनी सम्राटाच्या सन्मानार्थ राजधानीत (कॉन्स्टँटिनोपल) धान्य पाठवले. पण या धान्यासोबत काय जाणार होते, याचा अंदाज कोणालाच आला नाही. धान्यासोबत काळे उंदीरही राजधानीच्या शहरात पोहोचले. या उंदरांसोबत प्लेगच्या जीवाणूचा प्रसार करणाऱ्या पिसवादेखील पोहोचल्या. त्यांनी हा रोग राजधानीच्या शहरात नेला. ते वर्ष होते इसवी सन ५४१.

प्लेग राजधानीच्या शहरात म्हणजे कॉन्स्टँटिनोपलमध्ये धडकला. या रोगाने लगेचच कॉन्स्टँन्टिनोपलला कवेत घेतले. पुढे तो वणव्यासारखा संपूर्ण युरोप, आशिया, उत्तर अमेरिका आणि अरेबियात पसरला. या महामारीने तब्बल ३ ते ५ कोटी लोकांचा जीव घेतला. काही अभ्यासकांच्या मते, या महामारीमध्ये त्या काळातील जगाची निम्मी लोकसंख्या मृत्युमुखी पडली. (काहींच्या मते पुढील दोन शतकांमध्ये त्याचा उद्भव सुरूच होता आणि बळींचा आकडा जगातील त्या वेळच्या एक चतुर्थांश लोकसंख्येइतका होता.)

रोमन साम्राज्याचे एकीकरण टळले :

सम्राट जस्टिनाईन हा महत्त्वाकांक्षी होता. विभागलेले रोमन साम्राज्य एकत्र करण्याची त्याची योजना होती. मात्र, या महामारीमुळे त्याच्या साम्राज्याला मोठा आर्थिक धक्का बसला आणि त्याचे स्वप्न भंगले. परिणामी, युरोप मध्ययुगात लोटला गेला. या मनुष्य संहारामुळे ख्रिश्चन धर्म वेगाने वाढण्याच्या दृष्टीने पूरक परिस्थिती निर्माण झाली.

याबाबत डिपॉल विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक थॉमस मॉकैटिस सांगतात, “या रोगाशी कसे लढायचे याबाबत लोकाना काहीच कल्पना नव्हती. लागण झालेल्या रुग्णांपासून दूर राहणे एवढेच काय ते माहीत होते. या साथीचा अंत कसा झाला, याबाबतचा अंदाज म्हणजे ज्या लोकांमध्ये या रोगाची प्रतिकारक्षमता विकसित झाली, ते जगले. बाकीचे मृत्युमुखी पडले.” .........

२. द ब्लॅक डेथ (चौदावे शतक) :

जस्टिनाईन काळातील प्लेगच्या साथीने सहाव्या शतकात जगाला मोठा धक्का दिला, आणि एक महामारी काय घडवू शकते, हे जगाला दाखवून दिले. प्लेग पूर्णपणे संपला नव्हता. पुढे आठशे वर्षांनंतर पुन्हा युरोपात उद्भवला. ही साथ १३४७ साली पसरली. त्यात इतक्या मोठ्या प्रमाणात बळी गेले की, रस्त्यावर पडून सडणारे मृतदेह, त्यामुळे पसरणारी दुर्गंधी-संसर्ग हे चित्र त्या काळात सर्वत्र पाहायला मिळे. अवघ्या चार वर्षांत तब्बल २० कोटी लोकांचा मृत्यू झाला. ही जगातील लोकसंख्येपैकी तब्बल एक-तृतीयांश इतकी होती. हा प्लेग तो ‘द ब्लॅक डेथ’ नावाने ओळखला जातो.

इतकी वर्षं लोटली तरी हा रोग का होतो, याबाबत नेमकेपणाने काही माहिती समजली नव्हती. एक बाब मात्र तोवर लक्षात आली होती. ती म्हणजे, रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे या आजाराची लागण होते. त्यामुळे १४व्या शतकात व्हेनिस राज्यात प्लेगच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी एक उपाय केला जाई. या राज्यातील रागुसा या शहराने एक उपाय शोधून काढला.

इतर बंदरांमधून येणाऱ्या जहाजांना रागुसा बंदरात प्रवेश देण्यापूर्वी ती ३० दिवसांसाठी बंदरापासून काही अंतरावर नांगरून ठेवावी लागत. तोवर जहाजावरील कणी आजारी पडले नाही, तरच त्या जहाजांना शहरात प्रवेश दिला जाई. अशा प्रकारे ही जहाजे ‘क्वारंटाईन’ केली जात. पुढे व्हेनिस राज्याने ही पद्धत स्वीकारली. काळाच्या ओघात हा काळ ३० ऐवजी ४० दिवस इतका करण्यात आला. ‘क्वारंटाईन’ हा शब्दही इटालियन भाषेतून आला आहे. ‘quaranta giorni’ म्हणजे चाळीस दिवस. ही पद्धत पुढे युरोपात स्वीकारली गेली. त्याचा निश्चित उपयोग झाल्याचे इतिहासकार सांगतात.

युरोपातील राजकीय परिणाम :

या महामारीने युरोपात अनेक राजकीय बदल घडवले. • या महामारीने इंग्लंड आणि फ्रान्स या देशांना इतके हतबल केले की त्यांच्यात सुरू असलेले युद्ध त्यांना थांबवावे लागले. • बदललेली आर्थिक परिस्थिती आणि लोकसंख्येचे बदललेले प्रमाण यामुळे ब्रिटनमधील सरंजामी व्यवस्था पार कोलमडून पडली. तिथे नवी व्यवस्था उभी राहण्याच्या दृष्टीने पूरक परिस्थिती निर्माण झाली. • ग्रीनलँडमधील लढवय्या व विध्वंसक जमात असलेल्या ‘वायकिंग’ यांचेही प्लेगमध्ये मोठे नुकसान झाले. त्यामुळे त्यांचे उत्तर अमेरिकेत पोहोचून तेथील प्रदेश ताब्यात घेण्याचे स्वप्नही भंगले. .....

३. लंडन प्लेग (सतरावे शतक) :

चौदाव्या शतकातील प्लेगच्या साथीतून लंडन शहर लवकर पूर्णपणे बाहेर पडू शकले नाही. कारण ही साथ १३४८ नंतर पुढे तीनशे वर्षांच्या काळात दर वीसेक वर्षांनंतर डोके वर काढतच होती. या संपूर्ण काळात लंडनमधील तब्बल २० टक्के लोकांचा मृत्यू झाला.

इंग्लंडने सन १५०० च्या सुरुवातीला रुग्णांना इतरांपासून वेगळे ठेवण्याचा (विलगीकरण) कायदा केला. ज्या घरात प्लेगचे रुग्ण होते, त्यांच्या घराबाहेर तशा खुणा उभारण्यात आल्या. रुग्णाच्या घरातील लोकांना बाहेर सार्वजनिक ठिकाणी जाताना पांढऱ्या रंगाची काठी सोबत न्यावी लागे.

त्या काळी अशीही एक समजूत होती की, कुत्री व मांजरांमुळे हा रोग पसरतो. त्यामुळे लाखो प्राण्यांची एकत्र कत्तल करण्यात आली. १६६५ साली या साथीने कळस गाठला. अवघ्या सात महिन्यांमध्ये लंडनमध्ये एक लाख लोकांचा मृत्यू झाला. मनोरंजनाच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी रुग्णांना बळजबरीने त्यांच्या घरात कोंडण्यात येत होते. त्यांच्या घरांवर लाल फुली रंगवण्यात येत असे आणि ‘देवाची आमच्यावर दया आहे’ असे लिहिले जात असे. मृतांचे एकत्रित दफन केले जाई. ही साथ रोखण्याचा हाच एक मार्ग उरला होता, तो हाती घेण्यात आला. ...... अशा या ऐतिहासिक महाभयंकर साथी. त्यांनी जगाचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यांच्याशी तुलना केल्यावर आताच्या कोरोना विषाणू साथीशी अनेक समान धागे दिसतात का? हे शोधणे अधिक रंजक आणि उद्बोधक ठरेल.

(संदर्भ – पेन्डॅमिक दॅड चेंज्ड हिस्टरी लेख ; हाऊ ५ ऑफ हिस्टरीज् वर्स्ट पेन्डॅमिक फायनली एन्डेड लेख) (सौजन्य – हिस्टरी.कॉम) (संकलन व अनुवाद – टीम भवताल)