स्त्रियांच्या सामाजिक दर्जातील बदल – एक आढावा

आधुनिक युगामध्ये सतीला पुरुषाप्रमाणे स्थान दिले आहे. स्त्रीला वैचारिक, सामाजिक, राजकीय स्वातंत्र्य आहे. अशी विचारधारा सर्वत्र आढळून येते. पण प्रत्यक्षात वृत्तपत्रातून प्रकाशित होणा-या दैनंदिन स्त्री अत्याचारांच्या बाताम्यांवरून वरील विचारधारा सत्य असेल काय? असा प्रश्न मनात उपस्थित झाल्यावाचून राहात नाही. स्त्रीचे जीवन केवळ उपभोगापुरते आहे का? स्त्रीला स्वतंत्र काही अस्तित्व आहे का? स्त्रीचे कार्य केवळ ‘चूल आणि मूल’ एवढेच आहे का? स्त्रीला पुरुषापेक्षा कमी दर्जा देण्यास जबाबदार कोण? व केव्हापासून स्त्रीचा दर्जा खालावला? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. यासर्व प्रश्नांची उत्तरे शोधावयाची असेल तर, अतिप्राचीन आदिम संस्कृतीपासून आजतागाय स्त्रीच्या दर्जामध्ये झालेल्या बदलाचा विचार करणे अगत्याचे ठरते. अतिप्राचीन आदिम काळामध्ये स्त्रीच्या सर्जनक्षमतेबद्दल मानवसमूहात गुढतामिश्रीत कुतूहल आणि भययुक्त आदर असल्याने स्त्रीबद्दल आदराची भावना होती. भूमी आणि स्त्रीचा दर्जा समान मानला जात असे. भूमी ज्याप्रमाणे सर्जनशील आहे, तिच्यामध्ये नवनिर्मिती क्षमता आहे. त्याप्रमाणे स्त्रीमध्येही नवजीव निर्मितीची क्षमता आहे. या साम्यावरून स्त्रीला तेव्हा आदराचे स्थान होते. तत्कालीन समाज हा कृषी व्यवसायाशी निगडीत होता; व स्त्री ही कृषी कार्यात तरबेज होती. वस्त्र तयार करणे, धागा तयार करणे, विणकाम करणे यासर्व माध्यमातून तत्कालीन अर्थव्यवस्थेत स्त्रीचे महत्त्वाचे योगदान होते. समाजव्यवस्थेच्या मुळाशी अर्थव्यवस्था असल्यामुळे त्या काळात मातृसत्ताक कुटुंबव्यवस्था अस्तित्वात आली. प्रो.-हेनफेल यांच्यामते, “शेतीचा शोध आणि मातृसत्ताक समाजव्यवस्था यांची निर्मिती प्रथम भारतात झाली.” मोहंजदारो व हडाप्पा येथील उत्खननात सुद्धा स्त्रीच्या योनीतून वृक्ष बाहेर आल्याची प्रतिमा सापडली. याचाच अर्थ त्याकाळात भू देवतांची म्हणजेच स्त्री देवतेची पूजा करण्याची पद्धत असल्याचे दिसते. पुढे यामधून आदिमाता, आदिशक्ती या संकल्पना निर्माण झाल्या असाव्यात. थोडक्यात स्त्रीचा दर्जा तेव्हा पूजनीय होता. प्रो.मार्शल म्हणतात की, “मोहंजदारो व हाडाप्पा येथील संस्कृती अत्यंत प्रगत व मातृसत्ताक होती.” अशा प्रकारे स्त्रीचा दर्जा कृषी व्यवस्थेमुळे महत्त्वाचा होता. प्राचीन आदिम काळातील कृषीचे मानवी जीवनातील महत्त्व पाहता अनेक विधी, उत्सव व व्रत कृषी संदर्भात स्त्रियांनी निर्माण केल्याचे दिसून येते. जसे, सूर्यपूजा, वृक्षपूजा, नागपूजा, वारुळपूजा, वृषभपूजा, मेघपूजा, भूमीपूजा, लिंगपूजा इत्यादी या सर्वांच संबंध आज जरी धर्माशी जोडला असला, तरी धार्मिकतेशी या क्रियांचा काहीही संबंध नसून या व्रत, उत्सवांचे मूळ कृषी जीवनाशी निगडीत आहे. प्राचीन काळापासून आजपर्यंत हि व्रते स्त्रिया आनंदाने करताना दिसतात. प्राचीन आदिम काळातील पूजनीय असणा-या स्त्रीचा दर्जा आर्यांच्या आगमनानंतर व त्यांच्या संस्कृतीचा पगडा समाजमनावर पडल्यानंतर बदलत गेल्याचे दिसून येते. आर्यांच्या वैदिक संस्कृतीमध्ये पुरुष प्रधानता आली बैल, नांगर, यंत्रे यांचा कृषी व्यवसायात वापर वाढत गेला; व स्त्री ही कृषी व्यवसायापासून दूर सरत जाऊन पुरुषांचे महत्त्व वाढीस लागले. वैदिक संस्कृतीने मातृसत्ताक कुटुंबपद्धती, अर्थव्यवस्था व समाजव्यवस्था दृढ केली. आर्याच्या संस्कृतीमधून स्त्रियांना सर्वार्थाने दुय्यम करणा-या तीन दृष्ट प्रथा अस्तित्वात आल्या. त्या म्हणजे १) बहुपत्नीत्व २) बालविवाह ३) सतीची प्रथा. आर्य येण्याअगोदर ह्या प्रथा नव्हत्या. –हेनफेलच्या मते, “ब्राम्हणकाळात स्त्रीला सर्वाधीकारापासून वंचित करण्याचे काम नियमबद्धपणे केले गेले.” एकेकाळी अर्थव्यवस्थेचा कणा असणा-या स्त्रीचे कार्य केवळ ‘चूल आणि मूल’ एवढेच मानल्या जाऊ लागले. तिच्यावर बालविवाह, सतीप्रथा, केशवपन असे अत्याचार घडू लागले. धर्मात असेच लिहून आहे असे सांगून स्त्रियांना हीन दर्जा देणारे हे धर्मनिर्माते जागोजागी धर्माच पुष्टी जोडू लागले. सामाजिक, धार्मिक अत्याचाराच्या अंधारात दडलेल्या या स्त्रीला बाहेर काढण्यासाठी ज्योतीबा फुले सारखा प्रकाशझोत उदयास आला. ज्योतीबांनी स्त्रियांना शिक्षणाचे द्वार खुले केले. ब्रिटीश शासनास विनंती करून सतीप्रथा, केशवपन या कुप्रथा बंद केल्या. विधवेकरिता सुतिकागृह स्थापन केले. हळूहळू स्त्रीचा दर्जा शिक्षणामुळे सुधारला. स्वातंत्र्यानंतर तर या दर्जामध्ये आमुलाग्र बदल झाला, पण आजही स्त्रीला प्राचीन आदिम काळी असलेला दर्जा मात्र मिळाला नाही. याचा ठोस पुरावा म्हणजे शासनाने सुद्धा स्त्रियांना सर्व स्थरावर ५०% आरक्षण दिलेले दिसत नाही.