आप्पा भाऊ मगदूम संपादन

समडोळीकर वीरानुयायी आ. भा. मगदूम यांचा जन्म २६ मार्च १९०८ रोजी सांगलीजवळील समडोळी या खेडेगावात झाला. समडोळीच्या भाऊ बाबाजी मगदूम यांचे ते जेष्ठ सुपुत्र. भाऊ मगदूम हे अत्यंत प्रतिष्ठित आणि संपूर्ण गावात दरारा असणारे सदगृहस्थ होते.

आप्पा भाऊ मगदूम यांचे शिक्षण मराठी सातवीपर्यंत समडोळी येथेच झाले. त्या काळी प्राथमिक शिक्षक होण्यासाठी एवढे शिक्षण पुरेसे होते. ते सांगली जिल्ह्यातील भोसे येथील प्राथमिक शाळेत उपशिक्षक म्हणून रुजू झाले.

याच काळात आपला पेशा सांभाळून ते विविध नियतकालिकांतून वेगवेगळ्या विषयांवर लेख, कथा, कविता, प्रवासवर्णने इत्यादी प्रकारचे साहित्य लिहू लागले. त्या काळच्या प्रसिद्ध शालापत्रक, किर्लोस्कर, प्रावीण्य, जैन बोधक, प्रगती आणि जिनविजय या व इतर अनेक नियतकालिकांतून त्यांचे साहित्य प्रकाशित होऊ लागले. दर्जेदार लिखाण आणि सोपी व रंजक भाषा, नेमक्या शब्दात विषय मांडण्याची हातोटी, विषयवैविध्य यामुळे त्यांना मराठी साहित्य जगतात अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली.

पुढे त्यांची बदली आष्टे येथे झाली. तिथे असताना त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवाजी कोण ही कादंबरी प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांची बदली समडोळी या त्यांच्या मूळगावी झाली. समडोळी हे कांहीसे आडबाजूला असणारे एक छोटेसे खेडे, पण ते त्या काळात विविध प्रकारच्या चळवळींचे केन्द्रच बनले होते. सांगलीपासून जवळ आणि तरीही आडबाजूला असल्याने स्वातंत्र्य सैनिक या खेडयाचा उपयोग एकत्र येऊन विचारविनिमय करण्यासाठी करीत असत. बा. भू. पाटील व ना. ह. आपटे हे प्रसिद्ध मराठी लेखक याच गावचे.

आप्पा भाऊ मगदूम यांनी समडोळीला आल्यावर श्री वीर ग्रंथमाला या प्रकाशन संस्थेची स्थापना केली. या ग्रंथमालेचा उद्देश जैन साहित्य प्रकाशित करून ते जैन व अन्य समाजापर्यंत पोहचवणे हा होता. या मालेचे पहिले पुष्प म्हणजे १९३७ साली प्रकाशित झालेले वीर शासन हे पुस्तक होय. या पुस्तकात भगवान महावीरांच्या शिकवणुकीचे रसाळ भाषेत वर्णन करण्यात आले होते. विशेष म्हणजे हे पुस्तक त्या वेळच्या मुंबई इलाखा विद्याखात्याने शिक्षकांच्या वाचनालयांकरिता मंजूर केले होते. पुढे या ग्रंथमालेतून आ. भा. मगदूम यांनी स्वत: लिहिलेली तसेच प्रसिद्ध लेखक तात्या केशव चोपडे, बा. भू. पाटील, रा. ने. शहा यांची एकूण २४ पुस्तके प्रकाशित झाली. त्यांत महाराष्ट्रातील ३० कवींच्या प्रातिनिधिक कवितांचा संग्रह नादलहरी याचा ही समावेश होता.

कुशल प्रकाशक संपादन

श्री वीर ग्रंथ मालेच्या बहुतेक पुस्तकांच्या किमान दोन आवृत्त्या निघाल्या, त्यादेखील अल्पावधीतच. त्या कालातील इतर पुस्तकांच्या मानाने मालेची पुस्तके थोडीशी महाग असत, तरीही त्यांना भरपूर मागणी असे. याचे कारण म्हणजे आ. भा. मगदूम यांचे कुशल व्यवस्थापन, प्रचार यंत्रणा व विक्री व्यवस्था हे होय. मालेच्या पुस्तकांची परीक्षणे प्रमुख मराठी नियतकालिकांमधून प्रसिद्ध होतच, शिवाय Oriental Literary Digest व Bombay Chronicle या सारखी इंग्रजी नियतकालिकेही त्यांच्या पुस्तकांची दखल घेत.

मालेची अनेक पुस्तके मुम्बई इलाखा व मध्य प्रांत या दोन्ही राज्यांच्या विद्याखात्यांनी शिक्षकांच्या वाचनालयांकरिता मंजूर केली होती.

पुस्तके मोफत वाटायाला आ. भा. मगदूम यांचा विरोध होता. पुस्तके मोफत दिल्यास अनेकांना त्याची अजिबात किंमत वाटत नाही, त्यामुले अल्पशी का होईना, किंमत जरूर आकारावी असे त्यांचे स्पष्ट मत होते.

आ. भा. मगदूम यांनी लिहिलेल्या साहित्यात विविधता आढ़लून येते. त्यात कथा, लेख, कविता, चरित्र, नाटके, अनुवाद, विवेचन, प्रवासवर्णन, कादंबरी यांचा समावेश आहे. त्यांनी लिहिलेल्या चरित्रात्मक साहित्यात श्रेणिक, चन्द्रगुप्त, अशोक, कुमारपाल, वनराज चावडा, शिवाजी इत्यादी प्राचीन व मध्ययुगीन वीरांच्या कार्यांचा परिचय आहे.

आ. भा. मगदूम यांनी हिन्दी व इंग्रजीतही लिखाण केले आहे.

१९४२ साली त्यांनी समडोळी येथे काँग्रेस कमिटीची स्थापना केली.

अशा या अष्टपैलू साहित्यिकाचे १९४८ साली वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी निधन झाले. आडबाजूच्या खेड्यात राहून साहित्य निर्मितीचे त्यांचे कार्य खरोखरच वाखाणण्यासारखे आहे.