गोमंतकीय मराठी साहित्य

लेखिका,  कवयित्री,लोककला अभ्यासक,

सौ. पौर्णिमा राजेंद्र केरकर.

मुलाखतकार – सुखदा र. गांवस

हजेरी क्र.- एम आर १३१८

परिचय

जन्म पेडणेतील अरबी सागराच्या किनायावर वसलेल्या निसर्गसंपन्न आणि संतकवी सोहिरोबानाथ आंबिये यांच्याशी निगडित असलेल्या पालये गावात झाला. वडील कै. पांडुरंग परब हे स्वातंत्र्यसैनिक आणि मराठी शिक्षक होते. मराठी नाटकाचे दिग्दर्शक, कलाकार म्हणून त्यांना अनुभवत असताना त्यांना नाट्यकलेची ओढ निर्माण झाली.

प्राथमिक शिक्षण सरकारी प्राथमिक शाळेत, तर माध्यमिक शिक्षण पालयेतील आयडियल, तर उच्च माध्यमिक शिक्षण पेडणेतील सरकारी माध्यमिक विद्यालयात झाले. म्हापसा येथील सेंट झेवियर कॉलेजमधून मराठी आणि तत्वज्ञान विषय घेऊन पदवी मिळवली तर गोवा विद्यापीठातून प्रथम वर्गात पदव्युत्तर शिक्षण मराठीतून पूर्ण केले. कोंकणी सनद परीक्षेत गोवा राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला.

वडील मराठी शिक्षक असल्याने लहानपणापासून त्यांना सुंदर कविता, नाट्यगीते, भावगीते गाऊन दाखवायचे. थोरला भाऊ दादू परब कवी असल्याने त्याच्यासोबत त्यांना साहित्यिक उपक्रमांत सहभागी होण्याची संधी लाभली. मराठी साहित्याचे वाचन होऊ लागले आणि त्यामुळे त्यांच्यातील काव्यलेखनाच्या उर्मीला पोषक वातावरण लाभले. टिचर, कविता लेखन करू लागले आणि राज्यस्तरीय कविता वाचनात त्यांना बक्षिसेही मिळाली. वर्तमानपत्रात पाठविलेल्या कविता प्रकाशित होऊ लागल्या. प्राचार्य गोपाळराव मयेकर, डॉ. सोमनाथ कोमरपंत, प्राचार्य अनिल सामंत, प्रा. गजानन मांद्रेकर, कवयित्री लीना पेडणेकरसारख्या बुजूर्गांनी मार्गदर्शन केले. आणि त्यामुळे २००९ साली स्पदंन हा पहिला कवितासंग्रह त्यांचा प्रकाशित झाला.

साहित्य क्षेत्रातील योगदानाबाबत २०११ साली त्यांना धी गोवा हिंदू असोसिएशन मुंबईतर्फे कविवर्य बा. भ. बोरकर पुरस्कार प्राप्त झाला. पर्यावरण शिक्षण आणि जागृती क्षेत्रात आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून कार्य करत असल्याबाबत मुंबई येथील सेंक्च्युरी एशिया द्वैमासिकातर्फे त्यांना हरित शिक्षक पुरस्कार २०११ साली प्राप्त झालेला आहे.

१९९७ साली त्यांना गोमंतक मराठी अकादमीची अ.का. प्रियोळकर शिष्यवृत्ती आणि २००० साली भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाची लोकसाहित्याच्या संशोधनासाठी शिष्यवृत्ती लाभली होती. त्याद्वारे त्यांनी गोव्यातील धालोत्सवाचे स्वरूप समजून घेण्यासाठी पायाला भिंगरी बांधल्यागत पेडणे ते काणकोणपर्यंत भ्रमंती केली आणि त्यातून त्यांनी परिश्रमपूर्वक गोव्यातील धालोत्सवाचे स्वरूप या ग्रंथाची २०११ साली निर्मिती केली. लोकसाहित्याचा धांदोळ घेत असताना त्यांनी गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती खात्यामार्फत २०१२ साली अनुबंध लोकगंगेचे हे पुस्तक निर्माण केले. तत्पूर्वी २००९ साली त्यांचा स्पंदन हा कवितासंग्रह प्रकाशित झालेला आहे.

        सातत्याने समाजाशी नाते राखल्या कारणाने त्यांच्या लिखाणाचे विषयही त्यांच्याशी संबधित आहेत. लोकसाहित्य, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, लोकधर्म आदी विषयांवर त्यांनी आजपर्यंत केलेले लिखाण केंद्रभूत आहे.

मानवी मनाला विलक्षण आकर्षण असलेल्या आणि कल्पनेपलीकडे असलेल्या सभोवतालच्या भूताखेतांच्या आणि देवचारांविषयीच्या कथा त्यांनी अतर्क्य या लेखमालेतून मांडल्या. यंत्रयुगाच्या आगमनामुळे मानवी जीवनातून इतिहासजमा झालेल्या कित्येक वस्तूंची, घटकांची संशोधनात्मक माहिती त्यांनी विस्मृतीच्या उंबरठ्यावर या लेखमालेतून समोर आणली. लोकसंस्कृतीचे नंदादीप या लेखमालेतून त्यांनी नृत्य, नाट्य, गायन, वादन आदी लोककला क्षेत्रातील कलावंताबरोबर गावोगावी विशेष प्रकाशात न आलेल्या कारागिरांच्या जीवनाचे अज्ञात पैलू सिध्दहस्तरित्या मांडले.

आजपर्यंत त्यांनी गोव्याच्या लोकसंस्कृतीच्या विविध पैलूंचा जो धांडोळा घेतला,ते त्यांनी स्वतःजवळील संपादित ज्ञानाचे आकलन करून कधी पुस्तक रूपात तर कधी ललित लेखनाद्वारे प्रकाशात आणलेले आहे.

तळागाळात वावरून, समाजमूल्ये शोधून जतन करणारी ती एक फार मोठी समाजसेविका आहे. भावूक मनाची कवयित्री तर आहेच पण उत्तम प्राध्यापिकाही आहेत. ज्ञानप्रकाश उच्च माध्यमिक विद्यालय, मुळगाव इथे मराठीची व्याख्याती आहे.