उन्हाळ्या मध्ये नवजात बालकांची काळजी कशी घ्यावी?

मार्च महिना सुरू झाला की उन्हाळ्याची चाहूल लागते आणि आकाशामधला सूर्य आणि एकूणच वातावरण तापायला सुरुवात होते आणि या वातावरणाचा परिणाम आपल्या आरोग्यावरही दिसून येतो. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे आणि त्यातही नवजात बालकांची जास्त काळजी घ्यायला हवी कारण त्यांच्यासाठी हा पहिला उन्हाळ्याचा ऋतू असतो आणि आजूबाजूच्या उष्ण वातावरणाशी जुळवून घेणे त्यांच्यासाठी कठीण असते.

      नवजात बालकांना उन्हाळ्यामुळे विविध प्रकारचे त्रास होतात-

1. अंगावर घामोळ्या किंवा रॅश येणे.

2. गर्मी सहन न होणे.

3. लघवीला त्रास होणे.

या आणि अशा प्रकारच्या समस्यांमुळे बालके चिडचिड किंवा रडणे अशा गोष्टी करत रहातात. या सगळ्या त्रासांपासून सुटका मिळावी आणि उन्हाळ्यातील गरम वातावरणापासून नवजात बालकांचे रक्षण करण्यासाठी आपण काही गोष्टींची काळजी घेऊ शकतो जसे की

1. बालकांना पातळ,सुती आणि फिकट रंगाचे कपडे घालावे.

2. जास्त घट्ट आणि टोचणारे कपडे घालू नयेत.

3. बालकांच्या सभोवतालचे वातावरण थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा.

4. बालकांना दिवसातून दोन वेळा कोमट पाण्याने अंघोळ घालावी.

5.बालकांना गर्मीमुळे मुळे घामोळ्या झाल्या असतील तर

घामोळ्या झालेला भाग स्वच्छ करून काही वेळापुरता उघडा ठेवावा आणि त्याला हवा लागून द्यावी.

6. बालकांनाही उन्हाळ्यामध्ये डीआयड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता होण्याचा त्रास होऊ शकतो त्याकरिता जर बालक सहा महिन्यापेक्षा लहान असेल तर त्याला थोड्या थोड्या वेळाने फीडिंग करत रहावे आणि सहा महिन्यावरील असेल पाणी आणि फळांचे ज्यूस देत राहावेत.

7. उन्हाळ्यामुळे मुलांना मान, पाठ, काख आणि जागेमध्ये घामोळ्या होण्याची शक्यता असते हे भाग अधून मधून कोरडे करत रहावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने तेथे पावडर लावावी.

8. ड जीवनसत्त्वासाठी बाळांना सकाळच्या कोवळया उन्हात न्हेत असाल तर ते अगदी सकाळी सूर्योदयानंतर लगेच घेऊन जावे. त्यानंतर उन्हामध्ये नेल्यास जास्त त्रास होतो

  9. बाळ थोडे मोठे म्हणजे सहा महिन्यापेक्षा जास्त असेल तर सब्जा किंवा तुळशीचे बी घातलेले पाणी, फळांचा रस, मनुक्याचे पाणी इत्यादी गोष्टी त्यांच्या आहारात ठेवाव्यात.

10. बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो की उन्हाळ्यामध्ये बाळाला गुटी द्यावी की नाही कारण त्यातील काही पदार्थ उष्ण असतात पण जर तुम्ही बाळांना नियमितपणे गुटी देत असेल तर ती एकदम बंद करू नका, तिचे प्रमाण कमी करा.

11. बाळाने दिवसातून साधारण सहा ते आठ वेळा लघवी करणे अपेक्षित आहे तेवढी होत नसेल आणि लघवीचा रंग सुद्धा पिवळसर असेल तर याचा अर्थ बाळाला डीहायडरेशन होत आहे त्यानुसार त्याला जास्त फीडिंग किंवा पाणी देणे गरजेचे असते.

अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर बाळांचा पहिला उन्हाळा सुद्धा जास्त त्रासदायक न होता सुखकर्ता होऊ शकतो.