मायमराठीतून संगणक  वापरण्यासाठी आतुर असलेल्या मराठी जनांना....

मराठीतून माहिती तंत्रज्ञान...महाराष्ट्रासाठी माहिती तंत्रज्ञान

एकविसाव्या शतकात प्रवेश केल्यानंतर मराठीच्या विकासाला माहिती तंत्रज्ञानाचा परिसस्पर्श लाभणे ही स्वाभाविक बाब होती. मात्र त्यासाठी सध्या माहिती तंत्रज्ञानात मराठी वापरताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी कोणीच पुढाकार न घेतल्याचे दिसून आले आहे. ‘मराठीतून माहिती तंत्रज्ञान…महाराष्ट्रासाठी माहिती तंत्रज्ञान’ अशी ठाम भूमिका घेऊन हा महत्त्वाचा पण दुर्लक्षित विषय प्रकाशात आणणे हे प्रवाहाविरुध्दचे काम बनले आहे. नेमक्या माहितीच्या व मार्गदर्शनाच्या अभावी संगणकातच असलेली भारतीय भाषांची विनामूल्य सोय आपल्यापर्यंत पोचू शकलेली नाही. उलट संगणकावर मराठी वापरण्यासाठी आकृती, श्रीलिपी अशी वेगवेगळी सॉफ्टवेअर ‘विकत’ घेऊन आपण एकप्रकारचे अराजकच निर्माण केले आहे. त्यासाठीच मुळातच संगणकात असलेली मराठीची सोय कशी वापरावी याचे लेखी-प्रात्यक्षिक या लेखात सादर केले आहे. भारतीय भाषांचा संगणकावर वापर करण्यासाठी केंद्र शासनाने ज्याला अधिकृत मान्यता दिलेली आहे तोच हा युनिकोडचा पर्याय. सबंध महाराष्ट्रात ‘युनिकोड व संगणकावर मराठीचा वापर’ हे समीकरण दृढ करण्यासाठीच आम्ही झटत आहोत. तुमचा संगणक कोणताही असो..संगणकामध्येच असलेला मराठीचा पर्याय चुटकीसरशी सुरु करुन तुम्ही मराठीचा संगणकावर यथेच्छ वापर करु शकता. संगणकाचे जुजबी ज्ञान असणाऱ्या आबालवृद्धांना वापर करता येईल अशा सोप्या पद्धतीने त्याची मांडणी या लेखात केलेली आहे. संगणकावर मराठी वापरताना उभ्या ठाकणाऱ्या अडचणींची भिंत ओलांडताना आपल्या समाजाची दमछाक झाली आहे. तंत्रज्ञानाच्या पटावर इंग्रजीशी झटापट करण्यात मोठा वर्ग विकासाच्या परीघाबाहेर फेकला जातो हे वास्तव आहे. यासाठीच संगणकामध्ये मुळातच असलेली मराठीची सोय वापरण्याचे सोपे तंत्र तमाम मराठीजनांनी शिकावे व परीघातील आपले स्थान तंत्रसक्षम करावे हीच आमची मनापासून इच्छा आहे. मराठीतून संगणक-साक्षरतेसाठी हा लेख महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास आम्हाला वाटतो.


भाषेचा पर्याय संगणकात कुठे असतो ? o विविध भाषा वापरण्याची सोय सर्व संगणकांच्या (Desktop to Laptop) Control Panel मध्ये आहे. Control Panel हा ऑपरेटिंग सिस्टमचा भाग आहे o Control Panel मधील Regional and Language Options मध्ये जगातील सर्व भाषांचे व भारतीय भाषांचेही पर्याय (Input Language) दिलेलेच आहेत. o मराठीचा पर्याय आपल्याला सुरु करुन घ्यावा लागतो. संगणकावर भाषा व युनिकोड o युनिकोड हे कोणतेही सॉफ्टवेअर किंवा विकत घेण्याची वस्तू नाही o कोणत्याही संगणकावर कुठेही व कोणतीही भाषा सहजगत्या वापरता यावी यासाठी युनिकोड नावाचे मानक (Standard) १९९२ मध्ये निर्माण करण्यात आले. जागतिक स्तरावर त्याचा स्वीकार सर्व संगणक कंपन्यांनी केला आहे o विविध देशांच्या शासनांनी आपापल्या राष्ट्रांच्या भाषा संगणकावर वापरण्यासाठी युनिकोडला मान्यता दिली आहे o अधिक माहितीसाठी पाहा- http://www.unicode.org o भाषा वापरण्याची ही युनिकोडची सोय संगणकाच्या Control Panel मधील Regional and Language Options मध्ये विनामूल्य व by default असते


मराठीतून संगणकीय व्यवहारासाठी युनिकोडचे फायदे संगणकातच मराठी वापरण्याची ही सोय असल्याने कोणतेही वेगळे सॉफ्टवेअर (उदा. आकृती, श्रीलिपी) विकत घ्यावे लागत नाही MS-WORD, EXCEL, POWERPOINT यासारख्या नित्य वापरातील सॉफ्टवेअरसाठी सर्व टंकलेखन प्रक्रिया मराठीसाठीही करता येतात केवळ युनिकोड मराठीच्या संगणकातील सोयीमुळे मराठीतून ई-मेल पाठवता येते, इंटरनेटवर Google च्या माध्यमातून मराठीत माहिती शोधता येते, ब्लॉग्ज रचता येतात व इंटरनेटवर मराठीतून विनासायास वापरता येते


विंडोज् XP मध्ये मराठीचा पर्याय सुरु करण्यासाठी कृती vistaarc या कंपनीने तयार केलेल्या iComplex (Complex Script Installer) नावाच्या सॉफ्टवेअरने ही प्रक्रिया पूर्ण करता येते.

Complex Script Installer हे सॉफ्टवेअर कसे वापराल-

o http://www.omicronlab.com/tools/icomplex-full.html या लिंकवरील संकेतस्थळावर जा.

o तेथे IComplex 3.0.0 (Full Edition) असे लिहिलेल्या पानावर खाली Download: Click here to download अशी लिंक दिसेल

o येथून सॉफ्टवेअर तुमच्या संगणकाच्या हार्ड डिस्कमध्ये उतरवून घ्या


o त्याची exe फाईल आपल्या हार्ड डिस्कमध्ये अशी दिसेल-


o आता या exe फाईलवर दोनदा क्लिक करा. हे सॉफ्टवेअर रन करावे का अशी विचारणा होईल. Run च्या बटणावर क्लिक करा.


o ते सुरु केल्यावर पुढील चौकट दिसेल-


o यातील Install Complex Scripts या बटणावर क्लिक करा. यानंतर Copying Files ची प्रक्रिया सुरू होईल.

o ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर Restart computer अशी सूचना येईल.

o त्याप्रमाणे संगणक बंद करून पुन्हा सुरू करा

आता वरीलपैकी कोणत्याही प्रकारे संगणक पुन्हा सुरु केल्यावर

o पुढीलपैकी एकेका खुणेवर क्रमाने क्लिक करा Start > Control panel > Regional and Language options o Regional and Language options मध्ये असलेल्या Languages मधील Details ह्या खुणेवर क्लिक करा

o Text services and Input Languages नावाची नवी चौकट उघडेल. ह्या चौकटीतल्या Add ह्या खुणेवर क्लिक करा

o Add Input Language खूण असलेली लहान चौकट उघडेल. त्यातील Input language मधील भाषांच्या सूचीतून Marathi निवडा व OK या खुणेवर क्लिक करा.


काही आवृत्त्यांमध्ये Marathi सोबत Marathi Indic IME असाही पर्याय उपलब्ध आहे. आपण नुसता Marathi लिहिलेला पर्याय निवडावा

o आधीच्या Text services and Input Languages मध्येच Installed Services च्या भागात MA Marathi दिसेल. हाच मराठीचा पर्याय आहे


o आता Text services and Input Languages च्या तळाशी असलेल्या Apply आणि OK या बटणांवर क्रमाने क्लिक करा o संगणकाच्या उजव्या बाजूला कोपऱ्यात EN अशी खूण येईल. संगणकावर बहुभाषिक पर्याय सुरु झाल्याची ती खूण आहे.


• EN ह्या खुणेवर क्लिक केल्यावर English असे लिहिलेले दिसेल. त्याखालीच MA Marathi असेही लिहिलेले दिसेल.

• संगणकावर मराठीचा पर्याय सुरु करुन घेण्याची प्रक्रिया या पायरीवर पूर्ण होते. ही प्रक्रिया एकदाच करावी लागते. यामुळे आपल्या संगणकात कोणतेही बदल होत नाहीत.


MA ही खूण म्हणजेच मराठी वापरण्याचा पर्याय. तो क्लिक करुन निवडल्यावर मराठीतून काम करता येते. तो बदलून इंग्रजी वापरायचे असेल तर पुन्हा EN चा पर्याय निवडा.


लक्षात ठेवा- Alt व Shift ह्या कीज् एकाच वेळी दाबून MA व EN चे पर्याय बदलतात. (अधिक माहितीसाठी पाहा- Text services and input languages>Preferences>Key settings)

 MA म्हणजेच मराठीतून संगणक वापरण्याची सोय ई-मेल असो वा वर्ड, फेसबुक असो वा ब्लॉग, मराठीतून काम करण्यासाठी संगणक सुरु केल्यानंतर MA चा पर्याय क्लिक करावा. तो केल्यावर कीबोर्डवरुन काहीही टाईप केलेत तरी मराठी अक्षरेच दिसतील...करा तर मग सुरुवात लक्षात घ्या- MA मराठीचा पर्याय नसताना तुमच्या संगणकावर फक्त इंग्रजीतून काम करण्याची जी सोय होती ती EN- English ची होती. महाराष्ट्रात संगणक विकताना ते MA चा पर्याय सुरु करुन विकले जावेत असे धोरण शासनाने आखायला हवे

विंडोज् VISTA/ 7 मध्ये मराठी सुरु करण्याची कृती नोंद घ्या- विन्डोज् VISTA व 7 मध्ये मराठीचा समावेश करुनच दिला आहे. त्यासाठी XP प्रमाणे सीडी अथवा complex Script Installer वापरण्याचा खटाटोप करावा लागत नाही.

o संगणक सुरू करा आणि पुढील एकेका खुणेवर क्रमाने क्लिक करा

विन्डोज् VISTA साठी Start > Control panel > Regional and Language options

विन्डोज् 7 साठी Start> Control panel> Clock, Language and Region> Regional and Language options

o एक चौकट उघडेल. त्यात वरच्या Keyboards and Languages ह्या खुणेवर क्लिक केल्यावर Change keyboards हा पर्याय दिसेल

o त्यावर क्लिक केल्यावर Text Services and Input Languages नावाची चौकट उघडेल

o त्यातील General या चौकटीतील Add या खुणेवर क्लिक करा

o Add Input Language अशी खूण असलेल्या एका चौकटीत भाषांची यादी दिसेल (हे पर्याय XP ला मिळते-जुळते आहेत)

o या चौकटीतल्या भाषांच्या सूचीमधून Marathi ही खूण निवडून त्यावरील ‘+‘ च्या चौकटीत दोनदा क्लिक करा

o त्यात Keyboard चा पर्याय दिसेल. त्यावर ‘+‘ च्या चौकटीत दोनदा क्लिक केल्यावर विविध कीबोर्ड पर्यायांच्या छोट्या चौकटी दिसतील. त्यातील Marathi च्या चौकटीत खूण करा व OK म्हणा

इतर पर्याय वापरायला हरकत नाही. पण त्यात अंक रोमन लिपीतून (म्हणजे 1,2,3…) दिसतात. फक्त Marathi या पर्यायामुळे अंकदेखील देवनागरी लिपीतून (म्हणजे १,२,३...)दिसतात.

o Text Services and Input Languages ची चौकट परत येईल. या चौकटीत Apply व OK ह्या खुणांवर क्रमाने क्लिक करा.

o आता संगणकाच्या उजव्या बाजूला EN अशी खूण दिसेल. त्यावर क्लिक करून MA Marathi सुरु झाले आहे ना याची खात्री करा.

 लिनक्समध्ये (LINUX) युनिकोड मराठीची सोय वापरण्यासाठी

काहीवेळा सार्वजनिक वापरातील संगणकांवर ओपन सोर्स प्रकारातील लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टम असते (पाहा- http://www.linux.org) लिनक्सचे वितरण विविध नावांनी केले जाते. उदा. Red Hat, Fedora, Ubuntu Linux इ. संगणकावर लिनक्स बसवताना (Install) त्यातील Language Support च्या पर्यायांत मराठी निवडण्याची सोय दिलेली आहे. लिनक्स ही बहुतांश वेळा कार्यालयीन कामकाजात वापरली जाते. त्यासाठी कार्यालयातील संगणक विभागातील तंत्रज्ञांना किंवा संगणकीय कामकाज पाहणाऱ्यांना संपर्क करुन युनिकोड मराठी सुरु करुन द्यायला सांगता येऊ शकते.

 मराठीतून टंकलेखनासाठी कळफलकाची माहिती (Keyboard)

• मराठीचा पर्याय (MA) सरु करुन घेणे ही संगणकावर मराठी वापरण्याची पहिली पायरी झाली. प्रत्यक्षात मराठी अक्षरे संगणकावर टंकलिखित करण्यासाठी कळफलकाचाच वापर करावा लागतो.

• जसा भाषेचा पर्याय संगणकात मुळातच दिलेला असतो तसाच या भाषा वापरण्यासाठीच्या कळफलकाचाही पर्याय असतो. आपण ज्या कळफलकावर इंग्रजीतून काम करतो तोच कळफलक मराठीसाठी वापरायचा असतो. त्यातील कोणत्या इंग्रजी कीज् वर मराठीची कोणती अक्षरे व चिन्हे आहेत हे पाहून सरावाने तो शिकून घ्यावा लागतो.

• आपल्याकडच्या कळफलकांवर केवळ इंग्रजी अक्षरे दिसत असल्याने त्यावरील मराठी अक्षरांचे स्थान दिसत नाही.

कळफलकावर मराठी अक्षरे दिसण्यासाठी पुढील कृती करा-

विंडोज् XP साठी MA असताना पुढील पर्यांयावर क्रमाने क्लिक करा- Start> All Programs> Accessories> Accessibility> On-Screen Keyboard


विंडोज् VISTA व विंडोज् 7 साठी- Start> All Programs> Accessories> Ease of Access> On-Screen Keyboard


On-Screen Keyboard चा पर्याय सुरु केल्यानंतर टंकलेखनासाठी एखादी वर्ड फाईल उघडा. आता खाली MA पर्याय सुरु आहे याची खात्री करुन घ्या. समोरच्या कळफलकाच्या चित्रावर तुम्हाला पुढीलप्रमाणे आपोआप मराठी अक्षरे दिसतील- मराठी कळफलकाची प्रतिमा


मराठी अक्षरे इंग्रजीपेक्षा अधिक असल्याने काही अक्षरांसाठी Shift की चा वापर करावा लातो. Shift की दाबल्यावर

On-Screen Keyboard चा पर्याय बहुपयोगी आहे. तुम्ही ई-मेल वापरत असा वा वर्ड, हा पर्याय सुरु केल्यावर जे कळफलकाचे चित्र समोर येते ते माऊसच्या सहाय्याने खेचून हवे तिथे नेता येते. शक्यतो माऊसने ते खेचून समोरील स्क्रीनच्या वरच्या बाजूला मध्यभागी ठेवावे. त्यामुळे सराव करताना पाहून काम करणे सोपे जाते.


 मराठीचा कळफलक कसा शिकावा कळफलकावर मराठीतून टंकलेखन- काही सोपे नियम o कळफलकाची विभागणी

  कीबोर्ड हा दोन भागांमध्ये विभागलेला असतो. डावा भाग व उजवा भाग.
	   डाव्या व उजव्या हाताच्या हालचाली या भागांशी जोडलेल्या आहेत.


डावा भाग उजवा भाग लक्षात घ्या- प्रत्येक हाताची फक्त चारच बोटे टंकलेखनासाठी वापरली जातात. उजव्या हाताचा अंगठा हा स्पेसबार (Ctrl व Alt च्या ओळीतील मधली आडवी पट्टी) दाबण्यासाठी वापरला जातो. डाव्या हाताचा अंगठा टंकलेखनात अजिबात वापरला जात नाही. टंकलेखनामध्ये अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे प्रत्येक बोटाने त्याला ठरवून दिलेली अक्षरेच टाईप करावीत. त्यामुळे टंकलेखनातील आत्मविश्वास वाढतो. मराठी कळफलकावरील अक्षरांची विभागणी व स्थान

• मराठी कळफलकाच्या डाव्या भागात स्वर व चिन्हे येतात.

                        प्रत्येक स्वराची मात्रा ही स्वराक्षराच्या खालच्या (शिफ्ट न दाबता) की वर दिलेली आहे. 


• कळफलकाची उजवी बाजू ही अक्षरांची आहे.


वैशिष्ट्य- शिफ्ट जागेवरील अक्षरे त्याच की वरील शिफ्ट न दाबता असलेल्या अक्षरांशी संलग्न आहेत. उदा. क-ख, ग-घ, त-थ, द-ध......

मराठीतून टंकलेखनासाठी काही नियम

१. शब्दांची फोड करुन त्यानुसार क्रमवार अक्षरे व स्वरचिन्हे वापरणे उदा- ‘सई’ - दोन कीज् - स + ई, ‘अमर’ - तीन कीज् - अ + म + र

२. मात्रा उच्चाराप्रमाणे शब्दांची फोड करुन अक्षरांसोबत मात्रा लिहाव्यात नियम- अक्षर + मात्रा (आधी अक्षर नंतर मात्रा) उदा. पान = प + ा + न, ऋतु = ऋ + त + ु, भूल = भ + ू + ल ३. वेलांटी वेलांटी शब्दानुसार नंतर टंकित केली तरी ती सुयोग्य वळणानुसार जोडली जाते.

    नियम- अक्षर + वेलांटी  (आधी अक्षर नंतर वेलांटी)

उदा. पिता = प + ि + त + ा, किलबिल = क + ि + ब + ी + ल

४. अनुस्वार असलेल्या शब्दांच्या टंकलेखनासाठी X या इंग्रजी की वर अनुस्वार ं आहे. नियम- अक्षर+ अनुस्वार (ं ) उदा.- कंस = क + ं + स, अंग = अ + ं + ग मात्रा, उकार किंवा वेलांटीसोबत अनुस्वार येत असल्यास- अक्षर + मात्रा + अनुस्वार ं उदा- वेलांटी = व + े + ल + ा + ं + ट + ी, टांगा = ट + ा + ं + ग + ा

५. बाराखडीसाठी – अक्षर + स्वर चिन्ह (शिफ्ट न दाबता)

 उदा. 		का= क + ा 		कि= क + ि 

की= क + ी कु= क + ु कू= क + ू कै= क + ै कौ= क + ौ कं= क + ं ६. जोडाक्षरांसाठी पायमोडीची खूण (हलन्त चिन्ह) दोन अक्षरांमध्ये पायमोडीची खूण घातल्यास ् पहिले अक्षर अर्धे होऊन (त्याचा पाय मोडला जाऊन) ते नंतरच्या अक्षरास जोडले जाते (म्हणजेच त्याचे जोडाक्षर बनते)

  पायमोडीची खूण ही इंग्रजी D ह्या की वर शिफ्ट न दाबता आहे.

नियम- अक्षर (ज्याचा पाय मोडायचा आहे ) + ् (हलन्त) + अक्षर (ज्याच्याशी जोडायचे आहे ) उदा. राज्य = र+ ा + ज + ् (हलन्त) + य, विश्व = व +ी + श + ् (हलन्त) + व

७. कळफलकावर रकार वापरण्यासाठी

जेव्हा हलन्त नंतर र अक्षर येते (्र) तेव्हा रकार तयार होतो (उदा. क्र, द्र, ब्र)

रकार हा फक्त अक्षरांसाठीच वापरता येतो, स्वराक्षरांसाठी नाही.

हा रकार कळफलकाच्या 3 अंकावर शिफ्ट दाबून थेट दिलेला आहे.

o टंकलेखनात रकार चिन्हांचा वापर अक्षराची की व रकारची की अशा दोन स्वतंत्र कीज् वापरुन करावा. o त्याखेरीज हलन्त चिन्हाच्या सहाय्याने अक्षर अर्धे करुन व त्यात र मिसळूनही रकार असलेले व्यंजन तयार करता येते. o रकार एक पोटफोड्या रेषेने बऱ्याच अक्षरांसोबत दाखवला जातो. नियम- अक्षर (ज्यात रकार हवा आहे) + ्र (शिफ्ट 3) किंवा अक्षर (ज्यात रकार हवा आहे) + ् (हलन्त) + र उदा. क्रम = क + ्र (शिफ्ट 3) + म किंवा क + ् (हलन्त) + र + म महाराष्ट्र = म + ह + ा + र + ा + ष + ् (हलन्त) + ट + ्र (शिफ्ट 3) किंवा

	म + ह + ा + र + ा + ष + ् (हलन्त) + ट + ् (हलन्त) +  र 

८. कळफलकावर रफार वापरण्यासाठी जेव्हा ‘र’ अक्षरानंतर हलन्त येतो ( र् ), म्हणजेच र चा पाय मोडला जातो त्यावेळी रफाराची मात्रा तयार होते (उदा. कर्म, हर्ष)

रफार स्वतंत्ररीत्या टंकलेखित करण्यासाठी कळफलकाच्या 4 अंकावर शिफ्ट दाबून दिलेला आहे.

त्याखेरीज अक्षरानंतर र ला हलन्त केल्यास (र चा पाय मोडल्यास) देखील रफार होतो. नियम- अक्षर + रफार (शिफ्ट 4) + ज्यावर रफार हवा ते व्यंजन किंवा व्यंजन + र + ् (हलन्त) + ज्यावर रफार हवा ते व्यंजन उदा. बर्फ = ब + रफार (शिफ्ट 4) + फ किंवा = ब + र + ् (हलन्त) + फ गर्व = ग + रफार (शिफ्ट 4) + व उर्जा = उ + रफार (शिफ्ट 4) + ज + ा लक्षात घ्या- रफार टंकलेखित केल्यानंतर लगेचच दुसरे अक्षर टंकलेखित केले नाही तर ते

पायमोड्या र (र्) मध्ये बदलते.  उदा. कर्, तर्

९. काही विशिष्ट अक्षरे- अर्धा र मराठीत एक जादा अर्ध्या र चा (रफार) वापर केला जातो. तो रफार (उदा. ऱ्य) इंग्रजी J कीवर शिफ्टच्या जागी दिलेल्या ‘ऱ’ चा वापर करुन मिळवता येतो.


नियम- ऱ (J कीवर शिफ्ट) + ् (हलन्त) + ज्याला जोडायचे ते व्यंजन उदा. वाऱ्या = व + ा + ऱ + ् (हलन्त) + य + ा जर ऱ दाबला गेला नाही तर हाच शब्द वार्या असा होईल ऱ्हस्व = ऱ + ् (हलन्त) + ह + स + ् (हलन्त) + व साऱ्यांना = स + ा + ऱ + ् (हलन्त) + य + ा + ं + न + ा १०. अक्षरांनंतर विसर्ग चिन्ह वापरण्यासाठी

   नियम- अक्षर ( + मात्रा ) + ः

उदा- दु:ख = द + ु + ः + ख, निःशब्द = न + ि + ः + श + ब + ् + द विसर्ग व इंग्रजीतील कोलन : चिन्ह एकच असल्याने काहीवेळा गोंधळ होतो. मात्र मराठीतील विसर्गाच्या की वर शिरोरेखा असल्याने ते स्पष्टपणे वेगळे करता येते. मराठीसाठी हे चिन्ह चौथ्या ओळीत 0 अंकाच्या बाजूला आहे. त्यासाठी शिफ्ट की वापरावी लागते.


११. काही जोडाक्षरांच्या स्वतंत्र जागा- विशेष अक्षरे टंकलेखनाच्या सोयीसाठी ज्ञ, त्र, क्ष व श्र या जोडाक्षरांच्या स्वतंत्र कीज् मराठीच्या कळफलकावर अंकांच्या ओळीवर शिफ्ट दाबून देण्यात आलेल्या आहेत. उदा. ज्ञानेश्वर, त्रैमासिक, क्षमा, श्रावण कळफलकावरील जागा- अंकांच्या कीज् (शिफ्ट दाबून)


या जोडाक्षरांनादेखील हलन्त वापरुन अर्ध जोडाक्षरांत त्यांचा वापर करता येतो उदा. पक्ष्याने = प + क्ष + ् (हलन्त) + य + ा + न + े शास्त्र = श + ा + स + ् (हलन्त) + त्र


o वेगाने टंकलेखन करता येणे हे कौशल्य आहे व ते प्रशिक्षणानेच प्राप्त होते. जर मराठीतून प्रदीर्घ व सातत्यपूर्ण संगणकीय लिखाण ही तुमची गरज असेल तर ‘टंकलेखन शिकण्याला’ पर्याय नाही.

लक्षात घ्या- मराठीतून टंकलेखनासाठी फोनेटिक, टाईपरायटर असे विविध पर्याय आहेत. पण वर सांगितल्याप्रमाणे मराठीचा जो कळफलक मुळातच ऑपरेटिंग सिस्टमचा भाग म्हणून उपलब्ध आहे, तोच वापरण्याची सवय करावी.

 मराठी टंकांबद्दल (फॉंट) थोडेसे आपल्याकडे मराठीतून संगणकावरचे काम हे काही टंकांशी कायमचे जोडून टाकलेले आहे (उदा. शिवाजी, कृतिदेव, डीव्हीटीटी सुरेख वगैरे) हा समज बरोबर व चुकीचा दोन्ही आहे. बरोबर कारण अक्षरांच्या लिखाणासाठी जशी कळफलकाची गरज असते तशीच या अक्षरांच्या वळणासाठी टंकांची आवश्यकता असते. चुकीचा कारण एखाद्या टंकाद्वारे केलेले काम प्रमाणित असेलच असे नाही. हे टंक युनिकोड प्रमाणित व MA चा पर्याय सुरु केल्यावर वापरता येणारे आहेत का हा कळीचा प्रश्न आहे. ते जर नसले तर ते आपल्या प्रमाणीकरणाच्या तत्त्वाविरुद्ध जाणारे आहे. युनिकोड नसलेल्या टंकांमुळे मराठी वापरताना (विशेषतः इंटरनेटवर) अनेक मर्यादा येतात. म्हणूनच यापुढे कोणताही टंक वापरताना तो युनिकोड-प्रमाणित आहे का हे तपासून पाहा. मुळात तुम्हाला कोणी टंक विकत देत असेल तर तो युनिकोड नाही असेच समजा. युनिकोड व्यवस्था संगणकाचाच भाग असल्यामुळे ते वापरण्यासाठीचे टंकदेखील ऑपरेटिंग सिस्टममध्ये असतात. काही टंक हे इंटरनेटवरुन मोफत उतरवून घेता येतात.

• एखादा टंक युनिकोड-प्रमाणित आहे की नाही हे कसे ओळखाल ? यासाठी सोपी पद्धत म्हणजे टंक निवडून कोणताही एखादा अर्थपूर्ण शब्द वा वाक्य गुगलच्या चौकटीत टाईप करुन Enter ची की दाबा उदा. महाराष्ट्र हा शब्द घेऊ

जर गुगलने त्यानुसार मराठीतून माहिती शोधून दिली तर तो टंक युनिकोड आहे. जर गुगलकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तर तो टंक युनिकोड प्रमाणित नाही असे समजावे. तो युनिकोड प्रमाणित नसेल तर मराठीतून टंकलेखनासाठी निरर्थक आहे.

• मराठीचा MA पर्याय सुरु केल्यावर कोणता टंक वापरावा ? जेव्हा MA- Marathi चा पर्याय आपण सुरु करतो तेव्हा वर्डमध्ये टाईप करायला घेतल्यावर वरच्या टंकांतील चौकटीत Mangal (मंगल) नावाचा टंक आपसूक येतो.


मंगल हा टंक मायक्रोसॉफ्टच्या विन्डोज् या ऑपरेटिंग सिस्टममधील default टंक आहे.

विशेष सूचना- मंगल हा जरी default टंक असला तरी तो वापरु नये. याचे कारण तो दिसायला बेढब व अनाकर्षक आहे, तसेच मराठी जोडाक्षरांसाठी त्यात काही त्रुटी आहेत.

• संगणकावर मराठीतून टंकलेखनासाठी कोणता टंक वापरावा ? पारंपारिक वळणांनुसार मराठीची सर्व अक्षरे अचूक व आकर्षक दिसण्यासाठी Arial Unicode MS किंवा Sanskrit 2003 यापैकी कोणत्याही एका टंकाचा वापर करावा.

Arial Unicode MS हा टंक Microsoft Office सोबत येतो. टंकांच्या चौकटीत जिथे Mangal आहे तिथे बदलून Arial Unicode MS निवडता येतो. बहुतांश वेळा या टंकाचा समावेश केलेलाच असतो. मात्र काही कारणास्तव तो येत नसल्यास दुसऱ्या टंकाचा वापर करण्याखेरीज पर्याय नसतो.


• Sanskrit 2003 (संस्कृत २००३) टंकाबद्दल Sanskrit 2003 हा सध्या उपलब्ध असलेल्या युनिकोड–प्रमाणित मराठी टंकांतील सर्वोत्कृष्ट टंक आहे. हा टंक इंटरनेटवरुन मोफत डाऊनलोड करून घेता येतो. .

पुढील वेबलिंकवरुन हा टंक आपण विनामूल्य उतरवून घेऊ शकता. http://omkarananda-ashram.org/Sanskrit/itranslator2003.htm#dls (ही लिंक कॉपी करुन आपल्या इंटरनेट ब्राऊजरमध्ये पेस्ट करा)

त्यानंतरची कृती पुढीलप्रमाणे- १. वरील संकेतस्थळावर तुम्हाला Sanskrit 2003 ची लिंक पुढीलप्रमाणे दिसेल-


२. Sanskrit 2003 वर क्लिक करा. Sanskrit2003.zip असे लिहिलेली फाईल उघडेल. ती संगणकाच्या हार्ड डिस्कवर एका स्वतंत्र फोल्डरमध्ये सेव्ह करा.

३. आता ही झिप फाईल माऊसच्या राईट क्लिकने extract केल्यावर टंक दिसेल


           हा टंक तुमच्या C Drive\Windows\Font  या डिरेक्टरीत सेव्ह करा.

आता तुम्ही जेव्हा वर्ड फाईलमध्ये पुन्हा टाईप कराल तेव्हा टंकांच्या चौकटीतून Sanskrit 2003 निवडून घ्या.

आता यापुढील तुमचे सर्व काम हे Sanskrit 2003 टंकाप्रमाणे होईल. मराठी-इंग्रजी दोन्ही वापरताना बरेचवेळा टंकलेखन करताना आपल्याला मराठी व इंग्रजी दोन्ही भाषा वापराव्या लागतात. अशावेळेस आपण गरजेनुसार भाषेचे MA व EN हे पर्याय माऊसने क्किक करुन घेऊ शकतो किंवा वर सांगितल्याप्रमाणे Alt आणि Shift ही दोन बटणे एकाचवेळेस दाबल्यावरदेखील भाषेचा पर्याय बदलतो. बरेचवेळा इंग्रजी शब्द टाईप केल्यानंतर आपण MA मराठीचा पर्याय निवडतो तेव्हा Mangal हा default टंक येतो. तो बदलून आपल्याला हवा असलेला टंक निवडून घ्यावा लागतो.

मराठीतून फाईल्सना नावे देण्यासाठी MA चा पर्याय सुरु करुन आपण फाईल्सना मराठीतही नावे देऊ शकतो. अशीच नावे आपण फोल्डरनाही देऊ शकतो. उदा.


इंटरनेटवर मराठी वापरण्यासाठी आपल्या संगणकावरील ब्राऊजरमध्ये (उदा. Internet Explorer, Mozilla Firefox इ.) मराठीचा पर्याय असतो. तो सुरु करून घेण्यासाठी पुढील कृती करा- o ब्राऊजरच्या वरच्या पट्टीवरील Tools मधून Internet Options चा पर्याय शोधा. o त्यातील Languages च्या पर्यायात मराठीचा पर्याय (Marathi- mr IN) निवडा तसेच पुढील कृती करा- o ब्राऊजरच्या वरच्या पट्टीवर पुढील खुणांवर क्रमाने क्लिक करा- View > Encoding> Unicode (UTF-8) यामुळे तुम्हाला युनिकोड वापरुन मराठीतून आलेली सर्व ई-मेल वाचता येतील मराठीतून ई-मेल कसे पाठवाल ? ई-मेल (उदा. Gmail, Yahoo, Hotmail, Rediffmail वगैरे) मराठीत वापरतानाची पद्धत वर्डमध्येच सांगितल्याप्रमाणेच आहे. म्हणजे ई-मेल पाठवण्यासाठीदेखील आधी MA मराठीचा पर्याय सुरु करुन घ्यायचा आहे. जसे वर्डमध्ये आपण मराठी कळफलकाद्वारा टंकलेखन करु तसेच ई-मेलसाठीही करायचे आहे. म्हणजेच ई-मेल मराठीतून पाठवण्यासाठी तुम्हाला दुसरी कोणतीही सुविधा वापरण्याची गरज नाही. तुम्ही मराठीतून शिकलेले टंकलेखन ई-मेलपासून ब्लॉग्जपर्यंत व वर्डपासून ते फेसबुकपर्यंत सर्वत्र चालते.

मराठीसाठी उपलब्ध युनिकोड टंकांची सद्यःस्थिती मराठीसाठी वळणदार व परिपूर्ण अशा युनिकोड-प्रमाणित टंकांची वानवा आहे. Arial Unicode MS व Sanskrit 2003 हे दोन परिपूर्ण टंक सोडले तर इतर टंक सदोष व निष्प्रभ आहेत. तरीदेखील इच्छुकांनी पुढील संकेतस्थळावर जाऊन युनिकोड-मराठीसाठी असलेल्या विनामूल्य टंकांची माहिती घ्यावी व गरज भासल्यास ते उतरवून घ्यावेत. http://www.wazu.jp/gallery/Fonts_Devanagari.html

आपण मराठीतून तयार केलेली फाईल ई-मेलने पाठवल्यावर पलिकडे दिसेल का ? आपण युनिकोड मराठीतून वर्डमध्ये टंकलेखित केलेली फाईल ई-मेलने पाठवली तर ज्याला पाठवायची त्याला ती दिसेल का हा मुद्दा सर्वांनाच भेडसावतो. त्यामुळेच मग आपण त्या फाईलचे PDF मध्ये रुपांतर करतो. पण मग ती फाईल लॉक होते व समोरच्याला त्यात बदल करता येत नाहीत. MA मराठीचा पर्याय सुरु करुन टंकलेखित केलेल्या फाईलमधील मजकूर तुम्ही ई-मेलने पाठवता तेव्हा त्याचे रुपांतर default टंक Mangal मध्ये होते. अर्थात ज्याला पाठवले त्या व्यक्तिलाही युनिकोड माहिती असेल व त्याच्याकडे तुमच्याकडे असेलेले टंक असतील तर प्रश्नच नाही. लक्षात घ्या इंग्रजीतून पाठवलेल्या फाईल्सच्या बाबतीत असा प्रश्न आपल्याला कधीच पडत नाही. उदा. तुम्ही जर इंग्रजीत वर्डमध्ये Times New Roman हा टंक वापरुन काम केलेत तर समोरच्याला ते दिसेल का नाही हा प्रश्न कधीच भेडसावत नाही. कारण समोरच्याकडे तो टंक असेलच याची खात्री असते. तसेच मराठीचेही आहे. Mangal हा default टंक ऑपरेटिंग सिस्टमचाच भाग असल्याने तो सर्व संगणकांत असतोच. त्यामुळे मराठीचा मजकूर सार्वत्रिकरित्या संचार करु शकतो.


आम्ही युनिकोड-मराठीच्या कार्यशाळा महाराष्ट्रात सर्वत्र घेतो. कार्यशाळेसाठी संपर्क -: राममोहन खानापूरकर- ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन

                             चलभाष-   ९८२००४००६६      ई-मेल rammohan@orfonline.org



संगणकातील मराठीचा कळफलक शासनमान्य INSCRIPT/ DoE शिफ्ट की न दाबता

शिफ्ट की दाबल्यावर


हा कळफलक तुमच्या डोक्यात चपखल बसवून घ्या. जगातील सर्व संगणकात मराठीचा MA पर्याय निवडून घेतल्यावर हा कळफलक आपोआप सुरु होतो. मराठीला खऱ्या अर्थाने जागतिक बनवणारा हा कळफलक आहे.








शासकीय कामकाजात युनिकोडचा वापर अनिवार्य व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे परिपत्रक काढण्यात आले आहे.

शासन परिपत्रक क्रमांक मातंसं/नस्ती०८/८९/३९ दिनांक- १० सप्टेंबर २००८

कार्यालयाच्या संगणकीय कामकाजामध्ये युनिकोड आज्ञावलीचा वापर करण्याबाबत परिपत्रक

परिपत्रक निघाले तरी त्याच्या अंमलबजावणीसाठी शासनाने गेल्या अडीच वर्षात कोणतीही हालचाल केलेली नाही. त्यामुळेच आजही शासकीय कार्यालयांमध्ये मराठीची सॉफ्टवेअर विकत घेऊन पैसे वाया घालवले जात आहेत. त्याखेरीज प्रमाणित पद्धतीने काम न केल्यामुळे संगणकीय शासकीय कामकाज एकसमान पद्धतीने होत नाही.

युनिकोडच्या ह्या परिपत्रकाची शंभर टक्के अंमलबजावणीला होईल तो सुदिन !