'स्वामी विवेकानंद आणि कोल्हापूर संस्थान'स्वामीजींच्या कोल्हापूर भेटीचा मागोवा
१८९२ मध्ये स्वामी विवेकानंदांचा पदस्पर्श कोल्हापूर भूमीस झाला आणि स्वामीजींच्या इथल्या वास्तव्यात इतिहासात नोंद करुन ठेवाव्यात अशा मौलिक घटना घडल्या याबद्दलचे अनेक संदर्भ शोधून आणि अभ्यासून 'स्वामी विवेकानंद आणि कोल्हापूर संस्थान' हा ग्रंथ साकार झाला आहे.
आपले गुरु रामकृष्ण परमहंस यांनी देह ठेवल्यानंतर सन १८८८ मध्ये स्वामी विवेकानंदांनी आपल्या परिव्राजक काळात कलकत्यापासून सुरवात करीत भारताच्या उत्तरेपासून दक्षिण टोकापर्यंत भारतभ्रमण केले. या परिव्राजक काळात त्यांनी कोल्हापूर शहरास आक्टोबर १८९२ मध्ये भेट दिली. कोल्हापूरच्या इतिहासातील या सुवर्ण क्षणांच्या आठवणी आजपर्यंत गुलदस्त्यातच आहेत. या सुवर्ण क्षणांचा मागोवा घेत स्वामी विवेकानंदांच्या कोल्हापूर भेटीतील घडलेले प्रसंग तत्कालीन लेखी पुराव्यांसहित या पुस्तकात सादर केले आहेत. स्वामीजी कोल्हापूरात कसे आले, त्यांची येथील राहण्याची सर्व व्यवस्था कोठे आणि कोणी केली. या त्यांच्या वास्तव्यात येथे कोण कोणत्या घटना घडल्या याचे अभ्यासपूर्ण विवेचन यामध्ये आलेले आहे. स्वामीजींनी कोल्हापूरास भेट दिली तेव्हा कोल्हापूर कसे होते, येथील पदाधीकारी, वर्तमानपत्रे, इमारती, भौतीक परिस्थीती याचा सविस्तर आढावा तत्कालीन पुस्तकातून शोधून घेतला आहे. या सर्वबाबी स्पष्ट करीत असता ठिक ठिकाणी संस्थानकालीन रजिस्टर मधील नोंदी, अहवाल, नकाशे यांचा देखील वापर केला आहे.
या पुस्ताकाचे संशोधन व लेखन राहुल माळी यांनी केले असून पुस्तकास ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. रमेश जाधव यांनी प्रस्तावना दिली आहे तर पुस्तकाचे प्रकाशन अमेय जोशी 'अक्षर दालन प्रकाशन,कोल्हापूर'यांनी केले आहे.