कानिफनाथ मंदिर पाणदिवे ==

कानिफनाथाचे उरण तालुक्यातील एकमेव मंदिर हे पाणदिवे गावात आहे. भक्तांच्या हाकेला धावणारा आणि त्यांच्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण करणारे स्थान म्हणून हे तालुक्यात प्रसिद्ध आहे. सुमारे २५० वर्षांपूर्वीचे हे स्थान आहे. २०१८ मध्ये या मंदिराचा जीर्णाेद्धार केला. गुढीपाडव्याला येथे मोठा उत्सव होतो. हे स्थान उरणपासून १२ तर, बेलापूर-सीबीडीपासून १९ किमी अंतरावर आहे.

सुमारे २५० वर्षांपूर्वी पाणदिवे गावातील पाटील (पूर्वीचे खारकर) कुटुंबातील सदस्यांचा कानिफनाथ भक्तांशी संपर्क आला. त्यानंतर हे संपूर्ण कुटुंब कानिफनाथांचे भक्त झाले. मढी येथे पूजा अर्चा केल्यानंतर गावातील मुख्य घरात देव्हाऱ्यात कानिफनाथांच्या ताईतांची प्रतिष्ठापना करण्यात आली. भक्तांच्या हाकेला धावणारा कानिफनाथ संकटातून मुक्त करतो, अशी ख्याती असल्याने गावाचे ग्रामदैवत झाले आहे.

कानिफनाथाची प्रतिष्ठापना देव्हाऱ्यात करण्यात आली होती. दिवंगत शांताराम सोमा पाटील यंच्या वारसदारांनी नव्या मंदिरासाठी जागा दिल्यानंतर देव्हाऱ्यासमोरच २०१६ पासून नव्या मंदिराच्या निर्मितीला सुरुवात झाली. हे काम २०१८ मध्ये पूर्ण झाले.

मंडप आणि गाभारा असे मंदिराचे बांधकाम आहे. आकर्षक पांढऱ्या रंगातील शिखरावर तांब्याचा कळस आहे. या स्थळाचे पूर्वभिमूख प्रवेशद्वार आहे. मंडप आणि भिंतींना सुंदर फरसबंदी आहे. मंडपाला तीन प्रवेशद्वार आहे. गाभाऱ्यात राजस्थानमधून आणलेली तीन फूट उंचीची कानिफनाथाची सुंदर भगवे वस्त्र नेसलेली संगमरवरी बैठक आसनातील मूर्ती आहे. ही भव्य मूर्ती पाहिल्यानंतर साक्षात कानिफनाथ अवतरल्याचा अभास होतो. दुसऱ्या गाभाऱ्यात पाटील-खारकर कुटुंबियांच्या कुलदैवतांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

गुढीपाडव्याला कानिफनाथ मंदिराचा वर्धापन दिन साजरा होतो. या दिवशी सकाळपासून पूजा अर्चा आणि अन्य धार्मिक विधी होतात. दुपारी १२ वाजता आरती होते. या दिवशी आरतीनंतर महाप्रसादाची सोय असते.

श्री कृष्ण जन्माष्टमीचा सोहळाही साजरा होतो. मध्यरात्री पाटील-खारकर कुटुंबिय एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात.

मंदिरात दररोज सकाळी आठ वाजता आरती होते. गुरुवारी सकाळी आठ आणि संध्याकाळी सात वाजता आरती होते.

ठळक वैशिष्ठ्यै :

[] उरणपासून १२ किमी, तर सीबीडी- बेलापूरपासून २० किमी अंतरावर

[] या ठिकाणी येण्यासाठी उरणपासून एसटीची सुविधा आहे. तर, सीबीडी-किल्ला येथून एनएमएमटी सुविधा आहे.

[] मंदिर परिसरात खासगी वाहने जाऊ शकतात