मेहुली घोष ही एक भारतीय नेमबाज आहे, जिने २०१६च्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत वयाच्या १६व्या वर्षी नऊ पदके जिंकत सर्वांचे लक्ष वेधले. २०१७ मध्ये जपान येथील आशियाई एअरगन स्पर्धेत तिने पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक पटकावले. [1] पश्चिम बंगालमध्ये जन्मलेली मेहुली ही भारतीय नेमबाजी संघातील सर्वात तरुण खेळाडूंपैकी एक आहे.

वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी संपादन

लहानपणी टीव्हीवरील सी.आय.डी. ही मालिका आणि विविध अॅक्शनपट पाहून मेहुली गोळ्या-बंदुकांकडे आकर्षित झाली. २००८च्या ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्रा यांच्या सुवर्ण पदक विजयातून तिने प्रेरणा घेतली आणि यातच व्यावसायिकरीत्या करिअर घडवण्याचा निर्धार केला. सुरुवातीला तिला सराव करण्यासाठी कोणतीही योग्य शूटिंग रेंज किंवा इलेक्ट्रॉनिक लक्ष्य (टार्गेट) अशी साधनं उपलब्ध नव्हती. मग दोरीने काहीतरी जुगाड करून स्वतःसाठी लक्ष्य तयार करून त्यावरच सराव ती करू लागली. घोष एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढली. तिचे वडील रोजंदारीवर काम करायचे आणि आई गृहिणी. त्यामुळे तिच्या प्रशिक्षणादरम्यान कुटुंबीयांना खूप आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.[2] पण एवढे सगळे असूनही त्यांनी तिला पाठबळ दिले. २०१४ मधील एका घटनेमुळे मेहुली घोषला मोठा धक्का बसला. तिच्या झाडलेल्या एका गोळीमुळे चुकून एका व्यक्तीला दुखापत झाली. या घटनेचा तिच्या मनावर मोठा आघात झाला आणि ती नैराश्यात गेली. मग तिच्या आईवडिलांनी तिला अर्जुन पुरस्कार विजेते जयदीप कर्माकर यांच्या अकादमीत प्रशिक्षण घेण्यास पाठवले. [3] या अकादमीपर्यंतचा प्रवास लांब आणि खडतर होता, त्यामुळे अनेकदा तिला घरी पोहोचण्याच मध्यरात्र व्हायची. मात्र आजही आपल्या यशासाठी ती आईवडिलांचे आणि प्रशिक्षकांचे आभार मानते.[3]

व्यावसायिक कारकीर्द संपादन

२०१६ची राष्ट्रीय चॅम्पियनशिप मेहुली घोषसाठी अविस्मरणीय ठरली. त्यात तिने ९ पदकांची कमाई करत भारतीय कनिष्ठ संघामध्ये आपली जागा पक्की केली. २०१७ मध्ये जपान येथे झालेल्या आशियाई एअरगन स्पर्धेत तिने पहिल्या आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदकाची कमाई केली. २०१८ मधील ब्यूनोस एइर्स येथे युवा ऑलिम्पिक स्पर्धेत तिने रौप्य पदक जिंकले. त्याच वर्षी तिने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक व पुढे विश्वचषक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. [5] हे तिचे सीनियर गट वर्ल्ड कप मधील पदार्पण होते. त्यांनी महिलांच्या १०मि. एअर रायफल स्पर्धेत कांस्यपदक जिंकून जागतिक विक्रम नोंदविला. २०१९ च्या नेपाळमधील दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक जिंकले जे सध्याच्या विश्वविक्रमापेक्षा उल्लेखनीय होते.[6] २०२० च्या स्पोर्टस्टार अॅसेस अवॉर्ड्समध्ये घोष यांना "फीमेल यंग अॅथलीट ऑफ दी इयर" या पुरस्काराने सन्मानित व गौरविण्यात आले.[7]

संदर्भ संपादन

मेहुली घोष
वैयक्तिक माहिती
Nationality भारतीय
Citizenship भारतीय
जन्म २० नोव्हेंबर २००० (वय २०)
कल्याणी,नाडीया,पश्चिम बंगाल
Sport
खेळ नेमबाजी

पुरस्कार आणि पदके

१०मि.एअर रायफल महिला संपादन

  1. २०१९ : रौप्य पदक आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड कप सुहल
  2. २०१९ : सुवर्णपदक दक्षिण आशियाई खेळ काठमांडू
  3. २०१९ : कांस्यपदक आशियाई चँपियनशिप (ज्युनियर) ताओयुआन
  4. २०१८ : रौप्य पदक ऑलिम्पिक खेळ (युवा) ब्युनोस आयर्स
  5. २०१८ : कांस्यपदक आयएसएसएफ विश्वचषक ग्वाडलजारा
  6. २०१८ : रौप्य पदक राष्ट्रकुल खेळ गोल्ड कोस्ट
  7. २०१७ : सुवर्ण पदक एशियन चँपियनशिप (युवा) वाको सिटी
  8. २०१६ : २ सुवर्ण पदके
  9. २०१६ : ७ रौप्य पदके राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा, पुणे

१० मि. एअर मिक्सइड टीम संपादन

  1. २०१९ : कांस्यपदक आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड कप सुहल
  2. २०१८ : कांस्यपदक विश्वचषक ग्वाडलजारा