जोडवी दिवजोत्सवाची divajotsav


जयेश नाईक। दि. ८ (कामुर्ली) राज्यातील मंदिरातील उत्सवानिमित्त जोडवी दिवजोत्सवाची मोठय़ा प्रमाणात रेलचेल असून महिलांच्या वाढत्या सहभागाने उत्सवात रंगत वाढत आहे. विविध धार्मिक विधी, नाटके, पालकी व दिवजोत्सव हे मंदिरातील वार्षिक उत्सवाचे अविभाज्य भाग बनून राहिले आहे. काही ठरावीक मंदिरे वगळता बहुतांशी उत्सव बिगर पावसाळी हंगामातच होत असतात. यामुळे पाऊस संपून साधारण नोव्हेंबर महिन्यात मंदिरातील उत्सवांना प्रारंभ होतो आणि याच बरोबर रात्रीच्या अंधाराला छेद देणार्‍या जोडव्या व दिवजोत्सवाच्या उजेडाने रात्र उजळून निघते. आकर्षक पेहराव व अलंकार परिधान करण्याची संधी या प्रसंगी सुवासिनींना लाभते. वागाळी-कामुर्ली येथील नवृत्त सरकारी शिक्षक हनुमंत साळगावकर यांना दिवजोत्सवाच्या नजिकच्या स्वरूपाबद्दल विचारले असता हल्लीच्या काळात महिलांचा सहभाग वाढतच चालला आहे, असे ते सांगतात. पूर्वीच्या काळी दिवजोत्सवाचे स्वरूप र्मयादित असल्याचे ते सांगतात. महिलांचा सहभाग कमीच असायचा. माशेल येथील डॉ. सुशीला सावईकर यांनीही अशीच माहिती दिली. ओशेल येथील भवानी रामपुरुष देवस्थानचे मुखत्यार सदाशिव आगरवाडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या मंदिरात जवळपास पन्नास ते साठ वर्षांपासून दिवजोत्सव साजरा केला जातो. यामध्ये सुवासिनींची मिरवणूक पालखीसह महाकालिका कुंभेश्‍वर मंदिरापर्यंत जाते. ओशेल येथील बाळ वरोश्‍वर कमलादेवी रवळनाथ शिरोडकर मंदिरातही दिवजोत्सव रात्री साजरा केला जातो. तर क्षेत्रपाल मंदिरातील दुपारच्या वेळी जोडवी उत्सव होतो.

खैराट-कामुर्ली येथील श्री. काळाखडपेश्‍वर मंदिराच्या स्थापनेनंतर जोडवी दिवजोत्सवाची सुरुवात करण्यात आली. येथील दीपस्तंभाजवळून सुवासिनीची मिरवणूक राष्ट्रोळी मंडपमध्ये जाते. तद्नंतर ही मिरवणूक बाराजण येथे गेल्यानंतर मंदिरात तिचे विसर्जन होते. यामध्ये मोठय़ा संख्येने सुवासिनींचा सहभाग असतो. याच परिसरातील सातेरी मंदिरातही दिवजोत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. नानोडा-डिचोली येथील श्री चौरंगी देवस्थानच्या जत्रोत्सवानिमित्त पालखी प्रदक्षिणा व दीपोत्सव साजरा होतो. शेटकर वाडा हरमल येथील श्री भूमिका देवस्थानचा दिवजोत्सव गेल्या महिन्यात साजरा करण्यात आला. मोरजी येथील सत्पुरुष पंचायतन श्री देव कानडीवंश देवस्थान, आगरवाडा येथील सातेरी देवस्थान रसाळवाडा मोरजी येथील श्री कुळकार सातेरी दाभोळकर देवस्थान, हळर्ण पेडणे येथील वेताळ भूमिका व पंचायतन देवस्थान, सांतईनेज पणजी येथील रामपुरुष देवस्थान, सातेरी भाट वळवई येथील शांतादुर्गा देवी, सोलये होंडा येथील चव्हाटेश्‍वर, चोपडे येथील कुळदेव निराकार देवस्थान, धारगळ येथील कामपुरुष देवस्थान, घुबलवाडा-ओशेल येथील परन्नाथ देवस्थान तसेच इतर अनेक मंदिरात जोडवी-दिवजोत्सव साजरा केला जातो. डिचोली-अडवापाल येथील श्री देवी शर्वाणीच्या दिवजोत्सवात यंदा तीन हजाराहून अधिक सुवासिनींनी भाग घेतला होता. उजव्या हातात जोडवी-दिवजा घेऊन रांगेतील सुवासिनी व बॅन्ड व तत्सम संगीताच्या सोबतीने राज्यभरात दिवजोत्सवाची धूम चालू आहे. --Jayesh naik १४:५६, ९ डिसेंबर २०११ (UTC)