पुरुषी नव्हे ‘पुरुषसत्ताक’ मानसिकता बदलणे गरजेचे


हो आपल्याला समाजातील ‘पुरुषसत्ताक’ मानसिकता बदलावी लागेल. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पुरुषच होते परंतु त्यांचे आचार, विचार व वर्तन हे मुक्तिदायी, समतेचे व न्यायपूर्ण होते. या विचारधारेचे अनेक पुरुष आपल्याला इतिहासात बघायला मिळतील. किंबहुना आजही अनेक पुरुषांच्या मुक्तिदायी, समतादायी आचार व विचारधारेने अनेक स्त्रिया या उभ्या आहेत व विविध क्षेत्रांमध्ये पुढे जात आहेत. त्यामुळे पुरुषी मानसिकता असा शब्द वापरून सरसकट सर्व पुरुषांना दोष देणे बरोबर नाही. त्यामुळे पुरुषी मानसिकता समाजाला घातक नाही तर ‘पुरुषसत्ताक’ मानसिकता समाजाला घातक आहे.


या सत्तेच्या सामाजिकीकरणात  स्त्रिया व पुरुष दोघेही मोठे झालेले असतात. त्यामुळे पुरुषी सत्ता ही केवळ पुरुषांमध्येच नसते. तर स्त्रियादेखील पुरुषसत्ताक विचाराच्या बनतात. सासु- सुन किंवा इतर नातेसंबंधातील सामाजिक उतरंड आपल्याला कुण्या एका व्यक्तीचे स्थान वरचढ करण्यास भाग पाडते. तर दुसऱ्या व्यक्तीचे स्थान खालचा दर्जाचे. त्याठिकाणी जर  मैत्रीपूर्ण, सौहार्दपूर्ण वातावरण असेल तर निश्चितच समाजाच्या अहिंसात्मक संतुलनासाठी या बाबी महत्त्वाच्या ठरतील.


सत्तेच्या ऐवजी समानता ही महत्त्वाची असते. आज समाजात ज्या हिंसाचाराच्या घटना घडत आहेत त्यांच्या मुळाशी कुठे न कुठे पितृसत्ताक विचारधारा आहे. पुरुषांना मुलांना कुणी नाही म्हणत असेल तर तो नकार त्यांच्या इतका जिव्हारी लागतो की त्यातून विनाकारण स्त्रियांचे बळी पडतात. केवळ स्त्रियाच नाही तर पुरुषही बळी पडतात. पुरुषांच्या मुलांच्या लहान-सहान किरकोळ भांडणांमध्ये एकमेकांचा जीव घेतल्याची अनेक उदाहरणे आपल्याला सापडतील हे वाद एवढ्या तीव्र स्वरूपाचे असतात की पिढ्यानपिढ्या ती कटुता टिकवल्या जाते.


प्रेमात नकार दिल्यामुळे अनेक पुरुषांनी मुलांनी मुलींवर ऍसिड फेकले, कोणी पेट्रोल टाकून जिवंत जाळले, कोणी गंभीर छेडछाड केली, तर कोणी बदनामीची धमकी देत अत्याचार केलेत, तर कुणी आत्मघातही केला. परंतु प्रेमाला नकार दिल्यामुळे किती स्त्रियांनी मुलींनी वरील प्रकार केलेत? हा वास्तविक विचार आपण सर्वांनी करायला हवा.


अनेक महिला स्टोव्ह चा भडका झाल्यामुळे दगावतात. अनेक जणी कुठेतरी अचानक पाय घसरून विहिरीत पडतात. अनेक जणींना अन्नातून विषबाधा होते. अनेक जणी शारीरिक हिंसेला बळी पडतात. दैनंदिन घरगुती कामकाजाची सवय असताना अचानकच असे का होते?; उलटपक्षी कधी तरी स्वयंपाक करणारा पुरुष किंवा कधीतरी विहिरीवरून पाणी आणणारा पुरुष कधीही जळत नाही किंवा पाय घसरून पडतही नाही. कुणी जळू ही नाही आणि  पडू ही नाही. परंतु या वास्तविक परिस्थितीचा विचार आपण संवेदनशीलतेने करायला हवा.


या सामाजिक पितृसत्तेच्या परिमाणात विधवा स्त्रियांचे आजही हाल होतात. सार्वजनिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये या स्त्रियांना स्थान नसते. महान असणारे ‘मातृत्व’ नसणाऱ्या स्त्री ला स्थान नसते. जी स्त्री अविवाहित असेल किंवा कुठल्याही कारणाने एकटीच जगत असेल तर तिलाही सन्मान नसतो. तर दुसऱ्याच बाजूला विधुर पुरुषाचे लवकर लग्न लावून दिल्या जाते. त्याच्या पितृत्वावर  किंवा नपुसंकतेवर प्रश्नचिन्ह कधीही उपस्थित केल्या जात नाही आणि एकट्या पुरुषाचा तर ब्रह्मचारी म्हणून गौरव होतो ही प्रतिकूल सामाजिक घडी सत्तासंबंधातूनच तयार तयार झाली आहे.


भारतात हुंडा बंदीचा कायदा आहे. समान वेतनाचा कायदा आहे. बालविवाहास विरोध करणारा कायदा आहे. वारसा हक्काचा कायदा आहे. स्त्रियांवर घडणाऱ्या हिंसाचाराच्या विरोधी चा कायदा आहे. मूलभूत अधिकारांची घटनात्मक तरतूद आहे. परंतु सत्तेचा खेळ हा पुरुष व स्त्रियांना ही दिशाहीन करत आहे. यामध्ये अधिक संख्येने स्त्रिया बळी पडत आहे हे वास्तव मात्र आपल्याला नाकारता येणार नाही.


या सत्तेच्या परिघात स्त्रियांचं मुलींचं दिसणं, वागणं, बोलणं, राहणं हे सर्वच चौकटीबद्ध असायला हवं. असं बहुसंखेनं असूनही कुठेतरी कळत नकळत कुठेतरी कुण्या पुरुषाचा अहंकार दुखावला जातो. त्याच्या पुरुषत्वाला आव्हान दिल्या जाते, कुठेतरी त्याच्या लैंगिक वासना कुठल्यातरी कारणामुळे जागृत होतात, कुठेतरी मिळालेल्या नकार त्याच्या सहनशीलतेच्या पलीकडे जातो आणि मग परिणामी स्त्रियांवर हिंसा  होते…!


या पितृसत्तेच्या सामाजिक चौकटीत स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात बळी जात आहे व अनेक पुरुषांचाही एक संवेदनशील माणूस म्हणून घात होत आहे. या पितृसत्तेच्या या प्रतिकूल चौकटीतून निर्माण होणाऱ्या हिंसा थांबवायच्या असतील तर स्त्री पुरुषांचे सामाजिकीकरण हे स्वातंत्र्य, समतेवर, मुक्तिदायी व न्यायिक विचारांवर व्हायला हवे. व ही सुरुवात प्रत्येक सुजाण नागरिकाने आपल्या घरापासून करायला हवी.


डॉ. सविता बहिरट

8605495760

[[१]]

ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्र, डॉ. बा. आ. म. वि. औरंगाबाद.

येथे कार्यरत