नगर वाचन मंदिर, पंढरपूर.
नदिला फिरायला जायचे हा पंढरपूरकरांचा आवडता उद्योग. दिवसभराची कामे, पण कामे कसली मुळात मोठ्या वारीवर अर्थकारण चालणारे गावकरी वारी सोडता तसे निवांतच असतात. त्यामुळे दैनिक काम असं काही नाहीतच. पण आहे ती ही बारिक सारिक कामं उरकली की संध्याकाळी फिरायला नदीकाठी जायचे हा पंढरपूरकर आवडता छंद. पंढरीच्या दैनिक व्यवहारात नदि म्हणजे अविभाज्य अंग. तिच्या पाण्यावर आपली तहान भागवावी. तिचेच पाण्यावर पिकलेल्या अन्नधान्यावर पिंड पोसावा. तरूणांनी भल्या पहाटे उठावे जवळ असेल त्या वा जमेल त्या घाटावर जावून उर भरेस्तोवर धावण्याचा व्यायाम करावा. तिथेच जमेल तेवढ्या जोरबैठका काढाव्यात. सकाळी वाहत्या पाण्यात मनसोक्त स्नान करावे. कपडे डोक्यावर घेवून वाळवंटातून वाळवत घरी परतावं.
दिवसभराचं काम धाम आटोपले की मावळतीला पुन्हा नदीला जावं. नदीचा गार वारा खात वाळवंटाची मऊशार वाळू तुडवित तिथे दगडी पुलापासून पुंडलिकापावेतो भटकावं. मन करेत तिथं बैठक मारून वाळूत बसून रहावं. कधीमधी दत्त घाटावरच्या मंगेडकरचा चिवडा बरोबर न्यावा तो वाळूत बसून खावा. कधी नदर वाचन मंदिरात जावं. बाहेरच्या अंगणात नदीचे वाळवंटासहचे रूप अन पाण्याचे सौंदर्य न्याहाळत बसावं. वाचनालयाच्या खालच्या मजल्यावर बसून वृत्तपत्रं वाचावीत. अगदी हवी तेवढी. जास्तीत जास्त वरच्या मजल्यावर जावून पुस्तंक वाचावीत. सभासद असल्यास घरी न्यावीत. असे हे जीवन. त्यातला नदी आणि वाचन मंदिर हा अविभाज्य भाग. लोकांचे कधी कधी फिरायला जायचं निमित्त असायचं पण जायचे असायचे वाचनालयात. काहींना तर इतकी सवय की घरातून विशिष्ठ कामास्तव बाहेर पडली की काम विसरून पावले आपसुख इकडे वळायची. वाचनवेड संपल्यावर घरी गेल्यावर लक्षात यायचे की आपले काम राहिले. इथे आला नाही असा पंढरपूरकर विरळाच. नव्हे इथे न आलेला खऱ्याने पंढरपूरकर नव्हे. कारण इथे आल्याशिवाय पंढरपूरकर घडत नाही.
कारण नगर वाचन मंदिर म्हणजे जुनी नेटिव लायब्ररी. ब्रिटिश काळात १ एप्रिल इ. सन १८७४ साली त्याची स्थापना करण्यात आली. पुढे याचं नाव बदलून नगर वाचन मंदिर करण्यात आले. उद्धव घाटाच्या उत्तरेला याची मोठी दुमजली इमारत उभी आहे. वरच्या मजल्यावरचे सज्जातून वाळवंटाची शोभा पाहणे म्हणजे मौजच.
प्रारंभीला काहि थोडक्या पुस्तकानिशी सुरू झालेली हि लायब्ररी आज हजारो पुस्तकांनी समृद्ध आहे. कोणाहि इच्छूकाने येथे यावे आणि खुशाल पुस्तक वाचावे. त्यासाठी फार काहि करावे लागत नाही. सभासद वाचकांना अगदी नगण्य मासिक शुल्कात पुस्तके घरी नेवून वाचता येतात. इथे साहित्याचे अनेकविध प्रकारची पुस्तके आहेत. इतिहास, काव्य, धार्मिक, विविध शास्त्रे, कादंबरी, प्रवासवर्णने, चरित्रे, आत्मचरित्रे, वैचारिक असे अनेकविध प्रकारची संपदा इथे आहे. धार्मिक मधे तर पुराणांपासून सांप्रतचे विविध पंथापावेतो अनेक ग्रंथ आहेत. चिकित्सक अभ्यासकांना लागणाऱ्या कोशाचा तर स्वतंत्र विभागच इथे आहे. त्यांनी यावे आणि बसून कोणताही ग्रंथ अभ्यासावा. त्याला प्रत्यावाय नाही.
जुन्या काळचे बडोदा संस्थानने सुमारे १०० वर्षांपूर्वी प्रकाशित केलेले व्यायामज्ञानकोशाचे दुर्मिळ असे १० ही खंड अिथे आहेत. महादेवशास्त्री जोशीचे सांस्कृतिक कोश अन विद्यावाचस्पति शंकर अभ्यकरांचे भारतवर्षातील सांप्रदाय कोश ही तिथे आहेत. त्याशिवाय अनेक जुनी दुर्मिळ संपदा आहे. अगदी शिळाप्रेसवर मुद्रित केलेली पुस्तकेही वाचनालयात आहेत. मराठी बरोबरच हिंदी, अिंग्रजीचाही स्वतंत्र संपन्न विभाग आहे.
पंढरीत अनेकवार आलेल्या अनेक महापूरात इथले बरेच साहित्य वाहून गेले. फोटो कागदपत्रे, ग्रंथही वाहून गेले. भिजून बरबाद झाले. तरिही दैवी आघाताने न संपता दे वाचन मंदिर वयाची १०० पूर्ण करून १५० कडे यशस्वीपणे वाटचाल करित आहे.
दैनिके, साप्ताहिके, मासिके यायारख्या नियतकालिकांची तर गणनाच नाही. दैनिके वाचायला येणारा वाचकवर्ग आजही मोठा आहे. केवळ वाचायला पुस्तकं पुरवून हे ग्रंथालय थांबले नाही तर पूर्वी अनेक विद्वानांची व्याख्यानेही चालायची. ज्याला पंढरपूर करांची तुडुंब गर्दि असायची. हल्ली घरा इडियट बॉक्स (टिव्ही) आणि हाती चेटूक यंत्र ( स्मार्टफोन) आल्यापासून वक्त्याचे एेकायला येणारा श्रोता दुर्मिळ झाला आहे. इथल्या वाचन संस्कृतित हजारो वाचक तर घडलेच. पण केवळ वाचकच नव्हे तर अनेक साहित्यिकही या वाचन मंदिरामुळे महाराष्ट्राला मिळाले आहेत. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष द मा मिरासदार यांचे बालवयात, तारूण्यात त्यांची वाचनभुक इथेच भागायची. तासोनतास ते वाचन मंदिरात रमायचे. द मा चे जीवन चरित्र कथनात या वाचनालयाचे स्थान मोठे आहे. त्यांचे अनेक लिखाणात त्याचे प्रत्यंतर येते. याशिवाय वि. आ. बुवा आणि पु. आ. बुवा हे बंधू द. ता. भोसले सारखे साहित्यिकही या वाचनालयाचे सभासदच.
केवळ साहित्यिकच नाही तर पंढरपूरच्या इतिहासात नावे घ्यावी लागणारी अनेक व्यक्तित्वे इथे घडली. आपल्या बुद्धीबलावर आमदार झालेले, अनेकविध विषयांचा दांडगा व्यासंग असणारे, घणाघाती लिखाण करणारे आणि आपल्या वक्तृत्वाने विधानसभा गाजविणारे वै. पां. भा. तथा तात्या डिंगरे इथल्या ग्रंथात कायम रममाण असायचे. वै. बाबुराव जोशीं सारखे पंढरीचे विद्वान या वाचन मंदिराचे वाचक तर होतेच पण अनेकवर्षे अध्यक्षही होते. आमचे आजोबा शंकर रामचंद्र बडवे तथा बाबुराव पाटील हे ३० वर्षे नगर वाचनचे सचिव होते. अनेक जुन्या पुस्तकात त्यांनी केलेल्या टिपणांचे प्रत्यंतर येते. त्यांनी तर अनेक पुस्तके लांब लाबून मागावून वाचनालयाचे संग्रहात भर पाडली. अनेक सुधारणा घडवून आणल्या. युवकांना वाचनाकडे आणि समाजसेवेकडे वळते केले. ते तर दिवसरात्र इतके वाचायचे कि सभोवतालची मित्र मंडळी खूप खावून दूध न देणारी गाय म्हणून त्यांना हिणवायचे. अशी किती नांवे सांगावित.
आजही पंढरपूरातील १ क्रमांक असलेले हे वाचन मंदिर अग्रगण्य आहे. किंबहुना त्यामुळेच अनेक वाचनवेडे सामान्य नागरिकांपासून ते डॉक्टर, विधिज्ञ, चार्टर्ड अकाऊंटंट, प्रतिथयश व्यवसायी, तसेच न्यायाधिशही येथे आपली वाचनवेड जपण्यासाठी आवर्जुन येतात. वाचकांचे सोईस्तव पंढरीच्या उपनगरातही सध्या याची एक शाखा कार्यरत आहे. इथे असणारा कर्मचारी वर्गही सहकाऱ्यभावाने वावरतोय. आवताडे तर दोन पिढ्यांपासून सेवेत आहेत. ग्रंथपाल पाठक आपुलकीने पुस्तकाबद्दल बोलत असतात. तुम्ही पुस्तकाचे नाव वा लेखक सांगा ते वाचन मंदिर आहे की नाही सांगतात अन् शोधून द्यायला मदतही करतात. वाचकांना सदैव त्यांचा आधार वाटतो.
सुमारे १५० वर्ष पूर्ण केलेली ही पुस्तकशाळा म्हणजे पंढरीचे जिते जागते विद्यापिठ आहे. शारदेचे स्थान आहे. त्याच्या छत्रछायेत यापुढेही साहित्यीक, राजकारणी विधिज्ञ, अभियंते, व्याख्याते, डॉक्टर आदी विद्वान निर्माण व्हावेत.
©आशुतोष अनिलराव बडवे पाटील, पंढरपूर.