अंकात्मक बहुमापक: (Digital multimeter)

विद्युत उपकरणांची निर्मिती, वापर आणि दुरुस्ती करत असताना अनेक विद्युत राशींचे (विद्युत धारा, विद्युत दाब, रोधक, ऊर्जा, धारिता इत्यादी) मापन करावे लागते. पूर्वी प्रत्येक विद्युत राशी मोजण्यासाठी स्वतंत्र उपकरण वापरले जायचे, परंतु आता बहुमापकाच्या साहाय्याने आपण एकापेक्षा जास्त विद्युत राशी मोजू शकतो. या उपकरणाचा उपयोग प्रामुख्याने विद्युत धारा, रोधक, ऊर्जा, विद्युत दाब, धारिता, वारंवारता (frequency) इत्यादी विद्युत राशी मोजण्यासाठी होतो. या उपकरणाचा उपयोग करून आपण ए. सी. व डी. सी. अशा दोन्ही विद्युत राशी मोजू शकतो. याव्यतिरिक्त या उपकरणाचा उपयोग जोडणी (continuity) चाचणीसाठी होतो.

बहुमापकाचे मापन हे अंकांमध्ये असल्यामुळे निरीक्षणातील त्रुटी आपोआप कमी होऊन मापनाची गती वाढते. मीटरच्या आवरणामध्ये विद्युत घट (cell ) बसविलेले असतात. त्यांच्या साहाय्याने रोध मोजण्यासाठी विद्युत पुरवठा केला जातो. पर्यायी बटणाचा साहाय्याने आपण मोजली जाणारी विद्युत राशी व त्याची व्याप्ती निवडू शकतो.

कार्यप्रणाली संपादन

आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे अंकात्मक बहुमापकाला ज्या विद्युत राशींचे मापन करायचे आहे, अशा राशी (उदा., रोध, ए. सी. विद्युतधारा, डी. सी. विद्युत धारा, ए. सी. विद्युत दाब, डी. सी. विद्युत दाब) प्रविष्ट केल्या जातात. पर्यायी बटणाच्या साहाय्याने आपण ज्या विद्युत राशीचे मापन करायचे आहे ती राशी व तिची व्याप्ती वर्तुळाकार पटलावरती निवडू शकतो. रोधक मोजण्यासाठी ती विद्युत राशी पर्यायी बटणाच्या साहाय्याने वर्तुळाकार पटलावरती निवडली जाते.

रोध हा प्रत्यक्षपणे न मोजता, अप्रत्यक्षरीत्या त्याच्यामुळे होणारी विद्युत दाबातील घट मापून मोजला जातो. रोधामुळे होणारी विद्युत दाबातील घट व स्थिर विद्युत धारा स्रोत यांच्या साहाय्याने रोध मापून ते मापन अनुरूप (analogue) ते अंकात्मक परिवर्तकाला प्रविष्ट केले जाते. ते मापन अंकात्मक मापन मंडल (circuit) अंकात्मक प्रदर्शनावरती दर्शविते.

ए. सी. विद्युत दाब मोजण्यासाठी तो पर्यायी बटणाच्या साहाय्याने वर्तुळाकार पटलावरती निवडला जातो. ए. सी. विद्युत दाब हा अचूक तंतुमयकारकास  प्रविष्ट करून त्याची विशालता (मूल्य) कमी केली जाते , ज्यामुळे जोडणीमध्ये असलेले इतर मंडल खराब होत नाहीत. अचूक तंतुमयकारकाची प्राप्ती (output) ही दुरुस्तीकर्ता मंडलास देऊन तिथे ए. सी. विद्युत दाबाचे डी. सी. विद्युत दाबात रूपांतर केले जाते. हा रूपांतरित डी. सी. विद्युत दाब अनुरूप ते अंकात्मक परिवर्तकाला प्रविष्ट करून अंकात्मक मापन मंडलाद्वारे अंकात्मक प्रदर्शनावरती दर्शविला जातो.

ए. सी. विद्युत धारेचे मापन करतानाही अशीच प्रक्रिया राबविली जाते. पर्यायी बटणाच्या साहाय्याने वर्तुळाकार पटलावरती ए. सी. विद्युत धारा राशी निवडली जाते. मापन करण्यात येणारी ए. सी. विद्युत धारा नंतर विद्युत धारा ते विद्युत दाब परिवर्तकास प्रविष्ट करून तिचे ए. सी. विद्युत दाबात रूपांतर करण्यात येते. हा ए. सी. विद्युत दाब दुरुस्तीकर्ता मंडलास देऊन तिथे ए. सी. विद्युत दाबाचे डी. सी. विद्युत दाबात रूपांतर केले जाते. हा रूपांतरित डी. सी. विद्युत दाब अनुरूप ते अंकात्मक परिवर्तकाला प्रविष्ट करून अंकात्मक मापन मंडलाद्वारे अंकात्मक प्रदर्शनावरती दर्शविला जातो.

डी. सी. विद्युत धारा व डी. सी. विद्युत दाब मोजताना दुरुस्तीकर्ता मंडलाची  गरज भासत नाही.

डी. सी. विद्युत धारेचे मापन करताना ती राशी पर्यायी बटणाच्या साहाय्याने वर्तुळाकार पटलावरती निवडली जाते. मोजण्यात येणारी डी. सी. विद्युत धारा नंतर विद्युत धारा ते विद्युत दाब परिवर्तकास प्रविष्ट करून तिचे डी.सी. विद्युत दाबात रूपांतर करण्यात येते. हा रूपांतरित डी. सी. विद्युत दाब अनुरूप ते अंकात्मक परिवर्तकाला प्रविष्ट करून अंकात्मक मापन मंडलाद्वारे अंकात्मक प्रदर्शनावरती दर्शविला जातो.

डी. सी. विद्युत दाबाचे मापन करताना पर्यायी बटणाच्या साहाय्याने वर्तुळाकार पटलावरती डी. सी. विद्युत दाब राशी निवडली जाते. मापन करावयाचा विद्युत दाब हा अचूक तंतुमयकारकास  प्रविष्ट करून त्याची विशालता (मूल्य) कमी केली जाते, ज्यामुळे जोडणीमध्ये जात असलेले इतर मंडल खराब होत नाहीत. अचूक तंतुमयकारकाची प्राप्ती अनुरूप ते अंकात्मक परिवर्तकाला प्रविष्ट करून अंकात्मक मापन परिक्रमाद्वारे अंकात्मक प्रदर्शनावरती दर्शविले जाते.