भाषा कूस बदलते आहे – 1 भाषा आणि तंत्रज्ञान
भाषा कूस बदलते आहे – 1
संपादनअसं म्हणतात की कुठलीही भाषा प्रवाही असते. जगभराच्या कुठल्याही भाषेत सतत बदल होतच असतात. बदलत राहते म्हणून तर भाषा प्रवाही असते. प्रत्येक लहान मोठ्या वळणावर ती नवीन स्वीकारत असते. पहिल्या पाण्याची जागा नवीन पाणी घेत राहते आणि तरीही मूळ प्रवाह तोच राहतो. म्हणून ती मरत नाही, संपत नाही. पूर्वी अशा बदलांचे एक मुख्य कारण असायचे राजकीय सत्ता बदल. राजकीय, आर्थिक बदलांप्रमाणे भाषिकसत्ताही बदलायची. म्हणजे नवीन राजा त्याची भाषा घेऊन यायचा. प्रजेला राज्यकर्त्याच्या भाषेतील शब्दांचा वापर करायला लागायचा आणि म्हणून राजसत्तेमुळे भाषेत बदल अपरिहार्य व्हायचे. ज्याप्रमाणे मुसलमानी राजवट महाराष्ट्रात आल्यावर मराठीत अनेक उर्दू, फारसी, अरेबिक शब्द आले. स्थिरावले. (म्हणून तर शिवाजी महाराजांना व्यवहार कोश मराठीत लिहिण्याची गरज भासली.) इतके आपलेसे झाले की फर्मास, उमदा, कारकून, गुलाम, खबरदार असे अनेक शब्द मराठीतले नाहीत याची आठवण करून द्यावी लागते. (शिवाजीराजांच्या प्रामाणिक चेल्याच्या तोंडची भाषा पहा – खबरदार जर टाच मारूनी...... अर्थात ही काही शिवाजीराजांच्या काळात लिहिलेली कविता नाही.) त्याचप्रमाणे इंग्रजांच्या आक्रमणानंतर प्रत्येक भारतीय प्रादेशिक भाषेवर इंग्रजीचे आक्रमण झाले. त्यातून इंग्रजीचा वरचष्मा निर्माण झाला. हे भारतातील भाषांबाबत झाले तसेच ते इंग्रजांची वसाहत जेथे जेथे होती त्या प्रत्येक प्रदेशात झाले. पण अगदी बारकाईने बघायचे झाले तर इंग्रजी राजवटीत इंग्रजीचे प्रादेशिक भाषांवर तितकेसे आक्रमण झाले नव्हते असे आता म्हणावेसे वाटते. इंग्रजांबरोबर इंग्रजी भाषा आली. त्याबरोबर त्या भाषेतले ज्ञानविषय आले. पण तरीही इंग्रजीची भारतीय प्रादेशिक भाषांशी सरमिसळ झाली नव्हती. दोन स्वतंत्र भाषा एकाच वेळी आपापली वैशिष्टय टिकवून होत्या. त्या त्या प्रदेशातील मूळ भाषांची प्रादेशिकता बऱ्यापैकी टिकून होती. मात्र आता एकविसाव्या शतकात राजकीय सत्ता बदललेली नसतानाही भाषा मात्र बदलत आहेत. भाषा जणू आपली कूस बदलत आहेत. आणि याचं कारण आहे - तंत्रज्ञानाचे आक्रमण. हा खरं तर मुख्यत्वे आर्थिक आक्रमणाचा भाग आहे. जागतिकीकरण, आर्थिक उदारतावाद यातून जगभरात तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान सुरू झाले. इतकेच नाही तर असे आदान-प्रदान अपरिहार्य झाले. आज संगणक (computer) किंवा चलभाष (mobile) याशिवायच्या जीवनाची आपण कल्पनाही करू शकत नाही. तंत्रज्ञान स्वीकारताना त्यासाठी आवश्यक असणारी भाषा स्वीकारणे हे अपरिहार्य आहे. आज भाषा कूस बदलते आहे ती या तंत्रज्ञानामुळे. संवादाची नवी तंत्रज्ञानाधारित माध्यमे जशी जशी विकसित होत आहेत आणि स्वीकारली जात आहेत तशी तशी भाषाही बदलते आहे. अर्थातच तंत्रज्ञानाची आजच्या काळाची भाषा आहे – इंग्रजी. त्यामुळे अपरिहार्यपणे इंग्रजी शब्दांचा वापर करावा लागतो आहे. चला काही उदाहरणे पाहू या. – हे आपल्या रोजच्या व्यवहारातले संवाद बघा. ‘तू मला लगेच SMS कर’ “मी तुला email पाठवतो.” “मी तुला tag केलं.” “तिकिट मिळवा एका click वर.” संगणक, मोबाईल फोन त्यावर वापरता येणारी वेगवेगळी तांत्रिक सॉफ्टवेअर आणि ॲप्स यामुळे आपल्या भाषिक रचनेवर सतत परिणाम होत आहे. (सदर वाक्यातही दोन इंग्रजी शब्द आहेतच.) शब्दसंग्रहात भर पडत असते. पण हे होत असताना आणखी एक गंमतशीर सरमिसळ होते. मूळ मराठी धाटणीच्या किंवा वळणाच्या वाक्यरचनेत नवीन शब्द, नवीन क्रियापदे चपखलपणे येऊन बसतात. बघा हे नवे पाहुणे कसे आपल्या घरचेच होऊ पाहात आहेत ते. “आज तू online आला नाहीस.” हे वाक्य “तू आज कट्टयावर आला नाहीस.” या वळणाचे आहे. किंवा “ती ना सारखी फेसबुकवरच असते”. हे वाक्य “ती ना सारखी तंद्रीतच असते.” या तोंडावळ्याचेच आहे. तसेच कर, लाव, लाग ही मराठीतील जी लवचिक आणि बहुअर्थोत्पादक क्रियापदे आहेत ती आपण सर्रास (हा शब्द मराठी आहे का? याचं कूळ तपासून बघा बरं.) इतर भाषेतल्या नामांबरोबर वापरून ते शब्द आपल्या भाषेतले करून टाकतो. या पुढील वाक्यात बघा – मी ई-मेल करतो. तू एस्एमएस् कर. व्हाटस्अप केलंसय का? सिरियल लागली का? तुझा फोटो लाव ना तिथे. पीडीएफ् करून पाठव. या सगळया वाक्यांमधले कर्मवाचक शब्द इंग्रजी आहेत पण ते बेमालूमपणे मराठी क्रियापदांबरोबर संसार थाटून आहेत. (आणि ते देवनागरी लिपित लिहिले तर ते परके वाटतच नाहीत इतके आपण त्यांना आपलेसे केले आहे.) इथले पहिले वाक्य पुन्हा पाहूया म्हणजे हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल. इंग्रजीमध्ये (ई)मेल हे क्रियापद आहे आणि त्याला करणे या मराठीतील अर्थाच्या इंग्रजी to do या क्रियापदाची गरज नाही. म्हणजेच इंग्रजीत to do e-mail असे क्रियापद नसून to e-mail असे क्रियापद आहे. मराठीत ई-मेल हे क्रियापद नाही तर नाम आहे आणि त्यापासून क्रियापद करण्यासाठी त्याला करणे या मराठी क्रियापदाची आपण जोड दिली. आणि इंग्रजी शब्दाला आपण मराठमोळं रूपं दिलं. आपण सहजतेने तंत्रज्ञानाशी आधारित वाक्यांमधे इंग्रजी शब्द वापरतो. उदाहरणार्थ “मला add करा तुमच्या group मधे.” या अशा वाक्यांमधे जे इंग्रजी शब्द आले आहेत त्यांना आपण पर्यायी मराठी शब्द वापरू शकू का? Add या इंग्रजी क्रियापदासाठी मिळवणे, समाविष्ट करणे अशी मराठी क्रियापदे खरं तर आहेत. Group या शब्दासाठी समूह, गट असे शब्द मराठीत आहेत. म्हणून जर हेच वाक्य आपण “मला तुमच्या गटात सामील, समाविष्ट करून घ्या.” असं म्हटलं तर ते वाक्य बरोबर होईल का. आता या वाक्याचा संदर्भ पाहू या. हे वाक्य जर स्मार्ट फोन वर येणाऱ्या व्हाटस्अप या सॉफ्टवेअसरच्या संदर्भातलं असेल तर “मला तुमच्या गटात सामील करून घ्या.” हे त्या अर्थाचे मराठी वाक्य अगदीच गुळमिळीत आणि नेमका अर्थ न सुचवणारे वाटते. असे का होत असेल ? तर संपूर्ण मराठी वाक्याला तंत्रज्ञानात्मक भाषेचा लहेजा येत नाही. यापेक्षा आणखी एक चपखल वाक्य पाहू या. “तो स्क्रू जरा टाईट करून घे.” (इथेही आपण घट्ट या मराठी शब्दाच्या अर्थाचा टाईट हा इंग्रजी शब्द त्याच वाक्यरचनेत बसवला आहे. ) या ठिकाणी टाईट या शब्दाला एकवेळ घट्ट शब्द चालेल पण स्क्रू या शब्दाचं काय ? त्याला कोणता पर्यायी शब्द आपण वापरणार ? त्यामुळे शक्य आहे तिथे केवळ पर्यायी मराठी किंवा प्रादेशिक भाषेतले शब्द वापरून हा प्रश्न सुटत नाही. नवीन तंत्रज्ञानासह नव्याने जन्माला आलेल्या अनेक शब्दांना तर आपल्या भाषेमध्ये शब्दही नाहीत. उदाहरणार्थ सेल्फी हा शब्द पुढे आणि मागे असा दोन ठिकाणी कॅमेरा असणाऱ्या स्मार्ट फोन बरोबर आला आहे. स्वतःच स्वतःचा काढलेला फोटो हा त्याचा अर्थ असला तरी त्याला एकच सुटसुटीत पर्यायी मराठी शब्द नाही. (आणि तो तयार केला तरी त्यात सेल्फी ची मजा येणार नाही ते वेगळेच.) पीडीएफ् या संगणकावरील विशिष्ट प्रकारच्या फाईलला आपण कोणता मराठी शब्द वापरणार ? डाऊनलोड, अपग्रेड, सॉफ्टवेअर, हार्डडिस्क, स्मार्ट फोन, पेन ड्राईव्ह हे आणि असे कितीतरी शब्द उदाहरणादाखल सांगता येतील ज्यासाठी आपल्या प्रादेशिक भाषांमध्ये शब्दच नाहीत. हे जगभरातल्या अनेक भाषांबाबत खरे असणार आहे. त्यामुळे भाषा कोणतीही असली तरी मूळ शब्दच त्या त्या भाषेत वापरावे लागणार. तंत्रज्ञानानी जसं आपल्या रोजच्या जगण्यावर आक्रमण केलंय तसंच आणि तेवढंच आपल्या भाषेवर पण केलं आहे. कुणी म्हणेल की हे काही आजच नव्याने घडत नाहीये. पूर्वीदेखील शास्त्रीय क्षेत्रांमधे इंग्रजी शब्दांची मक्तेदारी होतीच. 19व्या शतकात रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र अशा अनेक शास्त्रीय विषयांच्या जवळीकीमुळे असेच अनेक शब्द इंग्रजीतून इतर जगाच्या भाषांमधे जाऊन बसले. पण त्यावेळी या शब्दांचा आणि त्याच्या वापराचा आवाका मर्यादित होता. शास्त्रीय मंडळी आणि शास्त्रीय चर्चा, काही प्रमाणात शालेय पुस्तके या परिघात हे शब्द वापरले जात होते आणि म्हणून रोजच्या व्यावहारिक भाषेला त्याची फार जास्त दखल घ्यावी लागली नाही. पण आज ज्या झपाट्याने तंत्रज्ञान अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत आहे तिथे मात्र त्याच्या बरोबर येणारा शब्दसंग्रह प्रत्येकाच्या घरात, घरातून वर्तमानपत्रात, जाहिरातीत, बातम्यात सगळी-सगळी कडे संचार करत आहे. पूर्वी शास्त्रीय शब्द अगदी खेडयापाडयातल्या माणसाला वापरावे लागत नसल्यामुळे तिथे पोहोचले नाहीत पण मोबाईल फोन आणि काहीप्रमाणात संगणक आणि इंटरनेटचे जाळे सर्वदूर पसरल्यामुळे हा नवीन शब्दसंग्रह प्रत्येकाच्या तोंडी रुळला आहे. म्हणूनच या लेखाच्या सुरुवातीला म्हटले तसे इंग्रजाचे राज्य असतानाही जेवढी इंग्रजी शब्दांची सरमिसळ प्रादेशिक भाषांमधे झाली नाही त्यापेक्षा कितीतरी जास्त धेडगुजरी भाषा आता वापरली जात आहे. इंग्रजी राजवटीच्या काळात जन्माला आलेले आपले आजी-आजोबा, आई-बाबा तेवढे इंग्रजी शब्द सहजपणे मराठीत मिसळत नाहीत जेवढे आपण आणि आपली पुढची पिढी तसे करते आहे. घराघरात पोहोचलेल्या या नवीन तंत्रज्ञानामुळे आपण परत एकदा जुन्या, आदिम संवाद साधनापाशी जाऊन पोहोचलो आहोत ती म्हणजे चित्रलिपी. (गंमत आहे, अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरताना आपण सगळयात जुनी संवाद साधणारी लिपी परत एकदा वापरत आहोत. ते ही आधुनिकतेचं निदर्शक म्हणून.) संगणक आणि मोबाईल वरून जे थोडक्यात पण चटपटीत संभाषण म्हणजे अगदी एकमेकांशी गप्पा मारल्या सारखा संवाद होतो त्यात चित्रलिपी फार प्रभावीपणे वापरली जाते. त्यांना स्माईली असे आजच्या भाषेत म्हणतात. हसरे, रडके, चिडके, रागावलेले छोटे छोटे चेहरे, भेटवस्तू म्हणून देता येण्यासारख्या गोष्टी, खाद्यपदार्थ अशी अनेकविध रंगीत आणि मोहक चित्रे नवीन ॲप्सबरोबर तुमच्या संगणकात, चलभाष संचात येतातच. आणि तुमच्या बोलण्याला खुमारी आणण्यासाठी त्याचा वापर नेहमी केला जातो. स्माईली शिवायचा संदेश(message) म्हणजे अगदीच अळणी पदार्थ होतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तर फुलं, केक, आईस्क्रिम असे स्माईली वापरले नाहीत तर तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देताय का सरकारी नोटीस पाठवताय ते कळणार नाही अशी परिस्थिती आहे. चलभाष संचावर येणाऱ्या अनेक संदेशांना (खरंतर विनोदांना) उत्तर म्हणून एकही शब्द न वापरता केवळ सुंदर असा हावभाव दाखवणाऱ्या हाताच्या मुद्रा असणारे स्माईली सतत इकडून तिकडे संचार करत असतात. आपल्या चलभाष संचावर येणारे संदेश नीट तपासून पाहा. त्यात अर्ध्यापेक्षा जास्त संवाद हे हावभाव दर्शवणाऱ्या डोळयांच्या, हातांच्या मुद्रांप्रमाणे रेखाटलेल्या सुरेख स्माईलीद्वारेच केलेले असतात. म्हणजे शब्देविण संवादुच जणू चालू असतो. चित्रलिपीची ताकद नवीन तंत्रज्ञानाने पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. पण भाषा अशी पटापट कूस बदलत असताना परस्पर संवादातले काही प्रश्नही निर्माण होताना दिसतायत. बदलत्या तंत्रज्ञानाबरोबरच नवी परिभाषा मुलं पटकन आत्मसात करतात. पण आजी-आजोबांना मात्र चलभाष, त्यातल्या वेगवेगळ्या सुविधा, इंटरनेट, संगणक हे तितकंस आपलं वाटत नाही. समजून घ्यावं, वापरावं असं वाटत नाही. आणि अर्थातच त्यामुळे नवीन परिभाषाही त्यांच्यासाठी अपरिचित राहते. त्यामुळे नातवंड, मुलं नेमकं कशाबद्दल आणि काय बोलतायत ते त्यांना लक्षात येत नाही. आणि एक प्रकारचा दोन पिढयातला दुरावा (generation gap या अर्थाने) नव्या भाषिक बदलांमुळे अधिकच दुणावतो. संवाद कमी होतो. भाषा प्रवाही असते, बदलत असते कारण ती बदलत्या समाजाचं प्रतिबिंब असते. सध्या तंत्रज्ञानाच्या बदलांना समाज सामोरा जातो आहे आणि त्याचं निदर्शक म्हणून भाषाही बदलते आहे. पण भाषा बदलाचे हे काही एकमेव कारण नाही. आणखीही सामाजिक बदल आपली भाषा बदलवत आहेत. म्हणूनच आपल्या डोळ्यासमोर (किंवा जीभेसमोर) भाषा चक्क कूस बदलते आहे. (प्रथम प्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे)सुनीला विद्या (चर्चा) १५:५१, ५ मार्च २०१६ (IST)