== आंध जमात ==


महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमाती व त्यांचे वास्तव्य क्षेत्र 1)गोंड -चंद्रपूर ,गडचिरोली ,नांदेड . 2)भिल्ल -धुळे ,नंदूरबार ,व जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वताचा प्रदेश ,तसेच अहमदनगर ,नाशिक आणि नांदेड जिल्ह्यातील डोंगराळ भाग . 3)कोकणा-नाशिक ,धुळे जिल्हातील डोंगराळ भाग . ४)कोरकू -अमरावतीच्या मेळघाट प्रदेश . 5)वारली -ठाणे,जिल्ह्यातील,डहाणू ,जव्हार ,मोखाडा ,तलासारीचा ,जंगलपट्टीचा प्रदेश . 6)ठाकर ,महादेव कोळी -पुणे ,अहमदनगर ,नाशिक ,ठाणे आणि रायगड जिल्यांतील डोंगराळ व पठारी प्रदेश . 7)कोलाम-राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतीय प्रदेश , 8)आंध -परभणी ‍(विभाजित हिंगोली ‌)नांदेड .अकोला यवतमाळ ‍(बुलढाणा ‌)


...........संदर्भ ४ थी भूगोल पान क्र 23 ‌

आंध जमातीचा इतिहास पाहू या .........................

आंध ही वऱ्हाडांत शेतकी करणारी एक जमात  आहे .ही यवतमाळ जिल्ह्यात आढळते .ही आंध्रांची एक पोटजात असावी .यांचे वारताती खालताती असे दोन भेद आहेत .पहिल्या वर्गात लग्न झालेल्या औरस स्ञियांच्या औऱस संततीचा समावेश होतो .दुसऱ्या अनौरस संतीतीची प्रजा येत असावी .यांची अनेक गोत्रे आहेत .त्यापैकी पुष्कळांची मराठी आडनावे आहेत........‍पान क्र 193(संदर्भ सुलभ विश्वकोश १९४९ ‌)   


आंध हा समाज महाराष्ट्र,आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यामध्ये पसरलेला आहे .रसेल आणि हिरालाल यांच्या मते आंध लोक आंध्रप्रदेशातून आताच्या मूळ ठिकाणी फार वर्षापूर्वी स्थलांतरित झाले आहेत.हसन यांच्या मते आंध समाज हि गोंड समाजाची शाखा असावी परंतु ती नाही , मराठा लोकांच्या अतिक्रमनामध्ये ते त्यांच्या मूळ समाजापासून वेगळे झालेले आहेत .मराठा समाजाच्या संपर्कात आल्यावर त्यांनी त्यांच्या रूढी ,परंपरा आणि भाषेत मराठा लोकांप्रमाणे बदल केला .आंध समाजाचे दोन प्रमुख प्रकार पडतात .वरताती म्हणजे वरचे अथवा उच्च आणि खालताती म्हणजे खालचे अथवा निच्च या दोहोंमध्येकधीही लग्न होत नाही .आंध या नावावरून सुध्दा ओळखता येते की ते आंध्रप्रदेशमधून आले असावेत ....

महाराष्ट्रात आंध लोक नांदेड ,परभणी,आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आहेत .१९८१च्या जणगणनेनुसार आंध लोकांची लोकसंख्या ही 2,31,871इतकी आहे .आंध लोक मराठी भाषा बोलतात जी इंडो-आर्यन भाषा आहे .देवनागरी भाषेचा वापर ते लिहिण्यासाठी करतात .हे लोक कमी उंचीचे पसरट नाक आणि चेहऱ्याची ठेवण असलेले आहेत .आंध लोक हे मांसाहारी असून मांसाहारात ते रान डुक्कर खातात छच;परंतु आता काही माणसे संपूर्णतः माळकरी आणि शाकाहारी झाली आहेत .

आंध लोकांचे आडनावावरून बरेच भाग अथवा समूह तयार होतात.जसे बनसाले ,डुकरे, नटकर,खडके ,मगरे,मिटकरी, वाघमारे इ .आतेमामे भावंडांच्या लग्नास मान्यता आहे .आणि अशा लग्नाला प्राधान्य दिले जाते .बाळाच्या जन्मानंतर 12 व्या दिवशी बारसे होते तर 5आठवड्यानंतर जावळ काढतात .जावळ काढल्यावर केस वाहत्या पाण्यात सोडतात ,आंध लोकांची घर पक्के असते छोटे शक्यतो दोन खोल्यांचे असते .घराभोवती लाकडी काटक्यांनी बनवलेले कुंपणअसते .या कुंपणात पशुधन ठेवले जातेकाही घरे वाड्याप्रमाणे असतात .आंध लोकांचा पेहराव हा मराठी लोकांप्रमाणे असतो पुरुष धोतर आणि बंडी घालतात ,तर स्त्रीया साडी आणि चोळी वापरतात आंध लोकांचे दागिने मराठी लोकांप्रमाणे असतात .

शेती हा आंध लोकांचा पारंपारिक आणि प्रमुख व्यवसाय आहे .तर पशुपालन शिकार आणि सरपण गोळा करणे हे त्याचे दुय्यम व्यवसाय आहेत .त्यातील काही लोक रोजदारीवर काम करतात .गेली काही वर्षे आंध लोक दुसऱ्याची शेती कसणे त्याचबरोबर शेती विभागून ती कसणे अशा प्रकारची काम करतात बरेच आंध सरकारी खात्यात लेखनिक तसेच शिक्षक म्हणूनही काम करु लागले आहेत .

    महादेव, खंडोबा, मसाई, मुंजा आणि कृष्ण या देवांचीआंध लोक पूजा करतात आखाडी ,गुढीपाडवा ,नागपंचमी, पोळा, शिवरात्री,दसरा,आणि होळी हे त्यांचे प्रमुख सन आहेत .आंध लोकांचा वंजारा ,मराठा ,नाईकपाड आणि चनवार या लोकांबरोबर उठबस असते .

कुटुंबकल्याण तसेच आधुनिक वैद्य्कीय सेवा याबाबत आंध जागरूक झालेले आहेत .रोजगार योजना ,विज प्रकल्प ,पिण्याच्या पाण्याच्या सुविधा इ .गोष्टीमुळे आंध समाजाचे जीवन सुधारत आहे .


.‍पान क्र 12-13(संकलन -महाराष्ट्रतील आदिवासी डॉ .शौनक कुलकर्णी ‌)


आंध --- ही एक शेती करणारी व शिकार करणारी जात आहे त्यांची मुख्य वस्ती परभणी व नांदेड जिल्ह्याचा उत्तर भाग ,व बुलढाणा ,चांदा व वाणी ह्यांचा दक्षिण भाग ह्यांत असलेल्या डोंगराळ प्रदेशात आहे .ह्यांची संख्या ३००० पेक्षाही कमी होती ‍(‌१९०१ खानेसुमारी )ते क्वचित स्वतन्त्र शेती करतात बहुतेक खंडाने करतात .दिसावयास वन्य जातींसारखे दिसतात .चंद्याच्या काही भागात इतर शेतकरी त्यांना जवळ जवळ अस्पृश्य समजतात त्यांच्यात आतेच्या किंवा मामाच्या मुलींशी लग्न होते ,विधवेचे दिराशी लग्न होत नाही .मृत लग्न झालेला असल्यास जाळतात ,लग्न न झालेला असल्यास पुरतात.


आंध आदिवासी लोकांची शरीर आकार पुढीलप्रमाणे 1)डोक्याचा घेर मिलीमीटर ५२३.२९ 2)डोक्याचे सापेक्ष प्रमाण ७८.८० 3)नाकाच्या उंचीचे प्रमाण ११२.९४ ४)नाकाच्या लांबी -रुंदीचे प्रमाण ७९.७४ ५)वरच्या जबड्याच्या लांबीचे प्रमाण ४४.३९ ६)चेहरा व डोके ह्यांच्या रुंदीचे प्रमाण ९३.९३ नाकाच्या लांबी रुंदीवरुन जाती जमाती वर्गवारी केल्यास अगदी शेवटी आदिवासी जमात येते यात वारली ,मल्हार कोळी ,भिल्ल ,गोंड ,कोलाम ,कोरकू ,आंध ,ठाकूर ,वगैरे वन्य जाती येतात.‍(संकलन ---मराठी लोकांची संस्कृति.इरावती कर्वे ‌)पान क्र १०३,१३०

महाराष्ट्रातील आदिवासीची प्रांतवार विभागणी ;

संपादन

महाराष्ट्रात बहुसंख्येने आदिवासी राहतात ते ज्या ज्या भू-प्रदेशात राहतात ,त्या त्या भू-प्रदेशात त्यांचे दीर्घ वास्तव्य ,राजकीय अस्तित्व आणि एकूणच सामाजिक सांस्कृतिक व धर्मिक बंड उठाव इत्यादीमुळे तो तो भू-प्रदेश त्याच जमातीच्या नावाने आज ओळखला जातो .सह्याद्रीच्या सातमाळातील बालाघाट आणि डांगच्या आणि दक्षिणेकडील महादेव कोळी डोंगर ह्या श्रेणीतील घाटमाथ्यालगतच्या पठारी प्रदेशाला पूर्वी ‍(नेर,डांगन आणि मावळ विभाग‌)कोळवण म्हणत असत असा उल्लेख काही ग्रंथात सापडतो .हा प्रदेश ठाणे ,नाशिक ,नगर ,पुणे ,आणि कुलाबा जिल्ह्याच्या काही भागात पसरलेला असून येथे महादेव किंवा डोंगरकोळी जमातीची वस्ती आढळते .अरवली, विंध्य व सातपुडा प्रर्वतातील जंगले हे भिल्लांचे वसतीस्थान होय ,ह्या प्रदेशात भिल्लांची वस्ती प्रामुख्याने आढळल्यामुळे त्याला भिंडवाडा किंवा भिलवड प्रांत म्हणून ओळखल्या जात असल्याने माहिती काही ग्रंथात मिळते .

    तिसरा भू-प्रदेश म्हणजे गोंडवाना होय .हा प्रदेश प्रामुख्याने नर्मदेपासून दक्षिणेस गोदावरीपर्यंत व पूर्वेस छतीसागडपासून पश्चिमेस खानदेश पर्यंत पसरलेला आहे एवढ्या विशाल प्रदेशात अतिशय घनदाट जंगले होती .अशा ह्या अरण्यमय प्रदेशात राहत असलेल्या गोंड जमातीच्या नावावरून गोंडवन हे नाव पडले असावे असा विचार अनेक विद्वानांनी मांडला आहे .गोंडवन ह्या शब्दाची व्युत्पतीसंबंधाने विव्दानांनी मतभेद असलेले आढळून येतात, असे असले तरी सुप्रसिद्ध संशोधक अ.ज.राजूरकर ह्यांचे मत ग्राह्या वाटते ते म्हणतात. 
 
काही विद्वान निराळीच व्युत्पती समोर मांडतात ते गोंडवन  असे नाव देतात वण हा व्रणचा अपभ्रंश होय .व्रण म्हणजे जखम किंवा आघात.गोंडांनी ज्या जमिनीवर व्रण पडले म्हणजे आघात केले असा भू-प्रदेश अशा अर्थाने ते गोंडवन नाव देतात .पण हे पाठ्ण्यासारखे नाही .गोंडांनीह्या भूमीवर व्रण पाडले ,आघात केले असे म्हणणे सर्वथैव चूक ठरते .आघात केले म्हणजेकाय केले ह्याचे स्पष्टीकरण ते विद्वान देत नाहीत .गोंडानी ह्या भूमीवर आघात केले नसून त्यांनी ह्या भूमीवरील जंगले साफ करून -कर्षण करून -म्हणजे तिला कसून तिथून जीवनाची सामुग्री बाहेर काढली .एकंदरीत गोंडवन हे नाव योग्य नाही .गोंडवन म्हणजे गोंड राहत असलेला अरण्यमय प्रदेश होय .गोंडवन हे विशेषनाम म्हणून वापरतात .या संदर्भात तू .ना.काटकर ह्यांनी आपल्या ग्रंथात गोंडवानाचा लावलेला अर्थ लक्षात घेण्यासारखा आहे .एडआर्ट झ्युस ह्या ऑस्ट्रियन भू-वैज्ञानिकाने दक्षिण गोलार्धातील एका कल्पित खंडाला गोंडवन भूमी हे नाव दिलेले आहे .वर नमूद केलेल्या भिलवड, कोळवण आणि गोंडवन ह्या भू-भागात अनुक्रमे भिल्ल ,महादेव कोळी किंवा गोंड जमातीचेच लोक राहतात असे नाहीतर इतरही आदीम जमाती राहतात .आज महाराष्ट्राच्या शेड्युल लिस्ट नुसार महाराष्ट्रातील एकूण आदिवासीची संख्या ४७ आहे .
    ह्या जमातींचा सर्वांगीण विकासाला गती यावी ,त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना -उपयोजना त्यांच्यापर्यंत पोह्चव्यात आणि त्यांच्या समाजिक ,आर्थिक  व सांस्कृतिक जीवनाचा स्तर उंचावल्या जाऊन शेकडो पिढ्यांचा त्यांचा वनवास संपावा ह्या दृष्टीने शासनाचे भरीव प्रयत्न सुरु आहेत .आदिवासी विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्राचे प्रामुख्याने खालील गट पाडण्यात आलेले आहे . 

1)सह्याद्री गट -विभाग,2)सातपुडा गट -विभाग ,3)गोंडवन गट -विभाग 1976-77 मध्ये महाराष्ट्रात आदिवासी उपयोजना सुरु झाली .त्या दृष्टीने आदिवासी विकासाच्या संदर्भात महाराष्ट्राचे खालील दोन विभाग पाडण्यात आलेले आहेत .......

         ह्या योजनेन्तर्गत सातपुडा विभाग अंतर्भाव गोंडवाना विभागातच करण्यात आलेला आहे .परंतु वाङ्मयाच्या दृष्टीने आपण महाराष्ट्राच्या गोंडवन ,सह्याद्री आणि सातपुडा ह्या तीनही भागांचा स्वतंत्र विचार करू .
  महाराष्ट्राच्या वरील तीन गटातील किंवा विभागातील प्रमुख आदिवासी जमातीचे वर्गीकरण असे - 
अ)सह्याद्री गटातील आदिवासी जमाती --महादेवकोळी ,वारली,कोकणा ,ठाकूर ,कातकरी किंवा काथोडी ,कोळी मल्हार ,कोळी ढोर,दुबळा, धोडीया .
ब)सातपुडा गटातील आदिवासी जमाती --भिल्ल, गामीट,कोरकू,धनका ,पारधी ,नायकडा,राठवा .
क)गोंडवन गटातील आदिवासी जमाती --गोंड ,आंध ,कोलाम ,परधान ,हलबा-हलबी ,कावर ,थोटी-थोट्या.ह्या शिवाय इतरही काही जमातीचा आदिवासी म्हणून समावेश होऊन अनुसूचित जमातीच्या यादीत आज सत्तेचाळीस जमाती आढळतात ...आदिवासी साहित्याचे स्वरूप ..डॉ .विनायक तुमराम .पान क्र 10-11.


आदिवासी लोकांना खास संस्कृती आहे .त्यांचे कार्ये सणवार ,चालीरीती पंचायातच्या नातीने समाजधर्म व न्यायदान आणि इतर संरक्षण व नियंत्रण आदि सर्व कामे बिनधोकपणे केली जातात .त्यांचे सांकेतिक नियम असून त्याचे पालन ते आनंदाने करीत असतात .सुधारित जगाचा व त्यांचा फारसा संबंध येत नाही .आदिवासी लोक वाघदेव ,पांढरदेव ,हिरवादेव ,नारायणदेव ,देव मानतात त्याशिवाय देवी ,मारुती ,आदि इतर देवाचीही ते पूजा करतात .दारिद्र्य खूप असल्याने सावकाराच्या शेतीवर मजुरी करणे ,इतर रोजगारांची कामे ते करतात पिढ्या न पिढ्या ते सावकाराच्या कर्जात बुडालेले असतात एवढी दयनीय अवस्था असतानासुध्दाते कष्टाळू ,प्रेमळ व प्रमामाणिक असतात ते सतत कामात असल्याने त्यांना इतर गप्पा करण्यास वेळ नसतो .आदिवासी लोकांना बोलण्याची जास्त सवय नसल्याने ते इतर लोकांशी गप्पा व विचारविनिमय करतांना दिसत नाहीत .चाहाडी चुगली ,त्यांना जमत नाही .ह्या परिस्थितीमुळे तसेच अज्ञानामुळे त्यांच्यात अंधश्रद्धा फार असते भूताखेतावर त्यांचा विश्वास असतो.अंगारे धुपारे त्यांच्यात सतत असतात ---.‍‍‌वनवासी व उपेक्षित जग. डॉ. भीमराव पिंगळे पान क्र ४९.

आदिवासी आंध जमातीचे नृत्य-नाट्य दंडार

संपादन

दऱ्या खोऱ्यात ,डोंगर कपारीत व झाडीपट्टीत राहणाऱ्या आदिवासी जमातीत प्रचलित व लोकप्रिय असले दंडार हे एक रंजनप्रधान लोकनाट्य आहे .दिवाळीच्या दिवसात ,सुगीच्या दिवसात तसेच जत्रा, उत्सवप्रसंगी आजही लोकरंजनासाठी दंडाराचे आयोजन केले जाते.मराठवाड्यात वसमत ,कळमनुरी ,हिंगोली ,जिंतूर ,किनवट ,या भागात तसेच विदर्भात पुसद,भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या भागात आंध व गोंड या आदिवासी जमातीत दंडार हे लोकनाट्य अधिक लोकप्रिय असल्याचे पाहवयास मिळते .नृत्य ,संगीत ,गीत कथागीत आणि सोंगे यातून नाट्याविष्कार घडविण्याचा प्रयत्न दंडारात असतो .दंडाराचे एकूणच स्वरूप नृत्य-नाट्याचे असल्याने त्यात रंजनाला अवसर मिळालेला असतो . दंडार या लोकनाट्याचे मूळ आदिवासीच्या नृत्यात असल्याने स्पष्टपणे सांगता येते .आदिम जीवनात विधीप्रसंगी तसेच रंजनाच्या हेतूने आदिवासी नृत्यातून आपल्या भावना ,आनंदव्यक्त करित असतनृत्य हा त्यांचा जीवनाचा अविभाज्य भाग असे .वृक्षाच्या पाना-फुलांनी स्वतःला सजवून निसर्गाच्या उत्साही वातावरणात आदिम नृत्य करीत .या नृत्यात पाड्यातील स्त्री-पुरुष सहभागी होत .झाडाच्या डहाळ्या किंवा दंड ‍म्हणजे आखूड काठी हातात घेऊन नाचत .शिकारीला निघाल्याचा ,शिकार शोधण्याचा ,शिकार मिळाल्याचा अभिनय आदिमांच्या नृत्यात केला जाई असा जीवनाविष्कार त्यांच्या नृत्यातून घडणे स्वाभाविकही असे .याशिवाय जंगलातील प्राण्यांच्या आवाजाचे ,पशु -पक्षांच्या आवाजाची नक्कल त्यांच्या नृत्य -नाट्यातून केली जात असे .विविध प्राण्यांचे मुखवटे धारण करूनही आदिवासी नृत्य करीत .आदिवासींच्या या स्वरूपीनृत्याचे काही विशेष दंडारात 1962 पर्यंत टिकून होते .नंतरच्या काळात लोकजीवनात प्रचलित असलेल्या लोकधर्मी नाट्यांचा प्रभाव दंडारावर पडत गेल्याने दंडाराचे सादरीकरणही बदलत गेले .असा बदलही स्वाभाविकच असतो .असे असले तरी आदिवासींच्या नृत्यांचे काही विशेष आजही दंडारात अवशेष रूपाने टिकून राहिल्याचे दिसतात .झाडाची डहाळी घेऊन नाच करणे ,शिकारीचे नृत्य ,टिपऱ्या घेऊन नाच करणे असे विशेष आंधांच्या दिंडारात कायम राहिलेले आहेत .

  दंडार या लोकनाट्याशी दिंडार ,दंडारण असे पर्यायी शब्द ग्रामीण भागात प्रचलित आहेत. हातात दंड म्हणजे आखूड काठी किंवा डहाळी घेऊन केलेला नृत्य -नाट्याविष्कार म्हणजे दंडार असे या लोकनाट्याविषयी म्हणता येते. लोकारंजनासाठी आज आदर केल्या जाणाऱ्या दंडाराचे स्वरूप लोकनाट्यासारखे बनलेले आहे. लोकजीवनात प्रचलित असलेल्या गोंधळ, जागरण, सोंगी भजन, तमाशा, बहुरुप्याचे लीलानाट्य यांचा प्रभाव दंडारावर पडलेला दिसतो. या लोकधर्मी नाट्यातील काही विशेष दंडार्यांनी आपल्या दंडारात स्वीकारल्याचे पाहावयास मिळते. असे असले तरी दंडाराची आपली स्वतःची अशी प्रकृती आहे. स्वतःचा असा आकृतिबंध आहे. स्वतःचे असे एक वेगळेपण आहे. नृत्य, संगीत, गीत, कथागीत, सोंगे यांच्या एकत्रीपणातून दंडारात नाट्याविष्कार घडविला जातो. त्यातून लोकरंजन होते. आजच्या दंडाराचे स्वरूप रंजनप्रधान लोकनाट्याचे बनलेले आहे. लोकरंजनाच्या पारंपारिक माध्यमांचा विचार करताना झाडीपट्टीतील, ग्रामीण भागातील लोकांचे रंजन करणाऱ्या दंडाराचा विचार करणेही क्रमप्राप्त ठरेल.

दंडाराचे स्वरूप आदिवासीच्या निरनिराळ्या जमातींचे दंडाराचे स्वरूप काही प्रमाणात वेगवेगळे असल्याचे पाहवयास मिळते .महादेव कोळी ,कोकणा ,ठाकूर या आदिवासी जमातीतील नृत्य-नाट्य भवाड या नावाने ओळखले जाते .त्यांच्या सांस्कृतिक जीवानात भवाड या नात्याविष्कार अनन्यसाधारण महत्व आहे.विधीच्या निमित्ताने आदिवासी भवाडाचे आयोजन करीत असले तरी त्यातील नाट्यतत्वामुळे त्यांचा सादरीकरणात रंजन असते.भवाड्यातील मुखवटे धारण करून केला जाणारा नाच व सोगे हे भवाडाचे मुख्य आकर्षण असते .गोंड आणि कोलाम या आदिवासी जमातीचे दंडार आलीकडे विधीपासून तुटून रंजनप्रधान लोकनाट्यचे रूप धरण करू लागले आहे.आंध या आदिवासी जमातीच्या दंडारात लौकिकीकरणावर अधिक भर दिला जात असल्याने या दंडाराचे स्वरूपही लोकनाट्याचे झाले आहे.मराठवाडा आणि विदर्भातील गोंड, कोलाम आणि आंध या आदिवासी जमातीच्या दांडारावर लोकनाट्याचा प्रभाव पडलेला असल्याने त्यांचे स्वरूप रंजनप्रधान लोकनाट्याचे बनले आहे.झाडीपट्टीत हव दंडार अधिक लोकप्रिय असल्याचे पहावयास मिळते.

विधीच्या निमित्ताने केल्या जाणा-या नृत्यातून दंडाराचाविकास होत आला आहे .बदलत्या काळाप्रमाणे जीवनप्रवाहप्रमाणे दंडाराची जडण-घडण झाली आहे.या स्वरुपाच्या जडणघडणीतून आज प्रचलीत असलेले दंडार आकारस आले आहे.नृत्य,संगीत, सोंगे ,गीत आणि कथा हे आजच्या दंडाराचे स्वरूप आहे . त्यातील नाट्यगुणामुळे आणि लौकिकीकारणामुळे त्यांचे स्वरूप रंजनप्रधान लोकनाट्याचे बनले आहे . दस-याला मुहूर्त करून रोज रात्री दंडारचे कर्यक्रम आपल्या तसेच शेजाऱ्याच्या गावात दंडारचे कार्यक्रम केले जातात.जवळपासच्या गावातील जत्रा -उत्सव प्रसंगीही दंडाराचे कार्यक्रम होतात .होळीच्या दिवसातही दंडार केले जाते .दिवाळीच्या होळीच्या दिवसात दंडारी दिवसाही नृत्य-गाण्याचे तसेच सोंगे आणून लोकरंजन करतात.अर्थात याला संपर्ण दंडार म्हणता येत नाही .दंडाराचे खरे स्वरूप रात्री सादर केल्या जाणा-या दंडारातून पाहावयास मिळते.आज आदिवासीची वसती असलेल्या राज्यातून झालेले आहेत.दंडा-याचे हे संच दंडाराचे कार्यक्रम करतात .

दंडारात किती कलावंत असावेत याला बंधन नाही.साधारणतः २५ ते ३० कलावंताचा सहभाग दंडारात असतो.त्यात वादक,गायक,नर्तक,सोंगाडे,आणि एकूणच सादरीकरणात मदत करणारे काही सहाय्यक यांचा समावेश आसतो.दंडारात स्त्रियांचा सहभाग नसतो.स्त्री पात्रांची भूमिका पुरुषच करतात.गोंडाच्या दंडारात पुरुष लुगडी नेसून नृत्यात सहभागी होतात.आंधच्या दंडारातही पुरुषच स्त्रीची भूमिका करतात.दंडारात देवदेवता स्तवन झाले की हातात टीप-या.दंड,झाडाची डहाळी घेऊन दंडारी नाच करतात.या नाचात स्त्रियाची वेशभूषाकेलेले पुरुष,तरुण मुले सहभागी होतात.या नाचाला ढोल,ढोलकी,तुणतुणे,झांज शिंगाडे,या वाद्यांची संगीत साथ असते. आंधाच्या दंडारात नाचे मुले हातात झाडाची डहाळी घेऊन तसेच कमरेला झाडाची पाने बांधून नाचतात.काही दंडारातून या नाचाच्या प्रसंगी शिकारीला जाणे शिकार शोधणे असा नृत्याभिनयही केला जातो.दंडारातील नाचात सहभागी कलावंताची संख्या अधिक असते.या नाचानंतर दंडारात विनोदी प्रसंग सादर केला जातो.भुताने झपाटलेल्या व्यक्तीचे भूत उतरणे,नवरा-बायकोचे भांडण,दोन बायकांचा दादला,नाव्हीआणि ग्रामस्थ,वनरक्षक आणि लाकूडतोड्या या सारख्या प्रसंगातून संवादातून खुमासदार संवादातून प्रेक्षकांना खळखळून हसविले जाते.

या प्रसंगानंतर नृत्य-गायकांचा कार्यक्रम सादर केला जातो.स्त्रीवेषधारी पुरुष आणि अन्य कलावंत पारंपारिक गाणी गातात.या गाण्यांना नाच्याच्या नाचाचीसाथ असते.मधूनमधून चटकदार,शृंगारिक सवांदाची पेरणी करून नाट्य खुलविल्या जाते.दांडरात म्हटली जाणारी गाणी परंपरेने प्रचलित झालेली असतात त्यांचे स्वरूप लोकगीतासारखे,लावणीपोवाड्यासारखे असते.दंडाराच्या उत्तररंगात पौराणिक कथाभागावर आधारित कथागीत सादर केले जाते.कथागीतातील घटनाप्रसंग या प्रमाणे सोंगे दाखविली जातात.दंडाराचा उत्तररंग नाट्याच्या दुष्टीने आस्वाद्नीय असतो.दंडाराच्या शेवटी आरती होऊन आरती प्रेक्षकांत फिरविली जारे. गोंड कोलम आणि आंधाच्या आदिवासी जमातीच्या दंडारांचे स्वरूप स्थूल मानाने वरील प्रमाणे असते .अर्थात एकूणच दंडारात साचेबंदपणा असतो.असे म्हणता येत नाही.गोंड कोलाम यांच्या दंडारापेक्षा आंधाच्या दंडारात अधिक लौकीकीकरण झालेले आहे.त्यावरून त्यांनी आपली स्वतःची अशी रंगभूमी विकसित केली असे म्हणता येते.दंडारातून घडणारा नाट्याविष्कार मुक्त स्वरूपाचा असतो.उत्स्फूर्त संवाद,वाचिक आणि आंगिक हावभाव यातून केलेली यातून केलेली विनोद निर्मिती संवादातील नाट्य,गीत,आणि कथा या बरोबरच सोंगे असे नाट्यगुण दंडारात असलेल्या त्यातून लोकरंजन घडते.

महाराष्ट्रात प्रचलित असलेल्या विविध लोकधर्मी नाट्याचा प्रभाव दंडारावर पडत गेल्याने या लोकधर्मी नाट्यातील काही नाट्यगुण दंडारात स्वीकारलेल्या गेल्याचे व त्यातून आजचे दंडार आकारास असल्याचे दिसते.दंडारात पूर्वरंग आणि उत्तररंग असे दोन भाग असतात.पूर्वरंग देवता स्तवन (गण ) नाच एखादे सोंग आणि संवादाचा प्रसंग असे सादरीकरण असते.उत्तररंग नृत्य-गायन सोंगे आणि कथागीत यांचे सादरीकरण आणि शेवटी आरती असते.दंडारातील पूर्वरंग आणि उत्तररंग ही कल्पना दंडा-यांना एकूण सादरीकरणाच्या आधारे या स्वरूपाची विभागणी करता येते.


दंडाराच्या पूर्वरंग

संपादन

दंडाराच्या पूर्वरंग रंगभूमीच्या पुजाविधीने सुरु होतो.आंधाच्या दंडारात देवकुंभाच्या झाडाची फांदी रंगभूमीवर ठेवून निरनिराळ्या देवदेवतांच्या प्रतिष्ठापना करून पूजा केली जाते.अलीकडे रंगभूमीवरफक्त नारळ फोडून दंडाराचा पूर्वरंग सुरु होतो.काही दंडारात रंगभूमीच्या पूजाविधीनंतर लगेचच दंडारी नृत्य करतात तर काही दंडारात नृत्यानंतर देवदेवतांचे स्तवन केले जाते.दंडारातील पूर्वरंगातील नृत्यात हातात डहाळी घेऊन,दंड म्हणजे आखूड काठी घेऊन दंडारी नाच करतात अंधाच्या दंडारात हातात दंड घेऊन शिकारी नृत्य केले जाते.

दंडारीचे नृत्य झाले की रंगभूमीवर गणपतीचे सोंग येते आणि गण गायिला जातो.गणाबरोबरच इतर देवदेवतांची स्तवनपर गाणीही गायिली जातात.गणानंतर खुमासदार संवादातून नात्य खुलविले जाते.यावेळी रंगभूमीवर सूत्रधार,सोंगाड्या पुरुषाने केलेले स्त्रीपात्र असे कलावंत विनोदी संवादातून नाट्य खुलवितात. यासंवादाना आंगिक आणि वाचिक अभिनयाची जोड असते. समाजातील नमुनेदार व्यक्ती,घटना प्रसंगावर आधारित हे संवाद नाट्य असल्याने प्रेक्षक मनापासून या नाट्याविष्काराला दाद देतात.पूर्वरंगात संवाद आणि गायन असे क्रमाक्रमाने सादरीकरण केले जाते. स्त्रीवेश धारण केलेल्या कलावंताचा नाच या नाचला गाण्याची संगीताची साथ असे या नृत्य गायनाचे स्वरूप असते.या प्रसंगी म्हटली जाणारी गाणी श्रुगारिक सामाजिक स्वरूपाची तशीच द्वद्व्दात्मक असतात.नाच गाण्याची एक फेरी संपली कि संवादातून नाट्य खुलविले जाते.काही दंडारात उत्तर रंगातील पूर्वार्धात नाच-गाण्याचा कार्यक्रम सादर केला जातो.

दांडराचा उत्तररंग

संपादन

दंडारात नाट्य खुलते ते उत्तर रंगात आंधाच्या दंडारात पौराणिक कथाभागावर आधारित किंवा परंपरेने प्रचलित असलेल्या कथेवर आधारित कथागीत संगीत व अभिनय सादर केले जाते.मधून मधून खुमासदार संवादाचीही पेरणी केली जाते.कथाभागावर आधारित सोंगेही आणली जातात.राजा,प्रधान,राणी या बरोबरच हरीच्चन्द्र-तारामती ,राम-लक्ष्मन-सीता ,मारुती अशी सोंगे त्या त्या कथानकाला पूरकच ठरतात.उत्तररंगातील कथानक पौराणिक असले तरी त्याचे लौकीकीकरण या नाट्याविष्कारात केले जातअसल्याने वर्तमानचे संदर्भ त्याला लाभतात.त्यातूनही दंडारात नाट्य खुलते.आंधाच्या दंडा रातील कथानक अलिखित स्वरूपाचे असल्याने त्यात उत्स्फूर्त असा बदलही केला जातो.दंडाराच्या शेवटी आरती होऊन दंडाराची सांगता केली जाते दंडाराचा हा कार्यक्रम जवळजवळ रात्रभर चालतो काही दंडाराच्या उत्तररंगाची दोन भागात विभागणी करता येते. उत्तर रंगातील पहिल्या भागात नृत्य-गायन,संवाद सादर केले जातात आणि त्यांतर पौराणिक कथाभागावर आधारित क्थागीत साभिनय व सोंगसह सादर केले जाते. दंडाराच्या एकूणच नाट्यप्रयोग रंजक प्रधान असतो.आदिवासी आणि त्या परिसरातील लोकांचे रंजनाचे दंडार हे एक लोकप्रिय माध्यम आहे.दंडारात पुढील नाट्यगुण असल्याने त्यातील रंजक परता पेक्षकांना एका आगळ्या वेगळ्या आनंदाचा प्रत्यय देते.दंडाराच्या एकूण प्रयोगात दंडारी तर आनंद घेतातच,त्याचबरोबर दंडाराचा प्रेक्षकही दिवसभारचे श्रम विसरून दंडाराचा आनंद लुटतो.

दंडारातील गाणी

संपादन

आंध,गोंड आणि कोलाम यांच्या दंडारात म्हटली जाणारी गाणी पांरपारिक असून लोकगीताच्या धाटणीची असतात.दंडार चालू असतानाच समयस्फूर्ती असा बदल किंवा रचनाही दंडारी करतात.दंडारातील बहुतेक गाण्यांचे स्वरूप संवादात्मक असते.श्रुगारिक,सामाजिक आणि पौराणीक स्वरूपाची गाणी वगळता बहुतेक गाण्यांना नृत्याची साथ असते.पौराणीक कथाभागावर आधारित गाणी दंडाराच्या उत्तररंगात गायिली जातात.त्यांचे स्वरूप काथागीतासारखे असते.या गीतांची चालमात्र लोकगीतासारखी असते.संवाद आणि गीत असे या सादरीकरणाचे स्वरूप असल्याने या कथागीतांना नाट्यसंहितेचे स्वरूप प्राप्त होते.या गाण्याचा आस्वाद दंडाराचा प्रेक्षक श्रद्धेने घेतो.दंडारातील एकूणच गाणी नाट्यगुण असलेली असल्याने त्यांतून रंजन होते.

चंद्रपूर,भंडारा,गडचिरोली,पुसदच्या परभणी जिल्यातील सेनगाव तालुख्यात गावे हिंगोली व कळमनुरी, औंढा,तालुक्यातील गावे व ग्रामीण भागातील दंडारात झडती च्या गाण्यांनी ख-या अर्थाने रंग भरल्या जातो.प्रेक्षकांना झडती तील गाणी फारच आवडतात याचे कारण या गीतांची रचना लोकगीतासारखी असते.तसेच त्यातून घडविला जाणारा भावनाविष्कार प्रेक्षकांना एका आगळ्या वेगळ्या आनंदाचा प्रत्यय देणारा असतो.झडतीतील गाणी ठसकेबाज,लौकिकजीवनातील घटना-प्रसंग आणि भावभावना यांचा आविष्कार करणारी असतात.झडतीतील बहुतेक गाणी शृंगारिक रसाचा परिपोष करणारी असतात.दंडारातील गाण्यांना नृत्य,अभिनय,संगीत आणि संवाद यांचा साथ असल्याने तसेच त्यांतून व्यक्त होणा-या भावनाविष्काराने त्यांत नाट्यात्म्कता येते. दंडारातील या स्वरूपाच्या गाण्याने एक उदाहरण असे-स्वरूप रंजनप्रधान लोकनाट्याचे बनू पाहत असल्याने त्यातील नाट्याविष्कारात अनेक नाट्यगुण येत आहेत.संवाद नकाला याचबरोबर कथानक आणि प्रेक्षकांच्या अभिरुची प्रमाणे गाणी यातून दंडाराचा नाट्याविष्कार घडविला जातो.अर्थात असा बदल होणेही स्वाभाविकच ठरते.

गोंड,कोलाम परधान यांच्या दंडारात नृत्याला प्रधान्य असले तरी त्यातून नाट्याविष्कार घडतो .मुखवटे धरण करून दंडारात केले जाणारे नृत्य नाट्यात्म अनुभव देणारे असते आंधाच्या आणि इतर आदिवासी जमातीतील दंडारातील सोंगे आणि त्यातून केला जाणरा संवाद हाही दंडारातील नाट्याविष्काराचा एक विशेष सांगता येतो.दंडारातील सहभागी होण-या दंडा-यांचा उत्साह नृत्याविष्काराला गती देणारा नृत्यात एक प्रकारचा धुंद्पाणा असणारा असतो.त्यामुळे दंडारातील नृत्य प्रेक्षकांना एका आगळ्या-वेगळ्या आनंदाचा प्रत्यय देते.अलीकडे दंडारातील नुत्यातील पारंपरिक कमी होऊ पाहत आसल्याच्रे दिसते.मुळात दंडारातील नृत्य म्हणजे आदिवासींच आदिमकाळातील नृत्य होते.आदिवासीची नृत्ये मुक्त आणि सामुहिक असते दंडारातील नृत्यात सामुहीकता असते.मुक्तपणाही असते.पणत्यातून घडणा-या जीवनाविष्काराचे स्वरूप मात्र आता बदलू पाहत आहे.असे जरी असले तरी दंडारातील नृत्यातून घडणारा नाट्यविष्कार मात्र प्रेक्षकांचे रंजन करणारा असतो.या नृत्यात फेर धरून केला जाणरा पदन्यास ,शरीराच्या हालचाली आणि अभिनय आकर्षक असतो.दंडारातील नृत्याला गाण्याची आणि संगीताची असलेली साथ नाट्य खुल्विणारी असते.

दंडा रातील नृत्य आणि गाणी विशेषतः झडतीतून होणारे सादरीकरण अधिक नाट्यपूर्ण असते.या गीताच्या चाली लोकगीतासारख्या असल्याने तसेच त्या गीतातील आशय प्रेक्षकांना सुखावणारा असल्याने त्यांतून होणारा नाट्यविष्कार प्रेक्षकांना मनाची पकड घेतो.या स्वरूपाच्या गीतांना नृत्याची असलेली साथही मोहक असते.दंडारातील झडती तून होणारा नाट्यविष्कार हा लोकनाट्यतून होणा-या नाट्याविष्काराच्या धाटणीचा असतो.दंडारातील संवादही नाट्यखुलविणारे,प्रेक्षकांच्या गालावर हास्याची खळी पाडणारे असतात.खुसखुशीत विनोद आंगिक आणि वाचिक अभिनय आणि समाजजीवनाचे या संवादाला लाभलेले संदर्भ नाट्यपूर्ण असतात त्यातून प्रेक्षकांचे रंजन होत असते हे संवाद समयस्फुर्त असतात काय बोलावयाचे हे पूर्वी ठरलेले नसते तरी मूळ प्रसंगाला उठावदारपणा आणणारे असतात.समाज व्यक्ती जीवनातील हरलेले नाट्य या संवादातून स्वाभाविकपणे आणि सहजतया आविष्कृत होत असते.आलीकडे दंडारातून विनोदनिर्मिती करण्यासाठी सोंगाड्या या पात्राचा वापर लोकरंगभूमीवर होताना दिसतो त्यामुळे प्रेक्षकांची अभिरुची लक्षात घेण्याचा प्रयत्न केलेला दंडारातील रंगभूमीवर अवतरण्यातूनही नाट्याविष्कार घडविला जातो त्यांची रंगभूषा आणि वेशभूषा दंडारातील कथानकाला उठाव देणारी असते.त्यामुळे दंडाराच्या उत्तर रंगात सादर केले जाणारे कथानक नाट्यपूर्ण बनते नकलांच्या सोंगातून निरनिराळे प्रसंग व्यक्ती नमुने नाट्यपूर्णपणे उभे करण्याचा प्रयत्न दंडारात केला जातो. त्यातूनही नाट्याविष्कार घडतो.दंडारात परंपरेने चालत असलेले नृत्य,संगीत,गीत नाट्य यासारखे कलाविष्कार लोक रंजनाच्या दुर्ष्टीने महत्वाचे ठरतात .त्यामुळे दंडाराला रंजनमुल्ये प्राप्त होतात मुक्त नृत्य पारंपरिक वाद्याचे संगीत,लोकगीत सारणीतील गीते आणि यांच्या एकत्रितपणातून घडणारा लोकधर्मी नाट्यविष्कार असे स्वरूप आदिवासीच्या दंडाराचे असते.दंडा उत्तररंगात सादर केले जाणारे कथागीत ते मौखिक परंपरेने लोकजीवनात प्रचलित असते.त्यांची संहिता अलिखित असते.त्यामुळे दंडाराची नाट्यसंहिता लवचिक असते.त्यात उत्सफूर्त बदल घडतो.त्यातूनही दंडारातील नाट्यविष्काराला एक वेगळेपण येते.दंडाराची रंगभूमी ही खऱ्या अर्थाने लोकरंगभूमी असते गावातील मोकळे मैदान सार्वजनिक ठिकाणाचा उंचवठा .जत्रेचे ठिकाण हीच दंडाराची रंगभूमी होय.प्रेक्षक या रंगभूमीभोवती बसून दंडाराचा आस्वाद घेतात. आदिवासीच्या दंडारातून त्यांच्या नृत्य नाट्यातून पारंपारिक कलात्मक आविष्काराचे दर्शन घडते.ही नृत्य नाट्ये त्यांच्या जीवनात जगण्याचा एक अविभाज्य भाग असत त्यांचा जीवनात आनंद निर्माण करणारी .जीवनाला उभारी देणारी ही नृत्ये-नाट्ये आता बदलत्या जीवन प्रवाहात बदलत्या मनोरंजनाच्या साधनात बदलत्या परीस्थितीप्रमाणे काही नवे नाट्यगुण स्वीकारताना दिसते. त्यातूनच दंडाराला लोकनात्याचे रूप येताना दिसते असे असले तरी आदिवासी जमाती ज्या परिसरात रहातात त्या परिसरातील लोकजीवनात दंडार आजही आपली लोकप्रियता टिकून आहे.लोकरंजनाचे कार्य आपल्या नाट्याविष्कारातून कारीत आहे .... संदर्भ --लोकरंजनाची पारंपारिक माध्यमे --डॉ शरद व्यवहारे.

आंधाची लोकगीते:पांरपरिकता आणि सहजता

संपादन

गोंडवाना प्रांतात गोंड,आंध,कोलाम,परधान,हलबा,कावर,थोटी-थोट्या आणि याशिवाय तुरळक प्रमाणात पारधी व भिल्ल या आदिवासीच्या जमाती पहावयास मिळतात.प्रत्येकांच्या जीवन जगण्याचे एक वेगळेच तंत्र आहे.काही जीवन जाणीव आहेत. श्रद्धा,निष्ठा,धारणा,आहेत.परमेश्वराविषयीच्या पराकोटीच्या श्रध्दाही या विविध जाती जमातीच्या पहावयास मिळतात.आदिवासी कुणाला म्हणावे या संदर्भात विविध व्याख्या सांगितल्या आहेत.विविध अभ्यासकांनी त्यांची वैशिष्ट्येच रेखाटली ही विशीष्टये त्यांच्या जीवन जगण्याची साक्ष पटवून देतात.एकाच विशिष्ट भूप्रदेशावर राहणारा समान बोली बोलणारा,समान सांस्कृतिक जीवन जगणारा ,विवाह,व्यवसाय इत्यादी बाबतीत समान निषेध नियमांचे पालन करणारा,तंत्रशास्त्रीय ज्ञानाच्या दृष्टीने मागसलेला,अक्षर ओळख नसलेला रक्त संबंधावर आधारित सामाजिक राजकीय रितीरिवाजांचे प्रामाणिकपणे पालन करणारा एकजिनसी गट म्हणजे आदिवासी होय.निश्चित अशी परिभाषा नसल्याने उपरोक्त वैशिष्ट्ये ज्या समाजात आढळतात त्या समाजाला आदिवासी समाज असे संबोधले जाते. अधिवासिंच्या विविध वैशिष्ट्यात एक महत्त्वाचे म्हणजे हा लोकगीते,लोककथा,लोकनाट्य,यांच्या मार्फत सांस्कृतिक वारसा सांभाळणारा परंतु लीपिबध्द साहित्यचा अभाव असलेला मानव समुदाय होय .या विशीष्टयातून त्यांच्या लोकगीतांचा निर्देश केला गेला आहे.त्यांची लोकगीते ही त्यांच्या जीवन जाणीवांतून अभिव्यक्त झालेली असल्याने त्यांच्या समग्र लोकगीताचे मोल अनन्यसाधारण असे आहे.आदिवासींच्या लोकगीतातून त्यांच्या समग्र जीवन जगण्याचे प्रतिबिंब पडते.कोणत्याही विधिप्रसंगी गीतांचे प्रचलन पहावायस मिळते. जन्म बारसे,लग्न,सणसमारंभ या प्रसंगी आपल्या भावना गीतातून मांडतात म्हणूनच आदिवासींचा अभ्यास करतांना,त्यांचे जीवनसमजून घेतांना त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास करतांना त्यांच्या लोकगीतांचा अभ्यास उपयोगी ठरतो. गोंडवाना प्रांतात आंध ही आदिवासी जमात पहावयास मिळते.श्रद्धाळू पापभिरू दैववादी,निष्कपटी,आडाणी आणि पारंपारिकतेने जूनं ते सोनं मानणारा परमेश्वरावर सगळा भर टाकून तूच तार नाही तर मार आशी पराकोटीची असलेला.परंपराचे पालनपोषण करून पुढच्या पिढीला घडविणारा बेडर धाडसी आणि व्यवहारचातुर्याने नटलेली आंध बांधव गोंडवाना प्रांतातील इतर आदिवासी जमातीतील बांधवापेक्षा निराळा आहे. वैविध्याने ज्यांचे जीवन भारलेले आहे आशा आंधाची अशी कुठलीही स्वतंत्र बोली नाही.हिंदूधर्मियांच्या सानिध्यात राहून त्यांचात झपाट्याने परिवर्तन होतांना दिसत असले तरी काही परंपरा,रूढी,विधी त्यांनी प्राणपणाने जपल्या आहेत.किनवट तालुक्यात ‍‍‍(जिल्हा नांदेड)आंध या आदिवासी जमातीचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे.हे आंध लोक मोठे कष्टाळू,प्रामाणिक आणि श्रध्दाळू प्रवृतीचे आहेत. कुठलीही तक्रार न करणारे,जे वाट्याला आले आहे.ते हसत हसत स्वीकारणारे परंपरावादीवृत्तीचे आहेत.

आंधांचे सणसमारंभ निसर्ग,ऋतू यावर आधरित असतात कृषीसंस्कृतीशी संबंधित असतात,ते निसर्गात रमतात.त्याच्याशी एकरूप होतात आणि निसर्गाच्याच सानिध्यात ते आपला आनन्दोत्सवही साजरा करतात. नागपंचमी सण आला की स्त्रियांच्या आनंदाला उधाण येते.नवविवाहित माहेरी येते. तिची मैत्रिणींशी भेटण्याची उत्सुकता.आईच्या मायेच्या ओढीने ती माहेरी येते. तिचा भाऊ खास बहिणीला आणायला जातो. तो खास घुंगराच्या माळा बैलाला बांधून ,खिल्ल्रा-या बैलाची जोडी डमणी गाडीला जुपून आणि मग भाऊ आल्याचा काय आनंद तो फक्त त्या सासरवासी मुलीला माहित आंध आदिवासी जमात ही मराठवाडा व विदर्भ या भागात आढळते व या जमातीतील स्त्रीयाच फक्त जात्यावर दळण दळताना ओव्या या स्त्री जीवनाशी फार निगडीत आहेत. आपल्या माहेरचे सुख सासरचे सुखदुख जात्यावर सखी मानुन त्याच्याजवळ सांगत असतात.त्यांचा मनावर ओझे हलके करण्याचे ते एक साधनच आहे.

आंधाच्या स्त्रीया जात्यावर दळण दळताना ओवीगीते गातात त्यांचे स्वरूप मराठी स्त्री गीतातील ओवीगीतासारखेचे आहे.मात्र कौटूंबिक जीवनातील भावनाविष्कार तितक्या उत्कटतेने त्यातून व्यक्त होताना दिसत नाही.स्त्रीयाच्या या ओवीगीतांतून देवदेवता याविषयीचा जो श्रध्दाभाव व्यक्त केला जातो तो खालीलप्रमाणे होय.

  • मंदी देव महादेव भोळा
  • उघडला तिसरा डोळा,कैलाशीच्या महादेवात


किंवा


  • पैसा काय कशात बाई ससळी
  • डोंगर शिखरावर जाऊन बसली
  • माय तुह्या वरीला हळकुंड
  • तुह्या म्होरंं जळं होम कुंड


अशा स्वरूपाच्या ओव्या आंध जमातीतील स्त्रीयांना प्रचलित आहेत. लग्नविधीत वधू-वरांना हळद लावतांना गाणी म्हणण्याचीही प्रथा आंधात आहे.वधू-वरांना हळद लावताना स्त्रीया पुढील गीत गातात

  • देव खेळतो खेळतो शिकार ,
  • त्येच्या संग कोण कोण हाकार ,
  • हळद लावा नवर देवाला पाठवा मंग जंगलाला ,
  • मैना बैसली की हो सेंंपाकाला,
  • हळद लावा मह्या मैनाला ,
  • नवर देव शिकार खेळून आला ,
  • मैनाणं व्ह्ला बाई रांधला.
  • नवरा जेवाया की हो बैसला,
  • मैना वाढी जेवाया त्येला,
  • मैनाचं रूपं जसं सोनं रूपं,
  • हळदीच अंग ,मैना वाढी तूप ,
  • तुपाची धार ,वगळली भाकरीवर,
  • मैना व्हती कुठ तुही नदर,
  • राघू बैसला पाटावर,

लग्नाविधीच्या या गाण्यातून नवरदेव-नवरी यांचे रूप-गुण वर्णन करीत त्यांचे कौतुक केले.आंधाच्या लोकगीतांचे प्रचलन अधिक असलेले पाहावयास मिळत नाही आंधाचे प्रचलित असे वाटते.नागरी संस्कृतीशी आलेला संपर्कातून त्यांनी त्या संस्कृतीतून गीतांची प्रथा स्वीकारली असावी,असे असले तरी त्यांची जीवनपद्धती मात्र त्यांच्या काही लोकगीतांतून काही प्रत्ययास येते. आदिवासी गीतांत शिकारीचीही गीते आढळतात.उदरनिर्वाहासाठी शिकार करणे ही पूर्वपार परंपरा आजही काही प्रमाणत टिकून आहे.त्यांच्या शिकारीवृत्तीचे आणि शिकारी जीवनाचेही प्रतिबिंब त्यांच्या गीतात पडलेली पाहावयास मिळते या स्वरूपाचे गीत खालीलप्रमाणे आहे.

  • कोन बाय शिकार निघताय
  • कोन बाय शिकार निघना ,
  • भुऱ्या भाऊ शिकार निघनाय
  • भुऱ्या भाऊ शिकार निघना.

वरील गीतात बहीण आपल्या भावाच्या शिकारीवृत्तीचे वर्णन मोठ्या अभिमानाने करताना दिसते.बहीण आपल्या भावाच्या शुरतेचे वर्णन करीत आहे.आदिवासीच्या बऱ्याच गीतांतून त्यांच्या पारंपारिक आणि आजच्या जीवनाचे चित्रण आढळते.बोलीभाषेच्या दृष्टीने ही गीते वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

आंधांचे लोकवाङ्मय अनोखे ज्ञानभांडार

संपादन

भारतातील महाराष्ट्र,आंध्रप्रदेश,मध्यप्रदेश व तेलंगणा राज्याच्या डोंगराळ प्रदेशात आंध जमातीचे वास्तव्य महाराष्ट्राच्या मराठवाडा व विदर्भ या प्रदेशिक भागात कडेकपारी डोंगरदर्यात आगदी प्राचीन काळापासून या जमातीची वस्ती आहे.हि शेतकी जमात असून जंगलातील प्राण्याची शिकार करणे या जमातीला आवडते.टोळ्याटोळ्याने राहत असलेल्या वस्तीच्या ठिकाणाला वाडी म्हटले जाते.जंगलातील प्राणी पक्षी यांची शिकार करणे ,लाकडे गोळा करून मोळ्या विकणे,सुकामेवा गोळा करणे,मोह्फुले गोळा करणे,टोया जमा करणे,टेंबर जमा करणे,तेंदूपत्ता जमा करणे,इत्यादी जंगलाने मुक्तपणाने दिलेले आहे.त्यावर त्यांचे पोषण झालेले आहे.आंधाचे जीवन हे जंगलमय असल्याने त्याला निसर्गात बदलाचे,प्राण्यांच्या आवाजाने शुभ व अशुभ सांकेतांचे ज्ञान अनुभावाने झालेले आहेत.त्यानुसार या जमातीचे जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे.हि जमात निसर्गाच्या सान्निध्यात राहत आलेली असल्यामुळे तिचे निसर्गावलंबीत्व आजही दिसते.

आंधाचे लोकवाङ्मय

संपादन

आदिवासी आंध जमातीचे लोकसाहित्य हे अनौपचारिक ज्ञानाचे व सामजनियमनाचे महत्वपूर्ण अंग आहे. लोकवाङ्मयातून लोकांच्या भाव भावना,इच्छा,आकांक्षा,सुखदुख,राग,लोभ याचे सहज उन्नयन होत असते.ती पुढे लोकांच्या जगण्याची रित होते त्याला लोकसंस्कृती असे म्हणतात.लोकसंस्कृतीच्या बाबतीत डॉ.शरद व्यवहारे म्हणतात .लोकसंस्कृतीच्या प्रवाहात अनेक अंतःप्रवाह सहजपणे मिसळलेले आहेत.कृषीवलांची जीवनधारा,भटक्या समुहाची जीवाधारा, पारंपारिक लोक्संस्थांचे जीवनविशेष,ग्रामरचनेतील पारंपारिक व्यावसायिकांची जीवनधारा,मौखिक वाड्मयाचा अंतःप्रवाह त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे लोककला इत्यादी अंतःप्रवाह लोकसंस्कृतीत आपले वेगळेपण ,आपला रंग मिसळून प्रवाहित राहिलेले आहेत.यावरून त्या त्या समाजाची संस्कृती निर्माण होत असते.आदिवासी आंध जमातीचे मौखिक वाड्मय म्हणजेच त्यांच्या संस्कृतीचे महत्वाचे अंग आहे.सणा,उत्सव,आचार विचार,श्रद्धा,धारणा व विधी इत्यादी सगळीकडे मौखिक धारणा रूढ असलेल्या पाहावयास मिळतात.आंध जमात गुढीपाडवा,आखाडी,नागपंचमी,बैलपोळा,दसरा,दिवाळी,सटीनागदिवे संक्रांत,होळी,पित्री आमावस्या इत्यादी प्रमुख सणाबरोबर मुंगसाजी महाराजांचा उत्सव, रामबापू महाराजांची यात्रा,आप्पास्वामी महाराजांची यात्रा, बिरसा मुंडा जयंती,सोमा डोमा आंध जयंती इत्यादी उत्सव साजरे केले जातात.पाचवी पूजन,नाव ठेवणे,नवस करणे,जावळे काढणे,विवाहविधी,अंत्यविधी,पितर पूजन,वृक्षपूजा,प्राणीपूजा,भूमिपुजा,निसर्गपूजा असे मनेक विधी प्राचीन काळापासून आंध जमातीत पार पाडले जात आहेत.यातून आंध जमातीच्या आगळ्यावेगळ्या संस्कृतीचे दर्शन घडते.तसेच बसाजी महाराज,फुलाजी बाबा,राघोजी महाराज यांच्या कार्याचा आणि विचारधारेचा प्रभाव आंधाच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनावर पडत आहे. आदिवासी आंध जमातीची संस्कृती मौखिक वाड्मयाने समृध्द आहे.लोककथा,लोकगीते,लोककथा गीते,लोकनाट्य,विधिनाट्ये,ल्कोनृत्ये,म्हणी,उखाणे,कोडे,वाक्यप्रचार असा विविध प्रकारात विभागलेले आहे.ते पंरपरेने चालत आलेल्या प्राचीन अनुभवाने संचित आहे.या लोकवाङ्मयाने अशिक्षित असलेल्या वाडीतील माणसांंचे मनोरंजन केलेले आहे. ते वर्षनुवर्षेनिसर्गमय जीवन जागणाऱ्या आंध जमातीला ज्ञान आणि प्रबोधन म्हणून उपयोगी ठरलेले आहे.आंध जमातीमध्ये लोककथांचे दालन अशिक्षित व्यक्तींकडे समृध्द आहे.वयस्क व्यक्ती आजही अनेक कथा सांगत असतात उत्पत्ती कथा,राक्षासांच्या कथा,देवांच्या कथा,परीकथा,अदभूत कथा,दंतकथा इत्यादी कथांचे वहन मौखिक पध्दतीने एका पिढीकडून पुढील पिढीकडे परंपरेने होत आलेले आहे.सामुहभाव ,आचारविचाराचे ज्ञान, मानवी जीवनाचा अर्थ,चांगल्या वाईट गोष्टीच्या ज्ञानाचे संचित पुढील पिढीकडे आपचुकपणाने कथेतून हस्तांतरित होते.

लोकगीतांना आंध जमातीच्या जीवनात महत्त्वचे झालेले आहे.स्त्री व पुरुषांची स्वंतत्र लोकगीते आहेत. स्त्रीजीवनात गीतांना खूप महत्व आहे.कारण सासरी आलेली स्त्री आपल्या मनातील सुख,दुःख, प्रेम,शृंगार,हास्यइत्यादी अनेक प्रकारच्या अनेक प्रकारच्या भावना व्यक्त करण्यासाठी लोकगीतांना जवळ केलेले आहे. ओवीगीते,फुगडी गीते,नागपंचमी गीते,शिराळा गीते,जात्यावरची ओवी,स्त्रिया नृत्यासह गातात.तसेच विवाहविधीत दळतांनाचे गीते,नवरदेव परन्या जातानाचे गीते,वीरकार्या वेळीची गीते,देवक्याविषयीची गीते इत्यादी लोकगीतांचे सादरीकरण सणवारानुसार होते.तसेच श्रमगीते ,होळीची गीते,शेतीची कामे करताना गायिली जाणारी लोकगीते पुरुष गातात.संमिश्र भावभावनांचे प्रकटीकरण करण्याचे अत्यंत जवळचे माध्यम लोकगीतांचे आहेत.

आंध जमातीच्या म्हणी,वाक्प्रचार,कोडे व उखाणे म्हणजे त्यांच्या बोलीतील अलंकार आहेत.कारण आंध जमातीच्या बोलीभाषेत म्हणीचे प्राबल्य अधिक आहे.या म्हणीना सामाजिक,सांस्कृतिक,आर्थिक,राजकीय इत्यादी अंगाचे कांगोरे आहेत. उदा.खेकड्याला नाही कान अन आंधाला नाही ग्यान,तुला न मला घाल कुत्र्याला, चाराण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला,घरात नाय दाणा आन बाजीराव म्हणा,पाहणा-याने तरी लाजावे नाय तर हागणा-यानी तरी,आगीतून निघाले अन फुफाट्यात पडले इत्यादी आंध जमातीत वाक् प्रचाराला तर काहीच तोटा नाही.वाक प्रचारातून सरळ सरळ अर्थ व्यक्त होत नसतो. पण ऐकणार्या व्यक्तीला कळतो.उदा.दूर होणे,पोटात कावळे ओरडणे,तोंड काळे करणे,पोट पाडणे माशा मारणे,काडीमोड घेणे,या बोटावरचा थुका त्या बोटावर नेणे,पाणी लागणे,उकंडा उरकणे,पाणी पाजणे,गळ टाकणे मोड पाहणे इत्यादी ज्ञान व आकलन यासाठी कोडे आणि उखाणे यांना खूप महत्व आहे,त्यातून शब्द,अर्थाच्या अंगाने चमत्कृती निर्माण केलेली असते.

आंध आदिवासीची लोककला ही लोकनाट्ये,विधीनाट्ये व लोकनृत्ये या लोककलेच्या प्रकारामध्ये विभागली गेलेली आहेत.दंडार,कलापथक,कहानी लिखित नाटके या लोकनाट्याचे सादरीकरण दिवाळी, दसरा,होळी इत्यादी प्रसंगी होते.विवाहातील विधी,जागरण,बारी,भारुडी,भजन इत्यादी विधीनाट्ये हे तिथी,वार यानुसार होत असतात.तर फुगडी,नागपंचमी,होळी या सणावेळी केले जाणारे नृत्य,विवाहविधीतील नृत्ये,बारीची नृत्ये,गजगुंडी नृत्य,दंडा नृत्ये करून इत्यादी प्रकारची लोकनृत्ये करून आंध जमातीचे लोक समाधानी जीवन जगतात .त्यांची लोककला ही आशायाच्या व सादरीकरणाच्या अंगाने बंदिस्त नाही .ती प्रत्येक नवीन सादरीकरणाच्या वेळी वेगळेपणाचा आनंद प्रेक्षकास देतात.संहिता ही लवचिक व मौखिक स्वरुपाची असते.तिचे संक्रमण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक पद्धतीने झालेले असते.कुलाचार,नवस,जागरण म्हणून सादर होणाऱ्या विधीतून नाट्यात्मकतेचा प्रत्यय येतो.तसेच सांस्कृतिक व सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब आंधाच्या लोकवाडमयातून प्रकट होते.बदलत्या काळात बिरसा मुंडा जयंती,सोमा डोमा आंध जयंती,जय बिरसा,माहिती तंत्रज्ञान,शिक्षण,संस्कृती,आरक्षण अशा अनेक प्रकारचे बदल लोकांच्या साहित्यातून पाझरतात म्हणजेच लोककला,म्हणी,उखाणे,वाकप्रचार,कोडे,गीते,कथा,विधी,इत्यादी अनेक अंगाने हे बदल स्वीकारतात व लोकवाङ्मय म्हणून पुढील पिढीसाठी अनुभवाचे समृध्द होतात.

आज आंध जमातीचे लोकवाङ्मय लोप पावत चालेले आहे.तसेच प्रयोगाच्या रूपाने सादर होणाऱ्या लोककलेत बदल होत आहेत. काही बदलामुळे हे सकारात्मक आहेत तर काही बदलामुळे आंध जमातीच्या प्राचीन संस्कृतीला तडा जात आहे.जसे लोककलांच्या सादरीकरणात लाउडस्पीकर,पडदे,स्टेज स्वरूपाचा रंगमंच व आशायानुरूप पात्रांचे पोशाख याला महत्व येत आहे.रंगमंचावर सादर होणाऱ्या संवादामध्ये मराठी,हिंदी,इग्रजी,भाषेचा प्रभाव पडत आहे.पौराणिक कथांबरोबर सामजिक,राजकीय,शिकणिक विषयांचा समावेश होत आहे. लिखित नाटके वर्तमानकाळातील समस्यांचा वेध घेऊन भाष्य करीत आहेत.त्यामध्ये आधुनिक मराठी व हिंदी चित्रपटाच्या गीतावर रेकॉर्ड नृत्ये सादर केली जात आहेत.माहिती तंत्रज्ञानाच्या साद्नांचा प्रभाव पडत आहे.त्यामुळे मनोरंजन आपल्या खिशात ही भूमिका रूढ होत आहे. पूर्वी प्रत्येक वाडीत लोककलेचे संच असत पण त्यांचे प्रमाण आज कमी झाले आहे.आज मोजक्या वाड्यापाड्यात हे संच पाहावयास मिळतात.पण एक मात्र खरे की,आजही सादर होणाऱ्या लोककला आंध जमातीच्या वाडीत रात्रभर चालतात.लहान-थोर,स्त्री-पुरुष यांना उदंड प्रतिसाद मिळतो.यावरून ही कला प्राचीन असली तरी लवचिक आहे.परंपरागत आशयाचे सादरीकरण करताना काळानुरूप बदल स्वीकारणारी आहे.लोककला वर्तमानकाळात टिकून असण्यामागे लोकाश्रयच कारणीभूत आहे.त्या लोककलांचे संवर्धन व लोककलाकारांना मान सन्मान देऊन प्रोत्साहन समाजाकडून मिळणे अपेक्षित आहे.तेव्हाच ती लोककलांचे संवर्धन होऊन पुढच्या पिढीपर्यंत टिकून राहील.

आंध समाज ही प्राचीन आदिवासी जमात आहे.या जमातीमध्ये प्राचीन काळापासून लोकवाङ्मय प्रकारचे अस्तित्व आहे.त्यांची आंधी बोली लोप पावलेली असली तरी तिचे शब्द आंध जमातीच्या वाडीतील वयस्कर माणसांच्या बोलीत आढळतात.त्यातून त्यांचे वेगळेपण सिद्ध होण्यास मदत होते.तसेच त्यांचे लोकनाट्ये,विधिनाट्ये,लोकनृत्ये,लोककथा,लोकगीते,म्हणी,वाक्प्रचार,उखाणे,वाद्ये,संगीत यांचे असलेले आस्तित्व अगदी अनोख्या स्वरूपाचे आहे.या लोकवाङ्मयाने प्राचीन काळापासून कित्येक पिढ्यांचे रंजन व प्रबोधन केलेले आहे.यातून खऱ्या अर्थाने त्यांची संस्कृती तयार झालेली आहे.पुढे तेच संस्कृतीचे मानदंड ठरलेले आहेत.आंध सामातींची विवाहविधीतील गीते,बारीगीते,शिराळाचे गीते,नागपंचमीचे गीते.दंडार,कलापथक,कहाणी,जागरण नाट्यातील गीते,संवाद,भाषा इत्यादीच्या माध्यमातून त्यांची संस्कृती पाझरत आहे.काळाच्या ओघात आंध बोली लोप पावलेली आहे.तसेच त्यांचे लोकवाङ्मय नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.त्या अनोख्या ज्ञान भांडाराचे जतन जिज्ञासू,अभ्यासू,सशोधनकांकडून होणे अत्यंत आवश्यक आहे.लोकसाहित्याचा अभ्यास प्रा.डॉ राजेश धनजकर ,डॉ.रा.गो.चवरे यांनी केलेला आहे.तसेच प्रा.माधव सरकुंडे.विश्वनाथ धुमाळे यांनी आंध जमातीच्या विविधांगीपणावर प्रकाश टाकलेला आहे.पण आजही या जमातीच्या लोकवाङ्मयाचा ऐतिहासिक,सामाजिक,सांस्कृतिक,वाड्मयीक,भाषा विज्ञानाच्या विविध प्रकाराच्या अंगाने अभ्यास होणे,अत्यंत आवश्यक आहे.असे मला वाटते.तो पुढील काळात जिज्ञासु,अभ्यासू व संशोधकांकडून झाला तरच ख-या अर्थाने आंध जमातीचे हे ज्ञानभांडार पुढे कित्येक वर्षे टिकून राहिल यांत शंका नाही.


==== संदर्भग्रंथ;- ====‌ १.डॉ.शरद व्यवहारे,लोकवाङ्मय उदगम आणि विकास,विश्वभारती प्रकाशन नागपूर,१९८७. २.डॉ.राजेश धनजकर,मराठवाड्यातील आंध जमातीचे लोकसाहित्य,अनुराधा पब्लिकेशन,नांदेड २०१३. ३.दुर्गा भागवत,लोकसाहित्याची रूपरेषा,वरदा बुक्स,मुंबई १९७२. ४‌.विश्वनाथ धुमाळे,आंध आदिवासी जमात;इतिहास व सांस्कृतिक वारसा,सुपर्ण प्रकाशन,पुणे,२०१६.

= आदिवासी जाती-उत्पती,संघर्ष व वाटचाल

संपादन

विध्वंसनामुळे पाम्पेईच्या अवशेषाचा इतिहास,सिंधू घाटीची सभ्यता व हडप्पा संस्कृती आणि मोहेंदोजारोच्या अवशेषांचे काय झाले हे आपणास माहित आहेच.डायनासोर सारखा प्रचंड प्राणी धा कोटी वर्षे पृथ्वीवर जगुनही नामशेष झाला,नालंदा विश्वविद्यालयातील तर्कशास्त्र ताम्रपट सहा महिने जळाले.जळून खाक झाले.थॉमस एडिसन यांची न्यूजर्शी मधील प्रयोगशाळा आगीत सापडून क्षणात भस्म झाली.अमेरिकेतील पेंटागॉन इमारत आतंकी हल्यात चुटकीसरशी जमीनदोस्त झाली.अशा कितीतरी अनंत घटना नैसर्गिक प्रलयाच्या चक्रव्युहात नष्ट झाल्या.काही घटना वंशवर्चेस्ववादामुळे वंशद्वेष ठेवून जाणीवपूर्वक बरबाद केल्या. नवीन पेज नंतर येणार आहे