मी मराठी विषयाची प्राध्यापिका आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मी अध्यापनाचे कार्य करीत आहे. साहित्यशास्त्र आणि समीक्षा हे माझे विशेष आवडीचे विषय आहेत. मी मुंबई विद्यापीठाची मराठी विषयातून द्विपदवीधर आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची पत्रकारिता पदवीदेखील मी प्राप्त केली आहे. तसेच राज्य पात्रता परीक्षा, राष्ट्रीय पात्रता परीक्षा मी उत्तीर्ण असून ज्युनिअर रिसर्च फेलोशिपही मी प्राप्त केली आहे. मी कथा आणि कवितादेखील लिहिते. कथालेखन आणि काव्यलेखन यासाठी मला अनेक जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मी निमंत्रित कवयित्री म्हणून सहभागी झाले होते. याखेरीज महाराष्ट्र साहित्य परिषदेचे दापोली येथे झालेले विभागीय साहित्य संमेलन, पुणे येथे झालेले ८वे प्रबोधन साहित्य संमेलन, ठाणे येथे झालेले राज्यस्तरीय प्रतिभासंगम साहित्य संमेलन, रत्नागिरी येथे झालेले महाराष्ट्र नाट्य परिषदेचे युवा संमेलन यांमध्ये माझा निमंत्रित कवी म्हणून सहभाग होता. मला नवनवीन ठिकाणांना भेटी देणे आवडते. आजपर्यत मी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाना, ओडिशा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आदी राज्यांना भेटी दिल्या आहेत. अशा विविध ठिकाणच्या आठवणी छायाचित्राच्या रूपाने जपून ठेवणे मला फार आवडते. तंत्रज्ञानापेक्षा मी पुस्तकामध्ये अधिक रमते.