राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित.
कै. एम.ए. रायभोगे गुरुजी.
मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,
माकणी (थोर) ता. निलंगा जि. लातूर.
✍ ❝ माकणी येथे मुख्याध्यापक पदी सर्वोत्कृष्ट व सर्वाधिक काळ कार्य केलेले शैक्षणिक कार्याकरीता भारताचे राष्ट्रपती यांचे हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक आदरणीय कै. रायभोगे गुरुजी यांच्या कार्याची थोडक्यात ओळख. ❞
✍ ❝ माकणी हे गांव प्राचिन काळापासून हनुमान मंदिरासाठी प्रसिध्द असून या गावाच्या जडणघडणीत किंबहुना माकणी गावची ओळखच ज्या थोर व्यक्तीमत्वांमुळे होते. त्यापैकी एक थोर व्यक्तीमत्व म्हणजे माकणी गावातील प्रत्येकांचे आदरणीय रायभोगे गुरुजी. ❞
✍ ❝ दिनांक 12.02.1940 रोजी मौजे वानवडा ता. औसा जि. लातूर येथे श्रीमान रायभोगे गुरुजी यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण वानवडा या गावी झाले. माध्यमिक शिक्षण औसा येथील सरकारी शाळेतून घेतले. मार्च 1958 मध्ये ते बारावी उत्तीर्ण झाले. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे व गरीबीमुळे त्यांना उच्च शिक्षण घेता आले नाही. सन 1962 मध्ये त्यांनी उदगीर येथून Senior Primary Teacher Course हा शैक्षणिक क्षेत्रातील दोन वर्षाचा कोर्स केला. ❞
✍ ❝ त्यानंतर तत्कालिन उस्मानाबाद जिल्हयातील म्हणजेच आज रोजी लातूर जिल्हयातील कोराळीवाडी ता. निलंगा येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. या गावातील बहुतांश समाज बेरड जमातीचा व तेलगु भाषा बोलणारा होता. या गांवी गुरुजींनी त्यांच्या प्रयत्नातून निधी जमा करुन एक शाळेच्या वर्गखोलीचे बांधकाम केले. ❞
✍ ❝ कोराळीवाडी येथून गुरुजींची कासारसिरसी येथील केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये बदली झाली. तेथे त्यांनी शिक्षणासोबतच गरीब विद्यार्थ्यांसाठी वाचनालय सुरु केले. लोकसहभागातून देणगी स्वरुपात निधी जमा करुन 300 पुस्तकांची खरेदी केली व गरीब विद्यार्थ्यांना त्याचे वाटप केले. त्यांनी आयोजित केलेल्या खादी प्रदर्शनास प्रथम पारितोषक मिळाले. श्री. बाबुराव चिंचणसुरे यांचे हस्ते त्यासाठी त्यांना गौरवित करण्यात आले. ❞
✍ ❝ त्यानंतर माकणी येथील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून त्यांची बदली झाली. येथुनच माकणीच्या शिक्षण विषयक विकासाची पायाभरणी झाली. माकणी गांवचा भौगोलिक विचार करता, शिक्षणाची कुठलीही शैक्षणिक व आर्थिक सुबत्तेची पार्श्वभूमी माकणी गावाला नव्हती. त्यामुळे आर्थिक परिस्थितीशी झगडणाऱ्या प्रत्येक कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावून प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याठी सुरुवातीस गुरुजींनी खुप परिश्रम घेतले. शहरी भागात असलेल्या शिक्षणाच्या संकल्पना त्यांनी स्वत:ला आर्थिक झळ पोहोचवून ग्रामीण भागात असलेल्या माकणी गावाला ओळख करुन दिल्या. शैक्षणिक साहित्य घेण्याची सक्षमता नसताना ते स्वत: विद्यार्थ्यांना ते पुरवून शिक्षण दिले. ❞
✍ ❝ गणित हा गुरुजींचा आवडता विषय. गणित शिकविण्याचा गुरुजींचा हातखंडा अतिशय सुलभ व अनोखा होता. अतिशय सोप्या पध्दतीने व सहजपणे गणित शिकविणे ही त्यांची हातोटी होती. तसेच सकाळच्या वेळी राष्ट्रगीत ज्या भक्तीभावाने म्हणले जायचे, त्याच भक्तीभावाने 30 पर्यंतचे पाढे विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेत. त्याचसोबत सुविचार, म्हणी, वाक्प्रचार हा सर्व परिपाठ दररोज घेतला जात असे. सहज व सुलभ शिकविण्याच्या पध्दतीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये गोडी लागली. त्यांच्या प्रयत्नाने हायस्कुल स्कॉलरशिप, मिडलस्कुल स्कॉलरशिप, शासकीय विद्यानिकेत तसेच त्यांचेकडून शिक्षण घेतलेले विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयास निवड झाली. त्यामुळे माकणी गावात त्यांनी सुरु केलेला हा शिक्षणाचा यज्ञ जवळपास 25 ते 27 वर्षे अखंडपणे सुरु राहीला. त्यामुळे तालुका स्तरावर माकणी हे गांव सरासरीने सर्वाधिक नोकरदार वर्गाचे राहीले. यामध्ये सगळयात मोठा वाटा हा शिक्षकांचा आहे. ❞
✍ ❝ त्यांच्याकरीता शिक्षण देणे हे केवळ शाळेच्या वेळेतच दयावे असे बंधन नव्हते. त्यांचे घर सुध्दा एक शाळाच होती. रात्री उशीरापर्यंत अभ्यास करणारे विद्यार्थी, सकाळी लवकर उठुन अभ्यास करणारे विद्यार्थी आणि सुटीच्या दिवशीसुध्दा अभ्यास करणारे विद्यार्थी असे अनेक विद्यार्थी गुरुजींच्या घरी अभ्यास करत. परंतु या सर्व गोष्टींचा कसलाही त्रास करुन न घेता उलट गुरुजींच्या या कार्यात मोलाची साथ रायभोगे काकुंनी सुध्दा समर्थपणे दिली. ❞
✍ ❝ सुरुवातीपासूनच सामाजिक बांधीलकीची जाणीव आणि राष्ट्रीय अखंडतेत रुचि ठेऊन त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत भरीव काम केले. गावात त्यांनी प्रौढ शिक्षणाची सुरुवात केली. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद अध्यक्ष व शिक्षणाधिकारी उस्मानाबाद यांचे उपस्थितीत ग्राम गौरव सोहळा आयोजित केला. स्थानिक लोकवर्गणीतून परीक्षांची तयारी करुन घेतली. रात्रीचे वर्ग घेऊन मुलांना शिक्षण दिले त्यासोबतच त्यांनी वृक्ष लागवडीस प्राधान्य दिले. त्यावेळी सामाजिक कुटुंब नियोजनाचे 100 टक्के सरकारी उद्दीष्ट पूर्ण केले. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, इत्यादीसाठी कामे केली. ❞
✍ ❝ त्यांच्या प्रयत्नातून शाळेने गुणात्मक व परिणामात्मक उन्नती केल्यामुळे पंचायत समिती निलंगा यांचेकडून त्यांना सन 1975 साली तालुका स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ❞
✍ ❝ विद्यार्थ्यांचे नियमित शारीरीक व्यायाम, राष्ट्रीय महापुरुषांची जयंती/पुण्यतिथी दैनंदिन वर्तमानपत्रातील बातमी वाचन, नाटक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले. विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून विकास व्हावा या हेतूने त्यांनी ‘विज्ञान वास्तु भांडार’ चे आयोजन केले. त्यांच्या या शैक्षणिक कामाची दखल घेऊन सन 1985 मध्ये त्यांना जिल्हा स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवित करण्यात आले. ❞
✍ ❝ ‘प्राथमिक शिक्षण म्हणजे शिक्षणाचा पाया’ या संकल्पनेवर आधारीत बालकांच्या मनावर प्रथमत: केले जाणारे संस्कार हे अखंड देशाचे संस्कार समजून बालमनाच्या जडणघडणीवर विशेष लक्ष दिले. श्रीमान रायभोगे गुरुजींनी अशा अनेक संस्कारीत पिढया घडविल्या. गुरुजींनी अनेक वर्ष माकणी येथे सेवा केल्याने गुरुजी माकणीच्या सहजीवनाचे अविभाज्य घटक झाले. ‘माकणीसाठी शिक्षण म्हणजेच रायभोगे गुरुजी’ असे समीकरण बनले. ते केवळ एक शिक्षक म्हणून मर्यादित नव्हते तर ते उत्तम नागरिक, समाजातील आदर्श व नितीवंत व्यक्तीमत्व आणि निर्वेसनी होते. त्यांनी जीवन जगताना कधीच राग, लोभ, असुया आणि भेदभाव पाळला नाही. हा आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला. त्यामुळे माकणीतील प्रत्येकजणांना त्यांचा अतिशय आदर आहे. ❞
✍ ❝ शिक्षणासोबतच त्यांना किर्तन, प्रवचनाची आवड होती. मृदु व सौम्य भाषेत ते खूप सुंदर भाषण करीत. त्यांची फार मोठी अभ्यासाची बैठक होती, त्यांच्या वाचनाचा अफाट आवाका होता त्यामुळे त्यांचे भाषा व ज्ञानावर प्रभुत्व होते. आदरणीय गुरुजींचे हस्ताक्षर त्यांच्या जीवनाचा अलंकार होता, त्यांचे मोत्यासारखे हस्ताक्षर होते. त्याच अक्षरवळणात त्यांनी विद्यार्थी घडविले. त्यामुळेच माकणीतील अनेक शैक्षणित पिढयांमधील विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुंदरच आहे. त्यांनी विद्यार्थांना दिलेला हा ठेवा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा अनमोल ठेवा ठरला. त्यांनी घडविलेल्या विद्यार्थ्यांना पुढे अनेक क्षेत्रात संधी मिळाली. ❞
✍ ❝ श्रीमान रायभोगे गुरुजी यांच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. त्यांना सन 1988 मध्ये राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारताचे राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. असे शिक्षक माकणी (थोर) या गावास लाभले ते माकणी गावचे भाग्यच. गुरुजींच्या रुपाने माकणीची जिल्हा परिषद शाळा सुध्दा राष्ट्रीय स्तरावर पोहोचली. ❞
✍ ❝ आदरणीय रायभोगे गुरुजी हे गरीबी व कष्टाच्या परिस्थितीतून आल्याने शिक्षणाचे महत्व त्यांनी वेळीच ओळखले होते. समाजाबरोबरच त्यांनी कुटुंब घडविले. त्यांचे जेष्ठ सुपुत्र डॉ. चंद्रकांत रायभोगे हे एम. डी. मेडीसीन असून लातूर येथे वैद्यकीय क्षेत्रात नामांकीत आहेत. त्यांचे द्वितीय सुपुत्र संजय रायभोगे हे शिक्षक आहेत आणि त्यांचे कनिष्ठ सुपुत्र प्रकाश रायभोगे हे स्थापत्य अभियंता आहेत. ❞
✍ ❝ रायभोगे गुरुजीचे यांचे दिनांक 17 मार्च 2001 रोजी निधन झाले. एक महान व्यक्तीमत्व हरपलं. अशा थोर माणसांच्या स्मृती जपणं, त्यांच्या कार्याची ओळख पुढील पिढीला करुन देणे व त्यातून शिक्षकांना नितीमत्तेचा पाठ व विद्यार्थ्यांना आदर्शाचा पाठ उलगडुन दाखविण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. आदरणीय रायभोगे गुरुजी आमच्या सर्वांसाठी चिरंतन वंदनीय आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यावर टाकलेला हा छोटासा दृष्टीक्षेप. ❞
संकलन व शब्दांकन : माधव सूर्यवंशी.
विशेष आभार : डॉ. चंद्रकांत रायभोगे, डॉ. भगवान माकणीकर.