नमस्कार. मराठी नियतकालिके - नियतकालिक म्हणजे ठराविक कालाच्या अंतराने उपलब्ध केले जाणारे वाङ्मय. त्यात तात्कालिक महत्वाचे तपशील असतात, तसेच काही चिरस्थायी महत्त्वाचे विषयही आलेले असतात. इंग्रजांच्या आगमनामुळे नियतकालिकांचे हे वेगळे वाङ्मयीन रूप आपल्या समाजाला परिचित झाले, तसेच ह्या नियतकालिकांच्या प्रकाशनासाठी आवश्यक अशी मुद्रणकलाही आली. इंग्रजी राजवटीच्या आरंभकालीच सार्वजनिक शिक्षणखात्याबरोबर लोकशिक्षणाचे एक साधन म्हणून वृत्तपत्रांचा अवतार झाला. दर्पण, दिग्दर्शन, प्रभाकर, ज्ञानप्रसारक, ज्ञानप्रकाश ही केवळ वृत्तपत्रे नव्हती, तर ज्ञानपत्रे होती. स्वदेशीय लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा आणि या देशाची समृद्धी व येथील लोकांचे कल्याण यांविषयी स्वतंत्रतेने व उघडरीतीने विचार करावयास स्थल व्हावे, या उद्द्शाने मराठीतले पहिले वृत्तपत्र दर्पण निघाले. (संपादक – बाळशास्त्री जांभेकर, प्रारंभवर्ष - ....१८३२.....) चालत्या काळाची वर्तमाने कळविणे आणि योग्यतेस येण्याचे मार्ग दाखविणे यांबरोबर शुद्ध मनोरंजन करणे, हेही दर्पणचे हेतू होते. दर्पण ते निबंधमाला – म्हणजे १८३२ ते १८८१ हे अर्धशतक – म्हणजे, मराठी नियतकालिकांच्या इतिहासाचे आदिपर्व होय. ज्ञानसंग्रह, ज्ञानप्रसार, लोकसुधारणा, स्वधर्मसंरक्षण, स्वदेशाभिमान आणि स्वभाषाभिमान या हेतूंनी हे आदिपर्व सिध्द आणि समृध्द झाले आहे. यांतूनच पुढील केसरी, सुधारक आणि करमणूक ही त्रयी तीन मार्गांनी कार्यरत झालेली दिसून येते. केसरीने राजकीय स्वातंत्र्याच्या दिशेने आपली पावले टाकली, तर सुधारकाने समाजसुधारणेचा रस्ता धरला. आणि करमणूकने मनोरंजनाच्या अनुपानातून मानवाना देवत्वापर्यंत नेणाऱ्या विदग्ध वाङ्मयाला जन्म दिला. राजकारण, समाजकारण आणि वाङ्मयकारण या तीन दिशांनी, अनेक अंगांनी पुढे मराठी नियतकालिकसृष्टी विस्तारली, बहरली. पुस्तकरूपांत प्रकाशित झालेलं अक्षर साहित्य आधी नियतकालिकांतून क्रमशः प्रसिद्ध झाल्याची अनेक उदाहरणे सांगती येतील. उदा. – दुर्गा भागवत यांचे व्यासपर्व आणि पैस, इरावती कर्वे यांचे परिपूर्ती, भोवरा आण गंगाजळ, केशवराव भोळे यांचे अंतरा, चित्रकार व समीक्षक द. ग. गोडसे यांचे पोत, शक्तिसौष्ठव आणि गतिमानी, आनंद साधले यांचा हा जय नावाचा इतिहास आहे इ. इ. बहुतेक सारे लेखक, कवी, कथाकार, निबंधकार, समीक्षक, साहित्य-संशोधक हे नियतकालिकांतूनच पुढे आलेले आहेत. व्यक्तिचित्रे, मुलाखती, प्रवासवर्णने, कलासमीक्षणे, ललितगद्य इ. साहित्यप्रकारांनी नियतकालिके सजून गेलेली असतात. नियतकालिकांचे आपल्या जीवनातले स्थान फार महत्त्वाचे आहे. दैनिके, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, वार्षिके आपणांस समाजाचे, मानवी संस्कृतीचे चौफेर चित्र दाखवत असतात. सत्यकथा, प्रतिष्ठान, युगवाणी ही कथा, कवितादी ललित साहित्य प्रकाशित करणारी मासिके, ललित हे समीक्षा आणि साहित्य-व्यवहाराला वाहिलेले मासिक, समाजप्रबोधन, नवभारत, साधना ही जीनवाची मूल्यमीमांसा करू पाहणारी मासिके, लोकप्रभा, साप्ताहिक सकाळ ही राजकारण, समाजकारण, कला-संस्कृती अशा सर्वच विषयांना स्पर्श करणारी साप्ताहिके ... अशी अनेक उदा. देता येतील.

मराठी नियतकालिकांची सूची .... (कालखंड --) – नियतकालिकांनी आपल्या वाचकांना व अभ्यासकांना कोणते वैचारिक, वाङ्मयीन व सांकृतिक धन दिले, याची विषयवार सूची उपलब्ध करून दिली आहे. या अवाढव्य व अमूल्य सूचीच्या आधारे एकेका विषयावर अनेक ग्रंथ सिध्द होऊ शकतील. वृत्तपत्रे वगळली तर अन्य नियतकालिके अल्पजीवी ठरतात. आर्थिक नुकसान एका मर्यादेपलीकडे गेल्याने नाईलाजाने ही प्रकाशने बंद करावी लागतात, ही वस्तुस्थिती आहे. पण मासिके बंद पडतात म्हणून नवी मासिके निघण्याचे कधीही थांबलेले नाही. नियतकालिके जन्मतात, आपले नियत-कार्य यथाशक्ती, यथामती पार पाडतात आणि बंदही पडतात, पण वाङ्मयीन / सांस्कृतिक प्रवाह अखंडपणे चालतच राहतो. साहित्य, कला आणि विज्ञान यासंबंधी प्रेम व जिज्ञासा असणे ही मानवाची मोठी गरज आहे, त्या दृष्टीने विविध विषयांस वाहिलेली नियतकालिके भरपूर प्रमाणात उपलब्ध होणे आणि त्यांतून मानवी संस्कृतीचे जतन व संवर्धन होणे, अगत्याचे आहे.

/धूळपाटी