- मातीतील स्वप्ने*
स्वप्नाशिवाय माणूस जीवंत राहू शकत नाही. स्वप्न नाहीत तो माणूस कसला? नुसत्या अन्नावर माणूस जीवंत राहू शकेल पण जगू शकणार नाही. माणूस स्वप्नांवरच जगत असतो. ज्यांची स्वप्ने संपली त्यांचा शेवट निकट आहे असे समजावे. वि. स. खांडेकर म्हणाले होते, माणूस फक्त दोन गोष्टींवर जगतो. एक भाकरी आणि दुसरे स्वप्न! स्वप्ने प्रत्येकाला असतात. लहान-थोर, गरिब-श्रीमंत, स्त्री - पुरूष, काळा-गोरा कोणीही असो ज्याला त्याला आपापली स्वप्ने असतात. रस्त्यावर भीक मागणार्या असहाय्य भिकार्याला जशी स्वप्ने असतात तसे अब्जो रूपयांची संपत्ती असणाऱ्या व्यक्तीलाही आपली स्वप्ने असतात. चांगल्या पगाराची नोकरी असणाऱ्याला स्वप्ने असतात तशी नोकरीच्या शोधात फिरणार्या बेकारालाही स्वप्ने असतात. नुकत्याच शाळेत जाऊ लागलेल्या लहानग्याला स्वप्ने असतात तशी थरथरत्या हाताने काठी सावरत शंभराव्या वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या वृद्धाचेही स्वप्ने असतात. स्वप्ने पाहणे हे माणूसपणाचे लक्षण आहे. माणूस म्हणून जीवंत असल्याचे ते लक्षण आहे. कोणाची स्वप्ने लहान असतील कोणाची स्वप्ने मोठी असतील. कोणाची स्वप्ने साकार होत असतील कोणाची स्वप्ने साकार होत नसतील. पण स्वप्ने सर्वांनाच असतात. मग या स्वप्नांपासून जगाचा पोशिंदा असणारा आणि रात्रंदिवस मातीत राबणारा शेतकरी राजा तरी कसा दूर असेल...? ज्याच्या कष्टात जगाची भूक भागवण्याची ताकद आहे, जो एका दाण्यापासून हजार दाणे करण्याच्या मातीच्या सृजनसोहळ्याचा साक्षीदार आहे, जो निसर्गाचा आणि जागतिकीकरणाचा एकमेव बळी ठरलेला दोघांमधला दुवा आहे अशा शेतकरी राजाचीही स्वप्ने असतात. काय स्वप्न असते शेतकरी राजाचे..? तर वेळेवर पुरेसा पाऊस पडावा, शेत हिरव्यागार पिकांनी बहरून यावं, बहरलेल्या पिकाची व्यवस्थित रास व्हावी, रास होऊन हाती आलेल्या धान्याला योग्य भाव मिळावा आणि हातात पडलेल्या मालाच्या पट्टीतून पोरांच्या शिक्षणाची सोय व्हावी, लेकीबाळींचे लग्न व्हावे... बस्स..! इतकी साधीसुधी स्वप्नेही पूर्ण होत नाहीत..! निसर्ग साथ देत नाही आणि व्यवस्था तगून राहण्याची संधी देत नाही. शेतीचे आधुनिकीकरण, यांत्रिकीकरण अजून सर्वत्र झाले नाही. सिंचनाची पुरेशी सुविधा नाही. धान्याला हमीभाव नाही. म्हणजे निसर्गाने शेतकर्याची साथ सोडली तर त्याला सरकार अथवा व्यवस्था कोणीही वाली नाही. निसर्ग कोपला की शेतकऱ्याचे मरण ठरलेले. मग शेतकर्याने तुरीचे औषध घेतले किंवा हातात दोरी घेऊन एखादे झाड जवळ केले तर त्यात नवल ते काय! अशा उध्वस्त आयुष्यात खस्ता खात खात परिस्थितीशी दोन हात करत लढणारे जिगरबाज शेतकरी स्वप्ने पाहण्यात कमी नसतात. दुष्काळातल्या उजाड माळरानावर हिरवी स्वप्ने पाहणारे शेतकरी अजून आहेत म्हणून शेती टिकून आहे. आणि शेती टिकून आहे म्हणून आपण जीवंत आहोत. काळ्या मातीतील सर्वच स्वप्ने सत्यात उतरतातच असे नाही. पण शेतकरी राजा स्वप्ने पाहायचे सोडत नाही. कारण निसर्गाने मारले, व्यवस्थेने गाडले तरी शेतकरी जीवंत असतो तो फक्त स्वप्नांवर..! मी माझ्या कवितेतही या शेतकरी राजाचे एक स्वप्न पाहतो. हे स्वप्न लवकरात लवकर सत्यात येवो हीच अपेक्षा...
- स्वप्न*
बैलगाडीऐवजी बाप मर्सिडीज बेंझमधून शेताकडे येतो आहे एसी गोव्यातील बैलांना पाणी पाजून ट्रॅक्टरने नांगर मारतो आहे 'ऊसाला पाणी दे' असा एसएमएस गड्याला करून मोबाईलवरून 'भाकर घेऊन ये' असं आईला सांगतो आहे आणि बासमती तांदळाच्या भातावर ताव मारून डिनरसाठी रेस्टॉरंट गाठतो आहे सालं नको म्हणलं तरी वारंवार मला हेच स्वप्न का पडत आहे...?? -बालाजी मदन इंगळे 9881 823 833.