• ग्रामीण लोकजीवनाचा दस्तऐवज : सांगावा*
                                    ✍️ गौतम कांबळे. 

___________________________________

        सचिन वसंत पाटील यांचा 'सांगावा' कथासंग्रह वाचला. पहिलीच कथा 'भूल' जीवाला भूलवून गेली. समाजात अशा काही गोष्टी आहेत की त्या एखाद्याला जीवनातून उठवून टाकतात. चर्चा करताना आपण कुणासमोर काय बोलतोय याचं भान नसलेली मंडळी परिणामाची पर्वाच करत नाहीत हे वास्तव या कथेत अधोरेखित झालंय. 
       एखाद्या आजारी माणसाला बिस्कीटचा पुडा घेऊन बघायला जायचं आणि त्या आजारानं कोण कसा मेला याचं रसभरीत वर्णन त्याच माणसासमोर चघळत बसायचं. त्या व्यक्तीला आपण आधार द्यायला आलोय की त्याला सरणाकडची वाट दाखवायला आलोय याचं तारतम्य तरी बाळगायला नको का? आधीच संकटात असलेल्या माणसाला अपयशाच्या कथा ऐकवून त्याला नाउमेद कसं केलं जातं याचा एक धडा म्हणून या कथेकडे बघावं असं लेखन लेखकानं केलं आहे. 
         जीवनानुभव सांगणारं लेखन प्रत्येकाला आपल्यासाठीच लिहिलं आहे असं वाटणं हीच लेखकाची ताकद आहे हे सचिन पाटील यांनी 'भूल' या कथेतून दाखवून दिलं आहे.
        काळीज पिळवटून टाकणारी 'काळीज' कथा. जमिनीची किंमत काय असते ती शेतमजूराला विचारावी, वडिलार्जीत आयते शेत मिळालेल्या शेतकऱ्याच्या ऐतखाऊ मुलाला नव्हे. बापाच्या जीवावर लाडाने पोसलेला जीव वेगळा विचार नाही करु शकत. त्यातही चंगळवादी जगण्याची सवय लागलेली माणसं घरचं विकून आपली हौस मौज भागवून घेतात. 'सेझ'च काय कोणतंही निमित्त पुढं करून हातातली शेती विकून घरं बांधून गाड्या उडवणारी माणसं या कथेनं डोळ्यासमोर आली. शेत ही घराण्याची इभ्रत असते. त्यात तालेवारपणा असतो, हे चार बुकं शिकून अर्धवट शहाणे झालेल्यांना कोण सांगणार. अडाणी म्हणावं तर हातात डिग्रीचा कागद असतो. शहाणं म्हणावं तर शहाणपणाचा लवलेशही नसतो. हा अर्धवटपणा तरुण पिढीला आजच्या घडीला घातक ठरत आहे. एवढा अर्थ मात्र या कथेनं दिला. सांधा बघूनच घाव घातला तर इप्सित साध्य होतं. तोच घाव सेझ घालतो. हेच सत्य आहे असं मला वाटतं.
          या कथासंग्रहातली 'मरणकळा' ही हृदयाला भिडणारी कथा. भयानक सत्य. बहुतांश गरीबीतून,  हाल अपेष्टातून काहीतरी साध्य केलेल्या माणसाच्या जीवनात चार पैशाची नोकरी मिळूनही समाधान न मिळण्याची अवस्था. दारिद्र्यात दिवस काढत असतांना ज्याला कुत्रंही विचारत नाही. अशी माणसं जीवनात यशस्वी होण्याच्या टप्प्यावर असताना कुणीतरी आपली मुलगी त्याला देऊन त्याच्यावर फार मोठे उपकार करतो. आपल्यापेक्षा ऐपतदार घरातील मुलगी बायको म्हणून मिळाली म्हणून आनंदी व्हावं की आपल्या गरीबीलाच कैद करून त्यात जगणाऱ्यांना आसुडाने फोडावं याचं न उलघडणारं कोडं सचिन पाटील यांनी  टाकलं आहे. या कोड्याचं उत्तर कसं शोधायचं? ती ताकद तर लग्नाच्या दिवशी आपणच संपवून टाकली असं म्हणावं की परिस्थितीपुढं मान टाकली म्हणावं. सगळे प्रश्न मनात काहूर माजवून टाकतात. समाजात असे अनेक वाघमारे सर आहेत, पण झाकलेली मूठ उघडणं कठीण आहे. भले त्या मुठीत आपल्या जीवाभावाची, रक्तामांसाची माणसं गुदमरून मेली तरी. धन्यवाद सचिनजी. हतबल माणसाच्या जगण्यातलं विदारक सत्य कथेतून व्यक्त केल्याबद्दल.
          खेड्यातलं शेतकरी जीवन मी शहरात राहात असतानाही 'सय' कथा वाचताना हुबेहूब डोळ्यासमोर येतं. मी लहानपणी पाहिलेली सुगीची लगबग कशी असायची हे सारं आठवतं.  रावबाचा घरापासून शेतापर्यंतचा प्रवास ओढ लावत जातो. मागून येणारा सतू गायब झाल्यानंतर मात्र ओळीगणिक उत्कंठा व थरकाप वाढू लागतो. रावबाबरोबरच वाचकांच्याही जीवाची घालमेल वाढवण्यात लेखकाला पुरेपूर यश आलं आहे. हे स्वप्न असल्याचे वाचल्यावर मात्र उसासा टाकावा वाटते. पण रावबा कुठं झोपला होता ते या कथेत सांगितलं नाही. रानात खोपेत झोपला असता तर पहाटेच्या वेळी थंडी जाणवू लागते. त्या थंडीत गाढ झोपेत चित्रविचित्र स्वप्ने पडू लागतात. भयप्रद स्वप्न असलं की त्याला दडपा म्हणतात. त्यात माणसं ओरडतही उठतात. तशा थंडीतही रावबाला घाम कसा फुटला? आणि पहाटे पडलेली स्वप्ने खरी ठरतात या भितीनं रावबा सतूच्या मामाच्या गावाला धावत सुटला असता. आणि पोराला सुखरूप बघून त्याला कवटाळलं असतं. हे बघून सतूच्या मामा-मामी, आजी-आजोबा यांची प्रतिक्रिया तोंडात बोट घालण्याइतकी झाली असती का ? असं राहून राहून वाटतं. 
         आज खूप वर्षांनी चकवा बसला. सचिन पाटील यांनी 'चकवा' कथेतून गावाकडचा चकवा अगदी ओघवत्या शैलीत मांडला आहे. पूर्वी वाहनांची सोय नव्हती. बऱ्यापैकी चालतच बाजार असायचा.  कुठेतरी गावाला जाण्याचा प्रसंग असायचा. किंवा तमाशा,  मेळे, नाटकं बघायला परगावी जाणं असायचं. येताना रात्रीचा  हमखास उशीर. मग काय कथा ऐकाव्या एका एका चकव्याच्या. भुताटकीच्या गोष्टी सगळ्या.  वाचताना मजा आली. आताच्या शहरी  पिढीला चकवा माहीत नाही. भविष्यात खेड्यातलाही चकवा बंद होणार आहे. त्यामुळे ही कथा ग्रामीण लोकजीवनाचा  दस्तऐवजच ठरणार यात शंकाच नाही.
        'वाट' कथा खूप अस्वस्थ करून सोडते. एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात चांगलं पीक यावं की नको असा प्रश्न निर्माण करणारी यंत्रणाच कार्यरत आहे की काय असे वाटते. कितीही लाडकं असलं तरी गुलामी ती गुलामीच असते आणि एखादा गुलाम बंडखोरी करु शकत नाही. केलीच तर काय होते हे लालीच्या रूपात 'मांडवझळ' कथेतून दाखवून दिलंय.
       एकंदरीत सर्वच कथा वाचणीय आहेत. मुखपृष्ठ साजेसे व गवळी प्रकाशनाने काम चांगले केले आहे. एखाद्या कथासंग्रहाच्या तीन आवृत्त्या निघतात आणि मागणी वाढतच राहते यावरूनच 'सांगावा' या कथासंग्रहाची महती कळते. असो... शुभेच्छा..! 

- गौतम कांबळे मुख्याध्यापक काकडवाडी मराठी मुलांची शाळा ता. मिरज जि. सांगली मोबा. ९४२१२२२८३४ ____________________________________ कथासंग्रह : सांगावा लेखक : सचिन वसंत पाटील प्रकाशन : गवळी प्रकाशन इस्लामपूर पृष्ठे १४८ किंमत २२० रूपये २०:५३, २७ फेब्रुवारी २०१८ (IST)२०:५३, २७ फेब्रुवारी २०१८ (IST)२०:५३, २७ फेब्रुवारी २०१८ (IST)२०:५३, २७ फेब्रुवारी २०१८ (IST)गौतम रा. कांबळे (चर्चा) २०:५३, २७ फेब्रुवारी २०१८ (IST)