व्यवसाय किंवा व्यक्ती कडे असणाऱ्या रोख रकमेला अथवा रोख रकमेमध्ये रुपांतरीत करता येणाऱ्या मौल्यवान गुंतवणुकीला तसेच उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या भांडवली गोष्टीना संपत्ती असे वाणिज्यिक भाषेत संबोधले जाते.

प्रकारसंपादन करा

१) स्थिर किंवा अचल संपत्ती (इंग्लिश: Fixed Asset) - व्यवसायाला दीर्घकाळ लाभ देत राहणाऱ्या संपत्तीला स्थिर किंवा अचल संपत्ती म्हटले जाते. स्थिर संपत्ती ची खरेदी विक्री वारंवार होत नाही. तसेच एकदा घेतलेली स्थिर संपत्ती, व्यवसायासाठी अनेक वर्ष वापरता येते.

उदा. स्थावर मालमत्ता, कारखाना, कारखान्याची जमीन,यंत्रे, दिलेली दीर्घकालीन कर्जे, मोठ्या कालावधी साठी गुंतवलेल्या रकमा या स्थिर संपत्ती मध्ये गणल्या जातात .

२) चल संपत्ती ( इंग्लिश : Current Assets ) - अल्पकालावधीसाठी व्यवसायात असणाऱ्या तसेच सहजतेने रोखीत रुपांतरीत करता येणाऱ्या संपत्तीला चल संपत्ती म्हणतात.

उदा. विक्रीचा माल, व्यापारातील ऋणको, प्राप्त विपत्र ( इंग्लिश: Account Receivables)

३) काल्पनिक संपत्ती (इंग्लिश : Fictitious Asset) - ही संपत्ती दृश्य स्वरुपात दाखवता येत नाही किंवा हिची खरेदी विक्री करता येत नाही पण या संपत्तीच्या निर्माणासाठी व्यवसायाला खर्च करावा लागलेला असतो.

उदा. व्यवसाय उभारणीचा प्रारंभिक खर्च, नाममुद्रेची बाजारातील किंमत, महसुली स्वरूपाचे दीर्घकालीन खर्च, भविष्यातील फायद्यासाठी आज केलेला खर्च.

४) शुद्ध संपत्ती (इंग्लिश : Net Worth) - व्यवसायासाठी मालकाने पुरवलेल्या रकमेला भांडवल असे म्हणतात. व्यवसाय सुरु झाल्यावर व्यावसायिक देयतेपेक्षा जास्ती असणाऱ्या रकमेला शुद्ध संपत्ती किंवा मालकाचा निधी म्हटले जाते. संचित रकमांचा (इंग्लिश : Reserves) समावेश सुद्धा शुद्ध संपत्ती मध्ये केला जातो.

द्विनोंदी लेखापालनातील वागणूकसंपादन करा

संपत्तीची खात्यांच्या बाबतीत द्विनोंदी लेखापद्धतीत खालील नियम पाळला जातो.

व्यवसायात येणाऱ्या संपत्तीचे खाते नावे केले जाते (इंग्लिश : Debit what comes in )

व्यवसायातून बाहेर जाणाऱ्या संपत्तीचे खाते जमा केले जाते (इंग्लिश : Credit what comes goes out )

उदाहरणसंपादन करा

१) व्यवहार  :- २००० रुपयांचा माल रोखीने विकला

या व्यवहारामध्ये रोख रकमेचे खाते तसेच मालाचे खाते चल संपत्तीचे खाते आहे. या व्यवहारात रोख रक्कम व्यवसायात आली आणि माल बाहेर गेला म्हणून खाली प्रकारे द्विनोंद केली जाईल

  रोख खाते   रुपये २०००  नावे
  माल खाते   रुपये २०००  जमा

२) व्यवहार  :- ५१२३ रुपयांचा माल अबक कंपनीला उधारीवर विकला.

या व्यवहारात मालाचे खाते चल संपत्तीचे आहे. अबक कंपनीचे व्यक्तिगत स्वरूपाचे आहे. अबक कंपनीला माल उधारीवर मिळाला म्हणजे ती रक्कम येणे आहे. म्हणजेच आपण माल उधारीवर देऊन थोड्या कालवधीत वसूल होणारी मालमत्ता निर्माण केली आहे.

   अबक कंपनी खाते   रुपये ५१२३  नावे
   माल खाते      रुपये ५१२३  जमा