संत सेना महाराज
सेना महाराज हे एक वारकरी संप्रदायातील संत असून त्यांना ज्ञानदेव-नामदेवांच्या परिवारातील मानले जाते.
मध्यप्रदेशातील बांधवगडमध्ये जन्मलेल्या सेना महाराजांचा मूळ व्यवसाय नाभिकाचा. घरात बादशाहाची हजामत करण्याचा मान. शरीराने आपले कर्तव्य पार पाडताना सेना महाराजांचे मन मात्र देवपूजेत रमलेले. अशी एक गोष्ट सांगतात की, एकदा बादशाहाने त्यांना हजामतीला बोलावले. तर सेना महाराज पूजेत रममाण झालेले. तेव्हा बादशाहा चिडला आणि त्याने सेना महाराजांना पकडण्याचे आदेश दिले. तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठलाने बादशाहाची हजामत केली आणि सेना महाराजांना वाचविले. देव आणि भक्त यातील नाते अधोरेखित करण्यासाठी मांडलेल्या या कथेतील भावार्थ समजून घ्यायला हवा.
सेना महाराजांनी आपल्या अभंगातूनही याच भक्तिरसाची उपासना केलेली आढळते. एका हिंदी भाषिक संतांची मराठी भक्तिरचना वाचताना महाराष्ट्र्रातील भक्तांना जरासुद्धा वेगळेपण जाणवत नाही. ज्ञानेश्र्वर, तुकारामाइतकेच संत सेना महाराजांना श्रेष्ठ मानले जाते. संत सेना महाराजांचे अभंग मोठया आवडीने आजतागायत गायले जात आहेत. संतांना प्रदेश, भाषा, जातपात यांच्या मर्यादा नसतात हेच यावरून सिद्ध होते. अतिशय उच्च विचारसरणी व पंढरीनाथावर निष्ठा असणारे हरिभक्त संत सेना महाराज जन्मले महाराष्ट्राबाहेर व घङले महाराष्ट्रीय संताच्या सहवासात, अशी त्याची जीवन यात्रा अखेर पर्यंत चालू राहिली. बऱ्याच दिवसानंतर ते जन्मभूमीकङे सर्वाचा निरोप घेऊन जायला निघाले.
जिथे जन्मलो त्या मातीची ओढ लागली होती त्याच्या पुनरागमनानतंर बाधंवगङला पुनर्वैभव प्राप्त झाले राजा बिरसिंहांनी त्याचे स्वागत केले. गावी आल्यानंतरही ते फारसे कुणात रमत नसत. दृष्टी सतत शून्यात होती. येताना त्या पंढरीनाथाच रूप ङोळ्यात साठवले होते. एकादशीला दिवसभर घरातच चितंनात मग्न राहिले. दुसरा दिवस उजाडला. कुणाशीही न बोलता धोकटी खुंटीला अङकवून तिथेच श्रीविठ्ठलाचे नामस्मरण करत करत समाधी लागली व कुङीतील आत्मतत्त्व अंनंतात विलीन झाले 'जाता पंढरीसी सूख वाटे जीवा' असे म्हणत हा वारकरी संत विठ्ठलचरणी लीन झाला. तो दिवस श्रावण वद्य द्वादशीचा. या दिवशी सेना महाराज पुण्यतिथी पाळली जाते.
चरित्र, काळ, काव्य
संपादनसंत नामदेव, नरहरी सोनार, परिसा भागवत, जनाबाई, चोखामेळा या संतांप्रमाणे संत सेनांचे कोठेही स्वतंत्र, सांगोपांग चरित्र उपलब्ध नाही. समकालीन संतांनी सेना महाराजांचा एक विठ्ठलाचे निःसीम भक्त म्हणून आपल्या अभंगांमधून उल्लेख केला आहे. (संत जनाबाई) शिखांचा धर्मग्रंथ, ‘गुरुग्रंथसाहिब’ या पवित्र ग्रंथात संत सेनांच्या एका पदाचा समावेश केला आहे. त्यांच्या अनेक उत्तरकालीन संतांनी, हिंदी-मराठी संशोधकांनी त्यांच्या काव्याचा अभ्यास मांडलेला आहे.
संत सेना यांच्या जन्मस्थळाबाबत, जन्मकाळाबाबत, अनेक अभ्यासक, संशोधकांमध्ये एकमत नाही. आजही त्याबद्दल अनिश्चितता आहे. शिवाय ते महाराष्ट्रीय की अमहाराष्ट्रीय या बाबतीतही अनेक मतभेद आहेत. पूर्वीपासून वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रीय संतांसमवेत त्यांचे नाव घेतले जाते. त्यांची मराठी धाटणीची, वळणाची, संस्कारांची मराठी कविता (रचना) आज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच उत्तर भारतातील प्रांतात विशेषतः पंजाब, राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश या प्रदेशातील भाषेत त्यांच्या रचनांचा उल्लेख आहे, परंतु मराठीच्या मानाने त्याचे प्रमाण कमी आहे. शिवाय स्वामी रामानंदांचे शिष्यत्व त्यांना लाभल्याने त्यांच्या जन्मठिकाणाबाबत एकमत व्यक्त करणे अवघड वाटते.
संत सेनामहाराज हे आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात उतर भारतामध्ये गेले होते. स्वामी रामानंदांचे शिष्यत्व स्वीकारून त्यांनी पुढे हिंदी रचना केली असावी. संत नामदेवांप्रमाणेच संत सेना यांनी मराठी प्रदेशातून हिंदी प्रांतात जाऊन दोन्ही प्रांतांमधील भाषांमध्ये साहित्य लिहिले आहे.
हे प्रसिद्ध संत सेना महाराज व्यवसायाने न्हावी होते. त्यांचा प्रसिद्ध अभंग:
आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ।।
विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ।।
उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ।।
भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू ।।
चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ।।
सेना महाराजांवरील पुस्तके
संपादन- भगवद्भक्त सेनाजी महाराज गाथा (ज.तु. शेटे व बाबुराव जाधव)
- विवेक आयना (संत सेना महाराजांच्या जीवनावरील कादंबरी, लेखिका - लीला दीक्षित)
- संत सेना महाराज (उन्मेष - वैशाली प्रकाशन,पुणे, २०)
- श्री सेना महाराज (र.रा. गोसावी व वीणा गोसावी)
- संत सेना महाराज (रमेश मुधोळकर)
- संत सेना महाराज (लक्ष्मण सूर्यभान)
- संत सेना महाराज-काव्यदर्शन-समीक्षा आणि संहिता (राजेंद्र वाटाणे)
- श्री संत सेना महाराज चरित्र व काव्य. (मधू जाधव)
- संत सेना महाराजांच्या जीवन चरित्रावर कीर्तन व अभंग गाथा. (निंबराज महाराज जाधव)