श्री.दि. इनामदार (जन्म : खामगाव, ५ फेब्रुवारी, इ.स. १९२८, - ३१ डिसेंबर, इ.स. २०१३) हे एक मराठी कवी आणि बालसाहित्यिक होते. 'मराठवाड्याचे रवींद्रनाथ टागोर', अशी त्यांची ख्याती होती.

श्री.दि, इनामदार यांचे शिक्षण लातूर जिल्ह्यातील खामगाव येथे निजाम राजवटीत झाले. स्टेट बँक ऑफ हैदराबादचे प्रशासकीय सचिव या पदावरून ते १९८७मध्ये निवृत्त झाले. बँकेत अनेक वर्षे नोकरी करणाऱ्या इनामदार यांची २६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांची बालगीतांची, बालनाट्यांची व कवितांची ही पुस्तके अपूर्व आहेत. एकोणीसशे सत्तर-ऐंंशीच्या मुक्त कविता लिहिण्याच्या कालखंडात छंद आणि लय सांभाळणारी कविता श्री.दि. सतत लिहीत राहिले. निसर्ग कविता, पुराणांतील संकल्पनांना घेऊन लिहिलेली कविता हे ‘श्रीदिं’चे वैशिष्ट्य होते.

साहित्य क्षेत्रात नव्याने लिहिणाऱ्यांना श्री. दि. यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. विविध संमेलनांत निमंत्रित कवी म्हणून त्यांचा सहभाग होता. त्यांनी अनेक संमेलने गाजवली. त्यांच्या अनेक कविता शालेय व महाविद्यालयीन स्तरावर अभ्यासक्रमात समाविष्ट होत्या. शिवगान व महावीर चरित्र याच्या ध्वनिफितीही निघाल्या. रामरक्षेचा भावानुवादही त्यांनी केला. साहित्य सेवा प्रकाशन, कीर्ती प्रकाशन व रजत प्रकाशनाने त्यांची पुस्तके प्रकाशित केली.

जिल्ह्यातील श्री. दि. यांच्या पूर्वजांच्या वाड्यात सखाराम महाराजांची समाधी आहे. त्यामुळेच कदाचित संत कविता आणि आध्यात्म्याचा ठसा त्यांच्या कवितांवर उमटत राहिला असावा, असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात. संत परंपरेत स्वतःची कविता कोठे आहे, हे तपासणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.

श्री.दि. इनामदारांची ‘बैलाचे ऋण’ नावाची पाळलेल्या बैलावरची एक कविता बालभारती या शालेय पुस्तकात होती. तिच्या ओळी काहीशा अश्या होत्या :

तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात,
नको करू हेटाळणी आता उतार वयात
नाही राजा ओढवत चार पाऊल नांगर,
नको बोलूस वंगाळ नको म्हणूस डंगर !

कविता आणि पुस्तके

संपादन
  • अपरिग्रहाचा महामेरु
  • गोदावरी (नाटक)
  • चांदोबा ये रे ये (बालगीते)
  • जाऊ अमृताचे गावा (कवितासंगह)
  • झुक झुक गाडी (बालगीते)
  • दिंडी जाय दिगंतरा (कविता)
  • दिवे सोडिले प्रवाही (कवितासंग्रह)
  • नभ मातीच्या कुशीत (कवितासंगह)
  • नाट्यरामायण (नाटक)
  • फूल फुलता राहिना (बालकविता संग्रह)
  • बुद्धिदाता श्रीगणेश (कवितासंग्रह)
  • मुक्तीचा येळकोट
  • शिवगान (कवितासंग्रह)
  • श्रीरामरक्षा (मराठी काव्यानुवाद)
  • सत्यं वद गोदावरी (नाटक)
  • हे माय मातृभूमी (कवितासंग्रह)
  • कैवल्याचे लेणें (पुस्तक)