श्रीमध्वाचार्य किंवा श्रीमदाचार्य (तुळू : संस्कृत : श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्यः (इ.स. १२३८ - इ.स. १३१७) हे तत्त्ववाद वेदान्तमताचे उद्गाते व भारतीय हिंदू धर्मीयांचे तत्त्वज्ञ होते. त्यांनी वेदव्यासांच्या बहुतांश साहित्यावर भाष्य केले. तसेच भगवान व्यासांच्या ग्रंथांची संशोधन करून पाठशुद्धी केली. त्यांनी अनेक प्राचीन ग्रंथांचा शोध लावला. इ.स.च्या १३व्या-१४व्या शतकात धर्मप्रसार व भगवान वेदव्यासांच्या ग्रंथांच्या पाठशुद्धीच्या तळमळीने एकूण तीनवेळा त्यांनी भारत भ्रमण केले. त्यांनी सनातन वैदिक परंपरेचा नेमका प्रसार सातत्याने केला. साहित्य, विज्ञान, संगीत-नृत्य-नाट्य, राजकारण, वैदिक वाङ्मय, स्थापत्यशास्त्र, मूर्तिशास्त्र, भाषाशास्त्र, तंत्र-मंत्राचे शास्त्र इत्यादी अनेक विषयांवर आचार्यांनी त्यांच्या ग्रंथांमधून लिहिले.

श्रीमध्वाचार्य

पलिमार मठ स्थापित कुंजारूगिरि येथील आचार्यांची मूर्ती
पूर्ण नावश्रीमद्‍आनंदतीर्थ भगवत्पादाचार्य:
कार्यक्षेत्र तत्त्वज्ञान,
भाषा संस्कृत
तत्त्वप्रणाली तत्त्ववाद वेदान्तमत
प्रमुख विषय भारतीय वैदिक सनातन तत्त्वज्ञान
प्रसिद्ध लिखाण महाभारत तात्पर्य निर्णय
प्रभाव बादरायण भगवान वेदव्यास
वडील मध्यगेह/नारायण भट
आई वेदवती/सत्यवती

जन्म व बालपण

संपादन

कर्नाटकातील पाजकक्षेत्र या गावी विलंबीनाम संवत्सरातील अश्विन शुद्ध दशमीला झाला. त्यांचे नाव वासुदेव असे नाव ठेवले. त्यांच्या वडिलांचे घर गावाच्या मध्यभागी होते म्हणून तुळू भाषेत त्यांना नडील्लायरू म्हणत असत. याचाच मध्यगेहभट असा संस्कृत अनुवाद केला गेला. त्यांच्या वडिलांचे नाव बहुधा नारायण व आईचे वेदवती अथवा सत्यवती असावे, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

संन्यासाची दीक्षा

संपादन

उपनयनानंतर वयाच्या ११व्या वर्षी वासुदेवाने अच्युतप्रज्ञ यति यांच्याकडून संन्यासाची दीक्षा घेतली. त्यानंतर त्यांचे नाव पूर्णप्रज्ञ असे झाले. पट्टाभिषेक झाल्यावर ते आनंदतीर्थ झाले. इतकी नावे असूनसुद्धा स्वतःचे वैदिक नाव मध्वाचार्य आहे असे सांगितल्याने पुढे तेच नाव रूढ झाले.

भारत भ्रमण

संपादन

मध्वाचार्यांनी प्रथम दक्षिण यात्रेस प्रारंभ केला. रामेश्वरम, अनंतशयन, श्रीरंगपट्टण अशा मुख्य तीर्थक्षेत्री आचार्य गेले. दक्षिणेनंतर आचार्यांनी आपल्या पहिल्या भारत भ्रमणाला सुरुवात केली..भारतातील अनेक तीर्थक्षेत्री भ्रमण करून सनातन वैदिक संप्रदायाचा प्रसार केला. भारत भ्रमणातच आचार्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली. पहिल्या भ्रमणात बद्री येथील आश्रमाला गीताभाष्याची प्रत अर्पण केली. त्यानंतर महाराष्ट्रात गोदावरीकाठी ब्रह्मसूत्रावर प्रवचने आरंभिली. तेथेच त्यांना शोभभट्ट या पंडिताशी ओळख झाली व नंतर तेच आचार्यांचे संन्यासी शिष्य पुढे पद्मनाभतीर्थ म्हणून ख्यात झाले.भारत भ्रमणातच आचार्यांचे अनेक शिष्य झाले. तत्कालीन राजांच्या भेटी घेत मध्वाचार्यांनी त्यांना मार्गदर्शनही केले. संगीत-नृत्य याच्या साथीने भगवंताचे नामसंकीर्तन, गुणसंकीर्तन करत भ्रमण करणे याचा पाया आचार्यांनीच प्रथमतः रचला.

बलोपासनेचे महत्त्व

संपादन

मध्वाचार्यांनी शास्त्राबरोबर प्रसंगी शस्त्र हातात घेता आले पाहिजे अशी शिष्यांची तयारी करून घेतली होती. प्रत्येक शिष्याला मल्लयुद्ध-मुष्टीयुद्धात प्रवीण बनवले होते. राष्ट्र व धर्म रक्षणासाठी बलोपासना गरजेची असून त्याची कास सर्वांनी धरली पाहिजे ही शिकवण आचार्यांनी १३व्या शतकातच दिली.

उडुपी येथे कृष्णमूर्तीची प्रतिष्ठापना

संपादन

कर्नाटकातील उडुपी येथे आचार्यांनी बालरूपातील श्रीकृष्णाची मूर्ती स्थापन केली. मध्वाचार्यांचे चरित्रकार, ही मूर्ती कोठून आली त्याचा उल्लेख करत नाहीत. पण संप्रदायातील एक सत्पुरूष वादिराजस्वामी ही मूर्ती रूक्मिणीपूजित असून द्वारकेहून आली असल्याचे सांगतात. मूर्तीबद्दल व कृष्ण विग्रहाविषयीबद्दल पलिमार मठाच्या रघुवर्यतीर्थांनी देखील लिहिले आहे. खूप वर्षांपूर्वी द्वारकेहून मलपे समुद्रात एक जहाज वादळात सापडून डुबले.. त्यातून पडलेली ही मूर्ती अनेक वर्षे समुद्राच्या पाण्यात बुडालेली होती. समुद् स्नानाकरता गेले असताना आचार्यांना ही कृष्ण मूर्ती सापडली व ती त्यांनी वर काढून उडुपीस आणून स्थापन केली. (ही कथा परंपरेने चालत आली आहे असे मध्वाचार्यांचे चरित्रकार लिहितात.).

शिष्यांना उपदेश

संपादन

मध्वाचार्यांनी कोणताही मठ स्थापिला नाही. मात्र, आचार्यांचे जे अनेक शिष्य होते त्यांच्याच परंपरा पुढे वाढत गेल्या व त्यातून मठ निर्माण झाले. राजाश्रयाने ज्या गावी संन्यासी वास्तव्यास असत त्या जागी इमारती बांधल्या गेल्या व त्या गावांवरूनच मठांची नावे रूढ झाली. आचार्य त्यांच्या एका ग्रंथात स्पष्टपणे संन्यासी शिष्यांना उपदेश करतात की, खांद्याला झोळी लावावी आणि भिक्षा मागावी. त्यातसुद्धा ३,५,६,७ एवढ्या घरांमध्येच जावे. जास्तीत जास्त ७ घरांपुढे भिक्षा मागूनही भिक्षा मिळाली नाही तर तीच भगवंताची इच्छा समजून त्यापुढे ८व्या घरात जाऊ नये. अशी शिकवण आचार्यांनी स्वकृतीने घालून दिली होती. जास्तीची भिक्षा मुक्या प्राण्यांना, गोर गरिबांना द्यावी. आपल्या प्रत्येक कृतीतून नानाविध जीवांची सेवा घडणे ही भगवंताची पूजाच आहे असे समजून ती करत राहावी हा आचार्यांचा संदेश होता.

अखेरचे बद्रीप्रयाण

संपादन

आयुष्याची ७९ वर्षे सनातन वैदिक परंपरेचा प्रसार करून झाल्यावर पिंगलाब्दी संवत्सरातील माघ मासात शुद्ध नवमी तिथीला उडुपीहून बद्रीला जाण्यासाठी मध्वाचार्यांनी अखेरचे प्रयाण केले.

ग्रंथसंपदा

संपादन

आचार्यांनी स्वतःच्या हाताने कोणताही ग्रंथ लिहिलेला नाही. आचार्य सांगत असत व त्यांची शिष्य मंडळी लिहून घेत असत. आचार्यांचे शिष्य श्रीहृषिकेशतीर्थ यांनी आचार्यांच्या काही ग्रंथांचे लेखन केले. ती मूळ हस्तलिखिते आजही पलिमार मठात जतन करून ठेवली आहेत. याबरोबरीनेच आचार्यांचे शिष्य सत्यतीर्थ हे देखील आचार्यांचे ग्रंथ लिहून घेत असत. तसेच पुढे परंपरेत आलेल्या व्याख्यानकारांनी लिहिलेल्या व्याख्यानांतूनही ग्रंथाचे पाठ रूढ झाले आहेत. ग्रंथ संस्कृत भाषेत असून तिगळारी, देवनागरी इत्यादी लिपीत आढळून येतात. आचार्यांनी रचलेले ग्रंथ खालीप्रमाणे -

ब्रह्मसूत्र

संपादन
  • अणुभाष्य
  • अनुव्याख्यान
  • न्याय विवरण
  • ब्रह्मसूत्रभाष्य

श्रीभगवद्गीता

संपादन
  • गीतातात्पर्य
  • गीताभाष्य

उपनिषद

संपादन
  • आथर्वणोपनिषद भाष्य
  • ईशावास्योपनिषद भाष्य
  • ऐतरेयोपनिषद भाष्य
  • कठोपनिषद भाष्य
  • छांदोग्योपनिषद भाष्य
  • तलवकारोपनिषद भाष्य
  • तैत्तिरीयोपनिषद भाष्य
  • बृहदारण्यकोपनिषद भाष्य
  • मांडुक्योपनिषद भाष्य
  • षट्प्रश्नोपनिषद भाष्य

पुराणे

संपादन
  • भागवत तात्पर्य निर्णय

महाभारत

संपादन
  • महाभारत तात्पर्य निर्णय
  • यमकभारत

वेदभाष्य

संपादन
  • ऋग्वेदभाष्य - पहिल्या ४० सूक्तांवर

इतर ग्रंथ

संपादन
  • उपाधि दूषण (खंडन)
  • ॐ तत्सत प्रणवकल्प (यतिप्रणवकल्प)
  • कंदुकस्तुति
  • कृष्णामृतमहार्णव
  • खंडार्थ निर्णय
  • जयंतीकल्प
  • तंत्रसारसंग्रह
  • तत्त्वसांख्यान
  • तत्त्वविवेक
  • तिथी निर्णय
  • द्वादश स्तोत्रे
  • नरसिंह नखस्तुति
  • न्यासपद्धति
  • प्रमाण लक्षण
  • मायावद दूषण (खंडन)
  • मिथ्यात्वानुमान दूषण (खंडन)
  • वाद- तत्त्वोद्योत
  • वाद लक्षण
  • विष्णूतत्त्वनिर्णय
  • सदाचार स्मृति

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन