यवतमाळ जिल्ह्यातील बिटरगावहून चार किलोमीटर अंतरावर, विदर्भ रॉबिनहूड श्यामा कोलामची टेकडी आहे. या टेकडीला भेट देऊनच पैनगंगा अभयारण्याच्या सहलीला सुरुवात होते. यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील निरंजन माहूर येथे जन्मलेला श्यामा कोलाम हा एक सामान्य नागरिक होता. इंग्रजांची जुलमी राजवट आणि गरीब समाजाला लुटणाऱ्या धनाढ्य सावकारांच्या तावडीतून जनतेची सुटका करून घेण्यासाठी त्याने बंड पुकारले. श्रीमंत सावकारांना लुटून ती संपत्ती तो गोरगरिबांत वाटायचा. सावकारांकडून लुटलेले दागदागिने आणि इतर धन तो टेकडीवर ठिकठिकाणी पुरून ठेवत असे. टेकडीजवळील घनदाट अरण्यातच त्याचे वास्तव्य असल्याने ह्या टेकडीला आजही 'श्यामा कोलाम टेकडी' म्हणले जाते. हे गुप्तधन शोधण्यासाठी अनेक लोक या टेकडीवर येत. इंग्रज सरकारचे शिपाईही श्यामा कोलामच्या मागावर ह्या परिसरात नेहमी यायचे.

या टेकडीच्या पायथ्याशीच महानुभाव पंथीयांचे ' मन्याळी खांड ' म्हणून ओळखले जाणारे दत्तमंदिर आहे.