शिवलीलामृत हा श्रीधरस्वामी नाझरेकर यांनी लिहिलेला मराठी काव्यग्रंथ आहे.

श्रीधरस्वामी नाझरेकरांनी लिहिलेल्या शिवलीलामृत या ग्रंथाला २३ फेब्रुवारी २०१९ रोजी ३०० वर्षे झाली. काशी विश्वेश्वराच्या देवळात बसून त्यांनी हा ग्रंथ लिहिला. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील शिवभक्त या ग्रंथाची पारायणे करतात. शिवलीलामृतात १४ अध्याय असून एकूण २४५० ओव्या आहेत. सोवळ्याविना वाचता येईल असा, कोणताही विशिष्ट अध्याय वाचण्याचे बंधन नसलेला, स्त्रियांनाही पारायण करता येईल असा हा लोकप्रिय ग्रंथ आहे. शिवलीलामृताची भारतातील अनेक भाषांत भाषांतरे झाली आहेत. भारतामध्ये छापखाना सुरू झाल्यानंतर म्हणजेच साधारण १८९२ सालापासून हा ग्रंथ छापील स्वरूपात मिळू लागला. त्यापूर्वी त्याची अनेक हस्तलिखिते तयार करण्यात आली असून, त्यांतील काही हस्तलिखिते भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे शिवलीलामृतातील अकराव्या अध्यायाचे भारतभर मोठ्या प्रमाणात पठण केले जाते. अनेकांना हा संपूर्ण अध्याय तोंडपाठ आहे. मराठी भाषेत लिहिलेला हा ग्रंथ कालांतराने अनेक भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आला. या ग्रंथाविषयी आणि श्रीधरस्वामी यांच्याविषयी इतिहास अभ्यासक चिंतामणी नीळकंठ जोशी यांनी विपुल संशोधन केले आहे.

श्रीधरस्वामींचे शेवटचे वास्तव्य पंढरपुरात विठ्ठलाच्या मंदिराजवळ असलेल्या घरात होते. त्याच घरात सध्या (२०१९ साली) त्यांची नववी पिढी राहते आहे. त्यांच्याकडे श्रीधरस्वामींच्या हस्ताक्षरातील शिवलीलामृत आणि मल्हारी माहात्म्य या पोथ्या आजही (२०१९ साली) जपून ठेवलेल्या आहेत.

शिवलीलामृताची सुरुवात अशी आहे :-

ॐ नमोजी शिवा अपरिमिता ।
आदि अनादि मायातीता ॥
पूर्णब्रह्मानंदशाश्वता ॥
हेरंबताता जगद्‌गुरो ॥१॥