डॉ. शांतिस्वरूप भटनागर (जन्म : शाहपूर (आता पाकिस्तानात) २१ फेब्रुवारी १८९४, - १ जानेवारी १९५५) हे भारतीय रसायनशास्त्रज्ञ होते.[] स्वातंत्र्योत्तर काळात भारताचा औद्योगिक विकास होण्याच्या दृष्टीने भारतात राष्ट्रीय प्रयोगशाळांची आणि वैज्ञानिक संशोधन केंद्रांची मालिका स्थापन करण्यात भटनागर यांनी बहुमोल कामगिरी केली. कौन्सिल ऑफ सायन्टिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (सी.एस.आय.आर.)चे ते शिल्पकार होते.

काही पायसांच्या (इमल्शन) भौतिक-रासायनिक गुणधर्मांसंबंधी संशोधन करून भटनागर यांनी १९२१ मध्ये लंडन विद्यापीठाची डी.एस्‌सी. पदवी मिळविली. त्यानंतर ते भारतात परतले व त्यांनी पंडित मदनमोहन मालवीय यांच्या विनंतीवरून त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापकपद स्वीकारले. १९२४ मध्ये ते लाहोर येथील पंजाब विद्यापीठात भौतिकीय रसायनशास्त्राचे प्राध्यापक व तेथील रसायनशास्त्रीय प्रयोगशाळेचे संचालक झाले. १९२६ पासून त्यांनी चुंबकीय रसायनशास्त्रातील संशोधनास प्रारंभ करून या विषयाच्या अभ्यासात उपयुक्त असलेले चुंबकीय व्यतीकरण संतुलनमापक (मॅग्नेटिक इंटरफिअरन्स बॅलन्स) हे उपकरण के. एन. माथूर यांच्या सहकार्याने त्यांनी तयार केलं व त्याचं एकस्व (पेटंट) मिळविले. १९३६ मध्ये त्यांनी स्टील ब्रदर्स या व्यापारी कंपनीला खनिज तेलासंबंधीच्या काही औद्योगिक समस्या सोडविण्यात संशोधन करून बहुमोल मदत केली. या कार्याकरिता या कंपनीनं दिलेल्या मोबदल्यातून भटनागर यांनी पंजाब विद्यापीठात एक खास प्रयोगशाळा स्थापन केली आणि त्यामध्ये केरोसीनचे शुद्धीकरण, गंधहीन मेणाचे उत्पादन, वंगणे व वंगणक्रिया, धातूंच्या क्षरणक्रियेला प्रतिबंधन यांसारख्या विविध समस्यांवर संशोधन केले.

१९४२ मध्ये वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन मंडळाचे रूपांतर 'कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च' या संस्थेत झाले आणि भटनागर यांची या संस्थेचे पहिले संचालक म्हणून नेमणूक झाली. ब्रिटिश सरकारने १९३६ मध्ये, 'ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' व १९४१ मध्ये 'नाइट' हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. १९४३ मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटी व सोसायटी ऑफ केमिकल इंडस्ट्री या संस्थेचा सदस्य होण्याचा त्यांना बहुमान मिळाला. १९५४ मध्ये भारत सरकारनं त्यांना 'पद्मविभूषण' हा किताब देऊन गौरवले.

शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार

संपादन

डॉ. शांतिस्वरूप भटनागर यांच्या नावाने हा पुरस्कार भारतातील कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च संस्थेतर्फे प्रदान करण्यात येतो. भटनागर यांचे पश्चात तरुण भारतीय संशोधक व तंत्रज्ञ यांनी केलेल्या महत्त्वाच्या मूलभूत संशोधनाला योग्य मान्यता मिळवून देण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार दरवर्षी देण्याचा प्रघात सन १९५७ पासून आहे. आजतागायत हा पुरस्कार सुमारे ४५० च्या जवळपास शास्त्रज्ञांना देण्यात आलेला आहे. हा प्रतिष्ठेचा समजला जातो.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ लोकसत्ता दि. ११/१२/२०१४
  2. ^ "लोकमत, नागपूर-ई-पेपर-दि.२७/०९/२०१३,पान क्र.११". 2013-10-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-09-27 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन