शांताराम विष्णू आवळसकर

शांताराम विष्णू आवळसकर उर्फ शां.वि.आवळसकर किंवा अवळसकर हे एक मराठी लेखक होते. यांनी रायगडची जीवनकथा हे पुस्तक लिहिले. मराठेकालीन कोकणच्या इतिहासाची साधनांचा त्यांनी प्रथमच मोठ्या प्रमाणावर उपयोग केला.

शां.वि.आवळसकर
जन्म नाव शांताराम विष्णू आवळसकर
जन्म ९ नोव्हेंबर, इ.स. १९०७
मृत्यू १३ ऑगस्ट, इ.स. १९६३
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म हिंदू
कार्यक्षेत्र इतिहास संशोधन
भाषा मराठी
साहित्य प्रकार इतिहास
विषय मराठेकालीन कोकण
प्रसिद्ध साहित्यकृती रायगडची जीवनकथा
आंगरेकालीन पत्रव्यवहार

कार्य संपादन

आवळसकरांनी तत्कालीन कुलाबा जिल्ह्यात (आताचा रायगड जिल्हा) शिक्षक असताना ऐतिहासिक कागदपत्रे जमविण्यास त्यांनी सुरुवात केली. त्या विषयाची आत्यंतिक गोडी निर्माण झाल्याने तो त्यांच्या अध्ययन - संशोधनाचा विषय झाला. कागदपत्रांचा शोध घेत हिंडणे, जुनी दप्तरे पाहणे, ऐतिहासिक कागदपत्रांच्या नकला करणे, त्या पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाकडे पाठवणे, अन्य संशोधकांबरोबर चर्चा करणे, संशोधित कागदपत्रांना विवेचक प्रस्तावना लिहिणे या प्रकाराची कामे ते करत. भारत इतिहास संशोधक मंडळाशी १९४० पासून त्यांचा संबंध आला. आंग्रेकालीन पत्रव्यवहार, शिवचरित्र साहित्य खंड ९वा (चौल अधिकारी दप्तर), ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड १० इत्यादी त्यांचे लेखसंग्रह भारत इतिहास संशोधन मंडळाने प्रसिद्ध केले.

आंग्रेकालीन अष्टागर, ऐतिहासिक साधने, रायगडची जीवनकथा , नागाव - आर्थिक व सामाजिक जीवन हे त्यांनी काही ग्रंथ आहेत. आवळसकरांनी रायगडाच्या जीवनकथेसाठी परिश्रमपूर्वक माहिती गोळा करून, काही भाग नव्याने उजेडात आणला, १९व्या शतकाच्या अखेरीपर्यंतचा रायगडचा इतिहास त्यांनी या पुस्तकात मांडला म्हणूनच हे पुस्तक महत्त्वाचे समजले जाते.

'नागाव' ह्या ग्रंथात अलिबागच्या दक्षिणेस चार मैलांवर समुद्रकाठी वसलेल्या नागाव या बागायती गावाच्या आर्थिक सामाजिक जीवनाचा प्रकाशित अप्रकाशित साधनांच्या आधारे केलेला अभ्यास दिसतो. त्यांच्या 'कोकणातील ऐतिहासिक (दंत)कथा ' व ऐतिहासिक कथा भाग १, २ या पुस्तकांत मराठेकालीन ऐतिहासिक सामाजिक संस्कृतीचे जिवंत चित्र आढळते.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पोर्तुगीजव्याप्त भूभाग भारत सरकारने पोर्तुगीजांकडून ताब्यात घेतला व आपल्या देशात विलीन केला. त्या वेळी पोर्तुगीज सरकारने भारत सरकार विरुद्ध हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात दावा दाखल केला. त्यावेळी दादरा नगरहवेली व गोवा हे प्रदेश मूळचे भारतीय कसे आहेत, हे सिद्ध करणारे पुरावे शां.वि.आवळसकरबाबासाहेब पुरंदरे यांनी शोधून दिले. त्यामुळे भारताचा दावा आंतरराष्ट्रीय न्यायालयात मान्य झाला.

गतेतिहासाचा शोध घेत असताना राजकीय घटनांच्या अन्वयार्थाबरोबरच तत्कालीन भौगोलिक, आर्थिक, सामाजिक संदर्भ परिश्रमपूर्वक ध्यानात घेत आवळसकरांनी आपली संशोधनदृष्टी किती सूक्ष्म, चौफेर, व्यापक आणि विश्लेषक बनवली होती हे त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांवरून दिसून येते. [१]

ग्रंथसंपदा संपादन

  1. शिवचरित्र साहित्य खंड ०९ - चौल अधिकारी दफ्तर , १९४४
  2. आंगरेकालीन अष्टागर - कोकणच्या इतिहासाची साधने - अधिकारी शकावली, १९४७
  3. आंगरेकालीन पत्रव्यवहार (भा.इ.सं.मं.त्रैमासिक वर्ष २८ अंक ३-४, १९४८)
  4. शिवचरित्र साहित्य खंड १० - कोकणाच्या इतिहासाची साधने, (भा.इ.सं.मं.त्रैमासिक वर्ष ३४ अंक ३-४, १९५४)
  5. ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड १० - कोकणच्या इतिहासाची साधने - दुसरा बाजीराव (भा.इ.सं.मं.त्रैमासिक वर्ष ३७ अंक १-४ , १९५७)
  6. कोकणातील ऐतिहासिक (दंत)कथा , १९६०
  7. ऐतिहासिक कथा , १९६१
  8. रायगडची जीवनकथा , १९६२, १९७४ , १९९५ , २००५ , २००८ [१]
  9. नागाव - आर्थिक व सामाजिक जीवन १७६०-१८४० , १९६२
  10. ऐतिहासिक कथा भाग २ , १९६३
  11. ऐतिहासिक साधने १५८८-१८२१ , १९६३
  12. राय आवळे , १९२४ , १९३७
  13. चंद्रप्रकाश , १९५०

संदर्भसूची संपादन

  • घाणेकर, प्र.के. दुर्गदुर्गेश्वर रायगड.
  1. ^ घाणेकर, २०११ पृ. ३४६-३५२.