डॉ. शशिकुमार मधुसूदन चित्रे (जन्म : ७ मे, इ‌.स. १९३६) हे एक मराठी खगोलभौतिकशास्त्रज्ञ आहेत. ते केंब्रिज, प्रिन्स्टन, कोलंबिया, ॲम्स्टरडॅम, व्हर्जिनिया, लंडन आदी विद्यापीठांमध्ये अतिथी व्याख्याते असून, रॉयल ॲस्ट्रॉनॉमी सोसायटी, इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन यांसह खगोलभौतिकी क्षेत्रातील बऱ्याच प्रतिष्ठित संस्थांचे फेलो आहेत.

१९५६मध्ये मुंबईतील एलफिन्स्टन कॉलेजमधून गणितात पदवी घेतल्यानंतर शशिकुमार चित्रे यांना त्याच वर्षी ड्यूक ऑफ एडिंबरो पाठ्यवृत्ती मिळाली. त्यानंतर ते गणितातील उच्च शिक्षणासाठी केंब्रिज सोसायटी ऑफ बॉम्बेचे स्कॉलर म्हणून पीटरहाऊस, केंब्रिजला गेले. १९५९ मध्ये त्यांनी केंब्रिज विद्यापीठामधून पदवी घेतली. त्यानंतर चर्चिल कॉलेजमध्ये गुलबेनकिअन संशोधन पाठ्यवृत्तीवर काम केल्यानंतर १९६३ मध्ये त्यांनी केंब्रिजच्याच उपयोजित गणित व सैद्धान्तिक पदार्थविज्ञान विभागामधून पीएच.डी पूर्ण केले.

अध्यापनसंपादन करा

१९६३ ते १९६६ या काळात चित्रे यांनी त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ लीड्समध्ये उपयोजित गणिताचे अध्यापन केले. त्या काळात डॉ. चित्रे यांच्या हाताखाली पीएच.डी.चे अनेक विद्यार्थी तयार झाले.

संशोधनसंपादन करा

१९६७ ते २००१ या काळात मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये व्याख्याते असल्याने डॉ. चित्रे यांचे नाव टीआयएफआरशी जोडलेले आहे. निवृत्तीनंतर तॆ मुंबई विद्यापीठातील मौलिक विज्ञान प्रकर्ष केंद्राच्या विद्वत सभेचे अध्यक्ष म्हणून काम करीत आहेत.

डॉ. शशिकुमार मधुसूदन चित्रे यांनी भारतातच राहून खगोलभौतिकशास्त्रात संशोधन करण्याचा वसा घेतला आहे. सौरभौतिकशास्त्र, भौतिकशास्त्र, खगोलभौतिकशास्त्र हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत. सूर्यावरील काळे डाग, त्यावरील चुंबकीय बदल, सौरवादळांच्या प्रक्रिया, कृष्णविवरे अशा विविध विषयांवर त्यांनी संशोधन केले आहे.

डॉ. शशिकुमार चित्रे यांना मिळालेले पुरस्कारसंपादन करा

  • विज्ञान क्षेत्रातील विविध सन्मान
  • पद्मभूषण पुरस्कार (२०१२)
  • कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार (२०१६)