शमा पक्षी २५ सें. मी. आकाराचा असून दयाळ (पक्ष्याच्या) जातकुळीतला आहे. नराचे डोके, पाठ ते शेपटीपर्यंत वरचा भाग तसेच खालून छातीपर्यंतचा भाग काळा, पोट ते त्याखालील भाग गडद नारिंगी रंगाचा, शेपटीत पांढरी पिसे. मादी नरासारखीच फक्त रंग फिके.

शमा (पक्षी)
शास्त्रीय नाव सॅक्सीकोलॉईडस फुलीकॅटस
(Copsychus malabaricus)
कुळ जल्पकाद्य
(Muscicapidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश
(White-rumped Shama)
हिंदी शमा

शमा पक्षी भारतभर सर्वत्र दिसतो तसेच बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका या देशातही याची वसाहत आहे. याच्या रंग आणि शेपटीच्या लांबीवरून किमान चार उपजाती आहेत. जंगलातील झुडपी भाग, खडकाळ भाग, मोकळ्या ओसाड बागा अशा ठिकाणी, एकाकी राहणे याला पसंत आहे, दयाळ पक्ष्यासारखे माणसाच्या जवळ येत नाही.

शमाचे मुख्य खाद्य कीटक आहे. तो चपळपणे जमिनीवरचे किंवा झुडपातील कीटक पकडून वेगाने एखाद्या सुरक्षित जागी जाऊन बसतो. एप्रिल ते जून हा काळ वीण हंगाम असून बांबुची पाने, गवत वगैरे वापरून तयार केलेले छोटे घरटे बांबुच्या रांजीत किंवा झाडाच्या ढोलीत असते. मादी निळसर हिरव्या रंगाची त्यावर लाल-तपकिरी ठिपके असलेली ३-४ अंडी देते. अंडी उबविण्याचे काम फक्त मादी करते, पिलांना खाऊ घालण्याचे काम नर-मादी मिळून करतात.

शमा पक्ष्याचा आवाज मोठा आणि मंजुळ आहे व यामुळे याला पकडून पिंजऱ्यात ठेवण्याचा कल आहे.

चित्रदालन

संपादन