वेध (पुस्तक)

(वेध, पुस्तक या पानावरून पुनर्निर्देशित)

वेध: बाबाचं मला सगळ्यात आवडणारं पुस्तक म्हणजे वेध! हे त्याचं पहिलं वहिलं आणि आतून आलेलं लिखाण. त्याच्या गद्धेपंचविशीत पोटतिडकीनं लिहिलेले लेख. आपल्या लिहिण्यानी कुणाला काय वाटेल याचं अजिबात ओझं न घेता बेधडकपणे लिहिलेलं. आणि त्यामुळेच मनाला भिडणारं.

लोकमान्य नगर मधे शेजारी रहाणारे ‘सकाळ’चे जेष्ठ पत्रकार मो. स. साठे ह्यांनी बाबाला लिहायला प्रोत्साहन दिलं. ‘जसं सांगतोस तसं लिहायचं’ असं सांगितलं. सुरुवातीला काहींनी बाबाच्या लिखाणावर ‘शैली नसलेली शैली’ अशी टिपण्णी केली; पण हळूहळू ती ‘अनिल अवचट’ शैली बनून गेली. आणि त्या ‘जणू-वाटे-गमे-भासे’च्या काळात ती शैली जास्तच उठून दिसली. तेव्हाचे बोली भाषेतले काही इंग्रजी शब्द वेधमधे सरळ देवनागरीत लिहिले आहेत. आता ती पद्धत रुळून गेली आहे, पण तेव्हा ते नवे होते.

१९६७-६८ च्या सुमारास पु.लंच्या पुढाकारानी पुण्यात बालगंधर्व रंगमंदीर बांधलं गेलं. तेव्हा तिथली उठवलेली मांगांची वस्ती, त्यांना न दिलेली पर्यायी जागा, बांधकामासाठी केलेला खर्च, ह्या सगळ्याच्या विरोधात बाबानी साधना साप्ताहिकात छापण्यासाठी संपादक यदुनाथ थत्ते यांना एक पत्र नेऊन दिलं. ते छापून आलं.

त्याच विषयावर अजून लिहावसं वाटलं म्हणून बाबानी अजून एक पत्र लिहिलं. ते तर छापून आलच; शिवाय यदुनाथ थत्ते यांनी बाबाला दर आठवड्यात लिहायला सांगितलं, आणि वेधची मालिका तयार झाली. ह्या मालिकेत अनेक मान्यवर व्यक्तींवर किंवा स्वतःला उच्चभ्रू समजणाऱ्या व्यक्तींवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तिरकसपणे लिहिलेलं दिसतं. पण ते जसं दिसलं तसं लिहिलेलं असल्यामुळे त्यावर कुणी टिकाही करू शकलं नाही. उलट आज ते वाचताना हसूच येतं. असं वटतं की हे विचार अनेकांच्या मनात येत असतील, पण ते इतके बेधडकपणे कागदावर उतरत नसतील. त्यामुळे अनेकांना ते आपलेसे वटतात. शिवाय बाबाच्या भाषेतल्या तिरकसतेबरोबर त्याच्या मनातली अस्वस्थता, एक तरुणाई, शोधक व्रुत्ती, कुतुहल, सरळ स्वभाव अशा अनेक गोष्टी दिसून येतात. आणि इतक्या छोट्या छोट्या लेखांमधूनही त्यातल्या मर्मीक भाषेमुळे आपल्याला खूपसा तपशील कळतो.

वेध मधला एक लेख क्रिकेट विषयी आहे. क्रिकेटचं सर्व वयोगटातल्या माणसांना असलेलं वेड, मॅच असल्यावर कामधाम सोडून ऐकलेली कॉमेंट्री, अशावेळी इतर बातम्यांकडे झालेलं दुर्लक्ष इत्यादी. तसच भारतीय खेळ कसे मागे पडत आहेत हे ही त्यात लिहिलं आहे. हा लेख अकरावीच्या मराठीच्या पुस्तकात एक धडा म्हणून निवडला होता, तेव्हा सगळे विध्यार्थी ह्या धड्यावर खूपच खार खाऊन असायचे! फ़क्त विध्यार्थीच नाही, तर शिक्षकही! क्रिकेट बद्दलचा विरोध त्यांना पचायचा नाही. बाबाला जेव्हा जेव्हा कुठल्याही कॉलेज मधे भाषणासाठी बोलवायचे, तेव्हा मुलं ह्याच विषयी त्याला प्रश्न विचारायचे. आज हा विचार करताना हसू येतं. आता तर टेस्ट मॅच वरून वन-डे, वन-डे नंतर २०-२०, त्यातही राजकारणी मणसे, सामील असलेले नेते, मॅच फ़िक्सींग अशी क्रिकेटची उत्क्रांती झालेली आहे!

वेध पुस्तक लिहून आता ३८ वर्ष झाली, तरी काही गोष्टी अजून तशाच दिसतात. आपल्याला वाटतं की भारतातलं कॉम्प्युटरचं आगमन, आय.टी.ची सुरुवात आणि त्यातली प्रगती, इतर यशस्वी उद्योग, सहज परदेशी शिक्षण आणि लोकांचे भरपूर पैसे कमावणे ह्यामुळे आपल्या देशाची केवढी भरभराट झाली आहे! मान्य आहे, भरभराट आहे, पण पूर्वीचेच प्रॉब्लेम्स, पूर्वीच्याच मनोव्रुत्ती आता वेगळ्या तऱ्हेने पुढे येत आहेत.

त्यावेळी भरलेल्या देशस्थ ब्राम्हणांच्या सम्मेलनाविषयी, सी.के.पींच्या सम्मेलनाविषयी सडकून टिका करणारे लेख ह्या पुस्तकात आहेत. त्यावर बाबानी झकास विनोदी अंगाने सुद्धा लिहिले आहे. पण आता तर सगळ्या पोटजातींचीही सम्मेलने भरतात. नुकतच पुण्यात झालेलं चित्पावन महासम्मेलन हे त्याचं ठळक उदाहरण. ‘आले रे आले, कोब्रा आले’ अशा घोषणा देत जाणारे कोकणस्थ, आणि ‘जगात फ़क्त दोन जाती आहेत; एक कोकणस्थ आणि उरलेले बाकी सगळे’ हे चर्चा करतानाचं ब्रीदवाक्य, आणि सम्मेलनात एक लाख कोकणस्थांची उपस्थिती ही प्रगती म्हणायची की अधोगती?

गणेशोत्सवात आणि साहित्य सम्मेलनात शिरू पहाणारे राजकारण या विषयी वेध मधे लेख आहेत. आजच्या युगात तर राजकारणाशिवाय ह्या उत्सव-सम्मेलनांची पाने हलत नाहीत! शिवाय त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवद्णुका झाल्या, की ‘नेमेची येतो पावसाळा’ प्रमाणे येणारे टिकात्मक लेख!

वेध मधे काही लेखांमधे विनोदाची झालरही दिसते. एक सत्याग्रहाविषयीचा लेख आहे. त्यात तेव्हा घडणारे अनेक विनोदी – जे एरवी गंभीर असायला पाहिजेत, असे प्रसंग आहेत. आणि ते लिहायला सुचणं हे मुख्य.जसे की – “सत्याग्रहाच्या वेळी बाजूने एक एल. आय.बी.चा सध्या वेषातला शिपाई चालला होता. त्याने थांबवले. ‘का हो डॉक्टरसाहेब, ह्या सगळ्या गडीमाणसांसाठी हे पोलीस आणले, बायकांसाठी खास स्त्री-पोलीस आणले’ -आणि मग थांबून काही स्त्री-वेषातल्या हिजड्यांकडे बोट दाखवून व गालातल्या गालात हसून म्हणाला, ‘पण यांची व्यवस्था काय?’ आम्हीही हसलो. कोणाचे काय अन् कोणाचे काय. लोकांच्यापुढे राहायच्या झोपड्यांचा प्रश्न,पुढाऱ्यांपुढे त्यांचे किंवा त्यांच्या पुढारीपणाचे प्रश्न, कमिशनरांच्या पुढे या सगळ्या झोपड्यांची कटकट कशी घालवावी हा प्रश्न. तर एल. आय.बी वाल्यांपुढे या हिजड्यांचे काय करायचे हा प्रश्न! आमच्यापुढे, आपण दुपारपासून इकडेच असल्याने आपण चहाच घेतला नाही हा प्रश्न उभा राहिला, आणि त्या दिशेने वळलो.”

वेध मधले काही लेख वाचताना, ‘तो काळ आता गेला’ असही मनात येतं. भारतात अजूनही गरीबी असली, दारिद्र्यरेषेखालचा समाज असला तरी मध्यमवर्गीयांची परिस्थिती सुधारलेली दिसते. मध्यमवर्गीयांचे आता उच्च्य-मध्यमवर्गीय झाले आहेत. ड्रायव्हर, कामवाल्या बायका, रंगारी, भाजीवाले यांच्याकडेही आता मोबाईल, टी व्ही, फ़्रीज, ह्या गोष्टी असतात. त्याच प्रमाणे शिक्षणातली सजगता दिसते. इंटरनेटमुळे तऱ्हतऱ्हेची माहिती आपल्या पर्यंत पोचते.

तेव्हा लिहिलेल्या ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे’ स्वरूप आता बदलले आहे. पूर्वीपेक्षा सुधारणा आहे, पण आता झालेल्या त्यच्या ‘अति व्यावसायिक’ आणि पुणेरी स्वरूपावर एक वेगळा लेखच होईल!!

हे सगळं असलं तरी वेध मनाला भिडतं ते भिडतच!! आता फ़क्त बाबाला एवढच सांगावसं वाटतं, की ‘वेध भाग-२’ लिहायची वेळ आली आहे!!!